सोमवार, ३ एप्रिल, २०२३

वेचताना... : डोह

( माणसाच्या जगण्याच्या विविध पैलूंमध्ये दिसणारी उत्क्रांती अथवा क्रांती यांची नोंद घेणारा एक स्तंभ लिहितो आहे. यापूर्वीही या ना त्या संदर्भात माणसाच्या टोळीजीवी अथवा जंगलजीवी ते नागरजीवी या स्थित्यंतराचा मागोवा घेत आलो आहे.त्याला समांतर ’बखर बिम्मची’ या जी. ए. कुलकर्णींच्या पुस्तकावरही एक मालिका लिहितो आहे. हे दोनही चालू असताना या दोन्हींला सांधणारे असे एक जुने पुस्तक पुन्हा एकवार समोर आले आणि त्या अनुषंगाने त्या दोन्ही लेखनांच्या दृष्टिकोनांची सरमिसळ होऊन तयार झालेला हा लेख.)

डोह

जंगलजीवींच्या तुलनेत नागर माणसाचे मूलभूत गरजांशी निगडित संघर्ष बरेच कमी झाले आहेत. जंगलजीवींना अन्न, पाणी नि निवारा या मूलभूत गरजांसाठी सजातीयांशी, अन्य सजीवांशी, निसर्गाशी सर्वांशीच संघर्ष करावा लागत असे. नागर मानवाने श्रमविभागणीचे तत्त्व अंगीकारले आणि मूठभरांनी केलेल्या कामाचे फायदे इतरांमध्ये वितरित करण्यास सुरुवात केली. यातून एकुण समाजाची कार्यशक्ती वाढली नि जंगलजीवींहून नागर मानवाचे कार्यकौशल्य अनेक पटींनी वाढले.

आज नागर जीवनात नळाची तोटी उघडली की पाणी मिळते, त्यासाठी घरच्या स्त्रीला घडा घेऊन नदीवर फेर्‍या माराव्या लागत नाहीत. माणसाच्या आहाराचा दीर्घकाळ अविभाज्य भाग असलेले दूध थेट पिशव्यांमधून वा बाटल्यांमधून विकत घेता येते. अन्नसंग्रहासाठी वा शिकारीसाठी करावी लागणारी यातायातही संपून गेली आहे. मूठभर लोकांनी केलेल्या शेतीतून वा पशुपालनातून कितीतरी मोठ्या नागर समाजाला पाकसिद्धीसाठी आवश्यक घटकांचा थेट पुरवठा होतो.

त्यामुळे होते असे की त्यातील वेळ वाचून, पाकसिद्धीला उदरभरणाच्या पातळीवरून ’कलिनरी आर्ट’ नावाने कला नि प्रयोगशीलतेकडे नेण्याइतकी उसंत निर्माण झाली. या दोन्हींबाबत उदासीन राहून अन्य क्षेत्रासाठी वेळ देऊ इच्छिणार्‍यांना पाकसिद्धीच्या जबाबदारीतून मुक्त करणारी, शिजवलेले अथवा तयार अन्न थेट विकणारी दुकाने- होटेल्स नागर अर्थव्यवस्थेचा अविभाज्य भाग बनली. विसाव्या शतकाच्या अखेरीस पाश्चात्त्य प्रगत राष्ट्रे तर सोडाच पण भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांतही दैनंदिन आहारासाठी तयार पदार्थच विकत मिळू लागले आहेत...

तसंच उपचारांसाठी आवश्यक असणारी वनौषधी शोधत हिंडण्याची आवश्यकता उरली नाही. ती ही अन्नाप्रमाणेच विकत मिळू लागली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सार्‍या व्यवहाराला एकत्र बांधून घालणारी चलन नावाची संकल्पना उदयाला आली आणि ती माणसाला रोजगार नावाच्या संकल्पनेकडे घेऊन गेली. यातून अक्षरश: शून्य शारीर श्रम करणारे, कोणत्याही व्यापक कार्याचा भाग नसलेलेही निव्वळ वैय्यक्तिक उदीमाच्या आधारे आपल्या अन्नादी गरजांच्या पूर्तीसाठी आवश्यक ते चलन मिळवू लागले आणि त्याच्या विनिमयाने अन्नासारख्या गरजा भागवू लागले आहेत.

या सार्‍या प्रवासामध्ये माणूस हळूहळू निसर्गापासून दूर होत चालला आहे. त्यामुळे आपल्या प्रगतीची किंमत निसर्गाने किती मोजली याबाबत तो अधिकाधिक अनभिज्ञ आणि म्हणून बेफिकिर होत गेला आहे. जंगल साफ करून शेती करताना निसर्गाचा एक तुकडा आपण नष्ट केला याबाबत अपराधगंड नसेल कदाचित, पण भान नक्की असे. साफ होण्यापूर्वी अथवा साफ होताना जंगलाच्या त्या तुकड्याने माणसाला नि इतर जिवांना काय काय देऊ केले होते याची समजही माणसाला होती.

पुढे प्रगतीच्या वाटेवर खांडववन जाळून इंद्रप्रस्थाची- एका नगराची उभारणी करताना माणूस नुसता बेफिकीरच नव्हे तर शोषकही होत गेला. तसे करत असताना वृक्षसंपदाच नव्हे तर त्यांच्या आश्रयाने राहणार्‍या प्राण्यांचा, मनुष्यांचा अधिवासच आपण नष्ट करत आहोत याची लाज त्याला वाटेनाशी झाली. खांडववनाच्या संहारामध्ये मयासुराच्या कुटुंबाला जीवदान दिल्याचा उल्लेख आहे, तसाच नागवंशाचा संहार केल्याचाही. प्रगतीच्या प्रत्येक वाटेखाली अनेक जिवांच्या किमान गरजांची थडगी गाडलेली असतात याची जाणीव नागर समाजामध्ये संपूर्णपणे नाहीशी झालेली आहे. निसर्गाप्रती माणूस संपूर्णपणे असंवेदनशील झालेला आहे.

मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांतून माणसाने आपले अधिवास हे लोखंड, सिमेंट यांतून तयार करायला सुरुवात केली आहे. घराभोवती कचरा वा डास नको म्हणून घराभोवतीच्या झाड-झाडोर्‍याची गच्छंती झाली. त्याची जागा कुंड्यांमध्ये लावलेल्या आटोपशीर नि खुज्या झाडांनी घेतली आहे. निसर्गाचेही बॉन्साय करुन माणसाने त्याला आपला बटीक बनवला आहे.

पुढे थोडे भान आल्यावर, घराच्या क्षेत्रफळाच्या प्रमाणात झाडे लावणे सक्तीचे झाल्यावरही त्याच्या आजूबाजूला सिमेंट अथवा त्याचे तयार पेव्हिंग ब्लॉक्स टाकून कचरा वरच्यावर उचलून तो कुजणार नाही, मातीच्या जमिनीवर शेवाळ साचणार नाही याची खातरजमा करुन घेतली जाते आहे. यातून त्यात जगणारे कीटक, त्यांना भक्ष्य करणारे पक्षीही माणसापासून दुरावले आहेत. एकमेकांचे तोंडही पाहायला लागू नये म्हणून माणसे दरवाजे बंद करुन बसू लागली आहेत.

मागील शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय माणसाचा निसर्गाशी संबंध येई तो टीव्हीवर पाहिलेल्या चित्रपटतील नायक-नायिकेच्या प्रेमगीताची पार्श्वभूमी म्हणून. आता ते कामही सरळ एखाद्या डान्सबार व हिरवाईचा अंश नसलेल्या परदेशातील एखाद्या रस्त्यावर स्थलांतरित झाले आहे. क्वचित कुणी एखादी निसर्गावरील माहितीपट पाहतो, कुणी पैसेवाला रोकडा मोजून निसर्गाची ‘टूर’ करतो. त्याचेही फोटो समाजमाध्यमांवर पडले की त्याचा संबंध संपतो.

त्याहीपलिकडे जाऊन एखादी महानगरी सधन व्यक्ती ‘कधीतरी निसर्गाकडे जावं बरं का’ म्हणून वरकड पैसे खर्चून कुठल्यातरी निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या बिल्डरच्या स्कीममध्ये पिटुकले ‘फार्म हाऊस’ बांधतो. वर्षांतून दोन-चार वेळा तिथे जाऊन राहतो (आणि पुन्हा फोटो- बिटो...).

थोडक्यात महानगरी माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान हे केवळ चिकटवहीत चिकटवलेल्या स्टॅंपइतके उरले आहे. ‘माझ्याकडे आहे’ एवढे समाधान देण्यापुरता, किंवा एखाद्या सांस्कृतिक या नावाने सादर केलेल्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाला जाताना हातावर हलकेच उमटवलेल्या एखाद्या अत्तराच्या थेंबासारखा. या माणसाच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान एखाद्या petting zoo सारखे उरले आहे. त्यातील प्राण्यांशी माणसाचा तात्पुरता संपर्क येतो, त्यांच्या सहवासात थोडा वेळ घालवून, त्यांच्याशी कुठलेही नाते न जोडता तो आपल्या आयुष्यात परतून येतो.

पण आपल्या सुदैवाने आपल्या देशाची अमेरिका झालेली नसल्याने महानगरी जगण्याच्या पलिकडे अजून निसर्गजीवीच काय जंगलजीवीही शिल्लक आहेत. त्यांच्या आयुष्यात निसर्गाचे स्थान नेहमीच अविभाज्य वगैरे नसेल, पण सहजीवन नक्कीच असते. लहानशा गावांत, पाड्या-वसत्यांवर मानवी वसती हीच अजूनही गाय, म्हैस, गाढवे, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या, कुत्री यांसारख्या प्राण्यांचीही वसती असते.

अनागर जीवनात आसपास असलेल्या झाड-झाडोर्‍याच्या आश्रयाने राहणार्‍या खारींसारखे छोटे जीव, पोपटांसारखे पक्षी तसंच माकडांसारखे प्राणीही त्या जीवसृष्टीचा भाग असतात. छोट्या शहरांतून, दाराशी एखादे फुलझाड असते. अंगण-परसाची चैन परवडणारे घर असेल तर अंगणात तुळस असते, परसात काही भाज्या असतात. पुढील दारी एखादे फळझाड असते, त्याच्यावर एखाद्या पाखराचे घरकुल असते.

स्वत:चे कवतुक करवून घेणारे, माणसाच्या दृष्टिने निरुपयोगी मांजर ही खास नागरी चूष आहे असे मला वाटते. एरवी जमिनीच्या प्रत्येक इंचावर काँक्रीट ओतून जंगलात उंदरांचा कडेकोट बंदोबस्त झाल्यावर मांजरांना फारसे काम उरत नसावे. आणि ठराविक वेळा अन्न थाळीत येते म्हटल्यावर समोर आल्या उंदराची शिकार करण्याची तसदीही ते घेत नसते. त्या अर्थी मांजर हे ही माणसाप्रमाणेच निसर्गापासून, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांपासून दुरावले आहे, नागर झालेले आहे.

नागरी आणि महानगरी आयुष्यात अजून बसूही न लागलेले मूल हाती मोबाईल घेऊन व्हिडिओ पाहू लागले आहे. त्याचे कौतुक म्हणून त्याला बंदूक वा बाहुली खेळायला मिळते. पण जिथे आर्थिक सधनता मुलाच्या हाती मोबाईल देण्यापर्यंत पोहोचलेली नाही आणि दाराबाहेर काँक्रीटचा पट्टा स्वागताला नसतो, अशा छोट्या गावांतील घरातून एखादे लहान मूल रांगत उंबर्‍याबाहेर पाऊल टाकते तेव्हा आसपासच्या सजीव सृष्टीची ओळख होऊ लागते. दोन हात-दोन पाय असलेल्या प्राण्यांशिवाय इतर जीवही जगात असतात त्याची त्याला जाणीव होऊ लागते. उपजत जिज्ञासेनुसार (जी पुढे शिक्षण नि संस्कारांतून मारली जाते आणि तिची जागा आप-परभाव आणि तद्जन्य अस्मितांना बहाल केली जाते) ते भवतालाची ओळख करुन घेऊ लागते.

थेट जंगलजीवी अथवा निसर्गजीवी असणारे त्याच्याशी ओळख करुन घेतात, विविध निरीक्षणे नोंदवत जातात. त्यातून त्यांचे व्यावहारिक ज्ञान विकसित होत जाते. समोर दिसतो आहे तो पायाचा ठसा वाघाचा आहे की वाघिणीचा, ती इथून किती वेळापूर्वी गेली याचे आडाखे बांधण्याइतके- आणि त्या आधाराने आपल्या जीवनाशी निगडित बाबींचे निर्णय घेण्याइतके ते निसर्गाचा भाग असतात.

त्या तुलनेत गाव-पाड्यावरचे मूल जेव्हा परिसराची ओळख करुन घेऊ लागते तेव्हा त्यामागे अभ्यासापेक्षा निव्वळ कुतूहल, जिज्ञासाच अधिक असते. दारचा राखणीचा कुत्रा, झाडावर नियमित दिसणारी खार, विशिष्ट वेळेला दारासमोरून जाणारी गाय अथवा शेळ्यांचे खांड, एखाद्या झाडाला फळे धरली की त्यावर येणारी पाखरे, माणसाच्या वसतीमध्ये बिनदिक्कत घुसून गोंधळ माजवणारी माकडे आणि कुठल्याही दाव्याखेरीजही माणसाच्या गुलामीच्या अदृश्य खांबाला बांधल्यासारखे स्थितप्रज्ञ वाटावे असे गाढव... ही सारी त्याच्या आयुष्याचा नि निरीक्षणाचा भाग होऊ लागतात. अशा वयातील मुलांचे नि निसर्गाचे नाते उलगडणारी दोन पुस्तके माझ्या वाचनात आली. त्यातील दुसरे म्हणजे जी.ए. कुलकर्णींचे ‘बखर बिम्मची’. आणि त्याहीपूर्वी हाती लागलेले श्रीनिवास विनायक कुलकर्णीं यांचे ‘डोह’.

ही दोनही पुस्तके संस्कारक्षम वयातील मुलांच्या भावविश्वाचे बोट धरून पुढे जातात. बिम्मच्या आयुष्यात येणार्‍या गायीच्या, पिवळ्या पक्ष्याच्या, हत्तीच्या, कुत्र्याच्या पिलाच्या लहान-लहान गोष्टी मांडत जी. ए. त्याचे भावविश्व साकार करतात. त्याचबरोबर त्या गोष्टी एखाद्या बिम्मला वाचून दाखवणार्‍या त्याच्या आई-वडिलांसाठीही त्यात काही ठेवून देतात. तर ‘डोह’मध्ये बिम्महून थोड्या अधिक वयाच्या- अधिक समज असलेल्या मुलाच्या तोंडूनच त्याच्या परिसराची ओळख दुसरे कुलकर्णी करुन देतात. यामध्येही या मुलाने बिम्मप्रमाणेच जगण्यातील जीवसृष्टीशी आपले नाते जोडले आहे. बिम्मप्रमाणे गाय, कुत्रा वगैरे माणसाला जवळच्या असणार्‍या प्राण्यांऐवजी त्यांच्या उपेक्षेचे- अनेकदा भीतीचे- विषय ठरलेल्या सुसर, घुबड आणि वाघळांसारख्या जीवांचीही दखल घेत जातो; वार्‍याच्या, पाण्याच्या प्रवाहाशी समरस होऊ पाहातो.

दोहोंमधील मुलाच्या वयोगटाशिवाय मांडणी आणि दृष्टिकोनाचा थोडा फरक आहे. जी. ए. बिम्मचे छोट्या गोष्टींच्या स्वरूपात मांडतात. तर श्री. वि. ‘डोह’साठी आता जवळजवळ अस्तंगत झालेल्या ललित लेख या वाङ्मयप्रकाराची निवड करतात. माटे मास्तर, पु. ग. सहस्रबुद्धे, विद्याधर पुंडलिक आणि अलिकडचे ग्रेस या लेखकांचे ललित लेख माझ्या वाचनात आले आहेत. अनुभव, आस्वाद, विश्लेषण आणि लालित्य अशा विविध अंगांना स्पर्श करत जाणारा हा प्रकार कथनात्म साहित्यामध्ये कथा, कादंबरींच्या गोंगाटामध्ये कोपर्‍यात ढकलला गेला आहे. त्याची बलस्थाने आजचे समीक्षक नीट उलगडू शकतील का अशी मला शंकाच आहे, इतका तो उपेक्षित राहिलेला दिसतो.

एरवी वेचित ब्लॉगसाठी वेचे निवडताना दोन ते तीन पर्यायांतून कुठला निवडावा अशा संभ्रमात मला काही वेळ द्यावा लागतो. परंतु ‘डोह’मधील वेचा निवडताना भूमितीमधील दोन बिंदूंतून जाणार्‍या एक आणि एकच रेषेप्रमाणे एकच वेचा- खरेतर पुरा लेख- सहजपणे निवडला. या लेखामध्ये निवेदक मुलाने वाघळांचा घेतलेला मागोवा उलगडून दाखवला आहे.

लेखाची सुरुवात निवेदकाच्या वैय्यक्तिक अनुभवांतून होते. त्यातून उल्लेख आलेल्या वाघळांकडे लक्ष वेधले जाते. त्यानंतर वास्तवाच्या नोंदी, दंतकथांचे संदर्भ, रोकड्या व्यावहारिक जगाचे संबंध यांसोबत वाघळांच्या वसतीच्या नि त्यांच्या जगण्याच्या विलक्षण संवेदनशीलतेने टिपलेल्या नोंदी या मार्गे अस्तित्वाच्या विलयापर्यंत केलेला प्रवास विलक्षण आहे. एका लहान मुलाने जगाकडे उलटे लटकून पाहणार्‍या वाघळांकडे इतक्या कुतूहलाने, जिज्ञासेने पाहणे ही देखील आता एक वाघळदृष्टीच म्हणावी लागेल.

- oOo -

‘डोह’मधील एक वेचा: रात्रपाळीचे शेजारी


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा