सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७

वेचताना... : पं. नेहरु: एक मागोवा

माणसाच्या बुद्धीचा विकास जसजसा झाला, तसतसे त्याची बाह्य धोक्यांची जाणीव वाढत गेली. मग त्याने धोक्यापासून रक्षण करु शकतील अशी भौतिक आणि अध्याहृत अशी दोन प्रकारची साधने त्याने विकसित केली. निसर्ग घटकांच्या दैवतीकरणाने सुरुवात करुन अखेर अमूर्त अशा देव संकल्पनेपर्यंत तो पोचला. स्वतःला सुरक्षित करुन घेण्यासाठी या बाह्य, अध्याहृत खुंट्यांचा आधार घेत असतानाच तो दुबळ्या जनावरांप्रमाणे कळपाने राहात होता.

जनावरांहून अधिक प्रगल्भ जाणीवा, अपेक्षा नि प्रेरणा विकसित झाल्या, तसतसे त्याला कळपातील परस्पर-व्यवहारांना अधिक काटेकोर करण्याची गरज भासू लागली. त्यातून आचारी (behavioral) धर्माचा जन्म झाला, आणि कळपाचे रूपांतर समाजात झाले.

पं. नेहरु: एक मागोवा

परंतु समाज आणि व्यक्ती यांचे हितसंबंध अनेकदा परस्परांना छेदून जात असल्याने व्यक्तींचा कल अनेकदा सामाजिक - आचारी धर्माचे - नीतिनियम डावलून स्वार्थानुरूप वर्तन करण्याकडे होत असतो. याला प्रतिरोध करण्यासाठी काही चतुर नेत्यांनी आचारी धर्माला यथावकाश देव-संकल्पनेसह पारलौकिक संकल्पनांशी जोडून दिले; आणि आचारी धर्माच्या नीतिनियमांना पावित्र्य संकल्पनेचा आवरणात गुंडाळून सादर केले, ज्यातून ते अनुल्लंघनीय असल्याचा धाक अधिक परिणामकारकपणे घालता येऊ लागला.

परंतु इतकेही पुरेसे होईना. पुढे वेगवेगळ्या धार्मिक समाजातील व्यक्तींची सरमिसळ होऊ लागली आणि त्यातून विविध समाजव्यवस्थांचे परस्परांना छेद जाऊ लागले. आता एक-धर्माचारी समाजच एकत्र वस्ती करून राहील असे बंधन राहिले नाही. त्यामुळे पुन्हा धर्मगट आणि समाज या कल्पना वेगळ्या झाल्या. 

आता या सरमिसळ समाजासाठी नीतिव्यवस्था आणि व्यवहार-व्यवस्था निर्माण करणे अपरिहार्य ठरले. विविध तत्त्वज्ञानांच्या माध्यमांतून नवे वैयक्तिक आचारधर्म पुढे आले, तर व्यापारादि परस्पर-व्यवहारासाठी सामाजिक व्यवस्था निर्माण केल्या गेल्या. तत्त्वज्ञानांचे क्षेत्र बुद्धिमंतांचे, तर सामाजिक व्यवस्थेचे क्षेत्र प्रामुख्याने राजकीय/सामाजिक नेत्यांचे ठरले. 

अर्वाचीन काळात पुन्हा ही विभागणी धूसर होत एखादा तत्त्वविचार एकाच वेळी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय चौकटी देऊ लागला. कम्युनिझमच्या विचाराने धर्मसंस्थाचे अस्तित्व प्रथमच संपूर्णपणे झुगारून सर्वस्वी अधार्मिक, ऐहिक अशी देऊ केलेली समाजव्यवस्था हा एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात नि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जगात व्यापकदृष्ट्या प्रभावशाली ठरलेला सर्वात अर्वाचीन असा विचार मानला जातो.

पं. जवाहरलाल नेहरु हे केवळ भारताचे पहिले पंतप्रधान इतकीच ओळख घेऊन उभे असलेले व्यक्तिमत्व नव्हते. आपल्या विद्यार्थी दशेतच आंतरराष्ट्रीय राजकारण, समाजव्यवस्था आणि अर्थकारण यांचा सांगोपांग अभ्यास करून भारतात आल्यानंतर संयुक्त प्रांतातील शेतकरी चळवळीच्या माध्यमातून थेट भारतातील समाजाच्या सर्वात वंचित थरातील समाजाशी जोडले गेले होते. स्वातंत्र्यपूर्व कालात त्यांच्यावर कम्युनिझमचा पगडा होता आणि रशियातील त्याच्या प्रयोगाबाबत आस्था

पण त्याच वेळी 'डिस्कवरी ऑफ इंडिया'च्या निमित्ताने भारतीय इतिहास व संस्कृतीचा बारकाईने अभ्यास करून तिच्याबद्दलचा अभिमान आपल्या विचारव्यूहात व दृष्टिकोनात राखूनही राष्ट्रवादाचे संकुचित रूप झाडून टाकून भारतीय स्वातंत्र्याला देशोदेशींच्या स्वातंत्र्य लढ्यांच्या संदर्भात पाहात होते. त्याआधारे एका व्यापक स्वातंत्र्याची संकल्पना मांडत एका बाजूने साम्राज्यवादी नि दुसर्‍या बाजूने फॅसिस्ट सत्तांशी आपला लढा आहे असे बजावून सांगत होते. असे बहुआयामी, बहुश्रुत असे हे व्यक्तिमत्व. 

त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मला भावलेला भाग म्हणजे त्यांची वस्तुनिष्ठता, मूल्यमापनाचा आग्रह आणि विचार तसेच निर्णय हे व्यक्ती, समाज, काल आणि परिस्थिती-सापेक्ष असणे मान्य करण्याचा खुलेपणा. त्याचबरोबर ज्यांच्या सोबत प्रवास करायचा त्यांच्यावरच्या निष्ठा, बंधुभाव कायम ठेवतानाच मतभेदांची शक्यता न नाकारणे, 'गिव एवरी डेविल हिज ड्यू' या न्यायाने ज्याला विरोधक मानले, त्याज्य मानले अशा व्यक्ति अथवा विचाराचीही सकारात्मक बाजू - कदाचित अन्य स्थळी, काळी आपले मूल्यमापन वेगळे असू शकते या साठी - नोंदवून ठेवणे.

इथे निवडलेला वेचा हा त्यांच्या मार्क्स, मार्क्सवाद आणि त्याचे भारतीय व पाश्चात्य संदर्भ याबाबत त्यांची भूमिका मांडणारा आहे. पण मी तो निवडला तो कम्युनिजमचा पंचनामा म्हणून नव्हे. मला भावली ती त्यांच्या विचाराची पद्धत. व्यक्ती, त्याचा विचार, अंमलबजावणी, त्याचे संदर्भ, स्थल-काला संदर्भातील सापेक्षता या परिमाणांचा इतका सांगोपांग वेध क्वचितच घेतलेला पहायला मिळतो. त्यामुळे इथे कम्युनिजम कडे मी केवळ 'केस स्टडी' म्हणून पाहतो आहे, आणि त्या निमित्ताने विश्लेषण, मूल्यमापनाचा वस्तुपाठ म्हणून मी हा वेचा निवडला आहे. कम्युनिजमवरची टीका शेअर करणे हा इथे हेतूच नाही! तेव्हा कम्युनिस्ट/कम्युमिजम द्वेष्ट्यांनी खूष व्हायचे कारण नाही, तसेच कम्युनिजम बद्दल आस्था असणार्‍या किंवा कम्युनिस्ट असलेल्यांनी नाराज व्हायचेही कारण नाही.

दुसरा मुद्दा असा, की ज्या पुस्तकातून हा वेचा निवडला आहे त्या पुस्तकाचे लेखक खुद्द पं. नेहरु नाहीत. त्यांच्या समग्र लेखनातून विविध विषयांबद्दल त्यांच्या मतांचा मागोवा घेणारे हे लेखन संपादित केले आहे ते नेहरुंचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. न. गो. राजूरकर आणि प्रसिद्ध विचारवंत, अभ्यासक, तत्त्वज्ञ - जे स्वतःला मार्क्सवादी म्हणवीत - प्रा. नरहर कुरुंदकर यांनी. तेव्हा या वेच्यातील विचार, तसंच वाक्यरचना तंतोतंत नेहरुंचे आहेत असे गृहित धरण्याचे कारण नाही. याशिवाय या वेच्यात नेहरुंने मार्क्सबाबत केलेले विवेचन या वेच्यासंदर्भात आणि एकुणच त्यातून प्रतिबिंबित होणार्‍या त्यांच्या विचारव्यूहाला लागू करणे आवश्यक आहे. नेहरुंचे बहुतेक लेखन हे स्वातंत्र्यपूर्व कालातले आहे, त्या परिस्थिती-संदर्भात आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांची मते बदललेली असू शकतात.

यात नेहरुंनी मार्क्सवादाबाबत केलेले भाष्य, केलेली टीका मला किंवा इतर कुणाला सर्वस्वी मान्य असायला हवी असा आग्रह धरण्याचे कारण नाही. (यातील एक दोन मुद्द्यांचा मीच विस्ताराने प्रतिवाद करु शकेन.) कदाचित यातील विचार पुढे कालबाह्य झाल्याचे नेहरुंनी मान्य केले असणे शक्य आहे किंवा कुण्या कम्युनिस्ट विचारवंताने त्याचा प्रतिवाद केला असणेही शक्य आहे.

प्रस्तावना आवरती घेताना पुन्हा एकदा आठवण करतो की हा वेचा कम्युनिजमवरची टीका म्हणून शेअर केलेला नाही, तर त्या टीकेचा दृष्टीकोन अभ्यासावा या हेतूने शेअर केलेला आहे. "मार्क्सही शेवटी आपल्या काळाचे अपत्य होता.", "मार्क्सचे विवेचन घडून गेल्यानंतरच्या काळात जर नवे घटक अस्तित्वात आले असतील तर त्याचा विचार करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन पडते. " यासारखी वाक्ये माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आणि त्यासंबंधीचे विवेचन अभ्यासनीय ठरते.

-oOo-

या पुस्तकातील एक वेचा : विचारांच्या मूल्यमापनाची परिमाणे


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा