गुरुवार, १७ ऑगस्ट, २०२३

चढ आणि उतार

माझ्या घरापासून अगदी पाच-दहा मिनिटांच्या वाटेवर टेकडी आहे. मनात आले की, तिच्यावर जाता येते, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे! विशेषत: मुंबईला कामासाठी गेलो, म्हणजे माझे हे भाग्य मला फार ठळकपणे जाणवते.

सुंदर पहाट होते. हातात लहानशी काठी आणि खिशात दुर्बीण घेऊन मी बाहेर पडतो. बालभारतीच्या पाठीमागे जी टेकडी आहे, तिच्या पायथ्याशी येऊन जरा मागे वळून बघतो, पुणे शहर अजून पुरते जागे झालेले नसते. अजून रस्ते वाहू लागलेले नसतात. पूर्व दिशेला लाली मात्र चढलेली दिसते. मी उत्साहाने टेकडी चढू लागतो.

अगदी परवा-परवा या टेकडीवर छान झाडी होती. पूरग्रस्त लोकांची वस्ती झाली, खिंड झाली, रस्ता झाला आणि टेकडीवरची अनेक झाडे सर्पणासाठी जाळली गेली. कडुनिंबाचे चांगले जाणते झाड कोणीतरी घाव घालून तोडत आहे, हे दृश्य मी अनेकदा पाहिले आहे. उघड्याबंब अंगाने धोतराचा काचा मारून झाड तोडणाऱ्या माणसापाशी त्याचे इमानी कुत्रे असत. दोन पोरे तोडलेल्या ढलप्या कवळे भरभरून नेत आहेत, असे दिसते. हे सगळे बघूनही 'बाबा रे, का तोडतो आहेस झाड? तू कोण? हे झाड कुणाच्या मालकीचे आहे?' असे त्या लाकूडतोड्याला हटकण्याचे धाडस मात्र कधीही माझ्याकडून झालेले नाही. तो पूरग्रस्त आहे आणि त्या वस्तीतल्या गरीब बापड्या लोकांना रोजची भाजी-भाकरी शिजविण्याला सर्पण विकत आणण्याची शक्ती जर नसेल, तर त्यांनी काय करावे?

फिरणे, हवा खाणे, निसर्गसौंदर्य चाखणे हे चोचले गरिबांना परवडण्यासारखे नाहीत, वगैरे सगळे मला माहीतच आहे. शिवाय माणसाने जमाना ओळखावा आणि गप्प बसावे, हे मध्यमवर्गीय शहाणपण मला वारसाहक्काने मिळालेले आहेच. असो.

घाव घालून अधू केलेली झाडे, विस्तार तोडून उरलेले आणि तरीही ढलप्यांसाठी कोयत्या-कुऱ्हाडीचे घाव घेऊन तांबडेलाल झालेले खुंट मला जागोजागी दिसतात. तोडून फरफटत नेलेल्या खोडांचे फरकाटे खडकावरून उठलेले असतात. पण या दृश्याकडे दुर्लक्ष करून मी हवा खात हिंडतो.

वाटा

टेकडीच्या माथ्यावर आणि अंगाखांद्यावर मला ओळखीच्या अनेक वनस्पती दिसतात. दगडीपाल्याचा हिरवाकंच वेल आणि त्यावर उमटलेली लांब देठांची पिवळी फुले दिसतात. कोरफडीचे आळे दिसते. सराट्याचे वेल दिसतात. काळमाशीचे गड्डे दिसतात. या सगळ्यांचे औषधी गुण मला बाळपणीच रामोशांच्या आणि धनगरांच्या गुराखी पोरांबरोबर राने तुडविताना माहीत झालेले आहेत. ऋतुकालमानानुसार या वनस्पतींचे दर्शन होते, तेव्हा मला बरे वाटते. गावाकडचा माणूस भेटावा, तसा आनंद होतो. या लहानसान वनस्पतींबरोबरच फुललेल्या कडुनिंबाचा आणि मुरमुट्याचा गंध, भिजल्या गवताचा आणि माळरानाचा वास हेही मला कसल्यातरी जुन्या आठवणी करून देतात. चालता-चालता वाटेवरच्या धुळीत गुंडी किड्यांनी केलेल्या सुरेख गदी दिसतात. अंगावरच्या कपड्यातले एखादे सूत ओढून त्याची लहान गुंडी या गदीत टाकावी आणि घसरून गदीत पडणाऱ्या भक्ष्याची वाट पाहात मातीखाली दडून राहिलेल्या किड्यांचे दर्शन घडते का बघावे, म्हणून मी थबकतो. कधी हात लावला की, अंगाचे वेटोळे करणारे पैसा किडे दिसतात. कधी माळसरडे दिसतात, कधी खारीची पोरे दिसतात. बघावे तेवढे थोडेच असते.

टेकडीच्या परिसरातली बरीच पाखरे आता माझ्या माहितीची झाली आहेत. अमुक ठिकाणी तमका भेटेल, तमुक ठिकाणी तो हा चरत असेल, असे माझे अंदाज सहसा खोटे ठरत नाहीत. पाखरे उडतात, तेव्हा ती दिवसभरात दूरदूरची राने धुंडत असतील, असे आपल्याला वाटते. पण ते काही खरे नाही. त्यांचेही जग एवढेएवढेसेच असते.

पायथ्याच्या माळरानावर मला तुरेवाले आणि बिनतुरेवाले चंडोल हमखास दिसतात. कधी चार-सहाच्या घोळक्यांनी ते चरत असतात. डोळ्याला दुर्बीण लावून त्यांना अगदी छान न्याहाळता येते. थोडी पोटे भरली की, त्यांना गाण्याची लहर येते. एखादे पाखरू अगदी ठिपका होईस्तोवर उंच उडते. क्षणभर जागच्या जागी थांबते आणि सुरेख गाणे गाऊन सारे आसमंत भारून टाकते. हे स्वर कानी येतात, तेव्हा मला शाळेची एकाकी वाट आठवते. माडगूळ ते आटपाडी हे पाच मैलांचे अंतर भल्या सकाळी तुडविताना सगळ्या वाटेवर चंडोलांचे गाणे माझा श्रमपरिहार करीत असे.

पायथ्याशी हिंडताना पांढरपोट्या दयाळाचे सुस्वर कानी पडतात. तो कुठे आहे, हे मला बरोबर माहीत आहे. वेताळ टेकडी आणि बालभारतीच्या पाठीची टेकडी या दोहोंमध्ये, आत गेलेला थोडा दडणीचा जो भाग आहे, तिथे उंच शेलाटा, एकाकी कडुनिंब आहे. त्याच्या टोकाशी बसून हा दयाळ रोज सकाळी गातो. 'हे एवढे रान माझे आहे. इथला स्वामी मी आहे,' एवढाच त्याचा गाण्याचा आशय असावा. आणखी एक कोणीतरी 'पीऽबीऽ चिक्ऽऽ पीऽ बीऽ' एवढेच कडवे सारखे गात असतो. बराच तपास करूनही त्याची-माझी दृष्टभेट अद्याप झालेली नाही.

गुराख्यांनी पाडलेल्या पायवाटेने मी वेताळ टेकडीच्या दिशेने चढू लागतो आणि वाटेवरच कुठे माना काढून, माझ्या हालचालींवर डोळा ठेवून असलेली तित्तिराची एक जोडी अगदी शेजारी गेल्यावर, भुर्रकन भरारी घेऊन पार पलीकडे असलेल्या घायपातीच्या लहानशा बेटात जाऊन पडते. त्यांना दुर्बिणीने टिपण्याचा माझा बेत अजून सफल झालेला नाही. प्रत्येक खेपेला, त्यांनीच मला आधी हेरलेले असते. बेटे चूप बसतात आणि मी अगदी चार फुटांवर गेलो की, एक-दोन-तीन म्हणून एकदम भरारी घेतात.

माथ्यावर पोहोचले की, चोहोकडे सुरेख रान आणि डोक्यावर निळे आभाळ दिसते. अजून कोणी फिरकलेले नसते. कडेची एखादी पायवाट धरून चालू लागले की, तांबूस पाठी, पांढरी पोटे आणि त्यांवर बारीक काळे ठिपके असलेल्या मुनियाचा भलामोठा थवा भेटतो. चांगल्या शे-सव्वाशे चिमण्या असतात. गवतात चिमणचारा वेचण्याच्या नादात त्यांना पुष्कळदा माझी चाहूल लागत नाही. मी बघत असती आणि त्या चरत असतात. हळूहळू आमच्यातले अंतर कमी होत जाते. दुर्बिणीतून झोपेतले बाळ सटवाईने घाबरवावे, तशा त्या भुर्रकन घोळक्यानेच उडतात. निळ्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर एवढे एवढे ठिपके खाली-वर होताना दिसतात. जमिनीवर मुक्या राहणाऱ्या मुनिया अधांतरी होताच बोलू लागतात. बारीक घुंगरमाळांचा आवाज रुणझुणावा, तसे त्यांचे बोल कानी येतात.

थोडे पलीकडे मेंढीफार्मच्या वरच्या बाजूला कशी कोण जाणे, पण अजून थोडी झाडी राहिलेली आहे. अगदी अलीकडे भल्या सकाळी कोणीतरी बुझवलेले एक भेकर सुसाट पाळताना मी खालून पाहिले होते, ते याच ठिकाणी. इथे मुरमुटीसारखी दिसणारी बरीच झाडे आहेत. ती फुलावर असली, म्हणजे अनेक फुलचोख्या डहाळ्यांशी झोंबताना दिसतात. त्यांच्या अस्वस्थ हालचाली अगदी निवांतपणे आपल्याला बघता येतात.

या झाडीत घुसून एखाद्या बुंध्याशी उभे राहून कान दिले की, नाना आवाज येतात. बुलबुल बोलत असतात. खाटीक, ल्हाने कोतवाल, मुके राघू आणि मठ्ठपणे बसलेले कावळे दिसतात. झाडांच्या बुंध्याच्या खांबातून वाकडे-तिकडे घसरत आपण सावकाश खाली उतरू लागावे.

शेपट्या हलवीत डहाळीवर बसलेले कोतवाल दिसतात, मेंढी फार्ममधल्या मेंढ्या चरणीसाठी बाहेर केव्हा येतात आणि त्यांच्या खुरांनी उडविलेले टोळ, किडे मटकावीत आपण त्यांच्याच पाठीवर बसून फेरफटका कधी घेतो, याची वाटच ते बघत असतात.

मधेच हवेत कोलांटी मारून एखादा मुका राघू पुन्हा साळसुदासारखा डहाळीवर येऊन बसतो, तेव्हा खुशाल समजावे की, त्याने उडता पतंग मटकावला. तुम्ही कधी पाण्यावर तरंगत जाणारा घोडा बघितला आहे का? नक्षीदार पंखांचा आणि लांब करवेदार शेपटाचा? बाळपणी आम्ही हलक्या हाताने हा पकडीत असू आणि त्याच्या शेपटीला लांब दोरा बांधून त्याचा पतंग उडवीत असू. एकदा असला भलामोठा घोडा मुक्या राघूने अधांतरीच पकडला. चांगला दीड इंच लांबीचा आणि फताड्या पंखांचा. रंगाने चकचकीत गुलाबी होता. हिरव्या मुक्या राघूने आपल्या दाभण चोचीने त्याला पकडले आणि फांदीवर येऊन बसल्यावर त्याच्या ध्यानी आले- 'अरे, हा तर लहान तोंडी मोठा घास आहे.' घोडा अजून धडपडतच होता. खरे तर चिमणी आकाराच्या मुक्या राघूने त्याला सोडून मोकळे व्हावयाचे. पण नाही! त्याने जोरजोराने त्याला फांदीवर आपटून पुरे केले आणि मग मोठ्या हिमतीने गिळले. पोट टम् झाले असावे. कारण मान आत घेऊन शेपटी खालीवर करीत तो कितीतरी वेळ जागचा हलला नाही. मला तर वाटले की, आता दिवस मावळेपर्यंत यांची बेगमी झाली.

असे बघत-बघत आपण मेंढी फार्मच्या फाटकाशी पोहोचतो. 'कुत्र्यापासून सावध' अशी पाटी इथे आहे. पण अनेक वेळा सावध राहूनही मला इथे कधी कुत्रे दिसलेले नाहीत. वतन गेले नाव राहिले, असा प्रकार असावा. याच उतारावर कधी नव्हे तो एकदा मला चित्तूर तुरगताना दुरून दिसला होता. फारच चपळाईने त्याने मला झुकांडी दिली. अस्मानी उडाला की पाताळी दडला, हेसुद्धा कळले नाही.

एवढा पल्ला मारून तळाशी उतरेपर्यंत दिवस वर आलेला असतो. रोजचे व्यवहार सुरू झालेले असतात. मेंढी फार्मवरची गुरे डोंगर वेचू लागलेली असतात.. पूरग्रस्त वस्तीवरची माणसे लोटा परेडसाठी डोंगराच्या दिशेने निघालेली दिसतात. कुठे उंच खडकावर स्वच्छ हवेत जोर-बैठका मारून हेल्थ कमविणाऱ्या पोरांच्या आकृती दिसू लागतात. मग दुर्बीण डोळ्याला लावून बघावे, असा भाग आता संपला, असे समजून मी नाकासमोर बघत परतीची वाट तुडवू लागतो.

अजून माळरानच असते. ते संपून खिंड येईपर्यंत काहीबाही दिसतच असते. रानवट दयाळची जोडी एकापाठोपाठ नाचताना दिसते. भांडखोर साळुंक्या कुस्ती खेळताना दिसतात. तारेवर बसून 'किलकिल्या' ओरडलेला ऐकू येतो. कधी बालभारतीच्या आसमंतात शेपूट नाचवून ओरडणारा शिंपीही दिसतो.

पुढे मात्र माणसे भेटू लागतात. कुत्रेवाली, मफलरवाली, छत्रीवाली...
कामगार, शाळकरी पोरे, भांडीवाल्या बाया, वडार, सायकली, रिक्षा, स्कूटर्स...

आता पाहण्यासारखे काही नसते. सपाट गुळगुळीत डांबरी रस्ता.

तरतरीत शरीराने आणि उल्हसित मनाने हाती काठी फिरवीत मी घराशी पोहोचतो. गरम चहाचा पत्तिगंध !

’वनस्पतिशास्त्र किंवा तत्सम एखाद्या शास्त्रातील विशिष्ट कामात मी गुंतलेलो नाही. परंतु जगलो वाचलो, तर निसर्गाबद्दल सांगण्यासारखे मात्र माझ्यापाशी पुष्कळच असेल.' असे तो आधुनिक ऋषी थोरो म्हणाला होता. बापडा पन्नाशीच्या आतच देवाघरी गेला. माझी उमेद एवढीच आहे की, जगलो वाचलो तर निसर्गापासून थोडा अधिक आनंद मी मिळवेन आणि तो तिळगुळासारखा वाटेन!

-oOo -

पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. ५६-५९.

(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा