बेलार्दो कुटुंबाशी स्नेह दृढ होण्यास एक योगायोग (कारणीभूत) झाला. बेलार्दो कुटुंबात एकदा भोजनाचं निमंत्रण होतं. दिवस होता चार डिसेंबरचा. तो माझा वाढदिवस होता. त्या घरात मी पाऊल टाकलं तेव्हा कळलं त्या दिवशी मग्दालेना यांचाही वाढदिवस होता. योगायोग म्हणजे दिनांक आणि वर्षही एकच होतं. मग्दालेनाचा एकुलता एक भाऊ गेल्यामुळे त्या मला भाऊ मानीत होत्या. त्या छोट्या अॅनाला म्हणाल्या,
"नॉई सियामो जेम्मेली ('आम्ही जुळी भावंडं आहोत.')". हे जुळ्या भावंडांचं कोडं अॅनाच्या काही लवकर ध्यानात आलं नाही. ती गोंधळून गेली. तिने विचारले, " फादर भारतातले व तू इकडची, मग तुम्ही जुळे कसे?" मग्दालेना खळखळून हसल्या.
बर्थडेचा खास बेत होता. मला सुट्टी होती. अकरा-साडेअकराच्या सुमारास मी त्यांच्याकडे पोहोचलो होतो. मग्दालेनाची बहीण लेआ त्या दिवशी आली होती. तिनं निवडलेला मुलगा मग्दालेनाला पसंत नव्हता व त्या (अ)विचारापासून मी तिला परावृत्त करावं म्हणून त्यांनी लेआला त्या दिवशी बोलावून घेतलं होतं. (अर्थात अतिशय सावधपणे मी त्या नाजूक प्रश्नाला बगल दिली. मिया बीबी राजी असतील, तर उगाच काजीनं तिथं नाक का खुपसावं?)
दुपारी बाराच्या सुमारास श्री. बेलार्दो अॅनाला शाळेतून घेऊन आले. आमच्या गप्पा रंगल्या; पण स्वयंपाकाचं कुणी नाव काढीना. खरोखर मला भोजनासाठीच बोलावलं होतं की... माझं मन साशंक झालं. खास वाढदिवसाचं भोजन म्हणजे खूप तयारी असेल अशी माझी (भारतीय) समजूत. साधारण साडेबारा वाजता दोघी बहिणी स्वयंपाकघरात गेल्या. गॅसवर पाणी उकळत होतं. मग्दालेनानं स्पागेतीचं पाकीट त्यात रिकामं केलं. लेआनं झटपट सॅलड बनवलं. रात्री शिजवलेल्या मांसाचा मोठा तुकडा फ्रीजमधून टेबलावर आणून ठेवला. पाव व दोन तीन प्रकारचं चीज काढलं. गुळाच्या ढेपेसारखा चीजचा एक तुकडा घेऊन लेआने त्याचा चुरा खरवडून तो सूपमध्ये टाकला. श्री. बेलार्दो यांनी चार-पाच तर्हेच्या वाईनच्या बाटल्या मेजावर मांडल्या. अर्ध्या पाऊण तासात भोजन तयार!
आपल्याकडं खास भोजनासाठी आठवड्याची तयारी लागेल. रांधणं, शिजवणं, उकडणं... किती प्रकार. 'उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म' या वृत्तीने सर्व तयारी कशी साग्रसंगीत. प्रत्येक भोजनासाठी ताजा बेत. प्रत्येक भाजीला 'ह्यूमन टच'ची फोडणी हवी. युरोपमध्ये झटपट संस्कृती. सगळेच पदार्थ बाजारात विकत मिळतात. संस्कृतीतील फरक स्वयंपाकघरामध्ये प्रकर्षानं जाणवला.
भातावर वरण ओतावं, तसं माझ्या मित्रानं स्पागेतीवर ऑलिव्ह ऑईल ओतलं आणि वर चवीला चीजच्या चुर्याचा थर चढविला. काट्याभोवती गुंडाळी करून घास घ्यायला सुरुवात केली. बाकी स्पागेतीचा घास घ्यावा इटलीकरांनी. आपण काट्याभोवती एक घास गुंडाळावा तोच त्यांची अर्धी प्लेट रिकामी. कोल्हा आणि करकोचा ही गोष्ट आठवली.
अधूनमधून वाईनचे घुटके घेत, स्पागेती खाणं चाललं होतं. अर्ध्या तासात जेवण आटोपलं. जेवणानंतर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. कारण एक वेळ भोजनाशिवाय इटलीकर वेळ मारून नेतील; परंतु सिएस्टाशिवाय त्यांचं पान हलत नाही. दुपारी २ ते ४ या वेळात सर्व इटलीकर बिछान्यावरच आढळतात.
छोट्या अॅनाला भाऊ नव्हता. तिला खेळण्यासाठी भावंडं हवं होतं; पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिच्या आईला ते शक्य नव्हतं. अॅना मला म्हणायची, "तूच माझा भाऊ हो ना!" ती चिमुरडी माझ्या अंगाखांद्यावर बागडायची. तिच्या छोट्या स्वतंत्र खोलीत मला खेळायला भाग पाडायची. घरातील एका लाकडी ठोकळ्याला कवेत घेऊन ती सर्वांन सांगायची, "हा माझा भाऊ."
खाऊ आणि खेळणी यांचा कितीही मारा केला, तरी मुलांना समवयस्काचीच संगत हवी असते. त्यांच्यात ती गुंतत असतात आणि वाढत असतात.
एकदा मी त्यांच्या घरी गेलो असता "मला तुमच्याशी खाजगी बोलायचं आहे", असं म्हणत अॅनाने अक्षरशः मला तिच्या खोलीत ओढत नेले. तिची आई हा प्रकार पाहून गालातल्या गालात हसत होती.
मी खोलीत गेल्यावर तिने दरवाजा लावून घेतला व हळू आवाजात म्हणाली, "तुझ्याकडे पोस्टाचे स्टँप आहेत का?"
"कशासाठी हवेत?" मी विचारले.
"माझ्या बॉयफ्रेंडला मला पत्र पाठवायचे आहे... मॉर्को मला खूप खूप आवडतो..."
"कुठं भेटला तो तुला?" मी विचारले.
"तो माझ्या आत्याचा मुलगा. आम्ही समुद्रावर फिरायला गेलो होतो ना, तिथं तो मला भेटला..." ती गोड हसत म्हणाली.
माझ्या डायरीत एक भारतीय स्टँप होता. मी तो तिला दिला. वेड्यावाकड्या रेषा रेखाटलेला व त्यावर हृदयाचे चित्र काढलेला एक कागद तिनं पाकिटात घातला व त्यावर तो स्टँप चिकटविला. हळूच त्यांचं किस घेतलं आणि पोस्टात टाकण्यासाठी माझ्या हवाली केलं. दार उघडताना मात्र तिनं ताकीद दिली: "आईला काहीही कळता कामा नये!"
"काय गं सांगितलं फादरांना?" आईनं विचारलं. तेव्हा ती लाजून म्हणाली, "आमचं सिक्रेट आहे, तुला नाही सांगायचं." आईला काही सांगू नकोस, असं तिनं मला नजरेनं खुणावलं!
एक दिवस मग्दालेना गप्पांच्या ओघात मला म्हणाल्या, 'फादर फ्रान्सिस, आम्ही दोघी बहिणी व निनो (अँथनी) हा आमचा लाडका भाऊ. वयाच्या १८व्या वर्षी त्याला आजार झाला व त्यातच तो गेला. आमच्या घराचं सगळं वैभवच जणू नाहीसं झालं. माझे आईवडील अजून त्या धक्क्यातून बाहेर पडले नाहीत. भावाची स्मृती जागी होताच डोळे पाण्यानं भरतात... तुम्हाला मी पहिल्या वेळेस पाहिलं तेव्हा का कुणास ठाऊक, मनाला वाटलं... माझा भाऊ परत आलाय..." त्या मध्येच थांबल्या. आपल्या खोलीत गेल्या. डोळे पाणावलेलेच होते... पट्ट्यापट्ट्याचा जाडजूड एक स्वेटर स्वेटर घेऊन त्या आल्या. "माझ्या लाडक्या भावासाठी स्वत:च्या हातानं मी हा विणलाय... आता थंडीचा जोर वाढत आहे. त्यासाठी घे तू! खूप उबदार आहे हा... आमच्या निनोची स्मृती..." मी भारावून गेलो. काय बोलावं ते मला सुचलं नाही. क्षणभर आम्ही दोघं स्तब्ध. भावाचं नातं जोडण्याच्या आपल्याकडील राखीच्या प्रथेची मी त्यांना माहिती दिली आणि त्या स्वेटरचा स्वीकार केला. डबल विणीचा तो स्वेटर खूपच उबदार होता. अंगावर चढवून मी त्यांचा निरोप घेतला.
निवासस्थानी पोचेपर्यंत मनात अनेक तरंग उठत होते... त्यांचे ते आसवांनी भरलेले डोळे, कंपित स्वर, मी निघताना घरातली ती बोलकी शांतता... प्रेम, माया, जिव्हाळा सातासमुद्रापलीकडेही एकाच रेषेत प्रवास करतात. माणसाच्या अंतरंगातील नातेसंबंधांची जाणीव कुठल्याही प्रदेशात तितकीच उत्कट असते म्हणायची... पण माझं प्रश्नांकित मन शांत बसायला तयार नव्हतं. त्या कुटुंबासाठी मी काय केलं होतं? काहीच नाही. मग आपल्या भावाच्या चेहर्यावरील खुणा त्यांना माझ्या मुद्रेवर कशा वाचता आल्या? देवाला ठाऊक!
युरोपच्या धुराड्यातून सोन्याचा नसला, तरी संपन्नतेचा धूर बाहेर पडतो. भांडवलशाही समाजरचनेमुळे आर्थिक सुबत्ता आली आहे. युनियन चळवळीमुळे कामगारांना न्याय मिळणं सुलभ झालं आहे. आधुनिक सुखसोयींचा पाऊस युरोप-अमेरिकेत कोसळत असतो आणि तरीही पश्चिमी राष्ट्रं खर्या अर्थानं सुरक्षित आहेत, असं वाटत नाही. अनिश्चितता आणि युद्धाची भीती यांच्या परजलेल्या तलवारी त्यांच्या डोक्यावर टांगलेल्या जाणवतात. लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्य याचे कितीही डिंडिम त्यांनी वाजविले तरी तो समाज भीतीच्या प्रचंड दडपणाखाली वावरत आहे. निर्भयतेचा अभाव मला युरोपमध्ये अनेक ठिकाणी जाणवला. त्याचा प्रत्यय या कुटुंबातच आला.
मग्दालेनाला भीतीने ग्रासलं होतं. महासत्तांमधील स्पर्धेमुळं तिसर्या महायुद्धाला तोंड फुटलं तर... या विचारानं त्यांचा थरकाप उडाला. इटलीचे रक्षण करण्यासाठी 'नाटो' करार करावा लागतो, यातच त्यांना आपल्या देशाचं दुबळेपण आणि परावलंबित्व दिसलं; पण ते उसनं बळ उठविलं, तर इटलीचा अफगाणिस्तान होण्यास विलंब लागणार नाही, असं त्यांचं मत ठरलेलं आहे.
१३ मे १९८२ रोजी दुसरे जॉन पॉप यांच्यावर दिवसाढवळ्या खुनी हल्ला झाला. कबुतरावर गिधाडानं घातलेली ती झडप होती. दहशतावादाच्या दुष्ट दूतांनी मंदिरातील वेदीलाच रक्तानं स्नान घालण्याचा केलेला तो दुबळा प्रयत्न होता. मग्दालेनाच्या दृष्टीकोनातून पोप हे शांततेचं प्रतीक. त्या प्रतिकाला झालेल्या जखमेमुळे त्या घायाळ झाल्या, उद्विग्न झाल्या, त्या गोष्टीचा त्यांनी धसका घेतला. त्या मानसिक धक्क्यातून बाहेर पडायला त्यांना खूप अवधी लागला. त्यांच्या कोमल आणि संवेदनक्षम मनाला त्या आघातामुळे खोलवर इजा झाली. आठ्यांचं जाळं त्यांच्या कपाळावर दिसू लागलं. जीवनावरची आणि जगण्यावरची त्यांची श्रद्धाच जणू उडाली. "माझ्या मुलीचं, माझ्या पतीचं, माझ्या कुटुंबियांचं भवितव्य काय? आज पोपवर, उद्या आम्हां कुणावरही पिस्तुल रोखलं जाईल," अशा विचारात त्या दंग असायच्या.
आणि व्हायचं तेच झालं! त्यांचा तोल ढळला. शून्यात नजर लावून त्या आसवं गाळीत बसायच्या. छोट्या अॅनासाठी हा अजब अनुभव होता. आपल्या आईला शांत करण्याचा ती प्रयत्न करू लागली. श्री. बेलार्दो यांनी त्यांच्यासाठी प्रख्यात मानसोपचातज्ज्ञांचं औषधपाणी सुरू केलं. एके दिवशी श्री. बेलार्दो यांनी मला घरी बोलावून घेतलं. वातावरण थोडसं गंभीर भासलं. सौ. बेलार्दो यांनी दोन दिवस अन्नपाण्याला स्पर्श केला नव्हता. त्यांची समजूत काढण्यासाठी त्यांची बहीण लेआ तिथं आली होती. घराबाहेर पाऊल टाकण्यास सौ. बेलार्दो तयार नव्हत्या. सर्वत्र जणू दहशतवादीच दिसत होते तिला.
"फादर चर्चमध्ये प्रार्थना करणार आहेत. तू प्रार्थनेला चल म्हणजे तुला बरं वाटेल," लेआनं सुचविलं.
हो ना करता त्या तयार झाल्या. लेआ आणि मी त्यांना घेऊन पायीच एका चर्चमध्ये गेलो. तिथं प्रार्थनेत काही वेळ घालविला. प्रार्थनेच्या वेळी ख्रिस्ती भाविकांना 'प्रसाद' म्हणून पावाचा तुकडा देतात. मग्दालेना वृत्तीनं धार्मिक, पण त्या दिवशी त्यांनी तो प्रसाद घेण्यास चक्क नकार दिला. कारण विचारलं तर त्या म्हणाल्या, "तुम्ही त्यात विष मिसळलं नसेल कशावरून?"
महिनाभरात त्यांना बरं वाटू लागलं. त्यांची बहीण चार दिवस राहून गावी निघून गेली. नवजात अर्भकाला जपावं तशी श्री. बेलार्दो यांनी पत्नीची काळजी घेतली. वेळोवेळी ते तिला औषधाच्या गोळ्या द्यायचे. तिची विचित्र वागणूक पाहून ते कधी तिच्यावर संतापले नाहीत, की चिडले नाहीत. त्यांनी धीर सोडला नाही. गाडीचं एक चाक नादुरुस्त झालं, की संसारी माणसाची कशी त्रेधातिरपिट उडते, हे मी पाहिलं. युरोपमध्ये हे विशेष जाणवतं. माहेर, सासर, गणगोत असा गोतावळा तिथं नाही. सगळी स्वतंत्र घरटी. ज्यानं त्यानं आपला क्रूस उचलून चालायचं.
हळूहळू सौ बेलार्दो पूर्णपणे बर्या झाल्या. त्या घरट्यात पुन्हा हास्य विनोदाला बहर आला. आनंद व्यक्त करण्यासाठी एका संध्याकाळी रोमजवळील समुद्रकिनार्यावर जायचं ठरलं. निळ्याशार लाटा किनार्यावर येऊन आदळंत होत्या. मावळत्या सूर्याच्या साक्षीनं आमच्या गप्पा चालल्या होत्या. मी त्यांना म्हणालो, "सारं कसं विचित्र! तुम्ही तिघं मला भाऊ मानता. तुमच्यावर कठीण प्रसंग आला तेव्हा तुम्ही मला बोलावलं. कुटुंबाचा घटक म्हणून मला तुम्ही वागविता... लवकरच मी मायदेशी निघून जाईन. मग तुम्ही मला विसराल..."
नाही, तसं कधीच होणार नाही. आम्ही तुला भेटायला भारतात येऊ. मी आतापासून इंग्लिश शिकायला सुरुवात केली आहे," श्री बेलार्दो म्हणाले.
मग्दालेनानं त्यांच्या सुरात सूर मिसळला. "मी पण येणार हं..." अॅना लाडिकपणे म्हणाली.
माझा निघण्याचा दिवस उगवला. सर्वात अस्वस्थ झाली अॅना... दिवसभर तिनं रडून डोळे लाल केले. दुपारचं भोजन मी त्यांच्याकडे घेतलं. जूनच्या उकाड्याचे ते दिवस! डबल विणीचा तो जाडजूड स्वेटर मग्दालेनाच्या हाती परत देत मी म्हणालो, " हा तुमच्याकडेच राहू द्या. आमच्या देशात मी त्याचा वापर करू शकणार नाही. उगाच फडताळात पडून राहील. माझी स्मृती म्हणून तुमच्याकडे तो ठेवून घ्या."
थोड्याशा अनिच्छेनं; पण मोठ्या मायेनं त्यांनी तो स्वीकारला. निरोप घेण्याआधी काही क्षण शांत राहून आम्ही प्रार्थना केली. निघताना कुणाच्या कंठातून शब्द फुटेनात. छोट्या अॅनाने माझ्या गालाच गोड पापा घेतला व रडवेल्या सुरात ती म्हणाली, "क्वाँदो रितोर्नी? (केव्हा परत याल?)"
मी उत्तर दिलं, "तुझा लग्नाला."
रोमहून मी भारतात परतलो. अधूनमधून आम्ही एकमेकांना पत्र पाठवितो. माझ्या वसईतील मित्राची पत्नी ज्युली ही हवाईसेविका आहे. रोमला तिच्या फेर्या व्हायच्या. बेलार्दो कुटुंबियांशी मी तिची ओळख करून दिली होती. अॅनाला ज्युलीचा भारी लळा. तिच्या लांबसडक आणि काळ्याभोर केशसंभाराचं फारच आकर्षण.
कधी रोमचं विमान लागलं म्हणजे ज्युली अॅनाकडे फेरी मारते. एकदा ज्युलीनं मला अॅनाकडून एक मोलाचं पत्र आणलं.
प्रिय फादर,
मला तुमची फार आठवण येतेय. मी तुमच्यासाठी प्रार्थना करते. तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करता ना? मी तुमच्यासाठी एक गंमत पाठवून देते.
तुमची लाडकी,
अॅना.
काय होती ती गंमत? अॅनाचा पडलेला पहिला दूधदात. एक फार मौल्यवान अशी भेट तिनं माझ्यासाठी पाठवून दिली होती.
बुद्धाच्या दाताप्रमाणं मी तो दात जपून ठेवला आहे.
- oOo -
पुस्तकः ओअॅसिसच्या शोधात
लेखकः फादर फ्रान्सिस दिब्रिटो
प्रकाशकः राजहंस प्रकाशन
आवृत्ती दुसरी (१९९६)
पृष्ठे ७२-७७.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : ओॲसिसच्या शोधात >>
---