सोमवार, २७ फेब्रुवारी, २०२३

सापळा

बाहेर रखरखीत ऊन होते, पण या दाट कोंडलेल्या अंधारात कोठे प्रकाशाचा कण नव्हता. हात पुढे करून चाचपडत प्रवासी थोडा पुढे सरकला, पण पायाखालची जमीन काचेची असल्याप्रमाणे निःशब्द, विलक्षण गुळगुळीत भासताच त्याच्या मनात भीती निर्माण झाली व तेथूनच मागे वळून निसटावे, असे त्याला वाटले. पण तेवढ्यात अनेक ठिकाणी तेजस्वी प्रकाशाचे पंखे उमटले, आणि त्या प्रकाशात भोवती पाहाताच विलक्षण भयाने त्याच्या अंगातील शक्तीच ओसरून गेली. भोवती इंद्रजाल निर्माण झाल्याप्रमाणे त्याच्याच सहस्र आकृती उमटल्या. त्याने बावरून डोळ्यांवर बोटे धरताच कानाकोपऱ्यात अनंत हालचाली झाल्या व प्रकट झालेल्या आकृत्यांनी निरनिराळ्या तर्‍हांनी बोटे उचलली. कारण भोवती सर्वत्र निरनिराळ्या कोनांत बसवलेले, छतापर्यंत पोहोचलेले भव्य आरसे होते. सर्वत्र प्रकाश होता, पण तो नेमका कोठून येत आहे हे समजत नव्हते. आणि या सार्‍यावर धुपाचा गंध असलेल्या धुराचे तलम पदर तरंगत होते. प्रवाशाने सारे धैर्य एकवटले व तो मागे वळून धावला. तोच दोन आरसे सहजपणे त्याच्या समोर सरकले व त्यावर आदळून प्रवासी मागे फेकला गेला.

रमलखुणा

आता भोवतालच्या आकृतींत शिकाऱ्याचे चित्र हजारपटीने उमटले. तो मोठमोठ्याने हसू लागताच ती चित्रे देखील अनेक तोंडांनी हसू लागली व सारा वाडा त्या हसण्याने भरून गेला.

"आता तो मार्ग बंद झाला !" दूर कोठून तरी शिकारी म्हणाला. “हे आरसे अनेक तर्‍हांनी सरकतात व तुला कुठंही वीसपंचवीस पावलांखेरीज चालता येणार नाही. आज मी इतकी वर्षे या वाड्यात काढली, पण दरक्षणाला हा व्यूह रचणाऱ्या माझ्या गुरूच्या कल्पनाशक्तीची मला धन्यता वाटते ! इथून निघायचा मार्ग माहीत असलेला मीच एकटा उरलो आहे !"

"म्हणजे मला तू कपटानं इथे आणलंस तर !" प्रवासी विषादाने म्हणाला, पण त्याचा आवाज भीतीने दुबळा झाला होता.

“नाही; माझा प्रत्येक शब्द सत्य होता. मी दिलेलं वचन पाळायला पूर्ण तयार आहे." शिकारी म्हणाला. “तुला खायला रुचकर पदार्थ मिळतील. मी सांगितल्याप्रमाणे तुला हरिणाचं, मोराचं मांस देखील मिळेल. एवढंच नाही तर खालच्या तळघरात का होईना, पण तुला जन्मभर ऐषआरामात जगता येईल. पण त्याबद्दल माझी एक लहानशी अट आहे. मला त्यासाठी तुझे डोळे काढावे लागतील."

"काय ? आणि मूठभर अन्नासाठी मी जन्माचा आंधळा होऊ ? अशक्य !" आवेशाने प्रवासी म्हणाला.

आरशांचे कोन बदलले व काही आरसे नीरवपणे सरकले. शिकारी आता जवळच कोठेतरी उभा असल्याचा भास झाला. अनेक ठिकाणांहून त्याचा हात हलला. प्रवाशाकडे बोट रोखून तो म्हणाला,

"साध्या क्षुल्लक गोष्टीविषयी तू वेडेपणा करू नको! मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो. डोळे काढताना विशेष यातना होत नाहीत. आणि दृष्टी गेल्यानं काही नुकसानही होणार नाही. उलट तुझी दृष्टी जास्त निवळेल, तुझ्यासमोरील एक आभास कायमचा नाहीसा होईल. एक पायरी चढून तू जास्त खर्‍या गाभ्याकडे येशील. असं पाहा, आता तू डोळे असताना एक वस्तू लाल रंगाची आहे असं म्हणतोस. पण हा लाल रंग म्हणजे काय ? केव्हाचा ? सकाळचा सोनेरी प्रकाश पडला की एक रंग, दुपारी एक रंग ! पाण्यावरच्या छटा कशा झरझर बदलतात, हे तू कधी पाहिलं नाहीस ? मग चांदण्यात पाण्याचा रंग कसा ? आणि सर्वत्र अंधार पडला की तुझा तो रंग कुठं जातो ? अरे वेड्या, या डोळ्यांमुळंच तुझ्याभोवती अनंत फसवी प्रतिबिंब निर्माण होतात आणि मग हे खरं— नव्हे ते खरं, असं म्हणत तू आयुष्य उधळून टाकतोस. आताच बघ, तुझ्या पाठीवर एक मोठी, काळी पाल आहे—

प्रवाशाने चटकन उडी मारली व निरनिराळ्या प्रतिबिंबांत स्वतःकडे निरखून पाहिले. पण पाठीवर काही नाही म्हणताच त्याला हायसे वाटले पण शिकारी मात्र अनावरपणे हसू लागला व त्याच्या हसण्याचा आवाज मंद पसरत असलेल्या धुपाच्या वलयांबरोबर तरंगत राहिला.

"घाबरू नकोस ! इथं पाल, सरडा राहू देच, पण एका चिलटालाही प्रवेश मिळणार नाही !" शिकारी म्हणाला. "पण पाहिलंस? एवढी साधी गोष्ट समजावून घ्यायला देखील तुला प्रतिबिंबालाच विचारावं लागतं. आणि ज्या डोळ्यांनी तू प्रतिबिंबांना शरण जातोस, त्यांना स्वतःचं रूप पाहायला देखील एका प्रतिबिंबाचीच गरज असते. मग तुला काय उपयोग आहे असल्या दुबळ्या फसव्या इंद्रियाचा ?"

"मी इथं दिव्यांचा स्वच्छ प्रकाश निर्माण केला, तो कशासाठी ? माझ्यासाठी नव्हे, तर तुझ्यासाठी. मी स्वतः आता प्रकाशमुक्त असल्यानं त्या रंगीत कारागृहातून सुटलो आहे. पण तू मात्र भोवती पाहा. अनंत रेषेपर्यंत ही प्रतिबिंबांची गर्दी तुला दिसेल. व त्यात देखील एकाचं आणखी एक, त्या दोघांची अनेक, अशी भुतावळ तुला दिसेल. शिवाय तुझा डोळा म्हणजे देखील एक आरसाच ! आरशातील प्रतिबिंब पाहाणारा एक फसवा आरसाच ! आणि या मायाबाजारात एकेक वस्त्र बाजूला करत सत्याकडे जाऊ पाहाणारा तू वेडा तर नाहीस ना? तू कोण आहेस एवढं तरी कधी तुला तुझ्या डोळ्यांनी समजावून दिलं आहे का ? या विविध प्रतिबिंबांपैकी तुझं खरं प्रतिबिंब कोणतं ? ते किती वेळ स्थिर राहतं ? की तू दरक्षणी बदलणाऱ्या प्रतिबिंबाबरोबर नाचरेपणानं स्वतः बदलत असतोस ? या अगणित प्रतिबिंबाची जर बेरीज करता आली, तर त्यातून तू निर्माण होशील का ?

हे झालं तुझ्यासारख्या एका बिंदूप्रमाणं असलेल्या एका व्यक्तीविषयी. मग तुझ्या भोवतालच्या, तुला ज्ञात झालेल्या जगाविषयी तर पाहायलाच नको ! एखाद्या चित्रनळीत किंचित हालचालीनं चित्रं बदलतात, तसं सारं गारुड घडत असतं. आधीच आपण एखाद्या आरशातील पडछाया, आणि खेळ पाहातो तो देखील छायांचाच ! युद्धक्षेत्रावर तुंबळ युद्ध होतं व अठरा अक्षौहिणी सैन्य नाश पावतं. एक असामान्य सुंदरी कुंडलं हलवत डोळे मोडते व तिच्या चेहर्‍यासाठी हजार तारवं समुद्रात ढकलली जातात, आणि आभाळाला भिडलेल्या मनोऱ्यांची नगरं अग्नीत नष्ट होतात. एक सिंहासन वर येतं, दोन साम्राज्यं नष्ट होतात. लक्षावधी घोडे उजाड माळावरून वणव्याच्या लाटेप्रमाणे धावू लागतात व खंड बेचिराख होतात ! प्रतिबिंबांचा प्रतिबिंबांशीच संघर्ष ! आरशातील उत्पात आणि कल्लोळ ! मग या साऱ्यांविषयी कोणीतरी गातं, लिहितं. पुन्हा छायेची आणखी पडछाया ! आणि ते आम्ही भाबडी माणसं वाचतो व त्याची छाया कवटाळून अभिमानाने जगतो.

फेसाच्या एका बुडबुड्यातून दुसऱ्या बुडबुड्यात जाताना आपण विश्व पादाक्रांत करीत चाललो आहोत, असं मानणारे आपण किती वेडे आहोत, नाही ? बरं, ही सारी प्रतिबिंबं पायाखाली तुडवून नष्ट करण्याचं तांडवसामर्थ्य तरी आपल्यापैकी एकात आहे ? छट ! उलट, त्या जाळ्यात सापडून संपून जाण्यातच आपल्याला धन्य वाटतं ! पण छायांचं हे विश्व नष्ट करण्याचा एक सोपा मार्ग आपल्या हातात आहे, तो म्हणजे डोळे काढून टाकणं !

माझ्या गुरूनं हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी देखील तुझ्यासारखाच उसळलो होतो. पण आता बघ. माझ्यासमोर गडद काळा पडदा आहे, त्यामुळे वस्तू सूर्यप्रकाशाबरोबर छिनाल होऊन बहुरूपी होत नाहीत. दृष्टी आत वळते. सत्याचं स्वरूप एक आवरण निघाल्याप्रमाणे जास्त उजळ होतं. मला दृष्टी नाही, परंतु मला तुझ्या अतिसूक्ष्म हालचाली देखील जाणवतात; मी किंचित आवाज देखील टिपू शकतो. डोळे असते तर हे सूक्ष्म ध्वनी मला जाणवलेच नसते. जितकी ज्ञानेंद्रिय जास्त तेवढी प्रतिक्रिया खंडित, दुबळी, विस्कळित होते. असा एक काळ यायला हवा, की ध्वनी, स्पर्श, गंध ही देखील पूर्णपणं झिडकारून टाकायला हवी. मनात मग फक्त उत्कट संवेदना, बुद्धीची निरंजन ज्योत यांनीच एकमेकांशी संवाद साधला पाहिजे.

पण हे फार दूरचं स्वप्न आहे. आज माझा प्रयोग केवळ दृष्टीविषयी आहे. विचार कर आणि निर्णय घे. तुला यातना होणार नाहीत, तुला पुढील आयुष्याची विवंचना पडणार नाही, याचं मी तुला आश्वासन देतो. मला प्रथम इथं आणलं तेव्हा मला असंच वचन मिळालं व ते शेवटपर्यंत पाळलं गेलं. मी देखील शपथ देऊन ते पाळीन. जर समजूतदारपणानं वागलास तर आजचा दिवस दोघांनाही अत्यानंदाचा होईल, कारण तू माझा शंभरावा अतिथी आहेस. इतर वेळी मला एकाकी वाटसरू, गुराखी, धनगर यांच्यावर अवलंबून राहावं लागलं; पण तुझ्या बोलण्याच्या आवाजावरून तू निराळा जाणवतोस. तुझ्या याचनेत देखील ताठरपणा होता. शंभराव्या प्रसंगी तू यावास हे माझं भाग्यच आहे. ही देणगी मला प्राणमोलाची आहे. तेव्हा तुझा निर्णय काय आहे ते सांग."

"छट ! ते कदापी शक्य नाही ! " प्रवासी अनावरपणे ओरडला. पण त्याची दृष्टी समोरील कोपऱ्यात होती. तेथील अंध शिकाऱ्याची आकृती कमी रेखीव पण जास्त गोलाकार होती. प्रवाशाने काळजीपूर्वक आपली फरशी उचलली व वेगाने तिकडे फेकली. पण ती पंधरावीस पावलेही पुढे न जाता एका आरशावर आदळली व खाली पडली.

"म्हणजे तुझ्याजवळ काहीतरी अस्त्र आहे तर!” शिकारी म्हणाला. "पण एक गोष्ट आताच ध्यानात घे. या आरशांवर कसल्याच लोखंडी आयुधांचा परिणाम होत नाही. दुसरं, मी तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा राहायला वेडा नाही ! असा मी ज्या वेळी तुझ्यासमोर प्रत्यक्ष उभा असेन, त्यावेळी माझी सुरी प्रथम तुझ्या छातीत रुतून तू आडवा झालेला असशील ! पण तोपर्यंत तुला प्रतिबिंबांशीच लढत राहावं लागेल. आणि वेड्या, प्रतिबिंब फसवी असतात, म्हणून तर ती डोळे असणार्‍यापुढं अमर असतात ! ठीक आहे, जर तू विचार करून हा निर्णय घेतला असशील तर माझा नाइलाज आहे. मी तुला सांगितलं की, मी शिकारी आहे. मी स्वतः हरीण, मोर असल्या क्षुद्र शिकारी करत नाही. मी शिकार करतो ती माणसांची ! सावजाला पूर्ण सावध करून, इशारा देऊन ! आता मात्र तू सावध राहा ! कोणत्याही क्षणी तुझ्या मृत्यूचा क्षण येईल ! तू तयार आहेस ?"

त्याच्या बदललेल्या स्वरातील भयानक कठोरपणा ऐकून प्रवाशाच्या अंगावर काटा उभा राहिला. त्याने पुढे सरकून आपली फरशी झटकन उचलली व एका कोपर्‍यात आसरा घेतला.

"आता तू पुढं सरकला आहेस, तू तुझं अस्त्र उचलून घेतलं आहेस, पण तुझ्या हालचालीत विलक्षण भय आहे." दुरून कोठेतरी शिकारी म्हणाला. एका आरशातील प्रतिबिंबात सुरी घेतलेला एक हात पुढे होताच अनेक प्रतिबिंबांनी अनुकरण केले. दुसऱ्याच क्षणी एक सुरी वेगाने प्रवाशाच्या दिशेने आली व अगदी त्याच्या गळ्याजवळून सरकून मागच्या आरशावर आदळून खाली पडली. प्रवाशाने कोपर्‍यात अंग आकसले, व भराभर दोन आरसे सरकवून तो सावधपणे उभा राहिला.

"आता तू दोन आरसे सरकवून उजवीकडे आला आहेस व तुझा श्वासोच्छ्‌वास वेगानं होत आहे." शिकारी म्हणाला. त्याच्या शब्दांमागोमाग एक सुरी आली व प्रवाशाच्या कमरेला ओझरता स्पर्श करून पायावर पडली.

प्रवाशाचा पीळ आता सुटत चालला व तो बेभानपणे आरसे सरकवत, काही वेळा त्यांच्या फटींतून, सैरावैरा धावू लागला. त्याचा चेहरा श्रमाने, भीतीने ओलसर झाला व त्याने हातपाय कापू लागले. शिकारी कोठे तरी पुढे सरकला व त्याची आकृती हताश होऊ लागलेल्या प्रवाशाभोवती उमटली. प्रवाशाने श्वास रोखून धरला व हलकेच अंग खाली सरकवत तो जमिनीवर पसरला व स्तब्ध झाला.

"ठीक आहे, तुझं त्राण संपत आलं आहे. मलाही आता घाई नाही. मी वाट पाहीन. तासन्‌तास वाट पाहण्याचा गुण असल्याखेरीज माणूस कधी शिकारी होतच नाही !"

भोवतालची त्याची प्रतिबिंबे नाहीशी झाली व काही आरसे सरकले. प्रवासी अगदी गोठल्याप्रमाणे निश्चल पडून राहिला व त्याने ओलसर चेहरा पुसून घेतला. आता छतावरील आरशातील प्रतिबिंब तेवढेच त्याला पूर्णपणे साक्षी होते. पण या पूर्ण हताश क्षणी त्याचे मन मात्र पूर्ण स्वच्छ होते. येथून सुटण्याचे अनेक मार्ग त्याच्या दृष्टीसमोर आले, पण सगळेच प्रतिबिंबाप्रमाणे क्षणभर दिसून नाहीसे झाले. हात वर करताच विविध पडछायांनी साद देणाऱ्या उंच गुळगुळीत भिंती अगदी वरपर्यंत पोहोचल्या होत्या व त्यावर माशी देखील सरकू शकली नसती. आधारासाठी त्यांच्यात कोठे खिडक्या, कोनाडे, खुंट्या असण्याची शक्यता नव्हती. पण भोवती, वर मार्ग नसला, तरी तो खाली निघणार नाही कशावरून ! त्याला या कल्पनेने किंचित उत्साह वाटला व उठून बसला. पण त्याबरोबर कोपऱ्या-कोपऱ्यात आपणावर पाळत ठेवणारे अनेक पहारेकरी देखील उठून बसले, हे पाहून तो एकदम भेदरला व पुन्हा आडवा झाला. मग त्याला जाणवले— हे पहारेकरी नव्हेत; ही आपलीच चित्रे आहेत ! आपण साधी हालचाल देखील हजार अंगांनी करत आहोत ! त्याने चेहरा पुन्हा कोरडा केला व गुळगुळीत जमिनीवर तीनचार ठिकाणी हलकेच फरशी आपटून पाहिली.

“नाही. तिथं तुला मार्ग मिळणार नाही. तिथे सगळीकडे पाचसहा हात खडक आहे." दूर कुठेतरी हसत शिकारी म्हणाला.

त्याबरोबर श्वास रोखून प्रवासी कोपऱ्यात अडकलेल्या श्वापदाप्रमाणे निश्चल झाला व त्याचे मन मूढ बनले. त्याला वाटले, वधिकाचा नाश करण्यास समर्थ ठरलेली फरशी, निर्जीव प्रतिबिंबांनी वेडावणाऱ्या या आरशांपुढे दुबळी ठरली ! या क्षणी त्यांच्यात खिंडार निर्माण करू शकणारी वस्तू अष्टभुजेच्या रत्नापेक्षाही अमूल्य आहे ! आणि त्या रत्नासाठी आपण अर्धा देश तुडवला, प्रवास केला !

आधी एका कस्तुरीमृगासारख्या स्त्रीसाठी जीव पणाला लावून भ्रमंती केली. नंतर त्या तेजस्वी रत्नासाठी आयुष्य वार्‍यावर सोडले ! म्हणजे परवाचे स्वप्न आज नाही, आजचे स्वप्न आता नाही. उसळत्या तारुण्यात स्त्रीची अभिलाषा; दारिद्र्यात रत्न मूल्यवान; भुकेच्या वेळी रत्नापेक्षा बोर मूल्यवान; आणि आता एका तरी आरशाला तडा पाडू शकेल असले आयुध मूल्यवान ! म्हणजे आपली सारी स्वप्ने म्हणजे फक्त भोवतालच्या स्थितीमुळे आपल्यावर चढलेला बुरखा आहे आणि तो गोळा करत त्यावर जगणारे आपण दोन पायांचे अहंमन्य कीटक ! प्रतिबिंबच का होईना, पण अभंग श्रद्धेने ज्यापुढे हा शरीराचा मांसाच कपटा फेकून द्यावा, असे प्रतिबिंबदेखील आपल्या वाट्याला येत नाही. एखाद्या झगझगीत हिरव्या खड्यासाठी एकदा प्राण पणाला लावावेत, तर एकदा एक निरुपयोगी बीच्या भोवती असलेल्या नखभर गरासाठी ते धपापू लागावेत, आणि आता शून्याच्या तुकड्याप्रमाणे असलेल्या एका हातभर भगदाडासाठी रक्त आटवत बसावे... क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या शेणामेणाच्या वाड्यात नांदणारी आपण माणसे...

प्रवाशाच्या थकलेल्या मनात हलकेच तरंग उमटत होते. बैराग्याच्या गोष्टी, अष्टभुजेमधून निघालेला लाल डोळ्यांचा सर्प, जटाधाऱ्याचे मरत चाललेले डोळे हंसाकृती नौकेतून विहार करताना गळ्याभोवती पडलेला रमणीचा गौर हात व त्यातील पात्रामधील लाल मद्य... सारे काही थेंबाथेंबाने या शून्यतीर्थात विसर्जित होऊ लागले. भोवती सर्वत्र वेडावणारी फसवी प्रतिबिंबे, आपणही कसले तरी प्रतिबिंब; प्रतिबिंबाची अनेकवार वर्तित झालेली पुन्हा प्रतिबिंबेच... ती आपल्या मृत्यूची वाट पाहात आरशातल्या मिंतीतल्या भिंतीतल्या भिंतीतल्या भिंतीतून आपल्याकडे पाहात आहेत...

तो तसाच पडून असता त्याच्या हाताला कसलातरी ओझरता मऊ उष्ण स्पर्श होताच तो चमकला व ताडदिशी उठून बसला. कुत्र्याचे पिल्लू त्याच्याभोव्ती हिंडत एका सांदीतून पुढे जायला मार्ग शोधत होते व त्याच्या गळ्याची दोरी आरशांच्या मागे मागे कोठेतरी गेली होती. त्या घटनेचा अर्थ ध्यानात येताच प्रवाशाच्या अंगात वीज चमकल्यासारखे झाले व त्यांच्या तोंडून नकळत हर्षाचा उद्गार बाहेर पडला.

"प्रवासी, तू एकदम उभा राहिला आहेस. तुझा कसलातरी नवा प्रयत्न आहे. " शिकारी दुरून म्हणाला. "पण लक्षात ठेव, इथून निसटणं सोपं नाही. गेली अनेक वर्षे अत्यंत विचारानं हे स्वप्नं मी रचत आलो आहे. आतापर्यंत मी नव्याण्णव माणसांचे डोळे काढले आहेत; मी शंभराव्या माणसाकडून पराभव स्वीकारणार नाही ! "

शिकार्‍याचे शब्द संपले, तोच त्याच्या मागून वेगाने सुरी आली व कुत्र्याच्या दोरीवर आदळत ती छेदून जमिनीवर पडली. प्रवाशाने प्राणपणाने दोरी घट्ट धरली व तो जमिनीवर आडवा पडला. त्याने एका हाताने कुत्र्याला आवरण्याचा प्रयत्न केला, पण ते दोन आरशांच्या सांदरीतून निसटले व पलीकडे नाहीसे झाले.

प्रवाशाने दोरी मनगटाला बांधून घेतली व तो तिच्या मागाने हलकेच पुढे सरकू लागला. वाटेत आरसे सरकवताना त्याचा श्वास आपोआप रोखला जाऊ लागला. त्या क्षणी त्याचे शरीर धनुष्याप्रमाणे ताणले जाई व दुसऱ्या क्षणी सैल पडून नीरवपणे पुढे सरकू लागे.

"प्रवासी,—" शिकारी कर्कशपणे ओरडला. त्याच्या आवाजात आता अनिश्चितता होती. "तुझ्याबरोबर आणखी काय आहे ? कोण आहे ?" आता पुन्हा एक सुरी आली, पण ती प्रवाशापासून काही अंतरावर पडली. "या माझ्या वाड्यात काहीतरी अज्ञात हिंडत आहे. इथं एक कीटक शिरणार नाही, अशी चिरेबंद व्यवस्था मी केली होती. तू स्वतःबरोबर काय आणलं आहेत आत ? येथील वातावरण केवळ माणसांचं आहे. त्यांच्या सूक्ष्म हालचालीनं, आवाजानं त्यांच्या सुखदुःखभय इत्यादी भावना मला अत्यंत तरलपणं समजतात. मी सारं आयुष्य त्यासाठी वेचलं आहे. पण आता या कोळ्याच्या जाळ्याला कसले तरी चमत्कारिक, अज्ञात हेलकावे बसत आहेत—"

शिकार्‍याचा आवाज आता वेडावाकडा फाटत असल्याप्रमाणे वाटू लागला, व तो आत्यंतिक निराशेने स्वतःशी हुंदके दडपत असल्याप्रमाणे घोगरा झाला होता. आता तर अनेक आरसे बेभानपणे वेगाने सरकवत असल्याचा सतत आवाज होऊ लागला, व सुर्‍यांचा स्फोट झाल्याप्रमाणे त्या वेगाने ठिकठिकाणी आदळू लागल्या.

आता प्रवाशाचे अंग उतावीळपणे थरथरू लागले, व तो एखाद्या जलचराच्या नीरवतेने पुढे सरकू लागला. दोरी वळत गेली होती तेथील आरसे सरकवत पुढे जाताना तो मोकळी झालेली दोरी मनगटाला गुंडाळत होता. काही वेळाने एक आरसा हलकेच सरकवताच समोर भव्य दरवाजा दिसला, आणि त्याचे सारे शरीर एकदम सैल पडले. त्याने थरथरत्या हातांनी अडणा उचलला. पण दरवाजा उघडताच झालेला कर्कश आवाज एखादा कडाच भंगत असल्याप्रमाणे त्याला प्रचंड वाटला, व त्या भीषण आवाजाने सारा वाडाच कोसळतो की काय, अशी त्याला भीती वाटली.

"म्हणजे तू दरवाजाजवळ पोहोचलास की काय ?” शिकारी दुरून ओरडला. अनेक आरसे वेगाने सरकले व शिकारी धावत येत असल्याप्रमाणे त्याची पावले बाजू लागली. स्फोटाने उडाल्याप्रमाणे प्रवासी बाहेर आला व त्याने बाहेरून कोयंडा अडकवला. पण त्या क्षणी मात्र इतका वेळ प्राणपणाने ताणून कोंडून ठेवलेली त्याची सारी शक्ती ओसरली व तो मरगळलेल्या पावलांनी पायरीवरच घसरला.

येताना आत कोठे तरी शिकाऱ्याने आणखी एक सुरी फेकली, तेव्हा चिरून फुटल्यासारखा आर्त आवाज झाला व लगेच विरून गेला. पण त्या आवाजाने प्रवाशांचे मन मात्र फाटल्यासारखे झाले. अंगात उरलेला एक क्षणाचा दीन आवाज देखील आता सुरीने अंग चिरून कोरून बाहेर काढल्याप्रमाणे कुत्रे ओरडले व कायमचे गप्प झाले.

प्रवाशाला वाटले, हे कुत्रे कुठले, कोणाचे, कुणास ठाऊक ! आपण त्याला एक घास अन्न दिले नाही, की पाण्याचा थेंब पाजवला नाही, पण आपले सारे आयुष्य मात्र त्या मुठीएवढ्या कुत्र्याचे कायमचे ऋणी झाले ! आयुष्यातील ऋणे कधी फेडता येतात का ? मृत्युरेषेपलीकडे जर कुठे आयुष्यातील असल्या ऋणांची मिटवण असलीच, तर आपले काळीज काढून त्याला दिले तरी ते ऋण संपणार नाही !

"एक कुतरडे ! एक भिकार, घाणेरडे कुतरडे !" आतल्या बाजूने दरवाजावर डोके आपटत शिकारी ओरडला व तो मोठ्याने हुंदके देऊ लागला. मोलाची व्हावी अशी शंभरावी शिकार— ती मिळाली एका क्षुद्र कुत्र्याची ! इतकी वर्षे व्यूह रचला, किंचित आवाजानंही माणसांची मनं जोखली; आणि ते सारं नष्ट केलं, ते या लाचार, स्वजातीयांशी वैर करणाऱ्या मलिन जनावरानं ! माझंच चुकलं ! सारं काही संपूर्णपणं चुकलं ! इतकी वर्षे हाडं झिजवल्यावर हलाहल मिळालं काय— तर आपलं सर्वस्वी चुकलं, हे विषारी ज्ञान ! मी सगळं माणसांचंच जग गृहीत धरलं, त्यावर निष्कर्ष बसवले, त्यातून तत्त्वज्ञान निर्माण केलं. त्यातच सगळं काही चिरेबंद करून लहानशी फट देखील ठेवली नाही. पण विश्वात मानव हा काही एकटाच जीव नाही हे मला सुचलं नाही, मला सुचलं नाही...”

शिकारी आता मोठमोठ्याने हुंदके देऊन रडू लागला.

- oOo -

पुस्तक: रमलखुणा
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती चौथी, दुसरे पुनर्मुद्रण
वर्ष: १९९५.
पृ. २६-३५.

---
या वेच्यामध्ये मी एक बदल केला आहे. यामध्ये शिकार्‍याच्या जीवनदृष्टीसंबंधी एक दीर्घ विवेचन येते. हा परिच्छेद ’मी इथं दिव्यांचा स्वच्छ प्रकाश निर्माण केला...’ या वाक्याने सुरू होतो आणि "...ही देणगी मला प्राणमोलाची आहे. तेव्हा तुझा निर्णय काय आहे ते सांग." इथे संपतो. पुस्तकात संपूर्ण दोन पाने याने व्यापली आहेत. मोबाईलसारख्या लहान स्क्रीनवर हा सलगपणे वाचणे जिकीरीचे ठरेल. यासाठी मी त्याचे चार ते पाच परिच्छेद केले आहेत. मूळ मजकुरात वा वाक्यांच्या क्रमवारीमध्ये काही बदल केलेला नाही वा भरही घातलेली नाही.
---


हे वाचले का?

रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

माकडिणीची कथा

नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळाला हात लावत आईने दार उघडले, तर वाणी दुकानदार समोर उभा !

तो म्हणाला, “तुमच्या यादीप्रमाणे सामान आणल आहे मी! उद्या गुरुवार, दुकान बंद. तेव्हा तुमची अडचण नको; म्हणून मीच सगळ्या पिशव्या सायकलीला अडकवून स्वतः आलो. कुठे ठेवू हे सामान?"

"सगळे ठेव माझ्या डोक्यावर!" असे त्याला सांगावे असे आईला फार वाटले. रात्रीचे साडेआठ-नऊ ही का कधी सामान पाठवण्याची वेळ असते ? ती वर वर हसून म्हणाली, " बरं केलंत, नाहीतर घरी पोहे नाहीत, म्हणजे आमचा फार खोळंबा झाला असता !

“ पोहे तेवढेच आणले नाहीत मी, "दुकानदार म्हणाला, "परवा दिवशी नंबरी माल येणार आहे. तेव्हा घेऊन येतो."

आता आईचा वण संपला. तिने सारे सामान घेतले. मग ते निरनिराळ्या डब्यात भरले, व डबे फळ्यांवर ठेवले.

बखर बिम्मची

तोपर्यंत दहा वाजले. ती वर आली तेव्हाच अर्धवट झोपेत होती. स्वच्छ पसरलेले, वाट पाहात असलेले अंथरूण बघून तिला फार समाधान वाटले. कोपऱ्यातील कॉटवर बब्बी, बाजूच्या कॉटवर बिम्म, दोघेही अगदी निश्चलपणे पसरली होती, तरी दोन्ही पोरे घड्याळाप्रमाणे खडखडीत जागी आहेत हे तिला पुरेपूर माहीत होते. ती अंथरुणावर पडली व भिंतीकडे तोंड करून तिने डोळे मिटून घेतले. पांघरुणाच्या कडेवरून बब्बीने तिच्याकडे पाहिले. पण बिम्म पांघरूण बाजूला टाकून सरळ उठूनच बसला. नंतर तो आईकडे आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, "आई, आज गोष्ट सांगायची राहिलीच की!"

“हे बघ बाबा ! " डोळे कसेबसे उघडे ठेवत आई म्हणाली, “ आज माझं हाड न हाड दुखतंय अंगात. आता झोप जा. शहाणा ना तू ?"

केवळ सवयीमुळेच बिम्मने मान हलवली. नाहीतरी शहाणा होण्याबाबत त्याचा उत्साह फारच कमी झाला होता. शहाणा व्हायचे म्हणजे पुष्कळशा गमतीच्या गोष्टी करायच्या नसतात, हे त्याला कळून चुकले होते.

"बरं आई, आज तुझी गोष्ट राहू दे, तू उद्या सांग, झालं?" बिम्म म्हणाला. आईला समाधानाचा सुस्कारा टाकायला वेळच मिळाला नाही, कारण तो पुढ़े म्हणाला, “ मग मीच तुला एक गोष्ट सांगतो."

आई एकदम घाबरी झाली. बिम्मची गोष्ट म्हणजे तीत काय येईल, काय येणार नाही, याला काही ताळतंत्र नसे. दिवसभरात घडलेले सारे प्रसंग, रस्त्यात दिसलेली गाय, बब्बीच्या हातून फुटलेला कप, वाळत घातलेले कपडे, मांजर, पोस्टमन, गवळी, चिमण्या, हे सारे तिच्यात येत असे. मध्येच जर एखाद्या कुत्र्याचे ओरडणे ऐकू आले, तर ते देखील गोष्टीत आलेच. शिवाय त्याची गोष्ट नुसती ऐकून घेणे त्याला साफ मंजूर नसे, तर ऐकणाऱ्याने प्रत्येक वाक्याला 'हूं' म्हटले पाहिजे. “जर तू 'हूं' म्हणत नाहीस, तर मी गोष्ट कशी सांगू पुढे?" तो अधीरपणे ओरडे, व झोपलेल्या आईला हलवून जागी करी. त्यालाच जर झोप आली, तरच त्याची गोष्ट थांबत असे, ती कधी संपत नसे; ती तात्पुरती थांबत असे. आणि ती सटवी त्याची झोपदेखील कधी रात्रीचे बारा वाजून गेल्याखेरीज आधी येत नसे. आई उठून बसली व म्हणाली, “मीच एक लहानशी गोष्ट सांगते. ती झाली की अंथरुणावर पडायचं व झोपायचं. कळलं?"

बिम्मने मान हलवताच ती सांगू लागली. “एक होता राजपुत्र-"

“त्याचं नाव काय होतं ?" बिम्मने लगेच विचारले.

“त्याचं नाव गाव गोत्र घेऊन काय करायचंय तुला? तू काय लगेच त्याला पत्र पाठवणार आहेस, की त्याचं लग्न जुळवणार आहेस?" आई चिडून म्हणाली, "आणि आता मध्ये बोललास तर गोष्ट नाही, काही नाही. शिवाय सकाळी एरंडेल घ्यावं लागेल, समजलं?"

बिम्मने ऐसपैस मांडी घातली, व तो निश्चयाने गप्प बसला.

"एक राजपुत्र होता. तो राजवाड्यात राहात असे. एकदा त्याला वाटले आपण बाहेर पडावे, व काहीतरी विकत घ्यावे." येथे बिम्मचे ओठ हलणार असे दिसताच आईने बोट उगारत त्याच्याकडे रागाने पाहिले व तो गप्प राहिला. राजपुत्र राजवाड्यातून बाहेर पडला, तेव्हा त्याला एक गुराखी, एक गाय व वासरू घेऊन चाललेला दिसला. राजपुत्र त्याला म्हणाला, "तुमच्याजवळ दोन गाई आहेत. त्यातील एक मला विकत द्याल काय ?"

गुराखी हसला व म्हणाला, “दिली असती, पण खरे म्हणजे माझ्याजवळ दोन गाई नाहीतच. एकच गाय आहे. ती दुसरी लहान गाय आहे ना, ती आणखी एक गाय नाही, तर ती लहानपणची मोठीच गाय आहे."

राजपुत्राने पाहिले. खरेच ती लहान गाय अगदी मोठ्या गाईसारखीच दिसत होती. तेव्हा तो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने वाटेत त्याला काही मेंढ्या बरोबर घेऊन निघालेला, तांबडा रुमाल बांधलेला एक धनगर भेटला. राजपुत्राने त्याला विचारले, "तुमच्याजवळ इतक्या मेंढ्या आहेत. त्यातील एक मला विकत द्याल का?"

त्यावर धनगरदेखील त्याच्याकडे पाहून हसला. तो म्हणाला, “दिली असती, पण त्या सगळ्या मेंढ्या काही खऱ्या नाहीत."

"खऱ्या नाहीत म्हणजे काय ?" राजपुत्राने विचारले.

“हे बघ, झोप यावी म्हणून पडले असता समोरून मेंढ्या चालल्या आहेत, अशी कल्पना करून त्या मोजत राहिलं की झोप येते, हे तुला माहीत आहे ना? ते पलीकडे झाड आहे, त्याच्या सावलीत चार माणसे आडवी झाली आहेत. त्यातील तांबडा रुमालवाला आहे ना, तो मीच आहे. मी ज्या मेंढ्या मोजत तेथे पडलो आहे, त्याच या सगळ्या मेंढ्या आहेत. मला झोप लागली, किंवा मी डोळे उघडले की, वा सगळया मेंढया नाहीशा होतील. मग असली एक मेंढी घेऊन तू काय करणार ?"

राजपुत्राला ते पटले. त्याने मान हलवली, व तो पुढे गेला.

थोड्या वेळाने त्याला घोड्यावरून येत असलेला एक माणूस दिसला. तो फार घाईत दिसत होता. पण राजपुत्राला तो घोडा इतका आवडला, की त्याने हात वर करून त्याला थांबवले व म्हटले, "तुमचा घोडा फार छान आहे. तुम्ही मला तो विकत द्याल का?" तो माणूस म्हणाला, “दिला असता की! पण हा घोडा माझा नाही. गावातील चौकात हातात तलवार घेतलेला एक टोपीवाला माणूस आहे ना, त्याचा हा घोडा आहे. मला गडबडीने कामाला जायचे आहे, म्हणून मी तो थोडा वेळ त्याच्याकडून मागून घेतला. तो फार तर एक तासभर हवेत पाय पसरून तसाच अंतराळी थांबेल. त्या आधीच घोडा परत आणून त्याच्याखाली पूर्वीप्रमाणे ठेवीन, असे मी कबूल केले आहे बघ. तुला जर घोडा दिला, तर तासभर हवेत राहिल्यावर तो कंटाळून धप्पदिशी खाली पडेल नव्हे ?"

“होय, पडणारच की." राजपुत्र म्हणाला.

आता परत राजवाड्याकडे जावे की काय, असा तो विचार करीत असता गळ्याभोवती दोऱ्या बांधलेली दोन माकडे सोबत घेऊन येत असलेला एक म्हातारा त्याला दिसला. माकडे गंमत करत, उड्या मारत, हुंदडत चालली होती. राजपुत्राने म्हाताऱ्याला विचारले, यांतील एक माकड मला विकत द्याल का?"

म्हाताऱ्याने थोडा विचार केला व म्हटले, "देईन की, पण त्याबद्दल तुला तुझा सोन्याचा सदरा व सोन्याची टोपी द्यावी लागेल. मला राजवाड्यात जाऊन माकडाचा खेळ दाखवायचा आहे. देशील?"

राजपुत्राने सदरा, टोपी काढून त्याला दिली व एका माकडाची दोरी हातात धरून तो परतला. म्हाताऱ्याने सदरा, टोपी माकडावर चढवली, व तो राजवाड्याकडे निघाला.

राजपुत्र माकड घेऊन राजवाड्याकडे आला तेव्हा सोन्याचा सदरा, सोन्याची टोपी घातलेल्या माकडाभोवती खूप गर्दी झालेली त्याला दिसली. सगळी माणसे माकडाला अगदी लवून मुजरा करत होती. खुळी माणसे नेहमीच कपडे, खुर्ची, गादीला नमस्कार करत असतात, पण माकड मात्र पायावर पाय टाकून ऐटीत स्वस्थ बसले होते. म्हाताऱ्याने आरडाओरड करत अनेकदा काठी आपटली, पण माकड मात्र सुस्तच राहिले.

उघड्या अंगाचा राजपुत्र दोरी बांधलेले माकड घेऊन तेथे येताच तेथील पहारेकऱ्याने त्याला हटकले, व दरडावून म्हटले, “चल नीघ येथून. राजवाड्यात "तुला आमंत्रण आहे काय ?" असे तीनदा झाल्यावर राजपुत्र रडकुंडीला आला, व बाहेर येऊन बसला. थोड्या वेळाने म्हातारा आपल्या माकडाला दरदर ओढत त्या ठिकाणी आला, व राजपुत्राच्या शेजारी बसला.

'तुझा सोन्याचा सदरा, तुझी टोपी घे बाबा परत. हे कपडे घातल्यावर माकड एक उडी मारेना. आणि खेळ नाही, तर कोण देईल पैसे ? उपाशी मरू की काय ?

त्याने माकडावरील कपडे उतरवले, तेव्हा ते लगेच टुणटुण उड्या मारू लागले, व काठीवर चढउतार करू लागले. राजपुत्राने आपले माकड परत करताच त्याचा खेळ सुरू झाला. म्हाताऱ्यापुढे माणसे जमली व काहींनी त्याच्यापुढे पैसे टाकले. म्हाताऱ्याने ते गोळा केले, व दोन्ही माकडे घेऊन तो निघून गेला.

राजपुत्राने आपले सोन्याचे कपडे घातले, व तो राजवाड्यात आला. पहारेकऱ्याने त्याला मुजरा केला, व इतरांनी त्याला आत जायला अदबीने वाट करून दिली.

“हं झाली आजची गोष्ट. आता गप्प जाऊन पड व मलादेखील झोपू दे थोडा वेळ!” आई अंथरुणावर लवंडून म्हणाली. मग बिम्म अथरुणावर जाऊन पडला. पण बराच वेळ त्याची चुळबुळ चालू होती. अखेर तो उठून बसला, तेव्हा बब्बीने डोळे उघडले व ती मोठ्या उत्सुकतेने पाहू लागली.

बिम्म आईजवळ आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, “आई-"

"आता आणखी काय काढलंस ?” मोठ्या कष्टाने डोळे उघडत आई म्हणाली.

"आई, खेळ करणारं एक माकड मला आणून देशील?" बिम्मने विचारले.

“खेळ करणारी दोन माकडं कशाला घरात?", आई चिडून म्हणाली, "एक आहे, तर त्यानेच मी हैराण होऊन जाते संध्याकाळपर्यंत! जा आता जाऊन पड. नाहीतर दोरीनं बांधून ठेवीन तुला त्या कॉटला !"

बब्बीने पटकन तोंडावरून पांघरूण घेतले, पण त्याखाली ती बराच वेळ खिदळत होती. तिच्याकडे पाहात आई म्हणाली, “आणि तूदेखील खिदळ खोबरी, आता जर का तिकडून थोडा जरी आवाज आला, तर कान ओढून लांब करून त्यांची गाठ मारून ठेवीन बघ डोक्यावर!"

बिम्म अंथरुणावर येऊन पसरला, डाव्या कुशीवर वळला, पण लगेच उजवी बाजू त्याला जास्त बरी वाटली. पांघरूण हळूच बाजूला करून बब्बी आपल्याकडे पाहात आहे, हे पाहून त्याने तिला वेडावून दाखवले. थोडा वेळ गेला, व त्याची हालचाल जास्तच वाढली. तो उठला व आईजवळ आला. या वेळी तिला जागी करायला जास्त वेळ हलवावे लागले.

"आई !"

"म्हणजे पुन्हा आलास होय? तुझा पायच मोडून देते थांब तुझ्या हातात." ती रागाने म्हणाली, "आता कसली काढली आहेस नवी वरात?"

"खेळ करणारं एक माकड आधीच आहे घरात असं म्हणालीस. ते कुठं आहे?"

बब्बी तर लाही उडाल्याप्रमाणे एकदम फट्ट्‌दिशी हसली. आईने भिंतीकडे तोंड वळवून ओठ घट्ट मिटून घेतले. मग ती म्हणाली, “ते आहे वरच्या मोठ्या कपाटात, आता ते शहाण्यासारखं झोपलं आहे. आता तूदेखील झोप. माझ्यावर एवढे उपकार कर बाबा! "

पुन्हा बिम्म अंथरुणावर पडला. इकडे तिकडे चार पाच वेळा वळल्यावर त्याचे डोळे जड होऊ लागले, व अखेर तो झोपला. तो झोपल्यावर बब्बीचेदेखील लक्ष उडाले, व ती ऐसपैसपणे झोपली.

पण सकाळी उठल्याबरोबर जर मोठ्या कपाटासमोर बिम्म अखंड धरणे धरून बसला, तर आपण काय करायचे ? असा विचार मनात येताच आईचा थरकाप झाला, व तिची झोप थोडा वेळ खाडकन उडाली.

- oOo -

पुस्तक: बखर बिम्मची
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती चौथी.
वर्ष: २०१८.
पृ. ६३-६८.

---

मूळ पुस्तकात ही ’माकडाची कथा’ या नावाने आहे. मी त्याचे शीर्षक हेतुत: बदलले आहे. नीट पाहिले तर ’अथ’पासून ’इति’पर्यंत ही कथा एका ’माकडाच्या पिल्ला’च्या आईचीच आहे. कारण तीही मादीच्या भरवशावर सोडून गेलेल्या बापाच्या माघारी त्याच्या पिलांचा एकट्याने सांभाळ करणारी, एखाद्या माकडिणीची नागर आवृत्ती आहे. आपल्याला ठाऊक असलेली पंचतंत्रातील माकडिणीची कथा वेगळी आहे. ती जिवावर आले की मुलालाही पायाखाली घेण्यारी आहे. या माकडाची आई मात्र कितीही दमली तरी पिलाला जोजवणारी आहे.


हे वाचले का?