रविवार, ९ एप्रिल, २०१७

वेचताना... : ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

आपली रेघ मोठी करायची असेल तर शेजारची खोडून लहान करायला हवी, आणि शेजारी अशी रेघ नसेलच तर आपणच एक छोटी रेघ शेजारी ओढून आपली रेघ मोठी असल्याचा भास निर्माण करावा' हे माणसाला संस्कृतीच्या अगदी प्राथमिक अवस्थेत झालेलं ज्ञान आहे असं म्हणायला हरकत नाही. आजही एखाद्याच्या अवगुणाबद्दल बोला, त्याचे तर्क संपले, मुद्दा अंगाशी आला की तो हटकून आपल्याहून अधिक अवगुणी व्यक्तीला चर्चेत आणून त्याच्याआड लपू पाहतो, किंवा स्वतःच्या निरपेक्ष मोठेपणाऐवजी, सापेक्ष मोठेपणा तुमच्या गळी उतरवू पाहतो.

ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी

हे जितकं सामान्य व्यक्तींबाबत खरं आहे, तितकच राजकारणी, कलाकार, विशिष्ट कौशल्य अंगीकृत केलेल्यांबाबतही. धर्मसंस्थेने किंवा स्वयंघोषित प्रेषितांनी त्यांच्या अनुयायांनीही हे तंत्र आपल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी यशस्वीपणे राबवले आहे. एखादी व्यक्ती 'कुणाला तरी हरवून जिंकली' आहे असं म्हटलं की जमावाच्या तिच्याबाबतचा आदर चटकन वाढतो आणि त्याचे म्हणणे जमाव आस्थेवाईकपणे ऐकतो. आता हे जिंकणे युद्धभूमीवरचे रक्तरंजित युद्ध असो किंवा बौद्धिक वितण्डाच्या स्वरूपातील. दोन्ही प्रकारात एक शत्रू हवा, त्याच्यावर मात करता यायला हवी.

पण हा जरा धोक्याचा मुद्दा आहे, कारण यात आपल्यालाही पराभवाला सामोरे जाण्याची शक्यता असते. यावर शब्दपंडितांनी एक सुरक्षित उपाय शोधून काढला आणि तो म्हणजे काल्पनिक शत्रू निर्माण करून त्याच्यावर आपल्या प्रेषिताने, नेत्याने, देवाने, धर्मासारख्या व्यवस्थेने विजय मिळाल्याच्या कपोलकल्पित कथा प्रसृत करायच्या. यातून आपल्या नेत्याची 'विश्वासार्हता' वाढते आणि जमाव त्याच्या शब्दाला प्रमाण मानून चालण्याची शक्यता कित्येक पट वाढते.

जगातील बहुतेक सर्व धर्मांमधे देवाच्या जोडीला एक अँटि-गॉड असतो. त्याचा रोल, त्याची भूमिका ही या छोट्या रेघेसारखी असते. त्याच्या शेजारी उभे राहिलेला आपला नेता जमावाला उंच भासत असतो, आणि तो म्हणेल तिकडे त्याच्या मागोमाग जाण्यास ते एका पायावर तयार होत असतात. जगात सर्वाधिक प्रसार झालेल्या बिब्लिकल धर्मात सैतान, इब्लिस वगैरे असतात, बौद्ध धर्मात बुद्धाला तत्त्वच्युत करू पाहणारा 'मार' असतो, हिंदू धर्मात असा 'एकास एक' सामना नसला - याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हिंदू धर्मच अनेकेश्वरवादी आहे - तरी ऋषीमुनींचा तपोभंग करणार्‍या मायाविनी अप्सरा असतात, यज्ञसंस्कृतीच्या उपासकांचे यज्ञ उद्ध्वस्त करणारे असुर असतात. थोडक्यात श्रेष्ठत्वाचा मापदंडच मुळी 'शेजारच्या लहान रेघेहून मोठा' असा असतो.

आमच्या गणितात आवश्यक (Necessary) आणि पुरेशी(Sufficient) अशा दोन संबंधातून कार्य नि कारण यांच्यातील एकास-एक परस्परसंबंध सिद्ध केला जातो. वरील तर्काचा विचार केला तर शेजारची छोटी रेघ ही बर्‍याच अंशी आवश्यक गोष्ट होती, पण ती पुरेशी नसे. त्या पलीकडे जाऊन नेत्याचे, प्रेषिताचे श्रेष्ठत्व स्वतंत्रपणे सिद्ध करणारे कर्तृत्व समोर ठेवावेच लागे. परंतु स्पर्धा व्यवस्थेला यशाची गुरुकिल्ली म्हणून सादर करणारी भांडवलशाही अवतरली आणि श्रेष्ठ अथवा गुणवान असण्यापेक्षा इतर सर्व स्पर्धकांपेक्षा पुढे असणे यशस्वी होण्यास पुरेसे ठरू लागले. थोडक्यात छोट्या रेघेपेक्षा आपली रेघ मोठी असणे केवळ आवश्यक न राहता पुरेसेही ठरू लागले

एकदा हे घडले की छोटी रेघ मोठी झाली तर आपली रेघही कष्टाने मोठी करावी लागते हे ध्यानात आले तसतसे सोपा उपाय म्हणून छोटी रेघ आणखी छोटी करण्याचे उपाय शोधले जाऊ लागले. त्यासाठी माध्यमांचा यथास्थित वापर सुरू झाला.

आता थोडे मागे गेलो तर लक्षात येईल की धार्मिक आणि राजकीय इतिहास लेखकांनी तरी याहून वेगळे काय केले आहे? त्यांनी आपला प्रेषित, नेता, राजा, सम्राट श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याच्या विरोधकांना अधिकाधिक काळ्या रंगात रंगवून वाचकांसमोर ठेवले नाही? आज गल्लोगल्ली उगवून आलेले इतिहासलेखकांचे एरंड तोच कित्ता गिरवत इतिहासाचे चक्र उलट दिशेने फिरवू पाहात नाहीत? गेलाबाजार राजकारणात प्रस्थापित होऊ पाहणारे प्रथम कुण्या लेखकाच्या, चित्रकाराच्या, नाटककारच्या डोक्यावर पाय देऊन त्याची रेघ छोटी म्हणून माझी मोठी हा दावा करत नाहीत? एकदा शिरकाव झाल्यावर राजकारणाची शिडी चढून जाताना, आपले कर्तृत्व वाढवत नेण्याऐवजी इतरांना खेचून खाली ढकलण्याचा सोपा मार्ग चोखाळत नाहीत?

ही सुमारांची सद्दी अधिकाधिक आक्रमक होत असताना एखाद्या व्यवस्थेवर, मुद्द्यावर, व्यक्तीवर, विचारव्यूहावर टीका करण्यासाठी आणि त्यांचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे असे समजणारे नि त्यासाठी आयुष्याचा मोठा भाग खर्ची घालणारे अभ्यासक ही जमात अस्तंगत होत जाताना दिसते यात नवल नाही.

महाराष्ट्रात मराठी भाषेमधे अर्वाचीन काळात 'विदुषी' हे विशेषण खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या दुर्गाबाई भागवत यांच्या अभ्यासाचा आणि विचाराचा परीघ अतिशय विस्तृत होता. अभ्यासकांमधे बहुतेक वेळा विचाराची अथवा अभ्यासाची व्याप्ती अधिक असलेले किंवा (मोजक्याच विषयात) खोली अधिक असलेले असे दोन प्रकार दिसतात. पण एकाच वेळी धर्माचा, तत्त्वज्ञानाचा, साहित्याचा अभ्यास करत असतानाच अस्वल या एकाच प्राण्यासंदर्भातील विविध परंपरातील दंतकथा अथवा संकेतांचा अभ्यास करून त्यावर एक पुस्तकच लिहिणार्‍या दुर्गाबाई एकाच वेळी या दोनही गटात बसतात.

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजी अनुवादांवर अवलंबून न राहता पाली भाषा शिकून मूळ ग्रंथांच्या आधारे त्यांनी त्याचा अभ्यास केला. अभ्यासकाची इतकी तीव्र बांधिलकी आज दुर्मिळ झाली आहे. केवळ त्या एका धर्माचा अभ्यास करून न थांबता त्या अनुषंगाने त्याचा भारतातील समाजजीवनावर असलेला प्रभाव, हिंदू परंपरा आणि बौद्ध तत्त्वज्ञानाचा परस्परसंघर्ष आणि सहकार्य, बौद्ध धर्मातून उगम पावलेल्या विविध परंपरा यांचा अभ्यास करताना त्या थेट डॉ. आंबेडकरांनी स्वीकारलेल्या बौद्ध धर्मापर्यंत पोहोचतात.

यातील कोणत्याच धर्माचा वा परंपरेचा एकांगी उदोउदो किंवा थेट चिरफाड करणे अशा टोकाच्या भूमिका त्या घेत नाहीत. आज ही विचक्षण दृष्टी दुर्मिळ आहे. धर्मसंस्थेबद्दल लिहायचे ते केवळ समर्थन करण्यासाठी किंवा त्यातील न्यून चव्हाट्यावर आणण्यासाठी इतकेच आपल्याला समजते. गल्लोगल्ली अभ्यासाविना झालेले अभ्यासक अशा तथाकथित वैचारिक लेखनाच्या काँग्रेस गवताची रुजवणूक करत आहेत. जे पटते त्याचे हातचे राखून न ठेवता कौतुक करायचे नि जे पटत नाही त्यावर निर्भिडपणे टीका करायची, अशी ताठ कण्याची भूमिका घेणार्‍या बाईंच्या इतका समतोल अभ्यास क्वचितच कुणी केला असेल.

अर्थात याचा अर्थ असा नव्हे की त्यांची मते तुम्हाला पटली पाहिजेत. (किंबहुना अनेकदा त्यातील आग्रहीपणा, ठामपणा, लवचिकतेचा अभाव खटकेलच!) खरं तर विचारपूर्वक भूमिका घेणार्‍याच्या बाबत उलट न पटण्याची शक्यताच अधिक कारण बहुसंख्या ही विचारापेक्षा बांधिलकीला (जातीय, धार्मिक, विभागीय, कौंटुंबिक, भाषिक इ.) अनुसरून निवड करणारीच असते.

कालानुरूप अभ्यासविषयाचे संदर्भही बदलतात. आज सर्वसामान्यांच्या मनात बौद्ध धर्म हा बुद्धापेक्षाही डॉ. आंबेडकरांच्या संदर्भात अधिक निगडित आहे. त्याबरोबर त्याला अस्मितेचे अस्तरही चिकटले आहे. त्याचवेळी उधाणलेल्या तथाकथित हिंदुत्ववादाने हिंदू धर्माचे जणू अपहरण करून आपणच त्याचे ठेकेदार असल्याची द्वाही फिरवली आहे. अशा वेळी या दोन धर्मांचा साधकबाधक विचार करणे, त्यातील मूल्ये पडताळणे, तुलना करणे त्याबाबत काही भाष्य करणे हे शत्रू-मित्रांचे मोहोळ उठवणेच ठरते. या गदारोळात साक्षेपी अभ्यासक नावाची जमात केव्हाच परागंदा झालेली आहे.

पण केवळ अभ्यासक, विचारवंत यापलीकडे त्यांची एक महत्त्वाची ओळख आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात व्यक्तिस्वातंत्र्याची पहिली गळचेपी म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या आणिबाणीच्या विरोधात सर्वप्रथम जाहीरपणे रणशिंग फुंकणार्‍या रणरागिणी अशीही त्यांची ओळख आहे. आणिबाणी-विरोधातील त्यांच्या घणाघाती भाषणानंतरच महाराष्ट्रातील साहित्यिक, विचारवंत यांनी आणिबाणीच्या विरोधात जाहीर आणि मुख्य म्हणजे सक्रीय भूमिका घेतली त्याचे श्रेय निर्विवादपणे बाईंचेच.

अशा चतुरस्र अभ्यासकाशी होणार्‍या अनौपचारिक गप्पाही सुखद आणि माहितीप्रद असतात असा अनुभव अशा व्यक्तींच्या आसपास असणार्‍यांना येतच असतो. अनेकदा असं वाटतंही की अरे हे असं अनौपचारिक बोलणं कुठे तरी नोंदवून ठेवायला हवं. कारण या संवादात औपचारिकता नसते, विचाराची चौकट नसते, शब्दसंख्येची मर्यादा नसते, प्रतिक्रियेची अपेक्षा अथवा भीती नसते, काटेकोरपणाची आवश्यकता नसल्याने पुराव्याखेरीज एखाद्या तर्कसंगत शक्यतेबाबत बोलता येते, लिखित स्वरुपात समोर येणार्‍या विचारांप्रमाणे बंदिस्तपणा नसतो. आणि म्हणूनच अनेकदा हा संवाद अधिक आनंददायी आणि समाधान देणारा असतो. यातून मुलाखत हा एक प्रकार पुढे आला.

पण माध्यमांनी जसजसे जगण्यातील प्रत्येक गोष्टीचे वस्तुकरण आणि एकसाचीकरण सुरू केले तसतशा या मुलाखतींचा कार्यक्रम हास्यास्पद होत गेला. मुलाखत घेणार्‍याला जणू काही समज असायची गरजच नाही. एका चॅनेलवरील साहित्यासंबंधीच्या चर्चेत वृत्तनिवेदिकाच मुलाखतकार म्हणून समोर आलेली पाहून मी कपाळाला हात लावला होता. तिला त्या कार्यक्रमाबद्दल इतकी 'आस्था' होती की कार्यक्रम सुरु होण्यागोदर जेमतेम एक तास आधी तिने माझ्याशी संपर्क साधून आपण काय बोलू शकतो याची तब्बल अडीच मिनिटे 'चर्चा' केली.

नव्या जगात उगवलेल्या 'मॅनेजमेंट' नावाच्या विषयाने जगण्यातल्या सार्‍याच गोष्टी या आनंद घेण्यासाठी नव्हे तर 'मॅनेज करण्यासाठी' असतात, त्यांचा इव्हेंट करण्यासाठी असतात, त्या 'संपन्न करण्यासाठी' असतात ही धारणा पुरेपूर रुजवली आहे. सोबतच 'जागा भरण्यासाठी' अशा गोष्टी केल्या जात असल्याने मागणी भरपूर. त्यामुळे हल्ली या मुलाखती - संवाद नव्हे - म्हणजे सुमार मुलाखतकार (ज्यांच्याकडे बहुधा वट्ट दहा प्रश्नांची चेकलिस्ट असावी, जी ते प्रत्येक मुलाखतीसाठी वापरत असावेत) आणि सुमार 'विचारवंत/ कलाकार/ अभ्यासक' अशी स्थिती असते.

त्यातल्या त्यात हसतखेळत मुलाखत घेणारा ग्रेट मुलाखतकार (हा शब्दच बोचतो) मानला जातो, तो रोल मॉडेल म्हणून पाहिला जातो. अतिशय गंभीर विषयावरील नाटक अथवा सिनेमातही पहिली संधी मिळताच दात दाखवणार्‍या, 'सस्त्यात मनोरंजन हवे बुवा' म्हणणार्‍या बहुसंख्य समाजाच्या मानसिक स्थितीलाही ते मानवणारं असतं. अशा वेळी मुलाखत घेणार्‍याची त्या तज्ज्ञाशी, कलाकाराशी, विचारवंताशी, अभ्यासकाशी बोलण्यासाठी किमान काही पात्रता असायला हवी असं म्हटलं तर 'हे काय आणखी नवीन' अशी बहुतेकांची प्रतिक्रिया येईल. हे असं का म्हटलो हे समजण्यासाठीच 'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी' हे पुस्तक वाचायला हवे.

प्रतिभा रानडे यांची ज्या प्रकारे दुर्गाबाईंना बोलते केले आहे, प्रसंगी एखादा मुद्दा विस्तारपूर्वक यावा म्हणून स्वतःही नेमकी भर घातली आहे (चॅनेलवरच्या बोलभांड निवेदकाप्रमाणे आपली अक्कल न पाजळता), कुठे बाईंच्या चतुरस्र बुद्धिमत्तेमुळे भरकटणारा मुद्दा पुन्हा जागेवर घेऊन आल्या आहेत. हे पाहणे आनंददायी आहे. अशा संवादात त्यांचे स्थानही किती महत्त्वाचे आहे हे जाणवते. नेमके बोलू शकणारा मुलाखतकार/ संवादक त्या संवादाला कुठल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो याचा वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखन निव्वळ संवादापुरते मर्यादित नाही. अधेमधे दुर्गाबाईंनी दिलेले संदर्भ शोधून प्रतिभा रानडे यांनी त्याआधारे बाईंच्या मुद्द्यांचे जागोजागी विस्तार करून ते पुस्तकात समाविष्ट केल्याने त्या दस्तऐवजीकरणाला अधिकच परिपूर्णता येते आहे.

या दीर्घ संवादात बाईंनी संस्कृती, स्त्रीवाद, मिथ्यकथा, साहित्य, श्लील-अश्लील वाद (भाऊ पाध्ये यांच्यावर अश्लीलतेच्या झालेल्या आरोपांच्या वेळी बाईंनी श्लील-अश्लीलता ही संदर्भातच असते अशी त्यांच्या बाजूने सडेतोड भूमिका घेतली होती, ज्याबद्दल अत्रेंनी त्यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केली होती हे जाताजाता सांगायला हरकत नाही.), त्यांचा अभ्यासविषय असलेला बौद्ध धर्म, त्यांचे स्वतःचे साहित्य, मृत्यू इ. अनेक विषयांवर आपली मते व्यक्त केली आहेत. प्रतिभा रानडे यांनी त्यांना त्यावर अतिशय नेमके प्रश्न विचारत, कधी स्वतः संदर्भ पुरवत, कधी आपल्या माहितीची, मतांची जोड देत एक संग्राह्य दस्तऐवज या पुस्तक रूपात आपल्या समोर ठेवला आहे.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: मोठी रेघ - छोटी रेघ.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा