मंगळवार, १५ जून, २०२१

'बोर्डचाट्या'च्या शोधात

’एव्हरिबडी लव्ज रेमंड’ या अतिशय गाजलेल्या विनोदी मालिकेतील हा एक प्रसंग आहे. रेमंडला मायकेल आणि जेफ्री अशी जुळी मुले आहेत. ते दोघेही सध्या प्री-स्कूल म्हणजे बालवाडीमध्ये शिकत आहेत. रेमंड आणि त्याची पत्नी डेब्रा त्यांच्या - विशेषत: मायकेलच्या- प्रगतीबाबत त्यांच्या शिक्षिकेशी बोलत आहेत.

Teacher: Michael may be little young for his age and might have to stay back another term in pre-school.

Raymond: What about the other kid I just saw, that one licking the board.

Debra: (intervenes) And Jeffery is doing fine. I was more worried about splitting them. They are so close.

Teacher : They both can stay back, no harm in that. It is good to do that in pre-school rather than later.

Raymond: Is the board-licker moving up...?

कुठल्यातरी जमावाचा भाग म्हणून स्वत:ला ओळखण्याची सवय माणसांच्या इतकी हाडीमासी रुजली आहे, की स्वतंत्रपणे स्वतःचा वा इतरांचा विचार करणे त्याला शक्यच होत नाही. 'तू/तुम्ही कोण?' या प्रश्नाचा गर्भित अर्थ बहुधा 'तू नक्की कुठल्या गटाचा?' असा असतो. 'तुझ्याशी मी कसे वागावे' या निर्णयावर सर्वात मोठा परिणाम घडवणारा घटक म्हणजे तू कोणत्या गटाचा आहेस हा! हा अनुभव तर आपण वारंवार घेत असतोच, पण त्या पूर्वग्रहांना मोडून काढण्याऐवजी त्याच व्यवस्थेत आपल्यासाठी जागा शोधू लागतो.

दुसरीकडे त्याचबरोबर गुणवत्तेचा, प्रगतीचा विचार करताना आपले मापदंड आपण निर्माण करावेत, त्यासाठी त्या त्या क्षेत्रातला आवश्यक तो अभ्यास करावा, याची माणसाला फिकीर नसते. त्या जमावाने जे ठरवले तेच आपले. बरं प्रगतीच्या वाटाही नव्या शोधायची गरज नाही, जमावाने त्या आधीच ठरवल्या आहेत. आता त्याच वाटांवर सारेच चालणार म्हणजे गर्दी तर होणारच. पण इलाज नाही, कारण आमच्याकडे पर्यायच नसतो. मग खेकड्यांच्या ढिगात जसे एक खेकडा दुसर्‍याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे सरकतो तसे जगायचे. थोडक्यात शेजार्‍यापेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची अहमहमिका सुरू होते. त्यातच भांडवलशाहीच्या उगमानंतर ’व्हॅल्यू डिस्कव्हरी’ सिद्धांतानुसार, 'स्पर्धेतूनच मूल्यनिर्धारण' सुरु झाल्यानंतर या तुलनात्मक गुणवत्तेच्या संकल्पनेला आणखी एक अधिष्ठान मिळाले.

गणितात कार्य-कारणभावाचा, अन्योन्यतेचा सिद्धांत सिद्ध करायचा तर आवश्यक (Necessary) आणि पुरेसा (Sufficient) अशा दोन प्रकारच्या संबंधांचा शोध घेतला जातो. 'अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात' असे विधान केले तर त्यातून अभ्यास करणे ’पुरेसे’ असल्याचे सांगितले जाते. पण ते 'आवश्यक' असल्याचे सांगितलेले नाही ! यातून परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी अभ्यासाव्यतिरिक्त अन्य मार्ग उपलब्ध असण्याची शक्यता शिल्लक ठेवली आहे. (आणि तसे ते असतात, निर्माण केले जातात हे उघड गुपित आहेच.) पण एका ’च’चा फरक करुन केलेले, ’अभ्यास केल्याने परीक्षेत चांगले गुण मिळतात’ हे विधान मात्र अन्य शक्यता खोडून काढून अभ्यास करण्याला परीक्षेतील यशासाठी पुरेशीच नव्हे तर आवश्यक कृती मानते आहे

आता स्पर्धेच्या युगात यश मिळवायचे, तर शेजार्‍याच्या एक पाऊल पुढे रहायला हवे ही आवश्यक बाब झाली. पण पाहता पाहता ती पुरेशी कधी होऊन जाते हे आपल्या ध्यानातच येत नाही. 'पुढे जायचे आहे' हे व्यापक साध्य सोडून 'शेजार्‍याच्या पुढे जायचे आहे' हे मर्यादित साध्य स्वीकारले जाते. आणि सारी धडपड, सारे नियोजन त्या मर्यादित साध्यापुरते केले जाऊ लागते.

आता एकदा हे झाले की, पुढे मग शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा प्रयत्नही करायची गरज उरत नाही, शेजार्‍याला मागे ठेवण्याचा प्रयत्न केला तरी पुरते. मग सारे प्रयत्न, सारे बळ त्यासाठी खर्चले जाऊ लागते. स्पर्धाव्यवस्थेने दिलेला हा ही एक वारसा, संकुचित साध्य आणि नकारात्मक कृतीचा ! काही आळशी, पण चतुर लोक स्वत: शेजार्‍याच्या पुढे जाण्याचा आटापिटा करण्यापेक्षा, शेजार्‍याला आपल्या मागे ढकलण्याचे उपाय शोधून काढतात. हे उपाय बहुधा कमी कष्टाचे नि खर्चाचे असतात.

जाहिरात करताना एखादा उत्पादक आपल्या उत्पादनाचे गुण सांगण्याऐवजी इतर उत्पादकांच्या त्याच उत्पादनामधील धोके, न्यून सांगत बसतो. अनेकदा असे काही न्यून नसले तर थेट न सांगता तसे अप्रत्यक्ष सूचित करणारी जाहिरात करुन कायद्याच्या कचाट्यापासून दूर राहतो. ’आमच्या टूथपेस्टमध्ये मिठासारखे वा कोळशासारखे खरखरीत पदार्थ नाहीत’, ’आमची उत्पादने केमिकल-फ्री आहेत’, ’आमच्या उपचारांचे काही साईड-इफेक्ट्स नाहीत’ वगैरे दावे याच प्रकारचे. दुर्दैवाने सामान्य जनतेची तर्कक्षमता कमी असल्याने, स्पर्धक वाईट वा कमी गुणवत्तेचा ठरला की हे सांगणारा आपोआपच अधिक गुणवत्तेचा ठरतो असे ती गृहित धरत असते... त्याला वेगळी सिद्धता ती मागत नाही! व्यावसायिक स्पर्धेपासून राजकीय स्पर्धेपर्यंत सर्वत्र हाच अनुभव येत असतो. एकुणात उद्योगधंदे असोत, राजकारण असो की वैयक्तिक आयुष्य, शेजार्‍यापेक्षा पुढे आहोत हे पुरेसे साध्य आहे. आणि 'जिंकण्याची स्पर्धा' केव्हाच मागे पडून 'हरवण्याची स्पर्धा' सुरू झाली आहे. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही एकच असाही समज रूढ होत चालला आहे.

आणखी एक पाऊल पुढे... चुकलो, मागे पडून आपण मागे पडलो, तरी आपल्याहून इतर अनेक मागे आहेत याकडे बोट दाखवून आपल्या मागे पडण्याचे समर्थन करणे हा प्रकार अलीकडे वारंवार अनुभवण्यास मिळतो आहे. 'आमच्या अंधश्रद्धांबद्दल का बोलता, त्यांना सांगा की’, ’मी तर रोज एक क्वार्टरच दारु पितो. शेजारचा गण्या तर वर आणखी नाईंटी पण मारतो’, ’इथल्या कायदा-सुव्यवस्थेबद्दल का बोलता, पाकिस्तानपेक्षा तर बरी आहे ना’, ’आमच्या मुलाला कमी गुण मिळाले म्हणून काय झालं, आमच्या चुलतभावाचा भाचा तर नापास झाला आहे.’ या धर्तीचे तर्क देत आपले न्यून झाकण्याचा प्रयत्न आपल्या नित्य अनुभवाचा भाग असतो. जगभरात कुठेही आपल्याहून कमअस्सल दाखवता येते, तोवर आपल्याला धडपड करुन स्वत:मध्ये सुधारणा करण्याची काही गरज नाही, असा बहुसंख्य लोकांचा आळशी तर्क असतो. त्याला अस्मिता नावाच्या मुळव्याधीची जोड मिळाली की यात अधिक निर्ढावलेपण येत असते.

म्हणूनच रेमंडला मायकेल आणि जेफ्री या आपल्या पोरांच्या प्रगतीची चिंता नाही. मायकेलमध्ये असलेले न्यून कसे भरून काढावे, याचा विचार तो करत नाही, त्यासाठी आपल्याला, आपल्या कुटुंबाला काय करता येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. मायकेलशी तुलना करून 'त्यापेक्षा तरी मायकेल बरा' म्हणण्याची सोय करण्यासाठी एक स्पर्धक त्याने निवडला आहे.

आता मायकेल पुढे जातो की नाही, हा त्याच्यासमोरचा प्रश्न नाही; 'तो बोर्ड चाटणारा मुलगा मायकेलबरोबर मागे राहणार की नाही?' हा प्रश्न उरलेला आहे. सुरुवातीला म्हटले तसे ’सोबतीमध्ये सुरक्षितता’ शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. तो ’बोर्ड चाटणारा मुलगा’ जर मायकेलच्या सोबतीने मागे राहणार असेल, तर आपल्या मुलाच्या प्रगतीचा वेग अपेक्षित नसल्याचे शल्य त्याला पुसून टाकता येणार आहे. ’त्यात काय, तो मुलगाही मागे राहिलाय की’ असे समर्थन करण्याची सोय त्याला मिळणार आहे.

आपल्यासारखेच वैगुण्य इतरांमध्ये असले की ते तितके गंभीर नाही असे समजणे हा मानवी स्वभाव आहे. त्याहून पुढे जाऊन आपल्या वैगुण्यामागे जर मोठा जमाव, शक्य झाल्यास बहुमत, ते न जमल्यास आवाजी बहुमत उभे करुन त्या वैगुण्याचे गुणात रुपांतर करता आले तर सोन्याहुन पिवळे. अशा झुंडींच्या बळावर क्रौर्याला शौर्याचे नाव देता येते हा मानवी इतिहासात असंख्य उदाहरणे असलेला अनुभव आहे.

आपली गुणवत्ता सुधारण्याच्या दृष्टीने आपल्याहून अधिक गुणवान व्यक्ती शोधून त्याच्याकडून काही गुण आत्मसात करण्यापेक्षा, आपल्यापेक्षा गुणवत्तेने कमी असलेला एखादा ’बोर्डचाट्या’ शोधून त्या तुलनेत आपल्या तुटपुंज्या गुणवत्तेलाच बुद्धिमत्ता म्हणून खपवण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यासाठी आपले मा्णसांचे वर्तुळ काळजीपूर्वक निवडून त्याच्या केंद्रस्थानी आपण असू असा- ’वासरांत लंगडी गाय’ म्हणून राहण्याचा प्रयत्न करणार्‍यांना हा रेमंड आपलासा वाटेल यात शंकाच नाही.

- oOo -


संबंधित लेखन

२ टिप्पण्या: