जी.ए. कुलकर्णी यांचे कथाकार म्हणून स्थान अनन्यसाधारण आहे. त्याचबरोबर त्यांचे एकांडेपण नि एकारलेपण हे मराठी साहित्यप्रेमींच्या अवाजवी कुतूहलाचा विषय बनून राहिले आहे. त्यांचा तो काळा चष्मा, त्यांच्या न झालेल्या भेटीचे सुरस चमत्कारिक किस्से चवीने चघळणे हे कधी वैचित्र्यप्रेमापोटी, तर कधी छुप्या असूयेपोटी होत असते. इंग्रजीत ज्याला introvert किंवा अगदी self-centered म्हणता येईल– मराठीमध्ये आत्मसंतुष्ट नव्हे पण आत्ममग्न– असे हे व्यक्तिमत्व, विक्षिप्तपणाच्या कथांचे नायक बनलेले.
याउलट सुनीताबाई देशपांडे या करकरीत बुद्धिवादी, लोकांच्या गराड्यात राहूनही त्या-त्या व्यक्तीच्या कुवतीनुसार संवाद राखू शकणार्या, प्रसंगी कणखरपणे तो तोडण्यासही मागेपुढे न पाहणार्या. पुरुषप्रधान मानसिकतेच्या समाजात ‘पु.ल. देशपांडे यांची पत्नी’ हीच ओळख असलेल्या. कवि नि कवितांशी - जी.एं.च्याच भाषेत - आतड्याचे बंध असलेल्या; बुद्धिप्रधान व विवेकप्रधान विचाराच्या असून त्याचे करकरीत शुष्क तत्वज्ञानात रूपांतर होऊ न देणार्या. (याचे प्रत्यंतर घ्यायचे तर त्यांचा ‘मनातलं अवकाश’ हा ललितलेख-संग्रह पाहा.).
पु.लं.ना जी.एं.चे आलेले एक पत्र नि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सुनीताबाईंनी दिलेल्या उत्तरातून त्यांच्यात सुरु झालेला पत्रव्यवहार एका अलौकिक मैत्रीची सुरुवात करून गेला. जी.एं.चे लोकविन्मुख असण्याने त्यांच्या आयुष्याबद्दल जे काही समजून घ्यायचे ते त्यांच्या पत्रांमधूनच. त्यांचा अनेकांशी पत्रव्यवहार झाला. तो संपादित करुन त्याचे खंड प्रकाशित करावेत असे ठरले. तेव्हा त्यातील पहिला पुरा खंड हा त्यांनी सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रांनीच भरून गेलेला आहे. जी.एं.चा मनमोकळा संवाद कुणाशी झाला असेल तर तो केवळ सुनीताबाईंशीच– याचे हे निदर्शक आहे. करकरीत बुद्धिवादी, विवेकवादी, स्वयंप्रज्ञ अशा सुनीताबाई आणि अधूनमधून पारंपरिक – विशेषत: स्त्रियांसंबंधीच्या– मतांशी बांधिलकी दर्शवणारे जी.ए. यांचा संवाद इतका आशयगर्भ नि आपुलकीचा कसा होऊ शकतो याचे आश्चर्य अनेकांना वाटत आले आहे.
या पत्रव्यवहारातील सुनीताबाईंनी जी.एं.ना लिहिलेली पत्रे स्वतंत्रपणे ‘प्रिय जी.ए.’ या शीर्षकाने प्रसिद्ध झाली. या पुस्तकाला डॉ.अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे. लेखन हे शाब्दिक सामान्यपणे करामत, निर्मितीचा फुलोरा किंवा कल्पनेच्या विटांचे लेखक नावाच्या आर्किटेक्टच्या आराखड्यानुसार– त्यानेच केलेले बांधकाम असा सर्वसाधारण अनुभव असतो. शब्दांच्या विटांऐवजी त्यांना सांधणार्या जोडकामाशी, त्यातील बांधिलकीशी ज्यांची नाळ जुळली आहे असे काही जण शब्दकळेच्या साहाय्याने काही अनाहुत बांधकाम करतात– खरेतर त्यांच्याकरवी हे अनायासे घडते असे म्हणावे लागते. त्या शब्दकळेमध्ये जो ओलावा, जी आस, जी माया अथवा जी आपुलकी असते तीच अनेकदा त्या लेखनाचे मूल्य म्हणून उभी राहते. अरुणा ढेरे या अशा दुर्मीळ स्निग्धहस्त लेखिका.
त्यांचे स्तंभलेखन, अभ्यासलेखन तर याचा परिचय देते. परंतु जी.ए. आणि सुनीताबाई देशपांडे या दोन दूरस्थ जिवांच्या निव्वळ पत्रव्यवहारातून दोन व्यक्तींचे मैत्र समजून घेऊन त्याचा पैस, व्याप्ती नि खोली या तीनही गोष्टी त्यांनी ज्या अलवारपणे उलगडल्या आहेत ते पाहून मी स्तिमित झालो होतो. दोन संवेदनशील व्यक्तींचे नाते तिसर्या संवेदनशील व्यक्तीने उलगडून पाहिले आहे. या संग्रहातील सुनीताबाईंची पत्रे तर वाचनीय आहेतच, परंतु त्या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज आहे तो ‘आपुला ठावो न सांडिता...’ या शीर्षकाची अरुणाताईंची ही प्रस्तावना. पुरी प्रस्तावना इथे देणे शक्य नाही. त्यातील एक वेचा इथे देतो आहे.
‘वेचित चाललो...’ वर पुस्तकांतील निवडक वेचे देताना त्या त्या पुस्तकाचे नाव सहज ध्यानात राहावे म्हणून त्याचे मुखपृष्ठ सोबत जोडत असतो. त्या प्रघाताला अनुसरून इथे ‘प्रिय जी. ए.’चे मुखपृष्ठ जोडले आहे. यापूर्वी इथे दोन पुस्तकांच्या प्रस्तावनांचे अंश समाविष्ट केलेले आहेत, परंतु त्या दोन्ही प्रस्तावना खुद्द लेखकांच्याच आहेत. परंतु इथे मात्र जोडलेला वेचा पुस्तकाच्या लेखिकेने - सुनीताबाईंनी - लिहिलेल्या मजकुराचा भाग नाही, हा अपवाद ध्यानात ठेवायला हवा.
नमनाचे घडाभर तेल अखेरीस संपले...
---
माणूस म्हणून त्यांच्या वाट्याला गरीब मध्यमवर्गीयांप्रमाणे पुष्कळ विपरीत आले. दारिद्र्य आणि दुर्दैव यांचे चटके त्यांनी फार सोसले. प्रभावती आणि नंदा या दोन मावसबहिणींखेरीज आतड्याची अशी माणसे त्यांना नात्याने फार काळ अशी मिळाली नाहीत. आई, वडील, सख्ख्या बहिणी, खूप हवीशी असणारी, दुसरी आईच अशी सोनूमावशी या सर्वांच्या जाण्याने मन दुखरे आणि एकटे झाले. अशा वेळी ओठ मिटून पण स्वाभिमानाने परिस्थितीशी झुंज देताना स्वतःमधल्या माणूसपणाचा हळवा, संवेदनाशील गाभा जपण्यासाठी त्यांनी त्याभवती अलिप्तपणाचे एक संरक्षक कवच उभारले. प्रसंगी कठोरपणे त्यांनाच जखमी करण्याइतके ते काटेरी होते.
हे ज्यांना समजले त्यांच्या अंगावर त्या दुःखसहनाच्या कणखर धैर्याने काटा आला आणि हृदय कळवळले. पण त्यांच्या वेदना कमी करण्यासाठी कुणी धडपड करावी हे मात्र जी० एं०ना मान्य नव्हते. एखाद्या हट्टी मुलाने जगावर रागावून, पुढे केलेले ताट दूर ढकलता ढकलता आईच्या घासाकडेही पाठ फिरवावी तसेच त्यांचे वागणे होते. स्नेह तर हवा, पण तो सहजपणे न स्वीकारण्याची नाना निमित्ते स्वतःच उभी करायची आणि स्नेहाचा मान राखून, स्नेह्याला स्नेहवर्षावासाठी अधिक उत्तेजन मिळेल अशी कृती प्रखर स्वत्वशीलतेने जाणीवपूर्वक टाळायची. जी० एं०चा प्रतिसाद अशा विचित्र पेचात सापडलेला आहे.
सुनीताबाईंच्या पत्रांमधून खरे तर त्यांना एक समानधर्मी माणूस भेटले होते. त्यांच्याविषयी पोटातून आस्था– खरीखुरी आस्था– बाळगणारे, त्यांच्या लेखनावर भाबडे नव्हे तर जाणते प्रेम करणारे, त्यांच्या प्रतिभेची जात ओळखणारे आणि जीवनाविषयी त्यांच्याप्रमाणेच अपार कुतूहल असणारे ते माणूस होते. जी० एं०ना त्यांची येणारी पत्रे फार हवी असत. पत्रांमधून ते हवे हवेसेपण अधूनमधून ते व्यक्त करतही असत. “सारे सांभाळून जशी तुम्हांला सवड मिळेल, त्याप्रमाणे जरूर लिहा. तुमची पत्रे आम्हाला फार आनंदाची वाटतात,”, “सवडीने लिहा. तुमची पत्रे केव्हाही आली तरी आनंद आहे. वाट पाहण्यासारखी ती जिव्हाळ्याची असतात.”, “नंतर कधी तरी जरूर लिहा– प्रकृती, इतर कामे सांभाळून. तुमची पत्रे आम्हांला नेहमीच हवीशी वाटतील.”, “सवड मिळाली, नवीन काही वाचले तर जरूर लिहा. खरे म्हणजे तसले कसलेही कारण नसले तरी लिहावे, असे वाटते.” असा जिव्हाळ्याचा उच्चार जी० एं०च्या पत्रांमध्ये मनापासून उमटला आहे.
जी० एं०च्या आंतरजीवनातली ही अंतर्विरोधी घडामोड सुनीताबाईंनी हळूहळू जाणलेली दिसते. एखाद्या आईने, एखाद्या बहिणीने, एखाद्या समंजस मैत्रिणीने जाणावी तशी जाणलेली दिसते. प्रतिभावंत जी० एं०चे सामर्थ्य जाणता जाणता मित्र आणि माणूस म्हणून असलेल्या जी० एं०च्या स्वभावगत मर्यादा आणि त्यातले गुंतेही त्यांनी समजून घेतले. गाभ्यातल्या हळवेपणाला जपण्याचा हट्ट तर सुनीताबाईंचाही होताच. खरे तर ही दोन्ही माणसे अतिहळवेपणाभोवती तट उभारण्यासाठी धडपडणारीच म्हणायची. सुनीताबाईंचा स्पष्टपणा, क्वचित् तर्ककठोर परखडपणा आणि धारदार बुद्धिवाद हा त्यांच्या गाभ्याला जपणारा तेजःकोश ठरला आणि हट्टीपणा, अलिप्तपणा, एकांडेपणा ही जी० एं०नी आपल्या त्या गाभ्याला सुरक्षित ठेवण्यासाठी उभारलेली तटबंदी ठरली. सुनीताबाई जी० एं०चा पेच समजू शकल्या त्याचे मग नवल वाटत नाही. शिवाय असेही वाटते, की स्त्रीलाच काय, पण विश्वाला समजून घेण्याचे प्रयत्न पुरुष जितक्या सायासाने करतो, त्याच्या तुलनेत एक प्रकारच्या आंतरिक शहाणपणाच्या बळाने समजुतीची आणि मायेची भाषा बोलत स्त्रीला ते सायासाविनाही साध्य होऊ शकते. कित्येकदा तर तिच्यासाठी ते अबोधपणेच घडून जात असते. सुनीताबाईंचे जी० एं०ना समजून घेणे अशा प्रकारचे आहे.
मैत्री हे सुनीताबाईंच्या लेखी एक जीवनमूल्य आहे. त्यांच्या लेखी मैत्री म्हणजे विश्वास. तिथे भांडण होऊ शकते, पण गैरसमज संभवतच नाही. ज्याला किंवा जिला आपल्या आंतरविश्वात मोकळा संचार करण्याचे स्वातंत्र्य आहे, तो मित्र किवा ती मैत्रीण. ‘सप्रेम नमस्कार’ या लेखात जी० एं०ना उद्देशून त्यांनी हे लिहिलेच होते शिवाय असेही लिहिले होते की, “स्त्री-पुरुषप्रेमापर्यंत अनेक पोचतात. नैसर्गिक गरजेपलीकडेही जाऊन सेवा, आत्मार्पण वगैरेही करतात. पण स्त्री-पुरुष मैत्री, अगदी समान पातळीवरची, ज्यात त्याग, सेवा वगैरेही काही नाही, दोघांचेही व्यक्तिमत्त्व अबाधित राहून तरीही एकाच शरीराचे दोन भाग असल्यासारखी, समजदारपणा आणि सुखदु खांची सह-अनुभूती घेण्याइतके धनिष्ठ संबंध निर्माण होऊन एकजीव झालेली मैत्री मला अभिप्रेत होती. पण तुम्हांला तिची गरज नसावी. स्वतःच्या एकान्ताच्याच प्रेमात तर तुम्ही पडला नव्हता?”
सुनीताबाई अशा प्रकारे जी० एं०च्या विचारांचा, मूल्यकल्पनांचा धांडोळा घेत होत्या. तरल जाणिवांनिशी घेत होत्या म्हणून सुनीताबाईच्या पत्रांमधून अनेक ठिकाणी व्यक्त होणाऱ्या स्वीकारशीलतेचा, माघारीचा, शरण्यभावाचा अर्थ लावताना आपण पोचतो ते थेट त्यांच्या जिद्दी, कणखर आणि झुंजार अशा मैत्रभावापाशी.
अतिदुर्मिळ रत्नासारखे जी० एं०चे मैत्र लाभावे म्हणून सुनीताबाईनी केवळ मैत्रीने निसर्गतः बहाल केलेल्या अलिखित हक्कांवरच पाणी सोडले. एवढेच नव्हे, तर फडा उभारलेल्या नागिणीसारख्या स्वतःच्या आत्मसन्मानालाही त्यांनी हृदयतळाशी बंदिस्त करून ठेवले. आधीच दुखऱ्या आणि घायाळ असलेल्या आपल्या मित्रासाठी त्यांनी त्यांच्या स्वभावातला एरवीचा धारदारपणाही दूर ठेवला. त्यांनी चुकवलेली ही किंमत मोठी होती, पण त्यांना जे मिळवायचे होते त्याच्या तुलनेत त्यांच्या लेखी तरी ती कमीच होती.
सुनीताबाईपुढेही जी० एं०नी नाना प्रकारे स्वतः ऐवजी जणू एक बागुलबुवा उभा केलाच होता. नाना बहाणे, नाना सबबी, बालीश पळवाटा आणि गमतीदार स्पष्टीकरणे, “आमच्या घरी जेवायला या,” असे सुनीताबाईंनी पत्रातून आमंत्रण दिल्यानंतर प्रकृतीच्या कारणाने नीट जेवता येणार नाही, म्हणून बरे वाटल्यावर मगच येईन, असे जी० ए० एका पत्रात कळवतात. आणि नंतर कधी तरी आपण आपल्या वडलांचे आक्रीतान्नाचे कसे घेतले आहे असा बहाणा करतात. लहान मुलाने तोडावर चादर घेऊन “आई, मी कुठाय?” म्हणून हाक मारावी आणि आई शोधायला आल्यावर, “चादरीच्या आत मी मुळीच नाहीच” असे तिला बजावून सांगावे, तेव्हा मग आईनेही खेळ पुढे चालू ठेवण्यासाठी तो बहाणा मान्य करावा असे जी० एं०चे वागणे असे आणि पत्रातले लिहिणेही असे.
सुनीताबाईंनी समजूनउमजून जी० एं०चा तसला खेळ स्वीकारला होता. वयाच्या नाना बिंदूवर फिरत जाण्याची आणि स्वतःला नैसर्गिक ऊर्मीने विस्तारत नेण्याची शक्ती एखाद्या प्रौढ, बुद्धिमान, आणि जणू पिंडधर्मातलेच नैसर्गिक शहाणपण लाभलेल्या प्रगल्भ स्त्रीमध्ये कशी असते याचे मोठे विलोभनीय दर्शन या खेळाच्या निमित्ताने होत राहते. जी० एं०नाही त्यांच्या त्या तशा दर्शनाचे अपरूप वाटत असले पाहिजे. सुनीताबाईना थोडे चिडवले, की त्यांच्यातली स्वत्वाची ठिणगी कशी झगझगीत चमकते हेही त्यांना कळले असले पाहिजे.
खरे तर सुनीताबाईंच्या रूपात जी० एं०ना प्रथमच एक अस्मितासंपन्न आणि बुद्धिमान स्त्री भेटली. त्यांच्याप्रमाणेच ती संवेदनांनी समृद्ध होती. तीक्ष्ण जाणिवांची होती. ती धीट होती. चाकोरीच्या निर्जीवपणातून वर उठणाऱ्या जिवंत गोष्टींवर प्रेम करणारी होती. जगाचे दडपण न मानता स्वतःला पटलेल्या वाटेवर ठाम चालणारी होती. “जीवनमूल्ये हाच माणसाचा खरा आधार” असे मानणारी होती आणि तिने स्वीकारलेली मूल्ये जी० एं०नाही स्वीकारणीय वाटत होती.
तिची जीवनाविषयीची आस्था गाढ होती आणि त्यातल्या भावना-संवेदनांच्या जालाविषयी तिला नितान्त मोठे कुतूहल होते. जीवनाचे चिंतन करण्याची तिची स्वाभाविक ऊर्मी होती. अशा चिंतनातून नाना प्रश्नांचा उदय सहजीच होत असतो. जीवनाचे स्वरूप काय, भोवतीच्या सृष्टीशी त्याचे नाते काय, मानवी जीवनाचा अर्थ काय, नियतीच्या संदर्भात मानवी कर्तृत्वाचे मोल काय, मुक्ती म्हणजे काय आणि मृत्यू म्हणजे तरी काय, अंतिमतः या मानवी अस्तिवाचेच प्रयोजन व अर्थ काय असे प्रश्न जीवनाच्या व्यामिश्रतेचा अनुभव घेणाऱ्या चिंतनशील माणसाला पडतच असतात. रूढार्थाने त्या माणसाला आपण आध्यात्मिक म्हणणार नाही. सुनीताबाई तर कोणत्याही सांकेतिक किंवा पारंपरिक अथनि देवभोळ्या नाहीत. किंबहुना, कर्मकांड किवा दैववाद यांच्या वाऱ्यालाही उभ्या राहणाऱ्या नाहीत. तरीही त्यांचा मूळ पिंड मात्र जीवनविषयक प्रश्नांच्या संदर्भात आध्यात्मिकाचाच आहे. नास्तिकाच्या अध्यात्माला काय संज्ञा देता येईल माहीत नाही; पण असे जर निराळे अध्यात्म कल्पिता आले तर सुनीताबाईंमधून ते सातत्याने आणि प्रखरपणे प्रकट होत राहिलेले दिसते. आणि म्हणून या बाबतीतही जी० एं०ना सुनीताबाईंमधून समधर्मी मैत्रीण भेटली असेच म्हणावे लागते.
ही मैत्रीण निःसंकोचपणे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न विचारणारी होती. मागे-पुढे न पाहता त्या प्रश्नांच्या कूट अशा गाभ्यापर्यंत पोचण्यासाठी धडपडणारी होती. तिला जंगलांची आणि वाळवंटांची, पाण्याची आणि पावसाची, अंतराळाची आणि नक्षत्रांची भव्य ओढ होती. निसर्गघटितांचा आणि मानवी जीवनाचा अर्थ लावू पाहणारे मोठे मन तिच्यापाशी होते. संज्ञेचा दिवा धरून असंज्ञ मनात आणि सृष्टिरहस्याच्या अंधारात शिरण्याची तिची तयारी होती. अज्ञातात उतरण्याची तिची एक वाट कवितेतून वळत होती आणि जी० एं०ना कविता हाच सर्वश्रेष्ठ वाड्मयप्रकार वाटत होता.
केवळ भावुक आणि गोडगोड लेखन करणाऱ्या आणि वाचणाऱ्या स्त्रियांमध्ये तिचा समावेश नव्हता. त्यांना आवडणाऱ्या कुसुमावती देशपांडे, इरावती कर्वे, किवा दुर्गाबाई भागवतांप्रमाणेच ही तीक्ष्ण संवेदनेची, सजग बुद्धीची आणि चिंतनशील स्वभावाची स्थिर आणि ‘स्वस्थ’ अशी स्त्री होती. त्यांच्याइतका तिच्या विचारांचा आणि वाचनाचा पैस मोठा नव्हता आणि जीवनाच्या व्यापक पटावर लहान-मोठ्या सृष्टिघटितांचा आणि मानवी सुखदुःखांचा अर्थ लावताना लेखक होऊन वाड्मयाचे माध्यम तिने वापरले नव्हते; पण त्या घटितांविषयीची तिची जाण मार्मिक होती आणि त्या सुखदुःखांचे स्वरूप ती सर्व शक्तीनिशी न्याहाळत होती.
शिवाय तिच्या वागण्याबोलण्यात निरभ्र अशी मुक्तता होती. सहसा स्त्रियांमध्ये अशी मुक्तता सापडत नाही. परंपरा किंवा आधुनिकता यांच्या साच्यामध्ये न सामावणारी मुक्तता. व्यक्तिविशिष्टतेतून उंच उठणारी मुक्तता.
या मुक्ततेच्या पोटात चुका करण्याची आणि त्या मान्य करण्याची संधी होती. क्षमायाचनेला अवसर होता. मनातळच्या मनात हलणाऱ्या अतिकोमल भावनांना शब्दांचा आधार घेण्याचे स्वातंत्र्यही होते.
जी० एं०साठी हे सारे नवलाईचे तर होतेच, पण थोडे दिपवून टाकणारेही होते. आपल्या कथालेखनाच्या पारंभकाळात भोवतालच्या वास्तवाचे अनुभव लिहीत असतानाही त्यामागच्या अमूर्त अशा जीवनार्थावर त्यांची दृष्टी खिळलेली होती. नंतर तर सरळ वास्तवाचा हात त्यांनी सोडूनच दिला आणि जीवनाच्या उग्र-भीषण किवा सौम्य कोमल आविर्भावामागच्या अंतिम सत्याला स्पर्श करण्याच्या निकराच्या प्रयत्नात ते दृष्टांतकथांमधून पुढे जात राहिले. त्यांचे ते तसे करणे साहसाचे होते, पण भव्य ध्यासाचेही होते. शिवाय त्यांच्यासाठी ते पर्यायहीनही होते.
हे समजू शकणारी एक समंजस स्त्री त्यांना सुनीताबाईमधून भेटली. माणूस म्हणून नव्हे तर कलावंत म्हणूनही त्यांना तो फार मोठा दिलासा मिळाला असणार नक्की. तिला जी० एं०च्या कथा आवडल्या त्याही ‘इस्किलार’, ‘यात्रिक’,‘प्रवासी’ यांसारख्या. सुनीताबाईंची रसिक म्हणून प्रगल्भता कोणत्या जातीची आहे हे तर पहिल्या पहिल्या पत्रांमधूनच जी० एं० मधल्या कलावंताला समजले होते, आणि ते त्यांना फार मोलाचे वाटले होते. मात्र या प्रकारची प्रगल्भतेच्या मुखावर चमकणारी मुक्ततेची सुंदर आभा त्यांना कोणा स्त्रीकडे पाहताना दिसावी हे थोडे अनपेक्षित होते. एखादी स्त्री आपल्यामधल्या कोमलतेचा परिमळ सांभाळूनही जीवनातल्या उग्र-प्रखर अनुभवांकडे पाहू शकते, त्यांच्या जवळ जाऊ शकते, त्यांनी उठवलेल्या काळ्या धुरातून पार जाऊ शकते याची कल्पना त्यांनी केली नसावी असे वाटते. आपला ठाव न सोडताही स्त्री पुरुषाच्या सुखदुःखात मिळून जाऊ शकते, स्वत्व राखूनही समर्पित होऊ शकते हे त्यांच्या समजुतीपलीकडचे होते. त्यांना गडकऱ्यांची सिंधू समजू शकत होती, पण शरदबाबूंच्या नायिका समजत नव्हत्या. “मूकपणे फार दुरून, स्वतः झिजत, भयंकर उच्च प्रेम करणाऱ्या त्या नायिका” त्यांना हास्यास्पद वाटत होत्या.
त्यांच्या तशा प्रतिक्रियेचा निषेध नोंदवताना सुनीताबाईंनी लिहिले आहे, “एखाद्या गोष्टीचं वेड घेऊन सूर्यासारखी अंतर्बाह्य तापणारी माणसं आपल्या समाजात आणि साहित्यातही फार कमीच व्हँगॉगच्या सूर्यफुलाला शेवंतीचा मंद सुगंध आला आणि सोन्याचं मोल लाभलं खरं, पण त्यासाठी त्याला त्या चित्रकारांच्या उद्ध्वस्त जीवनाचं खतपाणी मिळालं होतं. प्रत्येक गोष्टीला त्याची किमत द्यावीच लागते. Agony शिवाय Ecstasy कुठली? एखाद्या वेडापायी आयुष्य उद्ध्वस्त करण्यातली मस्ती मला फार विलोभनीय वाटते. सगळ्याच नायिका प्रेम करतात. पण शरदबाबूंच्या नायिकांच्या प्रेमाची तर्हा वेगळी आहे. ‘भयंकर उच्च’ म्हणून त्याची कुणी खुशाल चेष्टा करावी. पण ह्या नायिका स्वतः प्रेम करतात. प्रेमाची भीक मागत नाहीत. सुधाकरानं कितीही लाथा घातल्या तरी त्याला देवच मानणारी सिंधू शरदबाबूंनी निर्माण केली नाही किंवा डोहाळ्याचं निमित्त करून फसवून रानात पाठवणाऱ्या रामाचा वंश पोटात वाढतोय म्हणून प्राणत्याग करण्याची इच्छा सोडून देणारी सीताही शरदबाबूंनी निर्माण केली नाही... शरदबाबूंच्या नायिकांनीही प्रेम केलं स्त्री-पुरुषांतलं स्वाभाविक आकर्षण आणि ओढ त्या प्रेमातही अर्थातच आहे. पण त्यानंतरचं आयुष्य मात्र त्यांचं स्वतःचं राहिलं. त्यांचं प्रेम ही त्यांची स्वतःची गरज होती; प्रियकराच्या मालकीची वस्तू नव्हती. त्या स्वाभिमानानं जगल्या. दुःखाला पारख्या न होता उघड्या डोळ्यांनी सामोऱ्या गेल्या. स्वतःच्या प्रेमाच्या मस्तीत स्वतःचं आयुष्य उधळून लावण्याचा खेळ खेळायला कचरल्या नाहीत. त्यांना स्वतःची मतं आहेत, गुणदोष आहेत, स्वतंत्र अस्तित्व आहे. स्वी म्हणून त्यांनी स्वतःला माणसापेक्षा श्रेष्ठ अशी कुणी देवताही मानलं नाही आणि पुरुषापेक्षा कनिष्ठ अशी अबलाही मानलं नाही.”
सुनीताबाईच्या या पत्राला उत्तर देताना जी० एं०नी सिंधू आणि राम-सीता यांच्यावर अगदी वेगळ्या प्रकारची मार्मिक टिप्पणी तर केली आहेच, पण सुनीताबाईंच्या मूळ प्रश्नाला अत्यंत प्रगल्भ बगल देऊन शरदबाबू आणि गडकरी, गडकरी आणि वरेरकर यांची तुलना करत स्वतःचा बचाव केला आहे.
जी० एं०ना ज्या आतड्याच्या स्त्रियांचा अनुभव होता त्या स्त्रिया सोशीक, सेवाभावी, जीवनश्रद्ध, प्रेमळ आणि शहाण्या होत्या. त्यांच्यामधून जी० एं०चा स्त्रीत्वाचा आदर्श घडला असणार. त्याहून वेगळे पण तितकेच प्रेरक, पोषक आणि समर्थ रूप त्यांना सामोरे आले तेव्हा त्याचे स्वागत करण्याची मात्र त्यांची नीटशी तयारी नव्हती. हर्षभराने ते त्या रूपाला सामोरे जाऊ शकले नाहीत. किंवा कदाचित् असेही असेल, की त्यांनी स्वतःभोवती स्वतःच आखलेली लक्ष्मणरेषा ओलांडण्याचा प्रसंग आला तेव्हा तो आनंददायक असूनही त्यांनी डोळे मिटून, स्वतःला शपथ घालून मागे परतवले असेल.
सुनीताबाईंना हे न समजणे कसे शक्य होते? त्यांना ते समजले आणि खूप वेदनांसह त्यांनी ते स्वीकारलेही. थट्टा करून, वाद घालून, भांडण करून, आसवे गाळून अखेर समजुतीच्या अशा एका टप्यावर त्या आल्या की तिथे एका पर्यायहीन नात्याच्या अस्तित्वासाठी सारे स्वीकारण्याची तयारी होते.
की आपुला ठावो न सांडितां। आलिंगिजे चंद्रु प्रकटितां।
ऐसा अनुरागु भोगितां। कुमुदिनी जाणे॥
मैत्रीचा चंद्र हवा तर त्याच्या साऱ्या कळांसह तो स्वीकारला पाहिजे. अवसेच्या अंधारात मधूनच शिरण्याचा त्याचा हट्टही स्वीकारला पाहिजे. आपला ठाव न सोडताही कुमुदिनी नाही का तसे करीत? हा स्वीकार-समजूतदार स्वीकार-आणि तिथवरचे सुनीताबाईंचे उत्कट सुखदुःखांसकट (निर्विकार होत नव्हे) पोचणे हा या पत्रसंग्रहातला सर्वात जिव्हाळ असा भाग आहे.
-oOo-
पुस्तक: प्रिय जी.ए.
लेखिका: सुनीता देशपांडे (प्रस्तावना: डॉ. अरुणा ढेरे)
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली.
वर्ष: २००३.
पृ. नऊ ते पंधरा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा