एखाद्या पुस्तकातील वेचे इथे समाविष्ट करत असताना काही वेळा त्या वेच्याबाबत, पुस्तकाबाबत अथवा त्याचा धागा पकडून केलेल्या स्वतंत्र विचार-विश्लेषणावर आधारित ’वेचताना’ या मालिकेतील लेख इथे लिहित असतो. ’थॅंक यू, मि. ग्लाड’ या कादंबरीतील वेचे इथे शेअर करताना ’वेचताना...’ हा जोडलेखही शेअर केला आहे. परंतु मला तो थोडा अपुरा वाटतो आहे.
हा लेख प्रामुख्याने ती कादंबरी, लेखक आणि तिचे अन्य कलाकृतींमध्ये दिसलेले प्रतिबिंब याभोवतीच केंद्रित आहे. त्यामध्ये ग्लाड या पात्राच्या मनोभूमिकेकडे मी अधिक बारकाईने पाहिले आहे. त्या कादंबरीकडे नि त्यातील दोनही प्रमुख पात्रांकडे तुम्ही-आम्ही कसे पाहावे याबाबत त्यात काही लिहिलेले नाही. त्या कादंबरीचा आणि त्यावर आधारित नाटकाचा जनमानसावर तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव पाहता त्याबाबत स्वतंत्रपणे लिहिणे मला आवश्यक वाटले.
---
कादंबरी वाचत असताना त्यातील वीरभूषण पटनायक या कैद्याच्या (नक्षलवाद्याच्या) ताठ कण्याच्या व्यक्तिमत्वाचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडत जातो. ’वेचताना...’ या जोडलेखामध्ये म्हटल्याप्रमाणे यातील संघर्ष आहे तो ताठ मानेचा ग्लाड आणि ताठ कण्याचा वीरभूषण यांच्यातला. अखेरच्या प्रसंगामध्ये जेलर ग्लाड त्याचे श्रेष्ठत्व अप्रत्यक्षपणे मान्य करतो असा उतावळा निष्कर्ष काढला जाऊ शकतो- काढला गेला. त्यातून नकळत वीरभूषण या पात्राचे उदात्तीकरणही झाले.
यातून झालं असं की एखाद्या एकांगी विचाराच्या व्यक्तिमत्वावर मानवी वृत्तीचा शेंदूर लावून त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी या व्यक्तिमत्वाने एक आराखडाच (template) देऊ केला. ’वेचताना...’ लेखात उल्लेख केल्याप्रमाणॆ महात्मा गांधीच्या खुन्याचे समर्थन करण्यासाठी याच नाटकावर हिंदुत्ववादी संस्करण करुन रंगभूमीवर आणण्यात आले. आजच्या प्रचार-लढाईच्या कालखंडात भानावर राहणे किती मोलाचे आहे हे आपण सर्व जाणतोच. त्यामुळे या कादंबरी/नाटकाकडे अधिक वस्तुनिष्ठपणे पाहणे, भारावून न जाणे हे महत्त्वाचे ठरते.
’थॅंक यू मि. ग्लाड’च्या शेवटाकडे झुकताना ’वीरभूषण हा आपला शत्रू असला तरी आपल्या विचारांवर निष्ठा असणारा, त्यासाठी सर्वस्व झोकून देणारा आहे, त्या अर्थी क्रांतिकारक आहे’ अशी जाणीव ग्लाडला होते. म्हणूनच एखाद्या सामान्य गुन्हेगाराप्रमाणे त्याला फाशी न देतात क्रांतिकारकाला साजेसा मृत्यू तो देऊ करतो. आणि यातून वाचकाला वीरभूषणबाबत निर्माण झालेली सहानुभूती अधिक गाढ होत जाते. पण...
...’हा विचार ग्लाडचा आहे’(!) हे विसरून चालणार नाही! म्हणजे असं पाहा, की वीरभूषणने सात-आठ व्यक्तींची हत्या केली आहे, पण ती त्याच्या वैचारिक निष्ठेतून केली आहे असे त्याचे म्हणणे आहे. आणि जेलर ग्लाडलाही अखेरीस - परिस्थितीवश - मान्य झालेले दिसते. ग्लाड असा विचार करु शकतो, कारण ज्यांच्याशी आपले प्रत्यक्ष वैर वा संघर्ष नाही अशांप्रती एकतर्फी शारीरिक हिंसा हे त्याच्याही दृष्टीने स्वसत्ता प्रस्थापित करण्याचे अथवा राबवण्याचे वैध हत्यार आहे. तेव्हा आपल्या निष्ठेसाठी विरोधी बाजूंच्या काही जणांवर अत्याचार झाले तर त्यात काही गैर नाही, असाच त्याचाही समज आहे... आपल्या आसपासच्या बहुसंख्येचाही असतो! त्यामुळे जेलर ग्लाड ’पाशवी वृत्ती तीच, फक्त वैचारिक भूमिका वेगळी ’ असणार्या वीरभूषणकडे तो ’मला न पटणार्या’ विचारांचा क्रांतिकारक’ म्हणून पाहू शकतो.
ग्लाड ’बळी तो कान पिळी’ याच विचाराचा असला, तरीही वीरभूषणने त्याच्यातील विचाराला जागवले आहे, उपकृतही केले आहे. म्हणून तो असा विचार करु शकतो. एरवी विरोधकांवर मात करण्यासाठी ’पुरा तयांचा वंश खणावा’ वृत्तीचा एखादा अतिरेकी मानसिकतेचा हिंदुत्ववादी नक्षलवाद्यांबद्दल असा विचार करु शकेल? किंवा उलट दिशेने एखादा नक्षलवादी अशा हिंसाप्रेमी हिंदुत्ववाद्याबद्दल असा विचार करु शकेल? विशिष्ट वैचारिक दृष्टिकोन असणार्यांचे सोडा, तुमच्या-आमच्यासारखे वैचारिकतेचा केवळ झेंडा खांद्यावर मिरवणारे, एरवी वैचारिकतेमधील री पहिली की दुसरी हे ही माहित नसणारे हे करु शकतील का?
माझ्यापुरते याचे उत्तर नकारार्थी आहे. कारण माझ्या विचारांचे पोषण लोकशाही मूल्यांवर झाले आहे. आणि माझ्या दृष्टीने ती मूल्ये म्हणजे डाव्यांप्रमाणे वा हिंदुत्ववाद्यांप्रमाणे 'मला हवी तशी हुकूमशाही प्रस्थापित होईतो- नाईलाजाने घालावी लागणी टोपी' नाही. तिच्यातील दोष मान्य करुनही ती मला निर्विवादपणे स्वीकारार्ह असलेली व्यवस्था व विचारसरणी आहे.
निरपवाद, निरपेक्ष अशी न्यायाची कोणतीही कल्पना या जगात अस्तित्वात नसते! जो तो आपल्याला अभिप्रेत व्यवस्थेला अनुसरूनच न्याय-संकल्पना मांडत असतो. वीरभूषणने तेच केले आहे नि ग्लाडनेही. मी ही माझ्या व्यवस्थेला अनुसरूनच माझी कल्पना विकसित करणार हे साहजिक आहे. आणि माझ्या न्याय-संकल्पनेच्या परिघामध्ये या दोघांचेही वर्तन निषेधार्ह आहे- दंडनीय आहे असे म्हटले तरी चालेल.
मानवी समाजातील सर्वच व्यवस्थांमध्ये माणसे एकक (subjects) असतात आणि त्या व्यवस्थेच्या अंतर्गत त्यांच्या तंट्यांचे, संघर्षाचे, हक्काचे निवाडे करता येतात. पण दोन व्यवस्थांना पोटात घेणारी एखादी मातृ-व्यवस्था (सुपर-सिस्टम) नसते, जिथे त्या दोन्हींना त्या व्यवस्थेअंतर्गत एकक (subject) मानून त्यांच्या परस्परसंबंधांचे निवाडे तिच्या अंतर्गत करणे शक्य व्हावे. तेव्हा अशा दोन व्यवस्थांचे परस्पर-वर्तन आणि मूल्यमापन हे उभयपक्षी अधिकृत वा अनधिकृतपणे मान्य केलेल्या द्विपक्षीय करार वा संकेतांनुसारच होत असते. (या मुद्द्याचा थोडा उहापोह रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेल्या ’व्यवस्थांची वर्तुळे’ या लेखामध्ये केला आहे.)
मला अभिप्रेत असलेल्या लोकशाही व्यवस्थेचा आधार असणार्या सामान्य पोटार्थी व्यक्तींनाही त्याच्या व्यवस्थेचा शत्रू मानून वीरभूषण त्यांची हत्या करत असतो. लोकशाही व्यवस्थेनेही त्याच्याबाबत उलट दिशेने तीच भूमिका घेतली, तर माझ्या मानवतावादी भूमिकेला अनुसरून तिचा निषेध करणे मला अवघड होत असते. त्याच्या व्यवस्थेतील ’पीपल्स कोर्ट’ जर लोकशाही व्यवस्थेमधील व्यक्तींचा एकतर्फी निवाडा करत असेल, तर लोकशाही व्यवस्थेतील न्यायव्यवस्थेनेही त्याचा एकतर्फी निवाडा केला, तर अन्याय म्हणता येईल का? पण लोकशाही व्यवस्था- निदान सैद्धांतिक पातळीवर- तसा करत नाही हेच माझ्या लोकशाही व्यवस्थेवरील निष्ठेचे मुख्य कारण आहे.
दोन व्यवस्थांमधील परस्पर-संघर्षामध्ये ’न्याय’ ही संकल्पना मोजायची ती कशाच्या आधारे? त्याच्या व्यवस्थेत देहदंड हा चौकी बॉम्बने उडवून दिला जात असेल, तर या व्यवस्थेत दोराला लटकवून फाशी देऊन दिला जातो एवढाच काय तो फरक आहे. 'फाशी देणे योग्य आहे का?' ही चर्चा आपण लोकशाही व्यवस्थेअंतर्गतच करु शकतो. ती त्या व्यवस्थेच्या अंतर्गत बाब आहे. त्या व्यवस्थेअंतर्गत जोवर ती अस्तित्वात आहे, तोवर तिला अनुसरून निवाडे होत राहणार. ग्लाडची गोष्ट आणखी वेगळी आहे. तो तांत्रिकदृष्ट्या लोकशाही व्यवस्थेअंतर्गत असला तरी तुरुंग ही त्याच्या अखत्यारितील व्यवस्था आहे आणि तिच्याअंतर्गत तो त्याची दंडव्यवस्था राबवतो आहे, जी बव्हंशी वीरभूषणप्रमाणेच एकतर्फी निवाडा करणारी आहे.
यातील योग्य कुठले वा अयोग्य कुठले याबद्दल नैतिक निवाडा करणे अशक्यच आहे. नैतिकतेची कल्पना ही नेहमीच व्यक्ती तसंच व्यवस्थासापेक्ष असते. आणि वर म्हटले तसे दोन व्यवस्थांच्या संदर्भात सामूहिक नैतिकतेच्या कल्पनांना आधार देणारी सामायिक व्यवस्थाही अस्तित्वातच नाही. आणि म्हणून ग्लाडने वीरभूषणचा निवाडा क्रांतिकारक म्हणून केला असला, तरी लोकशाहीवादी व्यवस्था मानणार्या माझ्यासारख्याला तसा करणे शक्य नाही.
जो न्याय वीरभूषणला लावावा लागतो, तोच ’न्यायालयात न्याय मिळत नाही’ असा कांगावा करत विध्वंसाचा वडवानल पेटवणार्या, स्वत:ला धर्मयोद्धे समजणार्यांनाही ! यांच्या दृष्टीने लोकशाही व्यवस्थेचे पाईक हे शोषकांचे अथवा अन्य धर्माला पक्षपाती आणि म्हणून दंडनीय असतात. त्याचप्रमाणे लोकशाही व्यवस्थेच्या दृष्टीने हे दोघेही गुन्हेगारच असतात, क्रांतिकारक नसतात!
त्यामुळे ग्लाडच्या वैय्यक्तिक अनुभवातून- कदाचित उपकाराच्या ओझ्याखाली - ग्लाडचा कणा झुकला असला, तरी ते वीरभूषणच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र मानण्याची गरज नाही! ग्लाड असो की वीरभूषण, दोघांच्याही परस्परसंबंधात यथावकाश आपुलकीचा एक धागा निर्माण होतो आहे. तरीही ते दोघेही मूलत: हिंसेचे उपासक आहेत आणि सामान्यांचे कर्दनकाळ आहेत हे विसरुन चालणार नाही. त्यांच्या परस्पर-आपुलकीचा प्रादुर्भाव आपल्या मनात होऊ न देणेच शहाणपणाचे आहे.
ग्लाडची परिस्थिती वीरभूषणहून वेगळी आहे. जरी तो वीरभूषणबाबत ’माझ्या विपरीत विचारांचा क्रांतिकारक’ या निष्कर्षाप्रत पोहोचत असला तरी यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला, ’आपल्याला वैचारिक भूमिका आहे, दृष्टिकोन आहे’ हा ग्लाडचा भ्रमच आहे. कुणीतरी आपल्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन इतर कुणावर तरी अत्याचार करुन करण्याचा प्रयत्न करणे यात कुठलीही वैचारिक भूमिका नाही. असलाच तर भेकडाचा सूड आहे.
’वेचताना...’ या आधीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे तो सत्तेच्या बाजूला राहणारा, निष्ठा बदलणारा आहे. आपल्या वैफल्याचे विरेचन व्यवस्थेने आपल्या तावडीत आणून सोडलेल्या, त्याअर्थी दुबळ्या जीवांवर करणारा तो एक भेकड जीव आहे. आपली भीरूता जाहीर होऊ नये म्हणून त्याला क्रौर्याचा आधार घेऊन आपला दरारा निर्माण करावा लागतो, राखावा लागतो. आक्रमकता हा अनेकदा न्यूनगंडाचाच आविष्कार असतो याचे तो मूर्तिमंत उदाहरण आहे.
वीरभूषणने नाममात्र का होईना सर्वकल्याणकारी तत्त्वज्ञान अंगीकारले आहे- म्हणजे कदाचित ते अभ्यासले आहे. त्याच्या या सर्व-कल्याणाच्या व्याख्येमधून इतर व्यवस्थांचे पाईक वा लाभधारक सोयीस्करपणे वगळलेले आहेत. ते केवळ परकेच नव्हे तर थेट शत्रू मानले आहेत. त्यांचे निर्दालन करण्यास हिंसेचा वापर समर्थनीय मानला आहे.
हे ज्यांना असमर्थनीय वाटते त्यांनी समाजाअंतर्गत अन्य-धर्मीयांच्या अथवा अन्य-जातीयांबाबत आपली भावना अशीच आहे का हे स्वत:ला विचारून पाहायला हरकत नाही. इतकेच कशाला आपला देश महासत्ता व्हावा, इतर देशांवर त्याने वर्चस्व गाजवावे या वेडाने झपाटलेले लोक अन्य देशांतील- अथवा शत्रू म्हणून निवडलेल्या देशांतील - सामान्य नागरिकांची बॉम्बस्फोट वा तत्सम मार्गाने केली जाणारी हत्याही समर्थनीय मानत नाहीत काय? ’पुरा तयांचा वंश खणावा’ ही प्रवृत्ती या ना त्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या मनात ठाण मांडून बसलेली नसते का? वीरभूषणच्या विचारांतून येणारी हिंसा ही किती भयंकर द्रोही, मानवतेविरोधात आहे वगैरे म्हणत असताना देश, धर्म, वंश वगैरे आधारावर होणार्या एकतर्फी हिंसेचे मात्र आडवळणी समर्थन करताना आढळतात.
याचे कारण माणसांनी भौतिक प्रगती कितीही साधली असेल पण मूलत: माणूस हा अजूनही टोळ्या करून राहणारा प्राणी आहे. आणि अन्य टोळीच्या कोणत्याही सभासदाबद्दल तो तीव्र शत्रुत्व मनात बाळगून असतो. त्याने जन्माला घातलेले सर्व धर्म, स्वत:ला सर्वकल्याणकारी म्हणवणारी तत्त्वज्ञाने, व्यवस्था या शत्रूलक्ष्यी मांडणीच करत असतात. त्यातून मनुष्यप्राण्याच्या मनातील हिंसेचे विरेचन होण्यास एक वाट निर्माण होत असते. बहुसंख्य व्यक्तींना शाब्दिक विरेचन पुरते, गल्लीतल्या गुंडांना दुबळ्यांच्या मर्यादित वर्तुळात हिंसेचा वापर करुन पाहावासा वाटतो, पाठीशी जात, देव, देश, धर्माचे अधिष्ठान असले की या हिंसेला आणखी मोठे पाठबळ मिळते नि त्याची व्याप्ती वाढते.
या सार्याचा विचार करता वीरभूषण काय की ग्लाड काय या भेकड, टोळीबद्ध प्राण्यांतील एक प्राणी आहेत इतकेच. तुम्ही या दोहोंशी सहमत नसाल तर तुमच्या भूमिकेचे मी स्वागत करेन. परंतु तेवढे पुरेसे नाही. या दोहोंच्या विचारांचे मूळ असलेली, मित्र-शत्रूंच्या व्याख्येमध्ये सरसकटीकरण करणारी शत्रूलक्ष्यी मांडणी टाळून- त्या कुबड्या टाकून निरपवाद, स्वत:च्या पायावर उभी असणारी विचारसरणी अंगीकारणे गरजेचे आहे. लोकशाही ही तुम्हा-आम्हाला उपलब्ध असणारी अशी एक व्यवस्था आहे. ती स्वीकारायची असेल तर वीरभूषणचा ताठ कणा वा ग्लाडचा तथाकथित मनाचा मोठेपणा यांनी फार भारावून न जाण्याचे भान राखायला हवे आहे. त्याचबरोबर त्या दोहोंमधील दोषच वेगळ्या रंगात रंगवून मांडणार्या तथाकथित पर्यायी व्यवस्थांनाही नाकारणे आवश्यक आहे.
-oOo -
संबंधित लेखन:
वेचताना... : थँक यू, मिस्टर ग्लाड >>
शरीरम् धनसंपदा >>
नो थँक्यू, मिस्टर ग्लाड >>
---
(‘थँक यू, मि. ग्लाड’ बाबत विवेचन करणारे ‘वेचित चाललो’वरील दोन लेख एकत्रितरित्या “ग्लॅड फॉर ग्लाड?: वीरभूषण, ग्लाड आणि मी” या शीर्षकाखाली ‘तत्रैव’ नियतकालिकाच्या ‘नोव्हेंबर-डिसेंबर २०२४’ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहेत.)