देशपांडे मास्तर आरोग्यशास्त्र शिकवीत होते. पावसाळ्यात रात्री बेडूक ओरडावा तसा त्यांचा आवाज वाटत होता. मी पुस्तक पुढे धरून झोप घेत होतो.
देशपांडे मास्तर फारच गंभीर होते. क्वचित ते विनोद करीत, पण तोदेखील गंभीर असे. ते आरोग्यशास्त्र शिकवू लागले की, माझे डोळे जड होऊन मिटू लागत. मग पुस्तक पुढे धरून मी बसल्या बसल्या बैलासारखा झोप घेई. कधी कधी हे मास्तरांच्या ध्यानात येई. पुस्तक खाली ठेवून ते दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर चोळत आणि गंभीरपणे म्हणत,
“तेलीबुवा, उठा. डोळ्याला पाणी लावून या आणि मग बसा.”
मुले माझ्याकडे बघून हसत. मी मुकाट्याने उठून बाहेर जाई. शाळेच्या विहिरीतून बादलीभर पाणी काढी. तोंड धुऊन पुन्हा जाग्यावर येऊन बसे. पण हे क्वचित, मी एरवी झोपलो आहे हे ध्यानी येऊनही ते शांतपणे शिकवीत राहात. तास संपल्याचे टोले पडताच पुस्तक मिटून निघून जात.
आरोग्यशास्त्राच्या आड थोडा वेळ मला छान झोप लागली आणि एकाएकी देशपांडे मास्तरांनी विचारले,
“तेलीबुवा, तुम्ही टोचून घेतलं आहे का ?”
मी खडबडून जागा झालो. बावरून उभा राहिलो. देशपांडे मास्तरांनी प्रश्न पुन्हा विचारला, पण त्याचा रोख माझ्या ध्यानात आला नाही.
गंभीर आवाजात मास्तर पुन्हा म्हणाले,
“तुमच्या अंगरख्याच्या बाह्या वर करा.”
मला काही कळले नाही. पण मी बाह्या वर केल्या.
“देवी काढल्या आहेत का ?”
माझ्या शेजारी बसलेल्या मुलाने उठून ‘नाही’ असे उत्तर दिले. मग मी मानेनं नकार दिला.
मुलं एकमेकांशी कुजबुजू लागली. बाह्या वर करून एकमेकांचे दंड बघू लागली.
मास्तरांनी आपले नाक गोंजारले आणि दोन्ही तळवे एकमेकांवर चोळले. काही निर्णय घेण्याअगोदर ते बहुधा असे करीत. मग त्यांनी घड्याळात बघितले. तास संपायला थोडा अवकाश होता. टेबलापाशी बसून त्यांनी काही लिहिले आणि तो कागद माझ्या हाती देऊन सांगितले,
“आपल्या वडिलांना हे द्या!”
शाळा सुटताच मी बरोबरीच्या मुलांशी न भांडता सरळ घराकडे निघाले. चार मैलांचे अंतर तोडून माझ्या खेड्यात आलो. घरात येताच तो कागद आईच्या हाती देऊन म्हणालो, “मास्तरांनी हे नानाला दिलं आहे!”
ती शेजारच्या खेड्यात तेल विकण्यासाठी जाण्याची तयारी करीत होती. गिऱ्हाइकांनी घाणे काढण्यासाठी दिलेल्या करड्यातून काही करडे, वेळूने विणलेल्या टोपलीत घालून त्यात पिवळ्याधमक तेलाच्या चरव्या ठेवल्या होत्या. मी गेलो तेव्हा चुंबळ डोक्यावर ठेवून पाटी उचलू लागायला कोणी मिळते का हे ती बघत होती.
तेलाने भरलेले आपले हात काळजीपूर्वक नेसत्या लुगड्याला पुसून तिने माझ्या हातातला कागद घेतला. तो उघडला. उलटापालटा केला. एखाद्या लहान मुलासारखा दिसणारा तिचा चेहरा चिंतातुर झाला. हलक्या आवाजात तिने विचारले, “काय सांगितलंय् हेच्यात ?”
“माझ्या हाताला टोचलं पाहिजे ? ”
“अग बाई ! कशासाठी रे माझ्या लेकरा ?”
“मास्तर सांगतात म्हणून. शाळेतल्या पोरांनी घेतलं आहे!” आईने मला आपल्याजवळ ओढून घेतले. माझ्या टाळूवरून, तोंडावरून हात फिरवला आणि समजावणीच्या स्वरात ती बोलली,
“शाळा शिकायची तर सगळं सोसलं पाहिजे बाबा. मास्तर म्हणतात ते केलं पाहिजे. बाहेर गेलाय् तुझा बाप. आल्यावर दाखव त्याला !”
मग मी पाटीला हात लावला आणि माझी आई तेल विकण्यासाठी निघून गेली.
काही वेळाने माझा बाप आला. कमरेच्या धोतराखेरीज तो उघडाच होता. उघडा राहून राहून त्याचे अंग उन्हाने करपून गेले होते. पण तो चांगला जवान होता. घाण्यातली लाट उचलून त्याचे दंड भारी तयार झाले होते. पण त्यांच्यावर टोचल्याचे वण नव्हते.
कोनाड्यातील चिलीम-तंबाखू घेऊन तो उंबऱ्यापाशी दोन पायांवर बसला आणि चिलीम भरत आपल्या राठ आवाजात बोलला,
“कधी आला रे तू शाळेतून ?”
मी काही न बोलता मास्तरांनी दिलेली चिठ्ठी त्याच्या हवाली केली. तेव्हा भरलेली चिलीम पायाचा अंगठा आणि त्या शेजारचे बोट यांमध्ये उभी धरून त्याने चिठ्ठी दोन्ही हातांनी उघडली. मास्तरांनी लिहिलेली अक्षरे लावायला त्याला बराच उशीर लागला.
श्री. नरसू तेली यांना
स. न. वि. वि.
आपला मुलगा चि. रामू याला देवीची लस टोचून घेतली नसल्याचे आज माझ्या ध्यानात आले. लहानपणी टोचून घेण्याचे काही कारणाने राहून गेले असावे. पण आता अवश्य घ्यावे. साथ आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेतलेली बरी. कळावे.
आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.
मग माझ्या बापाचा चेहरा थोडा गंभीर झाला. मला जवळ बोलावून त्याने अंगरख्याच्या गुंड्या काढायला लावल्या. माझ्या छातीला, गळ्याला हात लावून बघितला आणि मग ती चिठ्ठी फाडून टाकून तो गरजला,
“गाढव आहे तुझा मास्तर ! तुला काही सुद्धा झालं नाही. टोचायचं का म्हणून ? डॉक्टरचं घर भरायला आम्ही काय जहागिरदार लागून गेलोय्. सांग त्याला, मला धाड सुद्धा झाली नाही म्हणून !”
मी म्हणालो, “जे काय असंल ते लिहून द्या. ”
यावर डाफरून तो बोलला, “बरं देईन. जा विस्तू घेऊन ये आतला ! ”
मी उलथन्यावर विस्तू घेऊन आलो. तो चटकन् बोटांनी उचलून त्याने चिलमीवर ठेवला. त्याच्या हाताला पोळत कसे नाही हे कोडे मला नेहमीचेच होते. खमंग वास सुटला. नाकातोंडातून काळा करडा धूर सोडीत, कोंडल्या आवाजात त्याने मला पुन्हा सांगितले,
“मला दौत, टाक, कागद दे.”
माझा बाप लिहिण्यावाचण्यापुरते शिकला होता. लिहिण्याचे साहित्य देताच पालथी मांडी घालून त्याने बराच वेळ विचार केला, आणि मला विचारले,
“मास्तरला पत्र लिहिताना मायना काय लिहितात रे?”
तो अडल्यामुळे मला विचारतो आहे हे मला कळले. पण मलाही मायना येत नव्हता. मी ठोकून दिले,
“पण तो काही तुझा मास्तर नाही नाना, साधा मायना लिही!”
मग दौतीत टाक बुडवावा आणि काय लिहावे हे निश्चित करीपर्यंत तो वाळावा असे बरेच वेळा झाल्यावर वाकड्यातिकड्या अक्षरात त्याने खालील मजकूर लिहिला.
रा. रा. मास्तरसाहेब यांना वाकडेवाडीहून नरसू बाबाजी तेली याचा राम राम. लिहिण्यास कारण की, चिठ्ठी मुलानं दिली. आपण काळजी करण्याचे कारण नाही; आता त्याचे अंग गरम लागत नाही. आपला संशय आला तो ताप नसावा. टोचण्याचे कारण नाही.
नरसू बाबाजी तेली.
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताच ती चिठ्ठी मी देशपांडे मास्तरांपाशी दिली. ती वाचता वाचता त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्या. लगेच तळवे चोळून त्यांनी दुसरी चिठ्ठी लिहिली.
श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.
आपला काही गैरसमज झालेला दिसतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने लस टोचून घेणे आवश्यक आहे. मुलाचा शिक्षक या नात्याने मला त्याच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपण मुळीच हयगय न करता टोचून घ्यावे. कळावे.
आपला,
र. वि. देशपांडे,
वर्गशिक्षक.
ही चिठ्ठी घेऊन मी घरी आलो तेव्हा घराबाजूला रोवलेला आमचा घाणा चालला होता; डोळ्याला झापडे बांधलेला म्हातारा बैल गोल फिरत होता. आणि घाण्यावर कुणीच बसलेले नव्हते. मी जाऊन बसलो. गोल फिरताना पोटात खळगा पडतो आणि बरे वाटते. बाष्पाची लाट म्हशीसारखा आवाज करीत होती. पेंड खाण्यासाठी कावळे भराऱ्या मारीत होते.
लगेच नाना आला. नित्याप्रमाणे तो उघडाच, पण धोतराभोवती तरडाचा एक धडपा गुंडाळला होता.
घाण्यापाशी घेऊन त्याने लाट हलवली. अर्धवट ठेचलेले करडे हात घालून सारखे केले आणि तेलकट हात तरटाला पुसून म्हटले,
“हं, काय म्हणाला तुझा मास्तर ?”
मी उत्तरादाखल चिठ्ठी दिली. उन्हाच्या तिरपेला जाऊन तो ती लावू लागला. मी तेलाने चपचपलेली ती पेंड खात होतो आणि घाण्याबरोबर फिरत होतो.
चिठ्ठी वाचून होताच नानाने दंडाला धरून मला पुढे खेचले आणि बैलाला मारण्याचा आसुड माझ्या पाठीवर उडवला. तो म्हणाला,
“गाढवीच्या, शाळा नको म्हणून आजारी असल्याचं सोंग करतोस; मास्तरला फसवतोस ? हां ?”
मी ओय् ओय् करीत पळालो. चाबूक उगारून नानाही माझ्या मागे लागला. मी गल्लीबोळातून पळालो. बापाच्या पुढे पळण्याची माझी ताकद नव्हती, पण कावळे पेंड खातील म्हणून तो उलवकर परत फिरला.
मग मी उशीरा घरी परत आलो. गावच्या ओढ्याप्रमाणे नानाचा राग लवकर ओसरतो हे मला ठाऊक होते. शाळेला जायला निघताच त्याने दुसरी चिठ्ठी माझ्यापाशी दिली. तिच्यात खाली दिलेला मजकूर होता.
रा. रा. देशपांडे मास्तरसाहेब यांना नरसू तेल्याचा राम राम. लिहिण्यास कारण की, तुम्ही पुन्हा टोचण्यास लिहिले आहे. आपले रास्त आहे, शाळा चुकविण्यासाठी आपण आजारी आहो असे त्याने लबाड सांगितल्याचे दिसते. त्याबद्दल मी त्याला ठोकला आहे. पुन्हा तो काही बोलणार नाही. कळावे.
आपला,
नरसू बाबाजी तेली,
वाकडेवाडीकर.
हा घोटाळा आणखी किती काळ चालणार आहे असे वाटून मी फार पंचायतीत पडलो. माझा बाप फारच हेकेखोर माणूस होता. जन्माला आल्यापासून आजतागायत तो कधी आजारी पडला नव्हता. त्याने कधीही औषध घेतले नव्हते. मग तो पोराला टोचून कसा घेणार !
देशपांडे मास्तरांनी चिठ्ठी वाचली. आणि कधी नव्हे तो त्यांचा चेहरा रागेजला दिसू लागला. नेहमी ते मला अहो जाहो बोलवीत, पण आज म्हणाले,
“तुला काही अक्कल आहे का ?”
मी होय नाही अशी मान हलवली.
“मग बापाला नीट समजावले का नाही ! ”
“पण मलाही नीट समजले नाही !”
हे ऐकून नाक गोंजारीत मास्तर स्वतःशीच पुटपुटले,
“ साधी गोष्ट. मला कळत नाही की, तुम्ही लोक इतके अडाणी कसे. बरं मी पुन्हा चिठ्ठी लिहितो !”
त्या दिवशी देशपांडे मास्तर मला सारखे प्रश्न विचारीत होते. त्यांनी मला मुळीच झोपू दिले नाही. शाळा सुटताच सगळी मुले माझ्याभोवती गोळा झाली. माझ्या अंगरख्याच्या बाह्या वर करून त्यांनी वण आहेत का नाही ते बघितले, आणि ओरडा केला,
“ तेलीबुवा, तुम्ही टोचून घ्या, हुर्यो ! ” कुणीसे म्हटले.
“टोचून घ्या तेलीबुवा, नाही तर ठोक्याच्या तपेलीसारखे तोंड होईल!”
“ मेहेरबानी तेवढ्यावर निभावले तर, नाही तर जीवे मराल!”
मुलांनी माझी पाठपुरवणी केली. ती सगळी मुकाट सहन करून मी घरी आलो आणि चिठ्ठी नानाला दिली.
कडू तेलाच्या दिव्यापाशी बसून त्याने ती लावली.
श्री. नरसू बाबाजी तेली यांना
स. न. वि. वि.
आपला गैरसमज झालेला दिसतो. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की, तुमचा मुलगा आता आजारी आहे. त्याने तशी बतावणीही माझ्यापाशी केली नाही. पण तालुक्यात देवीची साथ आहे. तिला आवर घालण्यासाठी टोचून घेणे आवश्यक आहे, म्हणून मी आग्रह धरला. माझ्या चिठ्ठया पुन्हा एकवार नीट वाचल्या तर ही गोष्ट तुमच्या नजरेस येईल. सरकारी दवाखान्यात मोफत टोचण्याची व्यवस्था आहे. फार त्रासही होणार नाही. मुलाचा शिक्षक या नात्याने मला ही खबरदारी घेणं आवश्यक वाटलं. आशा आहे की, झाला गैरसमज दूर होऊन आपण टोचून घेण्याची तजवीज कराल. कळावे.
आपला,
र. वि. देशपांडे.
चिठ्ठी वाचून होताच ती दिव्यावर धरून जाळीत नाना बोलला, “सुया होचून कुठं साथी जातात काय ? गाढव लोक ? मी कधीही काही टोचून घेतलं नाही. साथी आल्या अन् गेल्या. मी अजून जगलोय् ना ? माझा बाप, माझा आजा कुणी टोचलं नव्हतं. बाप अठ्याण्णव वर्षे जगला, आजा शंभर आणि वर तीन ! मास्तरला अक्कल नाही. सुयाबिया टोचणार असतील तर तू शाळेत जाऊ नकोस. आपला धंदा कर. ”
माझी आई इतका वेळ गप्प होती ती हळूच म्हणाली,
“पण चार यत्ता शिकू द्या त्याला. शाळा शिकायची, शहाणं व्हायचं तर टोचून घेतलं पाहिजे. मार सोसला पाहिजे. ”
त्यावर नाना ओरडला, “काय गरज नाही. कितवीत आहेस रे पोरा तू आता ?”
“मराठी चौथीत.”
“बास झालं. बापापेक्षा दोन पायऱ्या पुढं गेलास. आज मी चिठ्ठी देतो ती वाचूनही मास्तर टोचून घे म्हणाला तर पुन्हा शाळेची पायरी चढू नकोस.”
आणि त्यानं चिठ्ठी लिहिली.
राजमान्य राजश्री मास्तरसाहेब यांसी, राम राम.
पत्र लिहिण्यास कारण की, माझा गैरसमज झालेला नाही. मी, माझा बाप, माझा आजा कोणीही टोचून घेतले नाही, आमच्यापैकी कुणीही साथीच्या रोगाने मेले नाही. सबब माझा मुलगाही मरणार नाही. मी त्याचा बाप तो जास्ती कसा जगेल हे बघीन. तुम्ही फक्त त्याला चार अक्षरे शिकविण्याचे करा. कळावे.
आपला,
नरसू तेली.
ही चिठ्ठी घेऊन जेव्हा मी शाळेला निघालो तेव्हा मला फार भीती वाटत होती. माझी शाळा खलास झाली असे वाटत होते. धुळीने भरलेल्या वाटेने जड दप्तर वागवीत चाललो असताना मी या विचाराने अगदी व्याकुळ झालो होतो. घाण्यावर बसण्यापेक्षा मला शाळेत बसणे जास्त आवडत होते.
आणि भरभर चालून दमगीर झालेली माझी आई डोक्यावर तेलाची पाटी घेऊन माझ्या मागून आली. ती निश्चयाने म्हणाली,
“ चल, आपण दवाखान्यात जाऊन टोचून घेऊ. तू कळ सोसशील का ?”
मी म्हणालो, “सोशीन, पण नानाला कळलं तर?”
“त्यांच्यादेखत विव्हळू नकोस.”
“ नाही. पण तो सुजलेला हात बघील. टोचल्यावर हात सुजतो.”
“ त्यांच्यादेखत उघडा होऊ नकोस. आणि एकदा टोचल्यावर काय करणार आहे तो ? चल.”
चिठ्ठी फाडून टाकून आम्ही दवाखान्यात गेलो. मात्र टोचताना आईने डोळे पदराने झाकून घेतले. मी तोंड फिरवून कळ सोसली.
माझ्या बापाला मी टोचून घेतल्याचे कळले नाही. साथ संपली तेव्हा तो फुशारकीने मला म्हणाला,
“ सांग तुझ्या मास्तरला मी अजून जिवंत आहे म्हणून आणि म्हणावं माझा बापही आहे. गाढव साले. देवाशपथ मी सांगतो, पोरा तुझा तो मास्तरच एके दिवशी साथीत पटकन् मरेल !”
यावर माझ्याकडे बघून आई गालात हसली.
- oOo -
पुस्तक: माणदेशी माणसं
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशक: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
आवृत्ती पहिली,अकरावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २००८.
पृ. १२७ - १३४.