शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

वेचताना... : ओॲसिसच्या शोधात

लेखनाच्या दर्जावरुन नव्हे तर लेखकाच्या ’आडनावा’वरून किंवा त्याच्या साहित्यबाह्य मतांवरून त्याच्या लेखनाला न वाचताच बाद करून टाकण्याची आपल्याकडे परंपरा आहे. 

एवढं पुरेसं नाही म्हणून की काय वर आपापले गट असतात, इतर सार्‍या निकषांत बसत असला पण आपल्या गटातला नसला तर त्याच्या लेखनाची दखल न घेणे, त्यावर ताशेरे ओढणे हे ही चालते. नवे-जुने, देशीवादी-आधुनिक वगैरे कळप आपापली ’भूमी’ राखून असतात. त्यातच देशातील बहुसंख्येच्या बाहेरच्या सामाजिक गटातला लेखक असेल मग तर विचारायलाच नको.

त्यामुळे ’फादर’ दिब्रिटोंचं ’ओॲसिसच्या शोधात’ वाचलंस का?’ या माझ्या प्रश्नावर ’आम्ही खूप वाचतो बरं का’ असा दावा करणारे बरेच जण माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले होते. इतके सुरेख पुस्तक वाचून त्यातला आनंद घेता आला नाही, हे असल्या पूर्वग्रहदूषित मनाच्या व्यक्तींचे दुर्दैव म्हणायला हवे.

ओअ‍ॅसिसच्या शोधात

मध्यंतरी एका साहित्य-संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मीना प्रभू उमेदवार होत्या तेव्हा साहित्यिकांनी ’प्रवासवर्णन’ हा लेखनप्रकार साहित्य मानावा की नाही असा वाद निर्माण केला होता. सामान्यत: पर्यटनाचे अनुभव लिहिणे हा ढोबळमानाने प्रवासवर्णनाचा घाट असतो. यात प्रामुख्याने ज्या ठिकाणाला भेट दिली तिथली माहिती, तात्कालिक अनुभव, इतिहास, आदि माहितीचा भराव असतो.

पण फादर दिब्रिटोंच्या युरोप भेटींवर आधारित या लेखनाला प्रवासवर्णन या सदरात टाकता येणार नाही. याचे कारण म्हणजे यातील दृष्टीकोन पर्यटकाचा नाही. ज्या देशांना, शहरांना भेट दिली तेथील प्रसिद्ध ठिकाणांना दिलेल्या भेटींच्या आधारे लिहिलेले हे लेखन नाही. ज्या देशांना भेटी दिल्या त्या समाजातील व्यक्तींशी समरस होताना आलेल्या अनुभवांना शब्दबद्ध करुन समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. यात माहितीची भरताड, पर्यटनाची हौस यापेक्षाही त्या त्या ठिकाणच्या समाजातील मूलाधाराशी जोडून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण यात निव्वळ भेटींपेक्षा ’वास्तव्या’चा भाग अधिक आहे.

दिब्रिटो हे फादर असल्याने चर्चच्या माध्यमातून झालेले हे दौरे ख्रिश्चन परंपरांच्या संदर्भाशिवाय मांडले जाणे अशक्यच होते. पण केवळ जाताजाता येणारा उल्लेख इतकेच त्याचे स्थान या लेखनात आहे असे माझे मत झाले. एरवी युरोपच्या समाजाच्या तत्कालीन परिस्थितीचे आकलन करण्याचा, तिला भिडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे करत असतानाच त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाजाची आणि युरोपिय समाजाची तुलना करून पाहण्याचा प्रयत्नही केला आहे. आणि पूर्वग्रहदूषित मने गृहित धरतील, तसे हे विवेचन एकांगी अजिबातच नाही. ज्ञानोबा-तुकोबाला सोबतीला घेऊन त्यांनी अनेक ठिकाणी भारतीय समाज, परंपरा यांच्याबाबत तुलनात्मक केलेले भाष्य विचारात घेण्याजोगे आहे. 

खरंतर हा त्यांच्या प्रवासाचा अनुभव नसून 'अनुभवाचा प्रवास' आहे असे म्हटले तर ते अधिक सयुक्तिक ठरेल. ज्या काळात मोबाईल, इंटरनेट, आदि तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते; जेव्हा भारतात लॅंडलाईन फोन ही देखील समाजात मूठभर प्रतिष्ठितांची चैन होती आणि परस्पर-संपर्कासाठी पत्र हे एकच माध्यम उपलब्ध होते, त्या काळात दिब्रिटोंनी देशाच्या सीमा ओलांडून अनेक परदेशस्थ व्यक्तींशी, माणसांशी प्रस्थापित केलेल्या नात्यांचा हा लेखाजोखा आहे.

इथे निवडलेला वेचा त्यांच्या इटलीतील वास्तव्यादरम्यान एका कुटुंबासोबत घालवलेल्या काही काळासंदर्भात आहे. तोडकेमोडके इटालियन शिकलेले फादर आणि इंग्रजीचा गंध नसलेले इटालियन जोडपे आणि त्यांची छोटी मुलगी यांच्यात निर्माण झालेल्या ऋणानुबंधाची ही गोष्ट आहे.

पण निव्वळ तितकेच न राहता त्या दरम्यान फादर इटलीतील समाज, त्यांची जीवनपद्धती, खाद्यसंस्कृती, त्यांच्या जगण्यातले ताण-तणाव इत्यादींना स्पर्श करून जातात. त्यातल्या सर्वात छोट्या सदस्याशी - अनाशी - तर त्यांची छान दोस्ती होऊन जाते. या लेखात छोटी असलेली आना पुढे बरीच वर्षे त्यांच्या संपर्कात होती. पुढे तरुण आनाशी झालेल्या संवादावर पुढे आणखी एक लेख याच पुस्तकात त्यांनी लिहिला आहे. या दोन टप्प्यातील संवादावरुन अनाच्या व्यक्तिमत्वात झालेल्या स्थित्यंतराच्या निमित्ताने तेथील संस्कृतीचे काही पैलू डोकावून जातात.

वाचन हा ज्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अशांसाठी काही पुस्तके पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी असतात. अशा पुस्तकांच्या माझ्या यादीत 'ओअ‍ॅसिसच्या शोधात' हे पुस्तक आजही समाविष्ट आहे.

शाब्दिक, शारीरिक हिंसा, विध्वंस, द्वेष, असूया, हेवेदावे इत्यादींचा मारा असह्य होतो तेव्हा मी हे पुस्तक उघडतो. माणसाच्या माणसावरच्या विश्वासावरचा माझा डळमळीत झालेला विश्वास पुन्हा दृढ होतो.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा: ऋणानुबंध


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा