मनुष्यप्राण्याच्या इतिहासात त्याने आपल्या भीतीवर मात करण्यासाठी देव ही आदर्श, नियंत्रक आणि कृपाळू संकल्पना निर्माण करून त्याचे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व प्रतिपादित करायला सुरुवात केली. हे अस्तित्व केवळ मानण्यावरच असल्याने स्वयंसिद्ध होते.
पण मनुष्यप्राण्याचा माणूस होऊ लागला, त्याचे विचार-इंद्रिय विकसित होऊ लागले तसतसे श्रेष्ठत्व हे पुराव्याने, तर्काने सिद्ध करावे लागेल याची त्याला जाणीव झाली. मग मोठ्या-शेजारी छोटी रेघ ओढून त्याने त्याचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यास सुरुवात केली. जगातील बहुतेक जमाती, धर्म, वंश यांच्या परंपरेत देवाच्या जोडीला देवांकडून सतत पराभूत होणारा असा शत्रू आणून बसवण्यात आला. मग ज्यू/ख्रिश्चन परंपरेत सैतान आला, इस्लाममधे इब्लिस, शैतान आला, तर बौद्ध धर्मात मार उगवला. (या इथे दुर्गाबाईंच्या वेच्याच्या प्रस्तावनेतही हा मुद्दा आला आहे.) हिंदू परंपरेत तर अशा छोट्या रेघांची रेलचेल आहे, कारण इथे देवांची संख्या प्रचंड असल्याने त्यांचे शत्रूही महामूर.
ही आदिम जाणीव माणूस आजही पुढे घेऊन जातो आहे. राजकारणापासून समाजकारणापर्यंत कुठेही शेजारी लहान रेघ ओढल्याखेरीज आपली रेघ मोठी सिद्धच करता येत नाही इतकी श्रेष्ठत्वाची व्याख्या खुजी झाली आहे. इतिहास वा साहित्यही याला अपवाद नाही.
आपल्या मते मूर्खपणाच्या असलेल्या, मारक असलेल्या एखाद्या निर्णयावर 'तुघलकी निर्णय' असा शिक्का मारून त्याची निंदा केली जाते, कारण महंमद बिन तुघलक हा मूर्खांचा शिरोमणी अशी आपली व्याख्या आहे. इथे 'वेचित चाललो' वरच कार्नाडांच्या 'तुघलक'चा एक वेचा शेअर केला आहे. या नाटकातला तुघलक वेगळाच दिसतो. ही दुसरी बाजू पाहण्याची तसदी घेणारे कार्नाडांसारखे एखादेच, बाकीचे सारे पूर्वग्रहांवर जगतात.
याच्या दुसर्या टोकाला काही जण जात, धर्म, गट याचा विचार करून आपल्या बाजूच्या, गटाच्या प्रत्येक नकारात्मक प्रवृत्तीचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात एखादी व्यक्ती रोल मॉडेल आहे की आपला तुघलक आहे हे बव्हंशी वास्तवापेक्षा पूर्वग्रह नि आपल्या मतांना दामटण्याची सोय यावरच ठरते.
साहित्यामधे सर्वांतिसचा 'डॉन क्विक्झोट' हे पात्र याचे उत्तम उदाहरण ठरते. सर्वांतिसने त्याच्या या कादंबरीचा पहिला भाग प्रकाशित केला तेव्हा हे पात्र 'तुघलक' म्हणून सामोरे आले. पूर्वग्रहदूषित विचार करणार्यांनी या व्यक्तीला तसेच पाहिले. सोळाव्या शतकात प्रकाशित झालेल्या या कादंबरीला समीक्षकांनी बिल्कुल महत्त्व दिले नाही. पण वाचकांनी मात्र तिला डोक्यावर घेतले, ते ही एक विनोदी कादंबरी म्हणूनच.
पुढे एकोणिसाव्या शतकात ’क्विक्झोट'कडे हा एक वेगळेच व्यक्तिमत्व म्हणून पाहिले जाऊ लागले. क्विक्झोट्च्या व्यक्तिमत्त्वात एखाद्या प्रेषिताची कळकळ नि हेतू सहज दिसतात. फक्त त्याला योग्य कृती अथवा विचार सापडले नाहीत, त्यामुळे त्याची कृती हास्यास्पद ठरली, तो लोकांच्या उपहासाचे, मनोरंजनाचे साधन ठरून गेला. थोडक्यात त्याच्याकडे एक 'अयशस्वी प्रेषित' म्हणून का पाहू नये असा एक विचार पुढे आला.
इतकेच नव्हे तर त्याने जागतिक साहित्यात अनेक लेखकांना प्रेरणा दिली. 'क्विक्झॉटिझम' हा विचारच त्यातून पुढे आला. क्विझॉटिझम म्हणजे नक्की काय याची शाब्दिक व्याख्या प्रत्येकाने आपापल्या सोयीची केलेली असली तरी ढोबळमानाने 'सर्वेपि सुखिनः सन्तु' ही मूळ प्रेरणा आणि तसे घडावे म्हणून आपण आपली जबाबदारी उचलायला हवी हा विचार, पण त्याला आवश्यक असलेल्या वास्तवाच्या भानाचा किंवा बलाचा अभाव म्हणजे क्विक्झॉटिक व्यक्तिमत्व असे म्हणता येईल.
ही जी व्याख्या मी केली ती ढोबळ यासाठी म्हणतो, की यातील एखाद्या गुणाची (गुण या शब्दाला कोणतीही सकारात्मक, नकारात्मक छटा नाही!) छटा कमी अधिक गडद असू शकते, एखाद्याचा अभाव असू शकतो, तितपत धूसरता कोणत्याही व्याख्येत असतेच.
तर या क्विक्झॉटिझम ने साहित्यात आपले एक अढळ असे स्थान निर्माण केले. असे क्विक्झोटने जागतिक साहित्याच्या क्षेत्रातील अनेक दिग्गज लेखकांच्या लेखनात शिरकाव केलेला दिसतो. अनेकांनी जाहीरपणे हे ऋण मान्यही केले आहे. हा धागा घेऊन दोन जागतिक आणि दोन भारतीय लेखकांवरील क्विक्झोटचा प्रभाव शोधण्याचा प्रयत्न विजय पाडळकर यांनी आपल्या 'मृगजळाची तळी' या पुस्तकातून केला आहे.
डोस्टोव्हस्कीच्या 'इडियट'मधला प्रिन्स मिश्किन, हिंदीमध्ये बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' मधला सदानंद, गुस्ताव फ्लॉबेरची प्रसिद्ध 'मादाम बोवारी' आणि जीएंच्या 'यात्रिक' मधे येणारा डॉन (जो खरंतर व्यक्ती म्हणूनही डॉन क्विझोटच आहे) यांच्यातील क्विक्झोट उलगडून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
थोडे शोधले तर इतर अनेक कथा, कादंबर्यातून अशी क्विक्झॉटिक पात्रे आढळून येतील. विश्राम गुप्ते यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या 'चेटूक' या कादंबरीतील राणी ही देखील साहित्य, चित्रपटाच्या जगातून घेतलेल्या आदर्श प्रेमाची, आदर्श जोडीदाराची आस घेऊन असते. पण वास्तवात तिच्या समोर येतो तोच आपल्याला हवा तसा जोडीदार आहे या भ्रमात ती वागू पाहते. फक्त क्विक्झोटप्रमाणे तिचा भ्रमनिरास फार उशीरा होत नाही, पण तिच्या स्वप्नाळू काळातील कृतीचे परिणाम तिला अखेरपर्यंत भेडसावत राहतातच.
पाडळकरांनी या सार्या लेखकांच्या लेखनातील क्विक्झॉटिक अस्तित्वाबाबत केलेले विवेचन सारे तुम्हा आम्हाला पटेल असे मुळीच नाही. अगदी इथे मी निवडलेल्या वेच्याबाबतही मला ते पुरेसे पटले आहे असे नाही. परंतु स्वतंत्रपणे पाहिले, तर त्यांचा हा 'आकान्ताचे वैफल्य' हा लेखच मला पुस्तकातील पाच लेखांत सर्वात अधिक भावला.
हा लेख बिमल मित्र यांच्या 'मुजरिम हाजिर' या कादंबरीबाबत आहे. यातील सदानंद हा मला स्वतःला क्विक्झोट कमी आणि ’पराभूत बुद्ध' अधिक दिसतो. किंबहुना मी ती कादंबरी वाचली तेव्हा त्याचे ते बुद्धाची छाया असणेच मला अधिक भावले होते. आजच्या जगात बुद्ध अवतरला तर त्याचे भागधेय देखील ’सदानंद'पेक्षा वेगळे नसेल याची मला जवळजवळ खात्रीच आहे. 'जो लोक कल्याणा, घेई करी प्राण, त्या सौख्य कैचे' हे खरे असले तरी आज त्याला जोडूनच 'त्या यश कैसे' असेही म्हणावे लागेल.
वैयक्तिक स्वार्थ, माझ्या गटाचा स्वार्थ या क्रमाने प्राधान्यक्रम उतरत जात असताना आणि तो स्वार्थ, अहंकार जपण्यासाठी सोबत इतरांसाठी द्वेष जपणे महत्त्वाचे ठरत असताना ’सकलांचे कल्याण’ ही सर्वांनाच मूर्खपणाची कल्पना वाटत असते हे उघड आहे. अशा वातावरणात बुद्ध पराभूतच होत असतात. कारण बुद्धाचे श्रेष्ठत्व समजून घेण्याइतकी कुवत आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याची निर्लिप्तता केव्हाच अस्तंगत झालेली आहे.
हा लेख निवडला याचे कारण म्हणजे हा सदानंद एकांगी, सर्वगुणसंपन्न असा नाही हे! माणूस कितीही सद्भावना राखून असला तरी ती आचरणात आणण्याइतकी त्याची प्रेरणा किंवा कुवत पुरेशी प्रबळ असेलच असे नाही. तसे असले तरी त्याच्या त्या सद्भावनेचे महत्त्व कमी होत नाही. आणि म्हणून हा सदानंद आपल्यातलाच वाटतो. आणि जर तो क्विक्झॉटिक असेल, तर त्याच्यासोबत असताना आपल्या आतला क्विक्झोटही कदाचित सापडू शकतो.
-oOo-
या पुस्तकातील एक वेचा: आकान्ताचे वैफल्य