रविवार, २० जून, २०२१

अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास

’क्लॅश ऑफ टायटन्स’ या चित्रपटातील हा एक प्रसंग आहे. पर्सिअस हा झ्यूस या ऑलिम्पिअन देवांच्या पहिल्या पिढीतील देवाचा पुत्र आहे. पण तो जन्मापासून वडिलांपासून दूर वाढल्यामुळे त्याला ते ठाऊक नाही. आयो त्याला त्याचे जन्मरहस्य सांगते आहे. पण तो तिलाही ओळखत नसल्याने तिच्याबद्दल विचारणा करतो, तेव्हा ती आपण कोण त्याचा उलगडा करते आहे.

ही डेमिगॉड म्हणजे निम्नदेवता किंवा साहाय्यक देवता आहे, साधारणत: आपल्याकडील यक्ष व अप्सरांसारखी. हे देवांप्रमाणेच चिरंजीव आहेत, पण त्यांना देवत्व मिळालेले नाही. देवांचे साहाय्यक अशीच त्यांची कायम भूमिका आहे. आपली पार्श्वभूमी सांगताना ती ’चिरंजीवित्वाचा शाप’ असा उल्लेख करते. सर्वस्वी मानवी आयुष्य जगलेल्या (आणि म्हणून त्या जमातीमधील चिरंजीवित्वाची, दीर्घायुष्याची आस वारशाने मिळालेल्या) पर्सिअसला तो उल्लेख आश्चर्यकारक वाटतो. तो त्याचा उपहास करतो आहे. पण त्यावरचे आयोचे उत्तर मात्र त्याला नि प्रेक्षकालाही अंतर्मुख करुन जाते.

Perseus: Are you a God?

Io: There are Gods and there are men... and then there are those of us who are in between. Many years ago, I refused a God's advance. I was cursed with agelessness!

Perseus: (scoffs) So much of a curse.

Io: I have lived for years watching my loved ones die ! I imagine you are sympathetic to that.

शतायुषी झालेला सामान्य मनुष्य आपल्या कुटुंबातील किमान चार पिढ्या पाहात असतो. त्याचे आयुष्य जितके लांबते, तितके त्याला कुटुंबियांच्या मृत्युचा साक्षीदार व्हावे लागण्याची शक्यता वाढत जाते. आपल्या हातांचा पाळणा करुन वाढवलेल्या, पाहता-पाहता आपल्या हातातून निसटून आपलाच हात धरुन चालवत नेणार्‍या, पोशिंदा झालेल्या मुलालेकरांचा, नातवंडांचा मृत्यू त्याच्यावर किती क्रूर आघात करत असेल याची कल्पना करता येईल. 

शंभराचे वय दीडशेपर्यंत पोचले, तर त्याच्या पुढच्या दोन पिढ्या अस्तंगत झाल्याचे पाहण्याचे दुर्भाग्य त्याला सहन करावे लागते. नातवंडे मोठी होऊ लागताच मुलांच्या कुटुंबात आई-वडिल हळूहळू अडगळ वा बिनमहत्वाचे होऊ लागतात. याला मुला-नातवंडाच्या आयुष्यात इतर अनेक नवे संदर्भ जोडले जात असतात हे कारण असतेच, पण त्याशिवाय मुलांचेच वय उताराला लागते नि त्यांना स्वत:चीच काळजी घेण्यासाठी आपल्या मुलांवर अवलंबून राहण्याची वेळ येते हे ही कारण असते. त्या तिसर्‍या पिढीला आपल्या पुढच्या नि मागच्या पिढीचे संगोपन करताना या आणखी मागच्या पिढीसाठी कितपत वेळ, ऊर्जा नि आस्था शिल्लक राहणार याचा तर्क सहज करता येतो.

कुटुंबात नाही पण पण कुटुंबापलिकडेही समाजात त्याचे काही स्थान राहू शकेल का? एखादी प्रसिद्ध, महत्वाची अथवा यशस्वी व्यक्ती कदाचित कुटुंबाबाहेरील काही जगण्याचे संदर्भ सांभाळून राहूही शकेल. पण धार्मिक आणि सामाजिक सनातन्यांनी कितीही त्याला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी समाज नि संस्कृती ही प्रवाही असतात. त्यांत कालानुरूप बदल होत असतात. पुढच्या पिढ्या त्या बदलांसकटच जन्माला येत असल्याने मागील पिढ्यांचे संदर्भ फिकट होऊन त्यांच्या जगण्याला बदलत्या सामाजिक चौकटीचे संदर्भ अधिक बळकट होत जातात. काही पिढ्यांमध्ये जगण्याच्या चौकटी बर्‍याच बदलेल्या दिसतात.

गेल्या शतकात उद्योग आणि तंत्रज्ञानामध्ये- विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, वेगाने झालेल्या प्रगतीमुळे समाजाचे जगण्याचे संदर्भ नि चालीरिती आमूलाग्र बदलून गेल्या आहेत. आज शंभरीत असलेली एखादी वृद्धा तिच्या तरुणपणी चुलीवर अन्न शिजवत असेल. महानगरी जीवन जगणारी तिची नातसून घरात नळीने आलेल्या गॅसवर स्वैपाक करताना पाहते, तेव्हा तिला ते गौडबंगाल कितपत समजत वा रुचत असेल? गाडग्या-मडक्यात वा धान्याच्या डब्यात पैसे साठवून ठेवणारा तिच्या नवर्‍याला आज धान्यच काय पण शिजवलेले अन्नच थेट दारी येते, नि आणून देणार्‍याला आपला नातू वा पणतू कोणतेही पैसे देत नाही ही व्यवस्था कितपत समजेल वा रुचेल? 

रेल्वे प्रथम आली तेव्हा ती आपला पाठलाग करुन चिरडून टाकेल या भीतीने सैरावैरा पळणार्‍याचा पणतू, हजारो मैल दूर असलेल्या अमेरिकेतून आपल्या बापाशी समोरासमोर बोलतो, यावर त्याचा कितपत विश्वास बसत असेल? स्त्रियांना जिवंतपणी माजघराबाहेरही पाऊल टाकू न देणार्‍याची नातसून वा तिची मुलगी जिम नावाच्या कुठल्याशा ठिकाणी जाऊन चार पुरुषांसमोर, पुरुषांसारखेच कपडे घालून व्यायाम करते, याने त्याच्या संस्कारांच्या चौकटी उध्वस्त होत असतील की हा बदल तो सहज स्वीकारत असेल?

'तंत्रज्ञान युगाचा वेग आपण पकडला आहे. त्यावर आपण स्वार झालो आहोत. होणारे बदल आवश्यक वेगाने आत्मसात करत आहोत. थोडक्यात आपल्याला कालप्रवाहाशी जुळवून घेण्यास काहीच समस्या नाही.' असे समजणार्‍या मध्यवयीन मंडळींनी आपली तरुण, कमावती मुले वा नातवंडे मोबाईलचा नि त्यावर आधारित सेवांचा वापर जितक्या सफाईने करतात , तितक्याच आपणही करु शकतो का याचा एकदा अदमास घेऊन पाहायला हरकत नाही. कोणतीही बॅंक वा देश जामीन नसलेले चलन- नव्हे चलने आज बाजारात वापरली जातात. त्यांच्या आधारे आपण सहज व्यवहार करु शकतो का, आपली कमाई त्या चलनांत रूपांतरित करुन पुढच्या आयुष्याची बेगमी करण्याचे धाडस करु शकतो का याचाही अंदाज घेऊन पाहावा. आणि हे बदल जेमतेम एका दशकातील आहेत हे ध्यानात घेणे महत्वाचे.

’लिव्ह-इन’ स्वरूपाचे नाते समाजातील बहुसंख्य व्यक्ती सहज स्वीकारत नाहीत. संस्कृतीच्या, नैतिकतेच्या टेंभ्याच्या प्रकाशात त्याला नाकारले जाते. पण न्यायव्यवस्था त्याला दोन सज्ञानांनी परस्परसंमतीने जोडलेले नाते मानते. वारसाहक्क कायद्याच्या दृष्टीने कदाचित अजूनही ते कायदेशीर नसेल, पण गुन्हा ठरत नाही. पण आज लिव्ह-इन नात्याला सहज मानणारे लोक अपत्यप्रेमासाठी लग्नाचे नाते आवश्यक न मानणार्‍या, वात्सल्यपूर्तीसाठी विवाहाखेरीज मातृत्वाचा स्वीकार करणार्‍या एकलमातांकडे आजही तितक्याच खुल्या मनाने पाहतात का? आणि हे ’आजचे प्रागतिक' म्हणवणारे दीर्घायुषी झाले नि त्यांच्या आयुष्यातच एकास-एक जोडीदार ही संकल्पना मोडीत निघून कम्युनिटी लिव्हिंगची संकल्पना पुनरुज्जीवित झाली, तर त्या व्यवस्थेत कितपत सहज वावरु शकतील? त्या समाजात वावरताना नव्या सामाजिक नियमांशी जोडून घेणे त्यांना कितपत अवघड जाईल?

जुन्या ग्रीक आणि रोमन (आणि तुर्कस्थानसारख्या काही राष्ट्रांत अजूनही अस्तित्वात असलेली) सामूहिक स्नानगृहांसारखी ’कम्युनिटी किचन’ची अथवा सामूहिक स्वयंपाकघराची व्यवस्था सार्वत्रिक झाली तर? (बोहरा समाजात अशी कम्युनिटी किचन आताच अस्तित्वात आहेत) अशा सामूहिक अन्न शिजवण्याने घरात अन्न शिजवण्याचा वेळ, ऊर्जा, त्यानंतरच्या स्वच्छतेची आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघर नावाच्या स्वतंत्र खोलीची गरज वगैरे बर्‍याच कटकटी कमी होऊन त्यातून वाचलेला वेळ माणसे अधिक क्रिएटिव्ह, सर्जनशील कामासाठी वापरु शकतील. अन्नाची नासाडीही अनेक पटीने कमी होईल. अन्नाच्या वासाने जमा होणार्‍या झुरळ, मुंग्या वगैरे कीटकांपासूनही घर मुक्त होईल. महानगरांत जागोजागी दिसणारी 'पोळी-भाजी विक्री केंद्रे' या कम्युनिटी किचनचे बीज रोवणारीच आहेत. आता ही मागच्या पिढीतील प्रागतिक म्हणवणारी माणसे त्याच्याशी जुळवून घेतील की हट्टाने ’घरच्या अन्नाची सर बाजारच्या अन्नाला नाही’चे पालुपद पुढच्या पिढ्यांना ऐकवत त्यांचे डोके पिकवत राहतील?

सोळा वर्षाचे झाले, की आई-बापापासून दूर होऊन, स्वत: कमावते होत पोराने स्वतंत्र आयुष्याची सुरुवात करण्यास उद्युक्त करणारी अमेरिकन संस्कृती जगभर हातपाय पसरते आहे. अशा समाजात तिसर्‍या-चौथ्या पिढ्यांचे आपल्या दीर्घायुषी खापरपणजोबाशी असणारे भावनिक नाते कितपत दृढ असणार आहे? आर्थिक, तांत्रिक संपन्नतेमुळे सरासरी आयुष्यमान वाढलेल्या अमेरिकेमध्ये वृद्धांचे एकाकीपण ही भेसूर समस्या बनली आहेच. 

फ्लोरिडासारख्या ठिकाणी अशा ज्येष्ठांचे कम्युनिटी लिव्हिंगचे प्रयोगही सुरु आहेत. पण इतर प्रवाही समाजापासून दूरच असल्याने त्यांनाही एक प्रकारच्या घेट्टो अथवा गावकुसाबाहेरच्या वस्त्यांचे रूप येणे अपरिहार्य असते. जगणे आणि जिवंत असणे यातील फरक त्या वयात नि त्या परिस्थितीमध्ये जितका नेमका समजतो, अथवा जाणवतो, तितका तर्काची गिरणी निरंतर चालवूनही उमगत असेल असे मला वाटत नाही.

थोडक्यात दीर्घायुष्य हे माणसाला अधिकाधिक एकाकी करत नेत असते. शंभरीच्या टप्प्यानंतर तर तो/ती डोक्यावर छत असूनही अनिकेत ठरत असतो. स्वत:च्या कुटुंबाच्या संदर्भातही परकी होत जाणारी ही व्यक्ती समाजाच्या दृष्टीने कधीच इतिहासाचा भाग झालेली असते, बाजूला पडलेली असते.

आता याच तर्काला लांबवून अमर असलेल्या व्यक्तीचे आयुष्य कसे असेल याची कल्पना करता येईल. महाभारतकारांनी अश्वत्थाम्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला आहे. पण दीर्घायुष्याची, चिरंजीवित्वाची आस असलेल्या माणसांना चिरंजीवित्व म्हणजेच शाप हे गणित ध्यानात येणार नाही हे ओळखून, प्रतीक म्हणून त्याच्या कपाळावर सदैव भळभळणारी जखमही ठेवून दिली आहे. त्याचबरोबर अमरत्वामधील एकाकीपण, सामाजिक तुटलेपण अधोरेखित करण्यासाठी त्याला अरण्यातले परागंदा आयुष्य दिले आहे. आणि म्हणून आयो जेव्हा 'चिरंजीवित्वाचा शाप' म्हणते तेव्हा त्याची नाळ जगभरातील संस्कृतीशी, समाजांशी त्यांच्या प्रवाही असण्याशी जोडलेली असते.

पण संवाद नीट ऐकला तर लक्षात येते आयो अजर (ageless) असा शब्द वापरते आहे अमर (immortal) नव्हे! अजरत्व आणि अमरत्व हे दोन्ही एक नाही. निव्वळ अमरत्वामध्ये शरीराची नैसर्गिक वाढ, झीज वगैरे सामान्य मनुष्याच्या शरीराशी निगडित बाबींचा अपवाद नाही. अजरत्वामध्ये शारीरक्षयापासूनही मुक्ती आहे. कोणत्याही संस्कृतीच्या पुराणात अशा व्यक्ती बहुधा ’अजन्मा’ असतात किंवा खरंतर चमत्कारजन्मा असतात. पूर्ण वाढ झालेली व्यक्ती म्हणूनच त्यांचे अस्तित्व निर्माण होते. कारण अर्भक ते तारुण्य ही जीवविकासाची वाट जे शरीरातील जे जीवनद्रव्य घडवून आणते ते तारुण्यात अचानक क्रियाशून्य होणे शक्य नसते. 

क्वचित अशा व्यक्तीच्या जन्माचा उल्लेख असलाच, तर तारुण्यात तिला एखाद्या देवाच्या वराने वा तत्सम चमत्कृतीजन्य कारणाने अमरत्व अथवा अजरत्व बहाल केले जाते. जन्मच नसल्याने त्यांना कुटुंब नाही आणि वाढीच्या वयातील कौटुंबिक स्नेहाची, बांधिलकीची ऊब नाही. जगण्याशी संबंधित विविध बाबी, ज्ञान आत्मसात करत पुढे जाताना मिळणारी उमज पडल्याची, साफल्याची भावना त्यांना अनुभवता आलेली नसते. जगणे सेंद्रीय पद्धतीने विकसित होत जातानाच सापडत जाणारे सामाजिक स्थान त्यांना मिळत नाही.

पण असे असूनही ते मानवाचेच शरीर घेऊन वावरत असल्याने, सर्वसाधारण मानवाला अनुभवाव्या लागणार्‍या हर्षखेदादी भावभावनांना त्यांना सामोरे जावे लागतेच. त्यांना आयुष्यातील प्रत्येक बंध हा स्वत:, कृत्रिमरित्या जोडत जावा लागतो. आणि त्या बंधाच्या दुसर्‍या टोकाला असलेल्यांच्या मर्त्य अस्तित्वाच्या विलयाबरोबरच तो विरूनही जातो. मग पुन्हा नवी व्यक्ती, नवे बंध या चक्रातून जात असताना सतत जमा होत जाणार्‍या गमावलेपणाच्या दु:खाने त्या पिचून जात असतील. आणि शारीर अजरत्वासोबतच अक्षय स्मृतिंचे शाप असतील, मर्त्य मानवाला असलेली विस्मृतीची देणगीही त्यांना नसेल, तर या वेदनाही चिरंतन होऊन राहात असतील. 

आपल्या भवतालाचे खचत जाणे हताशपणे साक्षीभावाने पाहात राहण्यापलिकडे त्यांना काहीच करता येत नसेल. असे आयुष्य मृत्यूहूनही भयंकर असण्याची शक्यताच अधिक. पण दीर्घायुषी मर्त्य मानवापेक्षा या अजरामर व्यक्तींना एक फायदा असेल. कोणत्याही सकारात्मक, रचनात्मक अशा नव्या अनुभवाला सामोरे जाताना दुर्बळ शारीरतेची मर्यादा त्यांना नसेल. पण हे सुख-दु:खाचे गाठोडे जेव्हा साचत जाते, तेव्हा त्या ओझ्याखाली त्यांचे आयुष्य पिचून जाण्याची शक्यताही वाढते.

इथवर आपण चिरंजीवित्वाकडे आयोच्या नजरेतून पाहिले. आता थोडे पर्सिअसच्या- म्हणजे एका मानवाच्या नजरेतूनही पाहू. पर्सिअस जरी तथाकथित देवपुत्र असला तरी तो मानव आहे नि मानवसमाजातच वाढला आहे. त्यामुळे त्याचे संस्कार नि जगणे दोन्ही मानवी आहे. 

अन्नाची वा एकुणात आर्थिक असुरक्षितता, अनारोग्य नि त्यातून येणारी वेदना आणि अखेर मृत्यू या तीन गोष्टींचे भय माणसाच्या मनाला कायम व्यापून राहिलेले असते. त्यामुळे माणसाची जाणीव विकसित झाल्यापासून या तीन भयांचे परिमार्जन करण्याच्या दृष्टीने त्याचा आटापिटा चालू असतो. प्राचीन काळापासून सर्वच समाजातील किमयागार(alchemist) शिशापासून किंवा अन्य सहज उपलब्ध असलेल्या धातूपासून सोने, पॅनासिया(Panacea) म्हणजे 'हर मर्ज की दवा' आणि मुख्य म्हणजे चिरंजीवित्व देणारे द्रव्य (elixir of immortality) तयार करण्याच्या प्रयत्नात होते. मानवी आयुष्यातील तीन मोठ्या भयांपासून मुक्त होण्याचा हा प्रयत्न होता. धन, आरोग्य आणि मृत्यु-मुक्ती हे तीन हेतू यामागे होते. 

केवळ मृत्यूपासून मुक्ती पुरेशी नव्हती. कारण जगण्याच्या धबडग्यामध्ये तो अनेक धोक्यांना, लहान लहान समस्यांना सामोरे जात होता. त्यातून त्याच्या शरीराची झीज होत होती. अनारोग्याची अनेक कारणे आसपास होती. त्यामुळे अनारोग्याने भरलेले शरीर आणि चिरंजीवित्व यांचा संयोग मृत्यूहून वेदनादायी असेल हे त्यांनी जाणले होते. त्यामुळे चिरंजीवित्वासोबतच आरोग्याचा विचारही ते करत होते. काहींना चिरंजीवित्वाचा सुदृढ नि निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य हा व्यावहारिक अर्थच अभिप्रेत होता.

पण अमरत्व देणारे द्रव्य विकसित करण्यासाठी आधी 'असे द्रव्य अस्तित्वात आहे का?', 'असू शकेल का?' 'निर्माण करता येईल का?' 'अमरत्व साध्य करणे शक्य आहे का?' या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे मिळण्याची गरज होती. तरच पुढच्या धडपडींमागे पुरेसे मानसिक नि आर्थिक बळ उभे करणे शक्य होते. यासाठी आधी कुठेतरी असे अमरत्व अस्तित्वात आहे अशी मानवाने कल्पना सुरू केली. 

कल्पनाविस्ताराची मोठी कुवत असलेल्या माणसांनी मग पुराणकथांना जन्म दिला. वास्तव आयुष्यात दिसणारे आकाशातील सूर्य, तेथूनच पडणारा पाऊस, तो घेऊन येणारे पाणी हे जसे चिरंजीव आहेत तसेच दोन हात, दोन पाय नि डोके असणारे मानवसदृश जीव कुठेतरी आहेत, नि ते चिरंजीव आहेत ही कल्पना देवांना नि पारलौकिकाला जन्म देऊन गेली. यामुळे चिरंजीवित्वाला कल्पित का होईना आधार मिळाला नि त्याचा पाठपुरावा सुकर झाला.

मुळात सार्‍या पुराणकथा माणसाच्या मेंदूचीच निर्मिती असल्याने अमरत्वासारखी कल्पनाही त्याच्याच मेंदूतून निर्माण झालेली आहे. अमरत्वासहित स्वत:च्या आयुष्यात जे हवेसे वाटते, पण जे अप्राप्य आहे, अशा सर्व ईप्सितांची जंत्री जमा करुन त्यातून तो देव-देवतांची निर्मिती करतो. शारीर वेदना आणि मृत्यू हे मानवाच्या असंस्कृत, आदिम काळापासून असलेल्या वेदनेचे उगम आहेत. त्याच्यापासून त्याला मुक्ती हवी असते. पण ती मिळण्याचे मार्ग त्याच्याकडे उपलब्ध नसतात. त्यातून येणारे वैफल्य दूर करण्यासाठी तो त्यांना नाहीसे करण्याचे बळ असणार्‍या आणि म्हणून स्वत: त्यांच्यापासून मुक्त असणार्‍या देवतांना जन्म देतो. 

पण हे करत असतानाही त्या देवतांचे गुणधर्म नकळतपणे त्याच्या वैयक्तिक जगण्यातील अनुभवांतूनच उतरत असल्याने त्या अ-वास्तव जगातही वास्तव जगासारखी सामाजिक उतरंड दिसते. काही देव श्रेष्ठ तर काही कनिष्ठ भूमिकेत दिसतात. खरेतर ही उतरंड त्या त्या देवांना शिरी घेणार्‍या तथाकथित भक्तांनीच लावलेली असते. कालानुरूप लष्करी ताकदीचे, राजकीय-आर्थिक बलाचे गणित बदलले की त्याला अनुसरून ती बदलतेही. नवे देव जन्माला येतात, जुन्यांची सद्दी संपुष्टात येते. आणि हे साध्य करण्यासाठी हे देवही षड्रिपुंनी लिप्त असणे अपरिहार्य असते.

जगभरातील देवसंकल्पनेचा इतिहास पाहता ग्रीक देव-देवता या सर्वाधिक मानवी आहेत. आसक्ती, प्रेम, द्वेष, सूड, क्रौर्य आदी भावनांची त्यांच्या कथेमध्ये रेलचेल असते. आपल्या सत्तेचा प्रसंगी गैरवापरही करताना ते आढळून येतात. आयोवर आसक्त झालेल्या देवाबाबत असेच घडले आहे. आपल्या आसक्तीला प्रतिसाद न दिल्याने त्याने तिला अजरामरत्वाचा शाप दिला आहे. 

झ्यूस हा देव तर अनेक मानवी स्त्रियांशी संग करण्याबाबत प्रसिद्धच आहे. पर्सिअसच्या जन्माची जी दंतकथा ’क्लॅश ऑफ टायटन्स’मध्ये चित्रित केली आहे, त्यातही झ्यूस हा राजा अक्रिसिअसचे रुप घेऊन त्याच्या पत्नीशी म्हणजे दनाईशी संग करतो. त्यातून दनाई गर्भार राहते. हे ऐकून संतप्त झालेला अक्रिसिअस आपल्या पत्नीची हत्या करतो नि त्या अत्याचारातून जन्मलेल्या मुलाला तिच्या मृतदेहासोबत एका पेटीत घालून समुद्रार्पण करतो. ऐनवेळी झ्युस हस्तक्षेप करतो. अक्रिसिअसला तो विरूप करतो नि पर्सिअसला वाचवतो. पुढे स्पायरोस आणि त्याची पत्नी मार्मरा हे कोळी दांपत्य त्याचा सांभाळ करते.

झ्युस आणि दनाईच्या कथेचे इंद्र-अहल्येच्या कथेशी या कथेशी विलक्षण साम्य आहे. त्याचप्रमाणे पेटीतून अथवा परडीतून वाहात आलेल्या मुलाचा कोळ्याने अथवा दत्तक पालकांनी सांभाळ करणे या कथा-युक्तीचा वापर जगभरातील महानायकांच्या सामान्य कुळाच्या जागी श्रेष्ठ-कुलदीपक असल्याचा समज रुजवण्यासाठी केला गेला आहे. ग्रीकांनी पर्सिअसबाबत, ज्यूंनी मोझेसबाबत, भारतीयांनी कर्ण आणि कृष्ण यांच्याबाबत ही युक्ती वापरली आहे. 

मोझेसचा अपवाद वगळता अशा बहुतेक सर्वांचेच दत्तक(?) पालक हे सामान्य कुळातले आहेत सामान्य कुळातून असे श्रेष्ठ मानव जन्माला आले नि आपल्यासारख्या श्रेष्ठकुलजनांना त्यांचे श्रेष्ठत्व अमान्य करता येत नाही हे उच्चवर्गीय समाजाला डाचत होते. अशा कथायुक्तीच्या साहाय्याने त्यांनी या नायकांना ’आपलेसे’ करुन घेतले. 

पुढे वैष्णवांनी दशावतारांची कल्पना मांडून राम-कृष्णादी महानायकांचे श्रेय बिनबोभाटपणे आपल्या देवाच्या दानपेटीत जमा केले. मर्त्य कौरवांचा निष्ठावान आणि प्रबळ सहकारी असलेल्या सूतपुत्र कर्णासारख्या प्रबळ विरोधकाला सूर्यपुत्र बनवून वेगळा काढला. तसेच सामान्य कुलातील असामान्य लढवय्या असलेल्या पर्सिअसला देवपुत्र बनवून त्याच्या माता-पित्यांकडून त्यांचे श्रेय हिरावून घेत काल्पनिक देवाच्या बीजाच्या पदरी बांधण्यात आले. 

अशा बर्‍याच घटना, प्रसंग हे जगभरातील पुराण-इतिहासातून पुनरावृत्त होताना आढळतात. विविध संस्कृतींच्या पुराणकथांचा महत्तम साधारण विभाजक (म.सा.वि.) काढायचा झाला तर अशा बर्‍याच गोष्टी त्यात जमा करता येतील.

ग्रीकांचे असो की भारतीयांचे, सुरुवातीच्या काळात कदाचित प्राकृतिक घटकांना, महानायकांना दिले गेलेले देवत्व मागे पडून अध्याहृत, मानवकल्पनानिर्मित देवांनी त्यांची जागा घेतल्यावर त्यांच्या गुणांमध्येही बदल होत गेले. त्यांच्यातला मानवी अंश अस्तंगत होऊन ते अधिकाधिक पारलौकिकाकडे ढकलले गेले. 

इंद्रादी देवांची सद्दी हळूहळू संपत आल्यानंतर पुढे आलेल्या शिव, विष्णू वगैरे देवांच्या पुढच्या पिढीत, आपले देव मर्यादापुरुषोत्तम अथवा सर्वस्वी दुर्गुणविरहित असल्याचा दुराग्रह आपण धरू लागलो आहोत. आणि त्यातून मग त्या दनाईसारख्या, अहल्येसारख्या पीडितांनाच व्यभिचाराचा काळा रंग फासून आपल्या पीडक देवतांचा, तथाकथित आदर्शांचा रंग उजळून घेतो आहोत.

अखेरचा मुद्दा असा की मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा अंत अथवा विलय ही जाणीव फक्त मनुष्यप्राण्यातच असावी. एखादं काळवीट जेव्हा सिंह वा वाघ यांसारख्या शिकारी प्राण्यांपासून जिवाच्या आकांताने दूर पळतं, तेव्हा ते मृत्यूला घाबरुन पळतं की पाठलागाला? मृत्यू म्हणजे आपल्या अस्तित्वाचा अंत हे त्याला उमजत असेल का? माझ्या मते नसावं. वाघ वा सिंह काळवीट कळपाशेजारुन निवांत चालत जातो, तेव्हा काळवीटेही त्याच्याकडे दुर्लक्ष करुन निवांत चरत-फिरत असतात. 

वर्तनवैज्ञानिक(ethologist) याचा अर्थ असा लावतात, की शिकारी प्राणी त्याक्षणी शिकारीसाठी बाहेर पडलेला नाही हे त्या प्राण्यांना समजत असते. परंतु माझ्या मते हा पर्यवसायी निष्कर्ष आहे. सध्या तो आपला पाठलाग करत नाही इतकेच त्यांना समजत असावे. कारण जर त्याक्षणी तो शिकार करण्यासाठी बाहेर पडलेला नाही, किंवा त्याचे पोट भरलेले आहे, आपल्या जिवाला बिलकुल धोका नाही हे त्यांना समजत असते, तर एखादे काळवीट सरळ त्याच्याकडे जाऊन शिळोप्याच्या गप्पा मारताना, वा तंबाखूच्या चिमटीची देवाणघेवाण करताना दिसले असते. 

पण तसे होत नाही. कारण वाघ या क्षणी आपल्या मागे लागलेला नसला, तरी तो आपला पाठलाग करणारा, आपली मानगूट पकडणारा,वेदना देणारा प्राणी आहे हे त्यापूर्वी त्याच्या तावडीत सापडलेल्या सोबत्यांवरून त्या काळवीटांना पक्के ठाऊक असते. त्यामुळे आता तो पाठलाग करत नसला तरी केव्हाही करु शकतो, याचे भान राखून, निवांत असूनही ती अंतर राखून असतात.

थोडक्यात ते मृत्यूला नव्हे तर पाठलागाला, पकडले जाण्याला घाबरत असतात. मृत्यू म्हणजे अस्तित्वाचा विलय याची उमज त्यांना पडली असती, तर त्या भीतीने एव्हाना त्यांनीही देवांची, पारलौकिकाची नि कर्मकांडांची निर्मिती केली असती. एखाद्या वृक्षाखाली एखाद्या वाटोळ्या दगडासमोर आपल्या बळी गेलेल्या सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना ती दिसली असती. आणि मृत्यूपासून किंवा जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांमधून मुक्ती देण्याचा दावा करणारी कुरंगबाबांची प्रवचने सुरू झाली असती. आणि त्यांतून वाघांच्या कुठल्याशा देवाचा अंश असलेल्या एखाद्या वाघाकडून ’मुक्ती’ मिळालेले काळवीट स्वर्गात जाते वगैरे भाकड तत्त्वज्ञानाची उतरंड रचली जाऊ लागली असती.

- oOo -

१. टायटन्स (Titans) ही ग्रीक देवांची पहिली पिढी. यात Oceanus, Coeus, Crius, Hyperion, Iapetus, Cronus हे सहा देव नि Theia, Rhea, Themis, Mnemosyne, Phoebe, आणि Tethys या सहा देवतांचा समावेश होतो. ही सर्व युरेनस आणि गाया या आद्य माता-पित्याची अपत्ये. युरेनस आकाशाचा देव, तर गाया धरित्रीची देवता. Oceanus हा समुद्राचा देव. तो आणि Tethys यांची अपत्ये ही नद्यांचे देव नि देवता...

एकुणात देवांची ही पिढी म्हणजे प्राकृतिक देवांचे मनुष्यीकरण होण्याचा टप्पा आहे. ऑलिम्पियन म्हणून ओळखली जाणारी दुसरी पिढी प्राकृतिक संदर्भ सोडून संपूर्णपणे मानवी झालेली आहे.अलिकडे बर्‍याच गाजलेल्या ’गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेमध्ये बरीच पात्रे वचन देताना, शपथ घेताना ’बाय द ओल्ड गॉड्स अ‍ॅंड द न्यू’ असा उल्लेख करतात. त्याचा संदर्भ इथे आहे.

२. त्याच्या जन्माच्या कथेचे कृष्णजन्माशी निगडित कथेशी विलक्षण साम्य आहे. साधारणत: कृष्णजन्माशी निगडित कथा नि कर्णजन्माशी निगडित कथा यांचे एकत्रिकरण केले की पर्सिअसची कथा मिळते. आता पुन्हा ही पुराणकथेची लोकल ’अप’ आहे की ’डाऊन’ याचा निवाडा करण्याच्या फंदात मी पडत नाही. त्यातून दोन्ही बाजूच्या स्टेशनांवर बसलेल्या अस्मितेची मुळव्याध झालेल्या रुग्णांना उगाच आणखी त्रास नको.

३. किमया अथवा किमिया हे अल्केमीचे पर्शियन नाव. या धडपडीतूनच पुढे रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीचा उदय झाला.


हे वाचले का?

मंगळवार, १५ जून, २०२१

'बोर्डचाट्या'च्या शोधात

’एव्हरिबडी लव्ज रेमंड’ या अतिशय गाजलेल्या विनोदी मालिकेतील हा एक प्रसंग आहे. रेमंडला मायकेल आणि जेफ्री अशी जुळी मुले आहेत. ते दोघेही सध्या प्री-स्कूल म्हणजे बालवाडीमध्ये शिकत आहेत. रेमंड आणि त्याची पत्नी डेब्रा त्यांच्या - विशेषत: मायकेलच्या- प्रगतीबाबत त्यांच्या शिक्षिकेशी बोलत आहेत.

Teacher: Michael may be little young for his age and might have to stay back another term in pre-school.

Raymond: What about the other kid I just saw, that one licking the board.

Debra: (intervenes) And Jeffery is doing fine. I was more worried about splitting them. They are so close.

Teacher : They both can stay back, no harm in that. It is good to do that in pre-school rather than later.

Raymond: Is the board-licker moving up...?

कुठल्यातरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुजली आहे, की स्वतंत्रपणे स्वतःचा वा इतरांचा विचार करणे त्याला शक्यच होत नाही. 'तू/तुम्ही कोण?' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा?' असा असतो. 'तुझ्याशी मी कसे वागावे' या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा! हा अनुभव तर आपण वारंवार घेत असतोच, पण त्या पूर्वग्रहांना मोडून काढण्याऐवजी त्याच व्यवस्थेत आपल्यासाठी जागा शोधू लागतो.

दुसरीकडे त्याचबरोबर गुणवत्तेचा, प्रगतीचा विचार करताना आपले मापदंड आपण निर्माण करावेत, त्यासाठी त्या त्या क्षेत्रातला आवश्यक तो अभ्यास करावा, याची माणसाला फिकीर नसते. त्या जमावाने जे ठरवले तेच आपले. बरं प्रगतीच्या वाटाही नव्या शोधायची गरज नाही, जमावाने त्या आधीच ठरवल्या आहेत. आता त्याच वाटांवर सारेच चालणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण इलाज नाही, कारण आमच्याकडे पर्यायच नसतो. मग खेकड्यांच्या ढिगात जसे एक खेकडा दुसर्‍याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे सरकतो तसे जगायचे. थोडक्यात शेजार्‍यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची अहमहमिका सुरू होते. त्यातच भांडवलशाहीच्या उगमानंतर ’व्हॅल्यू डिस्कव्हरी’ सिद्धांतानुसार, 'स्पर्धेतूनच मूल्यनिर्धारण' सुरु झाल्यानंतर या तुलनात्मक गुणवत्तेच्या संकल्पनेला आणखी एक अधिष्ठान मिळाले.

गणितात कार्य-कारणभावाचा, अन्योन्यतेचा सिद्धांत सिद्ध करायचा तर आवश्यक (Necessary) आणि पुरेसा (Sufficient) अशा दोन प्रकारच्या संबंधांचा शोध घेतला जातो. 'अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात' असे विधान केले तर त्यातून अभ्यास करणे ’पुरेसे’ असल्याचे सांगितले जाते. पण ते 'आवश्यक' असल्याचे सांगितलेले नाही ! यातून परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध असण्याची शक्यता शिल्लक ठेवली आहे. (आणि तसे ते असतात, निर्माण केले जातात हे उघड गुपित आहेच.) पण एका ’च’चा फरक करुन केलेले, ’अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात’ हे विधान मात्र अन्य शक्यता खोडून काढून अभ्यास करण्याला परीक्षेतील यशासाठी पुरेशीच नव्हे तर आवश्यक कृती मानते आहे

आता स्पर्धेच्या युगात यश मिळवायचे, तर शेजार्‍याच्या एक पाऊल पुढे रहायला हवे ही आवश्यक बाब झाली. पण पाहता पाहता ती पुरेशी कधी होऊन जाते हे आपल्या ध्यानातच येत नाही. 'पुढे जायचे आहे' हे व्यापक साध्य सोडून 'शेजार्‍याच्या पुढे जायचे आहे' हे मर्यादित साध्य स्वीकारले जाते. आणि सारी धडपड, सारे नियोजन त्या मर्यादित साध्यापुरते केले जाऊ लागते.

आता एकदा हे झाले की, पुढे मग शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करायची गरज उरत नाही, शेजार्‍याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुरते. मग सारे प्रयत्न, सारे बळ त्यासाठी खर्चले जाऊ लागते. स्पर्धाव्यवस्थेने दिलेला हा ही एक वारसा, संकुचित साध्य आणि नकारात्मक कृतीचा ! काही आळशी, पण चतुर लोक स्वत: शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा आटापिटा करण्यापेक्षा, शेजार्‍याला आपल्या मागे ढकलण्याचे उपाय शोधून काढतात. हे उपाय बहुधा कमी कष्टाचे नि खर्चाचे असतात.

जाहिरात करताना एखादा उत्पादक आपल्या उत्पादनाचे गुण सांगण्याऐवजी इतर उत्पादकांच्या त्याच उत्पादनामधील धोके, न्यून सांगत बसतो. अनेकदा असे काही न्यून नसले तर थेट न सांगता तसे अप्रत्यक्ष सूचित करणारी जाहिरात करुन कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहतो. ’आमच्या टूथपेस्टमध्ये मिठासारखे वा कोळशासारखे खरखरीत पदार्थ नाहीत’, ’आमची उत्पादने केमिकल-फ्री आहेत’, ’आमच्या उपचारांचे काही साईड-इफेक्ट्स नाहीत’ वगैरे दावे याच प्रकारचे. दुर्दैवाने सामान्य जनतेची तर्कक्षमता कमी असल्याने, स्पर्धक वाईट वा कमी गुणवत्तेचा ठरला की हे सांगणारा आपोआपच अधिक गुणवत्तेचा ठरतो असे ती गृहित धरत असते... त्याला वेगळी सिद्धता ती मागत नाही! व्यावसायिक स्पर्धेपासून राजकीय स्पर्धेपर्यंत सर्वत्र हाच अनुभव येत असतो. एकुणात उद्योगधंदे असोत, राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, शेजार्‍यापेक्षा पुढे आहोत हे पुरेसे साध्य आहे. आणि 'जिंकण्याची स्पर्धा' केव्हाच मागे पडून 'हरवण्याची स्पर्धा' सुरू झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकच असाही समज रूढ होत चालला आहे.

आणखी एक पाऊल पुढे... चुकलो, मागे पडून आपण मागे पडलो, तरी आपल्याहून इतर अनेक मागे आहेत याकडे बोट दाखवून आपल्या मागे पडण्याचे समर्थन करणे हा प्रकार अलीकडे वारंवार अनुभवण्यास मिळतो आहे. 'आमच्या अंधश्रद्धांबद्दल का बोलता, त्यांना सांगा की’, ’मी तर रोज एक क्वार्टरच दारु पितो. शेजारचा गण्या तर वर आणखी नाईंटी पण मारतो’, ’इथल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल का बोलता, पाकिस्तानपेक्षा तर बरी आहे ना’, ’आमच्या मुलाला कमी गुण मिळाले म्हणून काय झालं, आमच्या चुलतभावाचा भाचा तर नापास झाला आहे.’ या धर्तीचे तर्क देत आपले न्यून झाकण्याचा प्रयत्न आपल्या नित्य अनुभवाचा भाग असतो. जगभरात कुठेही आपल्याहून कमअस्सल दाखवता येते, तोवर आपल्याला धडपड करुन स्वत:मध्ये सुधारणा करण्याची काही गरज नाही, असा बहुसंख्य लोकांचा आळशी तर्क असतो. त्याला अस्मिता नावाच्या मुळव्याधीची जोड मिळाली की यात अधिक निर्ढावलेपण येत असते.

म्हणूनच रेमंडला मायकेल आणि जेफ्री या आपल्या पोरांच्या प्रगतीची चिंता नाही. मायकेलमध्ये असलेले न्यून कसे भरून काढावे, याचा विचार तो करत नाही, त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबाला काय करता येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. मायकेलशी तुलना करून 'त्यापेक्षा तरी मायकेल बरा' म्हणण्याची सोय करण्यासाठी एक स्पर्धक त्याने निवडला आहे.

आता मायकेल पुढे जातो की नाही, हा त्याच्यासमोरचा प्रश्न नाही; 'तो बोर्ड चाटणारा मुलगा मायकेलबरोबर मागे राहणार की नाही?' हा प्रश्न उरलेला आहे. सुरुवातीला म्हटले तसे ’सोबतीमध्ये सुरक्षितता’ शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. तो ’बोर्ड चाटणारा मुलगा’ जर मायकेलच्या सोबतीने मागे राहणार असेल, तर आपल्या मुलाच्या प्रगतीचा वेग अपेक्षित नसल्याचे शल्य त्याला पुसून टाकता येणार आहे. ’त्यात काय, तो मुलगाही मागे राहिलाय की’ असे समर्थन करण्याची सोय त्याला मिळणार आहे.

आपल्यासारखेच वैगुण्य इतरांमध्ये असले की ते तितके गंभीर नाही असे समजणे हा मानवी स्वभाव आहे. त्याहून पुढे जाऊन आपल्या वैगुण्यामागे जर मोठा जमाव, शक्य झाल्यास बहुमत, ते न जमल्यास आवाजी बहुमत उभे करुन त्या वैगुण्याचे गुणात रुपांतर करता आले तर सोन्याहुन पिवळे. अशा झुंडींच्या बळावर क्रौर्याला शौर्याचे नाव देता येते हा मानवी इतिहासात असंख्य उदाहरणे असलेला अनुभव आहे.

आपली गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आपल्याहून अधिक गुणवान व्यक्ती शोधून त्याच्याकडून काही गुण आत्मसात करण्यापेक्षा, आपल्यापेक्षा गुणवत्तेने कमी असलेला एखादा ’बोर्डचाट्या’ शोधून त्या तुलनेत आपल्या तुटपुंज्या गुणवत्तेलाच बुद्धिमत्ता म्हणून खपवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपले मा्णसांचे वर्तुळ काळजीपूर्वक निवडून त्याच्या केंद्रस्थानी आपण असू असा- ’वासरांत लंगडी गाय’ म्हणून राहण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हा रेमंड आपलासा वाटेल यात शंकाच नाही.

- oOo -


हे वाचले का?