रविवार, १९ फेब्रुवारी, २०२३

माकडिणीची कथा

नेमकी आजच मोलकरीण आली नव्हती, आणि घरातील सगळीच पिठे संपून बसली होती. म्हणून आईला गिरणीकडे तीन चार फेऱ्या कराव्या लागल्या. त्यात भर म्हणजे गल्लीतील सगळ्याच मोलकरणी गैरहजर असल्याप्रमाणे गिरणीत आज खूपच गर्दी होती, व तेथे ताटकळत राहून तिचे गुडघे मेणाचे झाले होते. मग घरी मुलांची जेवणे झाली, ती नेहमीप्रमाणे अगदी साग्रसंगीत झाली. बिम्मने पाण्याचा तांब्या टेबलावर लवंडला. बब्बीला आमटीच्या वाटीत शेवग्याच्या शेंगेचा एकच तुकडा आला होता तर बिम्मच्या वाटीत दोन तुकडे अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांनी वाटीची ओढाताण केली, तेव्हा दोघांच्याही कपड्यांवर आमटी सांडली. आपापली ताटे उचलून ती मोरीत ठेवण्यासाठी जात असता बिम्मचे ताट वाटेतच खाली पडले. अखेर जेवणे संपली व मुले झोपायला वर गेली. तिने एक सुस्कारा सोडला असेल नसेल, तेव्हा गेट वाजले, व दारावरची घटा झणझणली. कपाळाला हात लावत आईने दार उघडले, तर वाणी दुकानदार समोर उभा !

तो म्हणाला, “तुमच्या यादीप्रमाणे सामान आणल आहे मी! उद्या गुरुवार, दुकान बंद. तेव्हा तुमची अडचण नको; म्हणून मीच सगळ्या पिशव्या सायकलीला अडकवून स्वतः आलो. कुठे ठेवू हे सामान?"

"सगळे ठेव माझ्या डोक्यावर!" असे त्याला सांगावे असे आईला फार वाटले. रात्रीचे साडेआठ-नऊ ही का कधी सामान पाठवण्याची वेळ असते ? ती वर वर हसून म्हणाली, " बरं केलंत, नाहीतर घरी पोहे नाहीत, म्हणजे आमचा फार खोळंबा झाला असता !

“ पोहे तेवढेच आणले नाहीत मी, "दुकानदार म्हणाला, "परवा दिवशी नंबरी माल येणार आहे. तेव्हा घेऊन येतो."

आता आईचा वण संपला. तिने सारे सामान घेतले. मग ते निरनिराळ्या डब्यात भरले, व डबे फळ्यांवर ठेवले.

बखर बिम्मची

तोपर्यंत दहा वाजले. ती वर आली तेव्हाच अर्धवट झोपेत होती. स्वच्छ पसरलेले, वाट पाहात असलेले अंथरूण बघून तिला फार समाधान वाटले. कोपऱ्यातील कॉटवर बब्बी, बाजूच्या कॉटवर बिम्म, दोघेही अगदी निश्चलपणे पसरली होती, तरी दोन्ही पोरे घड्याळाप्रमाणे खडखडीत जागी आहेत हे तिला पुरेपूर माहीत होते. ती अंथरुणावर पडली व भिंतीकडे तोंड करून तिने डोळे मिटून घेतले. पांघरुणाच्या कडेवरून बब्बीने तिच्याकडे पाहिले. पण बिम्म पांघरूण बाजूला टाकून सरळ उठूनच बसला. नंतर तो आईकडे आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, "आई, आज गोष्ट सांगायची राहिलीच की!"

“हे बघ बाबा ! " डोळे कसेबसे उघडे ठेवत आई म्हणाली, “ आज माझं हाड न हाड दुखतंय अंगात. आता झोप जा. शहाणा ना तू ?"

केवळ सवयीमुळेच बिम्मने मान हलवली. नाहीतरी शहाणा होण्याबाबत त्याचा उत्साह फारच कमी झाला होता. शहाणा व्हायचे म्हणजे पुष्कळशा गमतीच्या गोष्टी करायच्या नसतात, हे त्याला कळून चुकले होते.

"बरं आई, आज तुझी गोष्ट राहू दे, तू उद्या सांग, झालं?" बिम्म म्हणाला. आईला समाधानाचा सुस्कारा टाकायला वेळच मिळाला नाही, कारण तो पुढ़े म्हणाला, “ मग मीच तुला एक गोष्ट सांगतो."

आई एकदम घाबरी झाली. बिम्मची गोष्ट म्हणजे तीत काय येईल, काय येणार नाही, याला काही ताळतंत्र नसे. दिवसभरात घडलेले सारे प्रसंग, रस्त्यात दिसलेली गाय, बब्बीच्या हातून फुटलेला कप, वाळत घातलेले कपडे, मांजर, पोस्टमन, गवळी, चिमण्या, हे सारे तिच्यात येत असे. मध्येच जर एखाद्या कुत्र्याचे ओरडणे ऐकू आले, तर ते देखील गोष्टीत आलेच. शिवाय त्याची गोष्ट नुसती ऐकून घेणे त्याला साफ मंजूर नसे, तर ऐकणाऱ्याने प्रत्येक वाक्याला 'हूं' म्हटले पाहिजे. “जर तू 'हूं' म्हणत नाहीस, तर मी गोष्ट कशी सांगू पुढे?" तो अधीरपणे ओरडे, व झोपलेल्या आईला हलवून जागी करी. त्यालाच जर झोप आली, तरच त्याची गोष्ट थांबत असे, ती कधी संपत नसे; ती तात्पुरती थांबत असे. आणि ती सटवी त्याची झोपदेखील कधी रात्रीचे बारा वाजून गेल्याखेरीज आधी येत नसे. आई उठून बसली व म्हणाली, “मीच एक लहानशी गोष्ट सांगते. ती झाली की अंथरुणावर पडायचं व झोपायचं. कळलं?"

बिम्मने मान हलवताच ती सांगू लागली. “एक होता राजपुत्र-"

“त्याचं नाव काय होतं ?" बिम्मने लगेच विचारले.

“त्याचं नाव गाव गोत्र घेऊन काय करायचंय तुला? तू काय लगेच त्याला पत्र पाठवणार आहेस, की त्याचं लग्न जुळवणार आहेस?" आई चिडून म्हणाली, "आणि आता मध्ये बोललास तर गोष्ट नाही, काही नाही. शिवाय सकाळी एरंडेल घ्यावं लागेल, समजलं?"

बिम्मने ऐसपैस मांडी घातली, व तो निश्चयाने गप्प बसला.

"एक राजपुत्र होता. तो राजवाड्यात राहात असे. एकदा त्याला वाटले आपण बाहेर पडावे, व काहीतरी विकत घ्यावे." येथे बिम्मचे ओठ हलणार असे दिसताच आईने बोट उगारत त्याच्याकडे रागाने पाहिले व तो गप्प राहिला. राजपुत्र राजवाड्यातून बाहेर पडला, तेव्हा त्याला एक गुराखी, एक गाय व वासरू घेऊन चाललेला दिसला. राजपुत्र त्याला म्हणाला, "तुमच्याजवळ दोन गाई आहेत. त्यातील एक मला विकत द्याल काय ?"

गुराखी हसला व म्हणाला, “दिली असती, पण खरे म्हणजे माझ्याजवळ दोन गाई नाहीतच. एकच गाय आहे. ती दुसरी लहान गाय आहे ना, ती आणखी एक गाय नाही, तर ती लहानपणची मोठीच गाय आहे."

राजपुत्राने पाहिले. खरेच ती लहान गाय अगदी मोठ्या गाईसारखीच दिसत होती. तेव्हा तो पुढे चालू लागला. थोड्या वेळाने वाटेत त्याला काही मेंढ्या बरोबर घेऊन निघालेला, तांबडा रुमाल बांधलेला एक धनगर भेटला. राजपुत्राने त्याला विचारले, "तुमच्याजवळ इतक्या मेंढ्या आहेत. त्यातील एक मला विकत द्याल का?"

त्यावर धनगरदेखील त्याच्याकडे पाहून हसला. तो म्हणाला, “दिली असती, पण त्या सगळ्या मेंढ्या काही खऱ्या नाहीत."

"खऱ्या नाहीत म्हणजे काय ?" राजपुत्राने विचारले.

“हे बघ, झोप यावी म्हणून पडले असता समोरून मेंढ्या चालल्या आहेत, अशी कल्पना करून त्या मोजत राहिलं की झोप येते, हे तुला माहीत आहे ना? ते पलीकडे झाड आहे, त्याच्या सावलीत चार माणसे आडवी झाली आहेत. त्यातील तांबडा रुमालवाला आहे ना, तो मीच आहे. मी ज्या मेंढ्या मोजत तेथे पडलो आहे, त्याच या सगळ्या मेंढ्या आहेत. मला झोप लागली, किंवा मी डोळे उघडले की, वा सगळया मेंढया नाहीशा होतील. मग असली एक मेंढी घेऊन तू काय करणार ?"

राजपुत्राला ते पटले. त्याने मान हलवली, व तो पुढे गेला.

थोड्या वेळाने त्याला घोड्यावरून येत असलेला एक माणूस दिसला. तो फार घाईत दिसत होता. पण राजपुत्राला तो घोडा इतका आवडला, की त्याने हात वर करून त्याला थांबवले व म्हटले, "तुमचा घोडा फार छान आहे. तुम्ही मला तो विकत द्याल का?" तो माणूस म्हणाला, “दिला असता की! पण हा घोडा माझा नाही. गावातील चौकात हातात तलवार घेतलेला एक टोपीवाला माणूस आहे ना, त्याचा हा घोडा आहे. मला गडबडीने कामाला जायचे आहे, म्हणून मी तो थोडा वेळ त्याच्याकडून मागून घेतला. तो फार तर एक तासभर हवेत पाय पसरून तसाच अंतराळी थांबेल. त्या आधीच घोडा परत आणून त्याच्याखाली पूर्वीप्रमाणे ठेवीन, असे मी कबूल केले आहे बघ. तुला जर घोडा दिला, तर तासभर हवेत राहिल्यावर तो कंटाळून धप्पदिशी खाली पडेल नव्हे ?"

“होय, पडणारच की." राजपुत्र म्हणाला.

आता परत राजवाड्याकडे जावे की काय, असा तो विचार करीत असता गळ्याभोवती दोऱ्या बांधलेली दोन माकडे सोबत घेऊन येत असलेला एक म्हातारा त्याला दिसला. माकडे गंमत करत, उड्या मारत, हुंदडत चालली होती. राजपुत्राने म्हाताऱ्याला विचारले, यांतील एक माकड मला विकत द्याल का?"

म्हाताऱ्याने थोडा विचार केला व म्हटले, "देईन की, पण त्याबद्दल तुला तुझा सोन्याचा सदरा व सोन्याची टोपी द्यावी लागेल. मला राजवाड्यात जाऊन माकडाचा खेळ दाखवायचा आहे. देशील?"

राजपुत्राने सदरा, टोपी काढून त्याला दिली व एका माकडाची दोरी हातात धरून तो परतला. म्हाताऱ्याने सदरा, टोपी माकडावर चढवली, व तो राजवाड्याकडे निघाला.

राजपुत्र माकड घेऊन राजवाड्याकडे आला तेव्हा सोन्याचा सदरा, सोन्याची टोपी घातलेल्या माकडाभोवती खूप गर्दी झालेली त्याला दिसली. सगळी माणसे माकडाला अगदी लवून मुजरा करत होती. खुळी माणसे नेहमीच कपडे, खुर्ची, गादीला नमस्कार करत असतात, पण माकड मात्र पायावर पाय टाकून ऐटीत स्वस्थ बसले होते. म्हाताऱ्याने आरडाओरड करत अनेकदा काठी आपटली, पण माकड मात्र सुस्तच राहिले.

उघड्या अंगाचा राजपुत्र दोरी बांधलेले माकड घेऊन तेथे येताच तेथील पहारेकऱ्याने त्याला हटकले, व दरडावून म्हटले, “चल नीघ येथून. राजवाड्यात "तुला आमंत्रण आहे काय ?" असे तीनदा झाल्यावर राजपुत्र रडकुंडीला आला, व बाहेर येऊन बसला. थोड्या वेळाने म्हातारा आपल्या माकडाला दरदर ओढत त्या ठिकाणी आला, व राजपुत्राच्या शेजारी बसला.

'तुझा सोन्याचा सदरा, तुझी टोपी घे बाबा परत. हे कपडे घातल्यावर माकड एक उडी मारेना. आणि खेळ नाही, तर कोण देईल पैसे ? उपाशी मरू की काय ?

त्याने माकडावरील कपडे उतरवले, तेव्हा ते लगेच टुणटुण उड्या मारू लागले, व काठीवर चढउतार करू लागले. राजपुत्राने आपले माकड परत करताच त्याचा खेळ सुरू झाला. म्हाताऱ्यापुढे माणसे जमली व काहींनी त्याच्यापुढे पैसे टाकले. म्हाताऱ्याने ते गोळा केले, व दोन्ही माकडे घेऊन तो निघून गेला.

राजपुत्राने आपले सोन्याचे कपडे घातले, व तो राजवाड्यात आला. पहारेकऱ्याने त्याला मुजरा केला, व इतरांनी त्याला आत जायला अदबीने वाट करून दिली.

“हं झाली आजची गोष्ट. आता गप्प जाऊन पड व मलादेखील झोपू दे थोडा वेळ!” आई अंथरुणावर लवंडून म्हणाली. मग बिम्म अथरुणावर जाऊन पडला. पण बराच वेळ त्याची चुळबुळ चालू होती. अखेर तो उठून बसला, तेव्हा बब्बीने डोळे उघडले व ती मोठ्या उत्सुकतेने पाहू लागली.

बिम्म आईजवळ आला, व तिला हलवून जागे करत म्हणाला, “आई-"

"आता आणखी काय काढलंस ?” मोठ्या कष्टाने डोळे उघडत आई म्हणाली.

"आई, खेळ करणारं एक माकड मला आणून देशील?" बिम्मने विचारले.

“खेळ करणारी दोन माकडं कशाला घरात?", आई चिडून म्हणाली, "एक आहे, तर त्यानेच मी हैराण होऊन जाते संध्याकाळपर्यंत! जा आता जाऊन पड. नाहीतर दोरीनं बांधून ठेवीन तुला त्या कॉटला !"

बब्बीने पटकन तोंडावरून पांघरूण घेतले, पण त्याखाली ती बराच वेळ खिदळत होती. तिच्याकडे पाहात आई म्हणाली, “आणि तूदेखील खिदळ खोबरी, आता जर का तिकडून थोडा जरी आवाज आला, तर कान ओढून लांब करून त्यांची गाठ मारून ठेवीन बघ डोक्यावर!"

बिम्म अंथरुणावर येऊन पसरला, डाव्या कुशीवर वळला, पण लगेच उजवी बाजू त्याला जास्त बरी वाटली. पांघरूण हळूच बाजूला करून बब्बी आपल्याकडे पाहात आहे, हे पाहून त्याने तिला वेडावून दाखवले. थोडा वेळ गेला, व त्याची हालचाल जास्तच वाढली. तो उठला व आईजवळ आला. या वेळी तिला जागी करायला जास्त वेळ हलवावे लागले.

"आई !"

"म्हणजे पुन्हा आलास होय? तुझा पायच मोडून देते थांब तुझ्या हातात." ती रागाने म्हणाली, "आता कसली काढली आहेस नवी वरात?"

"खेळ करणारं एक माकड आधीच आहे घरात असं म्हणालीस. ते कुठं आहे?"

बब्बी तर लाही उडाल्याप्रमाणे एकदम फट्ट्‌दिशी हसली. आईने भिंतीकडे तोंड वळवून ओठ घट्ट मिटून घेतले. मग ती म्हणाली, “ते आहे वरच्या मोठ्या कपाटात, आता ते शहाण्यासारखं झोपलं आहे. आता तूदेखील झोप. माझ्यावर एवढे उपकार कर बाबा! "

पुन्हा बिम्म अंथरुणावर पडला. इकडे तिकडे चार पाच वेळा वळल्यावर त्याचे डोळे जड होऊ लागले, व अखेर तो झोपला. तो झोपल्यावर बब्बीचेदेखील लक्ष उडाले, व ती ऐसपैसपणे झोपली.

पण सकाळी उठल्याबरोबर जर मोठ्या कपाटासमोर बिम्म अखंड धरणे धरून बसला, तर आपण काय करायचे ? असा विचार मनात येताच आईचा थरकाप झाला, व तिची झोप थोडा वेळ खाडकन उडाली.

- oOo -

पुस्तक: बखर बिम्मची
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती चौथी.
वर्ष: २०१८.
पृ. ६३-६८.

---

मूळ पुस्तकात ही ’माकडाची कथा’ या नावाने आहे. मी त्याचे शीर्षक हेतुत: बदलले आहे. नीट पाहिले तर ’अथ’पासून ’इति’पर्यंत ही कथा एका ’माकडाच्या पिल्ला’च्या आईचीच आहे. कारण तीही मादीच्या भरवशावर सोडून गेलेल्या बापाच्या माघारी त्याच्या पिलांचा एकट्याने सांभाळ करणारी, एखाद्या माकडिणीची नागर आवृत्ती आहे. आपल्याला ठाऊक असलेली पंचतंत्रातील माकडिणीची कथा वेगळी आहे. ती जिवावर आले की मुलालाही पायाखाली घेण्यारी आहे. या माकडाची आई मात्र कितीही दमली तरी पिलाला जोजवणारी आहे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा