शनिवार, १ एप्रिल, २०२३

रात्रपाळीचे शेजारी

उंबरातली काळी सोनेरी पाखरे खाल्याने डोळे येत. सुजत. आणि दिवसाही उघडता येत नसत. मग आई मला हलके धरून मोरीपाशी घेऊन येई. ऊनसर पाणी पापण्यांच्या कडांना लावून त्या भिजवी. त्या न दुखवता सोडवून, दिसायला लागेल असे करी.

पण डोळे आल्यावरचे थोरल्या आईचे औषध विलक्षणच होते. दोनदोन दिवस ती अंधारातच बसायला लावी. ऐकले नाही तर डोळ्यात फूल पडून दिसणार नाही, असा धाक दाखवी. नि रात्रीही कंदिलाऐवजी करंजेलाचे थंड दिवे लावून घरात जेवणे होत.

दिवसाच्या अंधारात बसून राहायचे माझे एकाकीपण हलके व्हावे म्हणून आई, " माझे वाघळ काय करते आहे" असे सौम्य हसत मला विचारी. आणि वडाला टांगून घेणाऱ्या वाघळांसारखे आपलेही एक वाघळ झाले आहे असे वाटून माझी भीती उलट मोठी होत जाई. डोळे आल्याचे दुःख वाघळे नेहमी कसे सोसत असतील, समजत नसे.

पण वाघळांचा दिवस रात्री उगवतो असे आई सांगे.

रात्रीचा दिवस असलेली ती विक्षिप्त वाघळे मला उगीचच सारखी आठवत राहत. रात्री त्यांना कसे दिसत असेल यावर मी विचार करत बसे. नि त्यांचे दोन डोळे आपणांला मिळाले तर ते हातात घेऊन, काळोखातही दिसत कसे चालता येईल ते मी मनात चालून पाही.

डोह

आमच्या घरासमोरच्या वडाच्या दाट पानांच्या हिरव्या छताला अगणित वाघळे उलट्या, मिटलेल्या छत्रीसारखी लटकलेली असत. वडाच्या वरच्या पानावळींकडे मी मान अवघडेपर्यंत पाहत राही. उंदरासारखे तोंड. उभार पसरट कान. मागे वाघाच्या पट्ट्यातल्या एका छटेसारखा केसाचा उमदा रंग. दोन्ही बाजूंनी आलेली तेलकट काळीमोर नख्या असलेली पंखे मागे घेऊन ती निपचित डोळे मिटून डुलक्या घेत असत. इतक्या उंच अंतरावरूनही त्यांच्या पोटांचा भाता हलताना दिसे. आणि त्या इतक्या पोटांचे भाते खालवर होत असताना, वडाखालच्या भरून राहिलेल्या निळ्या पोकळीवरही आपणाला न कळणारे काही परिणाम होत असतील असे वाटे.

दुपार गावात पसरून राहिलेली असे. पांढरी फकफकीत दुपार. सूर्य माथ्यावर आलेला असे. उभ्या आटोपशीर झाडांच्या सावल्या पडेनाशा होत. सावल्यांनाही आपले अंग मिळायचे असे.

पण आपल्या अंगाहून वरला विस्तार कितीतरी मोठा असलेल्या वडाची तेवढी खालती दाट सावली पडे. मधून उन्हाचे ठिपके. वडाखाली जाऊन बघावे तेव्हा, मधला एखादा तुकडा त्या संथ नक्षीचा आकार पालटत चालताना दिसे. वडावरचे वाघळ जागा बदलत असे.

दुपारच्या शांततेचा पातळ तुकडा पलटवणारा वाघळांचा आवाज चिरकत येई. आणि एखादे वाघळ, दिसत नसतानाही आपली जागा सोडू लागे. जागा बदलायची त्यांची एक ठराविकच रीत होती. पुराच्या ओल्या गाळ-मातीतून चालताना एक पाय वरती काढायचा नि दुसरा टाकायचा, तशी. पहिले पंख लांबवून पुढे रुतवायचे नि मागले पंख सोडवून तिथे आणायचे.

त्यांचे जागा बदलायचे खेळ सारखे सुरू असत. अंग अवघडले म्हणून. उन्हाची तिरीप आली म्हणून. पण काही वेळा तो खेळ विचित्र वाटे. एकाने जागा बदलली की, पुढले वाघळही चळवळायला लागे. आणि ती रांग दूरवर लांबे. एका वाघळाच्या दिशेने बऱ्याच बाजूंनी वाघळे यायला लागत. एकमेकांना ओचकारत. चिरकत. त्या गोंधळात ते मधले वाघळ चाचपडत उठून दुसरीकडे पिंपळावर नाही तर चिंचेवर जाऊन पडे. आणि उरलेल्या वाघळांना त्याला हुडकता येत नसे.

उन्हाच्या वेळी थोरली आई स्वतःला दोन्ही बाजूंनी पदराच्या शेवांनी वारा घेई, तसे एखादे वाघळ स्वतःला टांगून घेतलेले असताना दोन्ही पंखांनी वारा घेताना दिसे. कधी एकच पंख हलवूनही ते वारा घेत राही.

मोजता न येण्याइतक्या त्या वाघळांच्या जागा जवळजवळ ठरलेल्या असाव्यात. त्यांना जोडणारी रेषा हवेत काढली असती तर ती हवेच्या कागदावरली रेषाकृती, नेहमी तिच्यावरूनच छापून काढल्यासारखी निघाली असती.

वाघळे अगदी जवळून पाहता आली ती देवाच्या आवारातून वरती आलेल्या उंबरावर लटकणारी. दोन वाघळे जोडीने नेहमी तिथे असत. वडापुढची तांबडमाती संपली की देवाच्या आवाराचा दगडी बांधीव तट लागे. खालती खोल डोळे फिरवणारे फरशीचे आवार, दादांच्याबरोबर जीव एकत्र करून मी त्या वाघळांना बघायला तटावर येत असे. माझ्या कुठल्याही उत्सुकतेत दादांचा उत्साह येऊन नेहमी मिसळे.

आणखी एक वाघळ दिवटीच्या मळीतल्या फणसाच्या झाडावर राही. आमच्या गावातल्या त्या एकुलत्या फणसाला ओळखणारे वाघळ इतरांहून वेगळे असले पाहिजे.

वाघळांच्या कळपातून ती वेगळी का राहत होती, त्यांची भांडणे होती की त्या कळपातल्याहून ती अधिक शहाणी होती, हे न सुटणारे प्रश्न होते.

वाघळांची सर्वात मोठी वसाहत वडाच्या विस्तारावर होती. उरलेली वाघळे वडाखालच्या पिंपळावर, जवळच्या चिंचेवर आणि काही डगरीच्या उंबरझाडांच्या अंधारात राहत. वाघळांना बाभळीवर लटकताना मी कचितच पाहिले. बाभळीच्या काट्यांनी पंख फाटण्याची भीतीही त्यांना वाटत असेल.

...संध्याकाळी हळूहळू वाघळांच्या जगाला जाग येऊ लागे. ती पंखे झटकत. त्या आवाजांतून त्यांच्या पंखांच्या वजनदारपणाची जाणीव होई. एक एक उठून वडाला, गावाला फेरी मारायला सुरुवात करी. थोड्या वेळाने नदीवर डगरीला जाऊन थांबले की वाघळेच वाघळे दिसत. प्रकाश मंद होत चाललेल्या त्या वेळी डोहातल्या आभाळात वर गिरकत राहिलेल्या वाघळांची अतिशय स्वच्छ प्रतिबिंबे उमटत. आणि डोह म्हणजे आभाळात उडणाऱ्या वाघळांचे काढलेले एक मोठे चित्र होई.

एक एक वाघळ मुळी न हलणाऱ्या डोहाच्या पाण्याचे पान मधूनच फाडी. ती वाघळांची पाणी प्यायची वेळ असे. वाघळ पाण्याच्या पृष्ठापाशी येई आणि झाप मारून पाण्याचा घुटका घेऊन जात असे. सगळी वाघळे तसेच पाणी पीत.

आणि मग डोहावरली वाघळे, उरलेल्या दिवसाच्या प्रकाशासारखी मोठ्या कळपाने पलीकडल्या भुवनेश्वरीच्या देवळाच्या कळसाच्या दिशेने झपाझप निघून जात. कुठल्या तरी फळांच्या बागांना भिलवडीकडून येणारा वाघळांचा दुसरा थवा त्यांना कळसापाशी आभाळात भेटताना खूपदा दिसे.

वाघळ विमानागत जाते असे शिंगटे नाना सांगे. आमच्या इथली वाघळे आंब्याच्या दिवसात, रात्रीत रत्नागिरीला जाऊन परत येतात हा त्याचाच शोध होता. ती रात्री वडावरून हलली तरी त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी दिवस उगवायच्या आत आलेली असत. एक एक वाघळ, जणू आपण रात्री कुठे गेलोच नव्हतो अशा थाटात येऊन वडावर लागत असताना दादांनी मला पहाटे उठवून कितीदा तरी दाखवले होते. ती येऊन वडावर लागत असताना अंथरुणातही आपोआप कळत असे.

वडाखाली वाघळांनी चोथून टाकलेल्या डाळिंबांच्या बिया अधूनमधून पडलेल्या दिसत. आमच्या जवळपास डाळिंबांची इतकी झाडे कु्ठे नव्हतीच. त्यांना कुठे तरी त्या डाळिंबांच्या बागा सापडलेल्या होत्या. कधीकधी खारकांच्या बियाही त्यांच्या तोंडातून खाली पडल्याचे नानाने पाहिलेले असे. आणि वाघळे त्या रात्री परदेशातल्या खारकांच्या बागातून आल्याचे तो ठरवी.

झाडावरले अस्सल फळ पहिल्यांदा वाघळानेच उष्टावलेले असे. वाघळाने खालेला आंबा, पेरू लगेच ओळखता येई. पोपट आणि दुसरे पक्षी वरच्या बाजूवर कुठेही टोच मारून फळ खात. पण वाघळाने ते फळाच्या तळापासून उलटे पोखरत आणलेले असे. फळाची जाणकारी वाघळाइतकी कुणालाच नाही असे नानाचे मत होते.

वाघळे कौलारू घरांच्या आढ्यावर फिरणाऱ्या उंदरांना रात्री घेऊन जात. आणि पावसाळ्यात उमलून आलेल्या पिवळ्या बेडकांवरतीही ताव मारत. रात्री वडावर बॅटरीचा झोत मारून पाहिला म्हणजे वाघळांचा दिवसा भरणारा बाजार उलगून गेलेला दिसे. कधीतरी एखादी वाघळ बरे नसल्याने चिकटून राहिलेली असे तेवढीच. दसऱ्याला दुपारी निघणाऱ्या देवाच्या पालखीला ओवाळायला न जाता घरीच राहिलेल्या एखाद्या आजारी सुवासिनीसारखी.

...थोरल्या आईच्या गोष्टींचे तेव्हा एक वेगळे जगच होते. त्यावेळी प्राणी आणि पक्षी यांची लढाई सुरू झाली होती. एकट्या सापडलेल्या पक्ष्याला प्राणी मारून टाकत होते, आणि एकट्या प्राण्याचीही पक्ष्यांच्या थव्यात तीच गत होती. पण त्या युद्धात वाघळांचे दोन्हीकडून साधत होते. पक्ष्यांच्या हल्याच्या वेळी ते आपले पंख त्यांना फडफडून दाखवत होते. उडून दाखवत होते. आपण पक्षीच असल्याचे पटवून देत होते. आणि प्राण्यांच्या तावडीत सापडले तरी त्याचे बिघडत नव्हते. प्राण्यासारखे, त्याला चोचीऐवजी तोंड होते. स्तनेही होती.

प्राणी आणि पक्षी यांच्यामधले चमत्कारिक मिश्रण असलेल्या त्या वाघळांना इतर पक्ष्यांप्रमाणे कोटी, घरटी करायची यातायात नव्हती. काळोख शोधून कुठेही लटकावे इतके त्यांचे राहणे सोपे होते. आणि वाघळ अंडीही घालत नव्हती. वर निरखून नजर टाकावी तेव्हा कितीतरी वाघळांतल्या माद्यांनी, वानरीसारखे एक एक पिल्लू आपल्या उराशी घट्ट धरून ठेवलेले दिसे. चटकन् पाहताना ते, त्या वाघळांना एखादे काळे टोपण बसवल्यासारखे वाटे. पिलाचे तोंड वाघळीच्या तोंडाशी अगदी एक झालेले असे. तिच्या तोंडातून येणारा अन्नरस बरोबर त्या पिलाच्या तोंडात जाई. त्यावरती ते वाढे. तिथून ते थोडे खालती सरकून तिच्या स्तनांनाही लुचे. दूध पिई.

पक्ष्यापासून दुसरा पक्षी होत होता. प्राण्यापासून तसलाच दुसरा प्राणी तयार होत होता. असे सारखे चाललेले होते.

किती तरी पक्ष्यांचे, प्राण्यांचे जन्म होताना मी पाहिले होते. अंडे घालताना. त्यातून पिलू बाहेर फुटताना. आमच्या घरामागे म्हशींना सारखीच रेडके होत आणि पाठीमागच्या शिंगट्यांच्या पडकात खड्डा काढून कुत्र्या वीत असत. पण बायकांच्यासारख्या, वाघळाही विताना कधी दिसल्या नाहीत. त्या रात्रीच वितात असे नाना म्हणे; सांगे की, वाघळीला एका वेळी एकच पिलू होते. तिची पिलू बाहेर यायची जागा, ती लोंबकळत असताना वरच्या बाजूला असते. पिलू बाहेर यायची वेळ तिला आपोआप समजते आणि वाघळी आपल्या पायांनी ते काढून घेऊन छातीशी झेलते.

वाघळींच्या पोटाला चिकटलेल्या लहानशा पोराएवढी, काळ्या तेलकट तकतकीत पंखांची किती तरी पोरे वडाच्या पानांनी झाकोळून गेलेल्या काळोख्या भागात शेणकुटे लावल्यासारखी डसून राहिलेली दिसत. त्यांचे आश्चर्य वाटे. आईबाप नसल्यासारखी ती केविलवाणी वाटत. इतक्या सगळ्यांच्या आया मेल्या की काय कळत नसे. त्यांना त्या अंधारात कुणीतरी कुणीतरी सारखे दगड मारून उठवीत. खूपदा ती दगड मुकाट्याने खात. आणि फारच झाले तर उठून एक आंधळी चक्कर मारून येत. त्यांतले एखादे पोर चुकून आमच्या घरात शिरे. माजघरातल्या सौम्य अंधारात भिरीभिरी फिरू लागे. मग थोरली आई 'ही कुठून चुकली पाकोळी' म्हणत तिला न शिवता घराबाहेर घालवी. पाकोळ्या म्हणजे वाघळीचीच पोरे हा माझा जुना समज होता. पाकोळी दिसते तेवढ्या आकाराहून मोठी न होणारी, वाघळासारखीच पण वेगळी जात आहे हे थोरल्या आईने कितीही सांगितले तरी खरेच वाटत नसे.

...आमच्या नदीचा घाट उतरताना उजव्या हाताला दुसरा, विरूपाक्षाचा बुरूज लागे. त्यावर आटोपशीर अंगाचे एक उंबराचे झाड छाया ढाळी. आणि त्या बुरुजावर कळकट काळ्या गोणपाटाच्या, तणावा देऊन बांधलेल्या झोपडीत शंकऱ्या तांबट वर्षानुवर्षे राहत असे. त्याचा रंग तेलकट, घाणेरडा काळा होता. त्याच्या पायांतले रक्तरस सुकून त्याला त्या चिपाडांनी चालायला यायचे बंद झाले होते. कधीच आंघोळ नसल्याने केसांचे पिवळट, भुरकट लपके झालेले होते. त्याच्या नाकातून सतत पिवळी नाळ वाहत असे. त्याला भयंकर बिड्या ओढायला लागत. सगळे व्यवहार तो तिथेच उरकत होता. आणि तरीही नदीपुढे उघडलेला हिरवा प्रदेश बघत तो जगला होता. त्याच्याभोवती असलेले एक कडे मला नेहमी भीती दाखवत असे. तो कधी तरी नुसते तारवटलेले डोळे झोपडीबाहेर काढी. नदीचे पाणी चढायला लागले की, त्याच्यापेक्षा गावच्या लोकांनाच त्याची अधिक काळजी लागून राही. बुरुजाला पाणी येऊन लागेपर्यंत तो देवळातल्या देवासारखा हलायला तयार नसे. त्याच्या झोपडीच्या कळकाला, गोणपाटाची झोळी करून, त्याची पालखी वरती वडापाशी आणली जाई. आणि पावसाळाभर त्याचा मुक्काम तिथे पडे.

पण तो घाणेरडा शंकऱ्या वाघळाचे तेल काढत असल्याबद्दल प्रसिद्ध होता. त्याच्याजवळ एक हिरवाकाळा उभा शिसा होता. त्यात वाघळाचे औषधी तेल ठेवलेले असे. संधिवातासाठी ते तो कुणालाही थोडेसे काढून देई आणि वाघळ मारून मागत असे. शंकऱ्याचे तोंड वाघळासारखेच होते. तो गेल्या जन्मी वाघळ असावा आणि पुढल्या वेळी त्याच जन्माला जाईल असे वाटे. त्याच्या झोपडीची दोन्ही बाजूंची पलखे वाघळाच्या पंखांसारखी दिसत. आणि स्वतः शंकर्‍या वाघळाच्या मधल्या भागासारखा. शंकऱ्या आणि त्याची झोपडी मिळून एक प्रचंड वाघळच होते. तो मेल्यावर, इतकी वाघळे मारण्यापेक्षा त्याचेच खूप तेल निघेल असे वाटे.

...गावातील शांत दुपारी कुणीतरी बंदुका घेऊन येत. आणि वडावरल्या बाघळांवर आवाज टाकत. आवाजाने भेदरूनच कितीतरी वाघळे पटापटा आवारात पडत. वाघळांचे सगळे आंधळे जग जीव गोळा करून आभाळात उघळले जाई. आभाळातल्या उन्हात ती पंखे हलवत राहत. त्यातली पुष्कळ वाघळे मठातल्या पिंपळाकडे जात. काही डोहापलीकडेही. पण त्या रख्ख उन्हांत त्यांना भोवंडून येई. ती लगेच कुठे ना कुठे चिकटू लागत. पुन्हा त्यांच्यावर आवाज निघत.

पोटातली अर्धवट तयार झालेली पिले बाहेर पडून वाघळा गावडत. त्यांत छातीशी लहानसे जिवंत पोर घट्ट चिकटून घेऊन, गोळीने चिंधड्या होऊन खाली आलेली वाघळ मी पाहिली होती— तिच्या रक्ताच्या भळभळत्या आठवणीने वडाखालचे आवार नुसत्या रक्ताच्या लाल पुराने भरून येते आहे असा मला भास होई.

पडलेल्या वाघळांचे पाय धरून ती एका पोत्यात भरली जात. त्यांचे दोन्ही मजबूत पंख पसरून पाहिले की केवढे लांब वाटत. आणि त्यांची माणसासारखे एकसारखे बारीक दात असलेली, रक्तबंबाळ उघडी जिवणी बघवत नसे.

शंकऱ्यासारखा वाघळाचे तेल काढणारा वाघाटे नावाचा माणूस गावात होता. तो कधीही वाघळे विकत घेत असे. वाघळाचे पंख तोडून उरलेला भाग तो शिजवी. एका एका चांगल्या वाघळाचे मापभर तेल पडे. वाघळाच्या शरीराचा बहुतेक भाग चरबीचाच असे, आणि त्यांचे मांसही रुचकर असल्याचे तो सांगे.

आपणहून मरून पडलेली एक वाघळ मी एकदाच पाहिली होती. अवचित दुपारची ती वडाच्या उंचावरून दगडासारखी खाली कोसळली होती. आणि तिच्या तोंडानाकातून बारीक बारीक पांढरी सुते भुळभुळत होती. तिला कुठला तरी विचित्र रोग झाला असावा.

स्वतःबरोबर जगणाऱ्या, वाढणाऱ्यांविषयी कळत नकळत, जी जवळीक आपोआप वाटत असते तशी त्या वाघळांविषयीही माझ्या मनात निर्माण झाली होती.

थोडा वेळही खाली डोके वर पाय करून राहिले तर चेहर्‍याच्या मागील भागात रक्त उतरे. केव्हा सरळ होतो असे होऊन जा. आणि वाघळांना तर तसे शीर्षासन करायची जन्मभर शिक्षा मिळाली होती. स्वत:ची विष्ठा त्यांच्या तोंडात जात होती हे त्याहूनही वाईट होते.

पंक्तिप्रपंच केल्याने बाळाच्या जन्माला गेलेली ती गेल्या जन्मीची माणसे आहेत, असे थोरली आई सांगे...

गावातल्या मरून गेलेल्या माणसांच्या कुठल्या छटा कुठल्य़ा वाघळांतून दिसताहेत का ते पाहायला तेव्हापासून मी वडाखाली येत असे.

... थोरल्या आईने सगळ्यांकरता करताना, एकाला एक, एकाला एक असे कधीच केले नाही.

- oOo -

पुस्तक: डोह
लेखक: श्रीनिवास विनायक कुलकर्णी
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती सहावी.
वर्ष: जुलै २०११.
पृ. २९-३७.

(लेखाचे मूळ शीर्षक: ’जुन्या जन्मीची माणसे'.)

---
संबंधित लेखन:
वेचताना... : डोह >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा