"वासंती मेली." बाळ्यानं पहिल्यांदाच फटकन सांगितलं. नान्याचा चेहरा कोवळाकोवळा होऊन गेला.
"पुढं ऐक. आम्हाला कुणालाच माहीत नाही ती आजारी आहे हे. चाळीतली माणसं पहिल्यांदा थोडी बुचकळ्यात पडली. हिचं झालं काय? ही येत का नाही? ही माणसं भलतंच काही समजली. कुजबूज सुरू. हे चाळीचं म्हणजे एकदम ठेवणीतलं. सांगतो काय. या लोकांना अकलाच नाहीत..."
मधेच सुधा दारापाशी गेली. तिनं दाराला कड्या आहेत की नाही हे पाहिलं. "हळू बोला. आपल्याला राहायचंय इथं-" खालच्या मानेनं सांगून ती कपाटाआड वावरु लागली.
![त्रिशंकू](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhflh5NkndnwwGuApyWpP_Gt2ZLV5fcZILlQhrfcdp5xyFekX42suLkrH1XEDLDfq_HwXBOFEzPYz106RB8krsNADOYFOhciaKVOHsiBoq2nhc6hqADgnzZ3Iy0Gq7nHZv6MRICxl3CG1xG2igyAbI7M31EZ-7xyJqCFYsxEjNL-xq06dNw80Z5BkthnQ/s320/Trishankoo.jpg)
"उठवलं कुणीतरी- वास्याला दिवस गेलेत. पाहायला मात्र पहिल्यांदा कुणीच गेले नाहीत हं. वार्ता चाळभर. या चाळीतून वार्ता त्या चाळीत प्लेगच्या उंदरासारखी पडली. मग काय, त्या चाळीतदेखील तेच. आमच्या विसूनानांच्या कानावर जाऊन ही वार्ता थडकली. ’रवये नम:*’ तरी काय? त्यांनी तोच संशय घेतला. पोर जेवत नाही. काही खात नाही. पावलं सुजलीत. झालं, म्हाताराही बिघडला. अजब या लोकांचं. बरं आमच्या या सात-आठ पोरांच्या आयाबायादेखील त्यांच्यातल्याच. माय गॉड! बातमी वासंतीला कळली. मग काय--"
बाळ्या एखाद्या रिकाम्या हंड्यासारखा झाला. कोरडा ठणठणीत पडला. पुढचे शब्द आटून गेले होते. तो पाहातच राहिला.
"बाळ्या, तो हसरा, लाघवी चेहरा दिसतोय रे मला." नान्याला भडभडून येत होतं.
"बातमी वासंतीला कळली आणि तुला देवाशपथ सांगतो नान्या, ती पोर कण्यातूनच मोडून पडली. म्हातारा मग इकडे फिरला, तिकडे फिरला. केव्हा केव्हा खोलीवर असायचाच नाही. मग आम्ही चार-पाच लोकांनी ठरवलं, डॉक्टरला आणून दाखवू या. पण ते त्या चाळीतले तरुण तरी काय? ते म्हणाले ह्या... ह्या... ठरवलं खरं, पण चाळीतले लोक उद्या आमच्यापैकीच कुणाचं तरी नाव घ्यायचे. झालं, मी एकटा तरी काय करणार--"
"भोसडीच्या, तुला काय झालं होतं? भ्याड--"
नान्यानं एकदम मुठीच आवळल्या. गोरी मुद्रा तापल्यासारखी झाली. कपाटाआडून सुधा कावर्याबावर्या डोळ्यांनी पाहू लागली.
"कबूल. नान्या, आम्ही सगळे भ्याड आहोत. नान्या, त्या वेळी मला तुझी आठवण झाली. पण माझी खात्री आहे नान्या, त्यावेळी तुलाही पाऊल पुढं टाकण्याचा धीर झाला नसता. हां... धीर झाला नसता. प्रत्येक खोलीत विषय एकच. वासंतीच्या मनाचं काय झालं असेल, कल्पना करवत नाही. खोलीचं दार नेहमी लावलेलं असतं. शेवटी डॉक्टर आला. कुणी आणला नकळे! पण डॉक्टर काय करणार होता? पोरीला कावीळ होऊन महिना लोटला होता. पण तिरडीवरसुद्धा तिचं तोंड हसरंच होतं. खरंच सांगतो. आपलं काळीज त्या रात्री दुभंगून गेलं. नी दार झाकून त्या रात्री ओक्साबोक्सी रडलो. या-- या आठ-आठ मुलांच्या रिकामटेकड्या बायांनी बळी घेतला तिचा. यांच्या डोकीवर पाटे-वरवंटे घालायला हवेत. पोर जेवत-खात नाही याचा अर्थ काय ती गरोदर राहिली? डोकंच अश्लील साल्यांचं."
बाळ्या आसनमांडी घालून बसला होता. नान्यानं डोळ्याला हातरुमाल लावला.
"असो!"
"रवये नम: सुरूच असतं!"
"काय करील म्हातारा? सृष्टीच्या नियमाप्रमाणं सूर्य उगवतोय ना? म्हातार्याला ’रवये नम:’ नित्यनेमानं म्हणणं भाग आहे!" नान्या. सुधानंही स्टोव्हकडे बसल्याबसल्या डोळ्यांना पदर लावला होता.
"नेहमी हसायची बापडी." बाळ्यानं स्वत:शीच म्हटलं.
"विषय बंद! आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही यापुढचं. म्यॅड व्हायला होईल. आपण सगळे भ्याड आहोत शेवटी. षंढ!"
नान्या उठला. त्याने दार उघडलं.
- oOo -
(* सूर्योदयाच्या वेळी ते आपल्या खिडकीत बसून ’रवये नम:’ चा जप करीत, म्हणून तेच त्यांचे टोपणनाव.)
---
पुस्तक: 'त्रिशंकू'
लेखक: चिं. त्र्यं. खानोलकर
प्रकाशक: मौज प्रकाशन
आवृत्ती पहिली: १९६८
पृष्ठे: १६६-१६७.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा