त्या रात्री बुधा एकदम जागा झाला.
त्यानं चिमणी लावलीच नव्हती. बकर्यांचे श्वास त्याला ऐकू येत होते. पण त्याला असं वाटलं, की कुणी तरी दाराशी येऊन उभं राहिलं आहे. तो कसाबसा धडपडत अंथरुणावर उठून बसला. कण्हत कण्हत, खोल स्वरात त्यानं विचारलं,
"कोन हाय त्ये?"
पण उत्तर आलं नाही. कारण कुणीच आलं नव्हतं. बुधाला आपलं उगीचच वाटलं होतं. मग तो पुन्हा अंथरुणावर पडला.
बाहेर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. कड्यावरून पाणी खाली झेपावत होतं. त्याचा केवढा तरी आवाज होत होता.
बुधाला एकदम वाटलं की उठावं, अन् आपल्या कुत्र्याची समाधी जागेवर आहे किंवा नाही ते पाहून यावं. आपल्या आवळीबाईला भेटून यावं. त्यानं उठायची धडपड केली. पण त्याला असं जाणवलं की सगळ्या इंद्रियांच्या शक्ती शरीराला सोडून चालल्या आहेत. मग तो नुसताच पडून राहिला. बाहेर पावसाच्या चळका झरत राहिल्या.
काही वेळानं एकदम बुधाच्या मनी उभं राहिलं, की मघाशी कोण आलं असावं? भूतचार? नव्हे नव्हे! मग कोण बरं ते!
अन् अचानक बुधाला तुकारामबाबाचा अभंग आठवला-
"वृक्षवल्ली आम्हां वनचरे सोयरे! पक्षीही सुस्वरे आळवीती..."
अचानक त्याला वाटलं की, हा असाच कुणी सोयरा वनचर असावा. हो हो, तोच तो! मग तो आत का आला नाही? बुधाला उराउरी का भेटला नाही? छे छे! चुकलंच! कोण आहे असं विचारलं, अन् तो सोयरा वनचर माघारा वळला! त्याला या म्हणायला पाहिजे होतं. त्याची ऊठबस करायला पाहिजे होती. आदरेखून त्याचं स्वागत करायला हवं होतं. पण ते केलं नाही!
बुधानं उठून बसायची धडपड केली. पण सगळं शरीर जणू विस्कळित झालं होतं. त्याच्यावरचा ताबाच हरपला होता. मग निरुपायानं त्यानं शरीर त्या प्रारब्धाच्या हाती सोपवून दिलं.
पण मन मात्र त्याचंच होतं. थकलं असलं, तरी ते अजून बुधाच्या स्वाधीन होतं. त्याला बुधानं बाहेर काढलं. वर जीन कसलं. तोंडात लगाम दिला. मग तो त्या वनचराच्या तपासास निघाला. आंब्यांच्या अन् हिरडीच्या खाली उतलेल्या फांद्या बाजूला सारीत तो त्याला शोधीत चालला. त्याच्या घोड्याच्या टापांखाली सोनकी फुलोरली होती. पिवळी तेजस्वी फुलं वाटभर पसरली होती. त्यांना धक्का न लावता तो चौखूर निघाला. आवळीवर आवळे लगडले होते. एका आइनावरुन कवंढळाचा वेल लटकला होता. त्याला चेंडूसारखी गोल कवंढाळं लोंबली होती- तांबूस-हिरवी. एका भुर्णीच्या झुडपामागं नागपुष्पी फुलली होती. पण या सार्यांकडे लक्ष न देता तो सोयर्या वनचराला शोधित होता. दरीखोरी तपाशीत होता. कडेकपारं शोधीत होता.
अन् एकदम तो थांबला. होय होय! एकदा तो सोयरा वनचर त्याला दिसला होता. नक्कीच! तोच तो!
आश्विनी पुनव होती. गेल्या वर्षीची. बोंबल्यानं बुधाला दूध प्यायला बोलावलं होतं. दूध पिऊन बुधा परतत होता. लवण ओलांडून तो पठाराची वाट चढून लागला होता. देखणं चांदणं भुईवर अंथरलं होतं. वाट किंचित् सादळली होती. मऊ झाली होती. चांदणंही सुखाचं वाटत होतं.
चालता चालता एका खडकावर येऊन बुधा थांबला. कुत्रा मागं होता, तो ही थांबला. सहज बुधानं मागं वळून पाहिलं. पाहिलं, अन् जसा हरीख त्याच्या आठी अंगांतून उमळून वर आला! वेड्यासारखा तिथंच खिळून बुधा उभा राहिला. उभाच राहिला. पुनवेचा चांद असा डोक्यावर यायला झाला होता. त्याचं चांदणं वरुन झरत होतं. ते थांबतच नव्हतं. पाऊस पडतो, अन् वाहून जातो. पण चांदणं वाहून जात नव्हतं. जणू भुई तहानलेली होती. ती अधाशासारखी ते चांदणं पिऊन टाकत होती.
समोर ते आवळेजावळे उभे होते. श्रीवर्धन आणि मनरंजन, दोघांनीही उन्हाची कांबरुणं काढून फेकली होती. ते दोघेही नागोडे उकिडवे बसून चांदण्यांच्या धाराखाली नाहात होते. अजून कड्यांवरुन पाणी झरत होतं. त्या आरशात चांदणं आपलं तोंड पाहात होतं.
बालेकिल्ल्याच्या उतारावर दाटीवाटीनं झाडं बसली होती. बारकीसारकी झुडपं त्या गर्दीत घुसत होती. काही मैदानात बसली होती. खोखो खेळायला पोरं मैदानभर पांगून बसतात तशी. पण ही सगळी अगदी निचळ होती. कुणी शपथ घातल्यासारखी.
पलीकडे दरी पसरलेली होती, अन् तिच्या त्या अंगाला डोंगर. हा दरीचा वाडगा चांदण्यानं लबालबा भरला होता. दरीच्या अलीकडे होती भात अन् साव्याची खाचरं. भाताचा प्रत्येक रोपा खाली वाकला होता. नम्र झाला होता. लोंबीतला दाणा न् दाणा तांदळानं तुडुंब भरला होता. गर्भवतीसारखा तो रोपा पिवळसर दिसत होताच, अन् आता पंगतीत बसून चांदणं पीत होता.
दिवसा काळेभंगार दिसणारे खडक आता रूपवंत झाले होते. त्यांच्या काळेपणावर चांदिण्याची झिलई चमकत होती.
समोर बोंबल्याचा झाप. मागं उंबराखाली बुधाची झोपडी. उंबराच्या सावलीत जणू ती लपली होती. खुणेची टाळी पडायची वाट पाहात होती. ती टाळी पडताच ती रानभर धावत सुटणार होती. तिच्या समोरची बुधाची आवळीबाईही मजेत पाय पसरून चांदण्यात बसली होती.
बुधा पाहातच राहिला. त्याचे दोन डोळे त्याला पुरेनासे झाले. त्याच्या मनी ती उत्कंठा इतकी दाटली, की मग त्याच्या अंगाअंगाला दिठी फुटली.
अन् अचानक पश्चिमेकडून एक झुळूक आली. तिच्या मागून दुसरी. तिसरी. मग कुणीतरी साईसुट्यो म्हटलं. आतापर्यंत बुधाच्या समोर जे चित्र रेखलेलं उभं होतं, त्याच्यात प्राण फुंकला. मग झाडं हलू लागली. झुडपं शिळा घालू लागली. बुधाची झोपडी जणू उंबराखालून हललीच!
त्याला अतिशय आश्चर्य वाटलं. या सगळ्यांत प्राण आहे, हे इतके दिवस कसं कळलं नव्हतं कोण जाणे! दिङ्मूढ होऊन बुधा एका भल्या सपाट्या दगडावर बसून राहिला. कुत्राही त्याच्या शेजारी अलगद बसला.
अन् मग बुधाला अचानक असं वाटलं की, कुणीतरी हसतंय. ते हसणं अतिशय मऊ आहे. ते हसतंय, अन् झाडांशी खेळतंय. प्रत्येक झाडाला शिवत ते रानभर धावतंय. धावता धावता क्षणभर ते सोनकीच्या ताटव्यापाशी थांबतंय. त्या फुलांना मऊ हातानं कुरवाळतंय. त्या कुरवाळण्यानं फुलं थरथरताहेत. प्रसन्न होताहेत.
मग ते रानभर पाकोळीसारख्या गिरक्या मारू लागलं. क्षणात इकडे, क्षणात तिकडे. त्याच्या मागं धावता धावता बुधाची म्हातारी दिठी थकली. ती आपल्याच जागी बसून राहिली. टुकुटुकु पाहू लागली.
ते कोणी तरी प्रत्येक झाडाला हसवीत, प्रत्येक भाताच्या लोंबीचा मुका घेत, असं बुधाच्या जवळ येऊ लागलं. बुधाचा म्हातारा देह संतोषानं थरथरला. त्या कुणाला भेटायला अतिशय उत्सुक होऊन तो त्याची वाट पाहात राहिला.
चंद्र नेमका मध्यावर आला. अन् त्या सोन्याच्या क्षणी त्या कुणी तरी बुधाला मिठी घातली. ती मिठी पडताच पहिल्या क्षणी बुधाच्या अंगभर शिरशिरी दाटली. त्याला झांजावल्यासारखं झालं. पण दुसर्या क्षणी त्याला असं वाटलं, की आपला जुना देह मागं राहिला आहे. आता लाभला आहे नवा, तरुण. त्या देहाला हे झाड वाटत होतं. या देहाला झाड हे पाठचा भाऊ वाटतंय. आता दुरावा उरला नाही. द्वैताची कोळिष्टकं झडली. अंगाअंगात जवळीक हेलावते आहे. हे सगळंच रान दूरपणाचा बुरखा टाकून आपल्याला खेव देऊ लागलं आहे. ते अन् आपण एक झालो आहोत. एकमेकांत मिसळून गेलो आहोत. अवघेंचि त्र्यैलोक्य आनंदाचे आतां!
तृप्ती तृप्ती म्हणतात ती हीच. तृप्तीची वीणा झणझणू लागली. त्या लयीत हारपून बुधा बसून राहिला.
*
शेवटी आता हंतरूणावरुन उठवेना झाल्यावर बुधानं त्या कुणाला तरी ओळखलं होतं. तो सोयरा वनचर होता. तुकारामबाबांना भेटलेला. अन् तोच पुन्हा एकदा बुधाला शोधीत आला होता. कशासाठी? त्याच्याशी एकरूप होण्यासाठी. देहाची ही खोळ टाकून देण्यासाठी? तो बुधाला बोलावीत होता? अन् बुधानं त्याला ओळखलं नाही?
क्षणभर बुधाला वाईट वाटलं. फार फार खेद झाला. पण मग वाटलं, की जर तो सोयरा वनचरच असेल तर तो पुन्हा येईल. आपण त्याच्या आश्रयाला आलो आहोत. तो आपल्याला टाकायचा नाही. सोडून द्यायचा नाही.
तो येईल. आपण हा सुरकुतलेला देह टाकून वर उठू, त्या वेळी तो आपलं बोट धरील. आपल्याला घेऊन जाईल. करवंदीच्या फुलांशी गोष्टी करण्यासाठी. बाहव्याच्या शेंगांना लटकून झोके घेण्यासाठ. सावरीच्या म्हातार्यांबरोबर आकाशात उडण्यासाठी. नक्कीच घेऊन जाईल.
अन् मग बुधा त्याची वाट पाहात पडून राहिला.
- oOo -
पुस्तक: ’माचीवरला बुधा’
लेखक: गो. नी. दाण्डेकर.
प्रकाशक: मॅजेस्टिक प्रकाशन
आवृत्ती सातवी (डिसेंबर २००५)
पृष्ठे: १०५ ते १०९.
---
संबंधित लेखन:
वेचताना... : माचीवरला बुधा >>
पहा जरा परतून >>
---
बुधाची कहाणी खरंच विलक्षण आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यात वर्णिलेल्या स्थळांना अनेकदा जाऊन आलोय. वेगळंच रसायन आहे बुधा. कधीतरी बोलूयात या वर निवांत ...
उत्तर द्याहटवा