रविवार, ९ एप्रिल, २०१७

मोठी रेघ - छोटी रेघ

"बाई, आता आपण पाप-पुण्य, स्वर्ग-नरकाबद्दल बोललो. त्याच संदर्भात एक प्रश्न मला विचारावासा वाटतो आहे. 'पैस' मधे तुम्ही अजिंठावर लेख लिहिला आहे. त्यामधे 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' असं नाव एक जर्मन माणसान दिलेल्या चित्राचं तुम्ही फार सुंदर वर्णन केलं आहे. या चित्रामध्ये गौतम बुद्धाला मोहात पाडण्याची पराकाष्ठा करणारा 'मार' दाखवलेला आहे. आता इथं मला आठवण होते ती 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' या कथेची. या दोन्हींची तुलना कशी कराल?"

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

"बौद्ध वाङमयामधे 'मार' ही व्यक्तिरेखा आहे, ती सैतानाची मूर्ती नाही. ख्रिश्चॅनिटी आणि इस्लाममधे सैतान आहे. 'मार' हा त्या अर्थाने सैतान नाही. पण तो बुद्धाला, बौद्धांना मोहात पाडणारा आहे. तुमच्या मनात ऐहिक सुखासाठी लोभ-मोह उत्पन्न करणारा आहे; पण हा पापी नाही. 'संपत्ती पाहिजे? ये माझ्याकडे, मी देतो. बुद्धाकडे कशाला जातोस?' अशा पद्धतीचं त्याचं बोलणं असतं. 'बुद्धप्रलोभन' म्हणून मी एक लेख लिहिला आहे. त्यामध्ये हा मार बुद्धालाच मोहात पाडायचा प्रयत्न करतो त्याबद्दल मी लिहिलंय. तेच ते अजिंठा इथलं चित्र. फारच सुंदर चित्र आहे ते, की बुद्धासमोर मार येतो. अक्राळविक्राळ चेहर्‍याचा आहे तो मार. बुद्धाला भय दाखवतो, की मी मारेन तुला. मग त्याच्यासमोर आसन्नप्रसवा गर्भवती, सुंदर स्त्री उभी करतो, की ती बघून त्याला - बुद्धाला - आपल्या बायकोची, मुलाची आठवण यावी आणि त्याचा तपोभंग व्हावा. कारण गौतम आपल्या तान्ह्या मुलाला आणि तरुण, सुंदर पत्नीला सोडून आलेला असतो. पण गौतमाने आपला मार्ग सोडला नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे, की गौतमाच्या वडिलांनी त्याला अगदी ऐषारामात ठेवलं होतं. दु:खाचा, दैन्याचा वारादेखील त्याला लागू नये म्हणून. पण गौतमाने जख्खड म्हातारा बघितला, रोगी माणूस बघितला, प्रेतयात्रा बघितली आणि मग वैराग्य येऊन त्यानं राजवाडा सोडला, आपला तान्हा मुलगा सोडला, तरुण, सुंदर पत्नीचाही त्याग केला. पण एक लक्षात घे, की गौतमाला हे वैराग्य मोठ्या वयातच आलं असं नव्हे, तर लहानपणापासून त्याची ती मूळ प्रवृत्तीच होती. एकदा छोटा गौतम पांढर्‍या जांबाच्या झाडाखाली बसला होता. तर तिथं बसल्या बसल्याच जांबाकडे बघून त्यानं ध्यान लावलं. तेव्हा तो ५-६ वर्षांचाच होता. त्याची ही वृत्ती बघूनच त्याच्या वडिलांनी त्याला हरप्रकारे दु:खापासून दूर ठेवलं होतं, ऐषारामात ठेवलं होतं. त्याला हा मार परत परत वैराग्यापासून, ज्ञानमार्गापासून, तपःसाधनेपासून दूर ठेवायचा प्रयत्न करतो. पण बुद्ध मात्र आपल्या निश्चयापासून ढळत नाही. 'बुद्धिझम अ‍ॅन्ड मायथॉलॉजी ऑफ इव्हिल' नावाचं एक पुस्तक आहे, ते वाच. या मारबद्दल खूप माहिती मिळेल तुला. तशीच 'मेरी कॉरेली'ची 'सॉरोज् ऑफ सॅटान' नावाची कादंबरी आहे. त्यामध्ये तिनं सैतानाचं दु:ख काय आहे ते मांडलंय. फार छान पुस्तक आहे ते."

"अगदी जरूर वाचेन ही पुस्तकं. आणखीही काही मिळाली तर वाचेन."

"आणि मग मला सांग; काय काय तुला मिळालं ते."

"सांगेन. पण आत्ता मला सांगा, की बौद्ध वाङमयातला मार आणि ख्रिश्चनांचा सैतान यांच्यामधला फरक, साम्य काय? 'टेम्प्टेशन ऑफ बुद्ध' आणि 'टेम्प्टेशन ऑफ ख्राइस्ट' यांच्यामधे साम्य, फरक काय?"

"मार आणि सैतान हे दोघेही लोकांना मोहात पाडण्यासाठी धडपडणारे आहेत. ख्रिस्ताबद्दल असं म्हणतात, की माग्दालेना ही ख्रिस्ताचे पाय आपल्या अश्रूंनी धुते, आपल्या लांबसडक केसांनी ख्रिस्ताचे पाय पुसते. तेव्हा ख्रिस्त तिच्याकडे दयार्द्र दृष्टीने बघत असतो. ते दृश्य पाहून लोकांना वाटतं, की ख्रिस्ताला माग्दालेनाचा मोह पडलेला आहे. पण वस्तुतः तिने जीझसचे पाय आपल्या अश्रूंनी धुवून, केसांनी पुसून स्वतःच्या पापांच क्षालन केलेलं आहे, असाही विचार मांडला जातो."

"बुद्ध आणि मार यांचं नातं वेगळंच आहे. बुद्धाने वैराग्याच्या मार्गाने, तपश्चर्येच्या मार्गाने जाऊ नये, सुखासीन आयुष्य जगावं, जगातले सगळे उपभोग घ्यावेत यासाठी मार त्याला कधी भीती दाखवतो, तर कधी मोहात पाडतो. कितीतरी प्रसंग असे आहेत, की बुद्ध मोहात पडू शकला असता; त्याच्या नकळतच. पण बुद्ध विचलित झाला नाही. म्हणून बुद्धाचं हे टेम्प्टेशन नाहीच आहे. कोणी कोणी विद्वान येतात आणि काहीतरी आख्यायिका शोधून काढून कशाशी तरी संबंध लावतात. खरं म्हणजे या चित्रामध्ये मार तिथे असला; तरी ते बुद्धाचं टेम्प्टेशन नाही; तर मार तिथे असूनही बुद्धाला झालेला परमसत्याचा साक्षात्कार आहे. म्हणूनच बुद्धाची नजर, त्याचे डोळे अर्धोन्मीलित आहेत, अंतर्मुख झालेले आहेत. बुद्ध स्वतःच कल्पना करतो, की मार मला कुठल्या पातळीपर्यंत जाऊन मोहात पाडायचा प्रयत्न करू शकतो. आणि त्या कल्पनेपासूनही बुद्ध स्वतःला सोडवून घेतो. ख्रिस्ताचं भांडण आहे ते प्रत्यक्षातल्या सैतानाशी.

"हिंदू धर्मामध्ये सैतानाची किंवा मारची कल्पना दिसत नाही ना?"

"नाही. हिंदू धर्मात सैतान किंवा मार नाही. त्याचं स्वरूप फार वेगळं आहे. एक महत्त्वाचा फरक म्हणजे माणसाला मोहात पाडायला, तपश्चर्येपासून विचलित करण्यासाठी दुसरा कोणी लागत नाही; तर माणसाच्या मनातच लोभ, मोह, माया, आसक्ती असते. माणूसच स्वतःचा शत्रू असतो. ही कल्पना हिंदू धर्मात आहे. म्हणूनच आपले साधू, संत, महात्मे नेहमी सांगत असतात, की माणसाने स्वतःच आसक्ती आणि मोहापासून दूर राहावे. हिंदू माणसाचा झगडा असतो तो सैतानाशी नसून स्वतःशीच असतो. पण दुष्टात्मा, भूतंप्रेतं, राक्षस ही कल्पना हिंदूंमध्ये आहे. पण या लोकांचं माणसाशी वैर असतं, ते इहलोकी मिळणार्‍या सुखदु:खांशी जोडलेलं आहे. आध्यात्मिक मार्गाने जाणार्‍याला स्वतःच्या मनाशीच झगडा करावा लागतो."

"पण आपल्याकडे अप्सरा वगैरे आहेतच; ऋषीमुनींना मोहात पाडण्यासाठी."

"आहेत ना. त्यांना इंद्र पाठवतो. किंवा इतर देवांना जेव्हा या ऋषीमुनींची भीती वाटते तेव्हा ते इंद्राकडे जातात, विष्णूकडे जातात. आणि मग ते देव मोहिनीचं रूप घेतात किंवा स्वर्गातल्या एखाद्या अप्सरेला त्या ऋषीमुनींचा तपोभंग करण्यासाठी पाठवतात. त्यामागे हेतू असतो तो देवांच्या स्वार्थाचा. की अमुक ऋषीनं एवढं तप केलेलं आहे, की इंद्राला वाटतं त्याच्या तपामुळे माझं इंद्रपद जाईल; म्हणून तो अप्सरेला पाठवतो. किंवा ऋषी जेव्हा यज्ञयाग करायचे तेव्हा राक्षस येऊन त्यांचा यज्ञ उध्वस्त करून टाकायचे; कारण यज्ञ करून ऋषींना वर मिळतील, ते आपल्यापेक्षा वरचढ होतील म्हणून राक्षसांना भीती वाटायची. दुसरी एक गोष्ट आहे एका राक्षसाची, भस्मासुराची. त्यानं तपश्चर्येनं शंकराकडून वर मिळवला, की तो ज्यांच्या डोक्यावर हात ठेवेल ते ते लोक मरतील. शिवाय त्याला इतर कुणीही मारू शकणार नाही. हा वर मिळाल्यानंतर त्याने पृथ्वीवर अगदी हैदोस घातला. ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवत त्याने मानवसंहार सुरू केला. तेव्हा सगळे लोक विष्णूला शरण गेले. मग विष्णूने मोहिनीचं रूप घेतलं आणि नाचता नाचता त्या राक्षसाला आपल्या नादी लावलं आणि स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवायला लावला. आता या गोष्टीत अध्यात्माचा किंवा ज्ञानमार्गाला जाणार्‍याचा काहीही संबंध नाही.मनुष्य, राक्षस, दुष्टात्मे आणि देव यांचं भांडण आहे ते सत्तेसाठी. परम कोटीला जाऊ पाहणार्‍या माणसाला अडवण्यासाठी देव आणि दानव कोणीही येत नाही. हा फरक आहे हिंदू धर्म आणि इतर धर्मांत; सैतानाच्या किंवा मारच्या संदर्भात." बाई म्हणाल्या.

- oOo -

पुस्तकः ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी
लेखक/संवादकः दुर्गा भागवत/प्रतिभा रानडे
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती पाचवी (२००५)
पृष्ठे: १२०-१२२.

---

टीपा:
१. तिरपा ठसा संवादक प्रतिभा रानडे यांच्या संभाषणासाठी.
२. या विषयासंबंधी दुर्गाबाईंनी सुचवलेली पुस्तके गोळा करून प्रतिभा रानडे यांनी त्यांच्या आधारे– विशेषतः टी.ओ. लिंग लिखित 'बुद्धिझम अ‍ॅन्ड दि मायथॉलॉजी ऑफ इव्हिल'– या उतार्‍याला एक टिपण जोडून दिले आहे. ते आवर्जून वाचण्याजोगे.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा