गुरुवार, ३ ऑगस्ट, २०२३

सहकार आणि संघर्ष

दुसरी एक मजेची गोष्ट मी सारखी पाहत होतो. म्हशींच्या मागे, पुढे गायबगळे सारखे टपून होते. या थोराड जनावरांच्या चारीही पायांनी आणि त्यांच्या मुस्कटांनी गवतातून उडणारे टोळ, गवळणीसारखे कीटक, अळ्या, सरडे, उंदरं, बेडकं असं त्यांचं खाद्य फार शोधाशोध न करता आयतं त्यांना मिळत होतं. म्हशी पुढं सरकल्या की, उडण्याची तकलीफ न घेता हे पांढरेधोट बगळे वाहनात बसून मजेनं जावं, तसं त्यांच्या पाठीवर, शिंगावर बसून जात होते आणि यात काही गैर आहे, ही पाखरं आपला भलताच फायदा उठवीत आहेत, असं म्हशींना वाटत नव्हतं. पाखरांची चालण्याची शक्ती ती किती? म्हणून ते या वाहनांचा उपयोग करून घेत असावेत. हेच बगळे गेंड्याच्या भोवतीही गर्दी करून होते. हरणाच्या पाठीवर लहान साळुक्या होत्या, काळे कोतवाल होते. जनावरं खाली बसून चरत होती आणि ही लहान पाखरं त्यांच्या पाठीवर बसून होती. एखादा लठ्ठ टोळ दिसला की, तेवढ्यापुरती गिरकी घेऊन त्याला मटकावत होती आणि पुन्हा पाठीवर बसत होती. उंचावर असल्यामुळे त्यांना सगळीकडे नजर ठेवता येत होती. माना वेळावून ती दाही दिशांना बघू शकत होती. कुठं धोका जाणवला की, ओरडून ओरडून गेंड्यांना, हरणांना, म्हशींना इशारा देत होती. हिरव्यागार गवतातून अचानक फर्रकन तीन-चार पांढरेधोट बगळे उडत आणि जरा पुढं जाऊन बघावं, तर निळ्या पाण्यात डुंबणारा काळाधोप गेंडा दिसे! पाठीवरचे बगळे असे उडताच तो सावध होऊन उठलेला असे. ही लहान पाखरं जनावरांच्या पाठीवरूनच सफर करतात असं नाही, तर चार-पाच फूट उंचीचा बस्टार्ड पक्षी जेव्हा गवतातून चालतो, तेव्हा त्याच्या पाठीवर बसूनसुद्धा कोतवालासारखा एखादा लहानगा पक्षी आपण हत्तीवरून जावं, तसा जातो. वाहनाचा आनंद माणसानंच घ्यावा, असं थोडंच आहे!

जंगलातील दिवस

रान काढून सावज उठवण्याचं काम मोठी जनावरं करतात आणि ही पाखरं आपली शिकार साधतात. मोठी जनावरंही पाखरांचं हे अंगाखांद्यावरचं खेळणं सहन करतात. कारण जिथं शिगं, खूर, शेपूट पोहोचत नाही अशा अवघड जागी चिकटून रक्त पिणारे त्यांच्या अंगावरचे लहान लहान कीटक ही पाखरं मटकावून त्यांना सुख देतात. माझा अंदाज आहे की, लहानसहान बलुतेदार पूर्वी जसे एकएक मोठा शेतकरी, आपलं कूळ म्हणून धरून ठेवीत, तशी ही पाखरंही एकच कूळ धरून ठेवत असावीत. मैना-साळुंक्यांच्याच कुळातला एक पक्षी oxpeckers असं करतो. आफ्रिकेतल्या गेंड्याशी आणि रानम्हशी-रेड्यांशी त्याचं असं कूळ-बलुतेदाराचं नातं असतं. मोठ्या कळपांपैकी एकच जनावर तो धरून असतो. सगळा जन्म तिथंच काढतो. रेड्याच्या पाठीवरच त्याचं सगळं खाणं, मादी शोधून तिच्याशी प्रियाराधन करणं, हनिमून! जे जगाच्या पाठीवर माणसं करतात, ते सगळं तो रेड्याच्या, गेंड्याच्या पाठीवर करतो. त्याच्या पायाची नखं चांगली धारदार आणि जनावराच्या कातडीशी लटकण्याजोगी पकड असणारी असतात. तोल सावरायला उपयोगी पडेल, अशी लांब, ताठ शेपटी असते. आखूड, सपाट अशी चोच असते. तिचा कात्रीसारखा उपयोग करून तो अडचणीत शिरून बसलेल्या गोचड्या, गोमाश्या खतो आणि समोर धोका दिसला की, वारंवार ओरडून, आपल्या कुळाच्या डोक्याभोवती चकरा घेऊन त्याला सावध करतो.

कुणातरी हुशार फोटोग्राफरनं घेतलेला एक उत्तम फोटोग्राफ पाहिलेला मला आठवतो. आफ्रिकेतल्या जंगलात प्रचंड शिंगांचा आणि गलेलठ्ठ मानेचा मोठा काळवीट वाहत्या धारेत उभा राहून पाणी पितो आहे आणि त्याच्या हनुवटीला उलट लटकून दोन oxpeckers ही पाणी पिताहेत.

असं हे गुण्यागोविंदानं नांदणं असतं. वेगवेगळ्या प्राण्यांचे कळप शांततामय सहजीवनाचे चाहते असतात. मारामारीसाठी मारामारी सहसा होत नाही. कधी होते, ती मादींच्या पायी नरानरांतच! तीही जीव घेण्याच्या इराद्याने नाही, तर फक्त मी बलिष्ठ आहे, हे सिद्ध करण्यासाठी! रक्तपात असा घडत नाही.

आणखी लठ्ठालठ्ठी होते ती हद्दी सांभाळण्यासाठी. ही भांडणं विशेष करून पाखरांत होतात. ही माझी हद्द, ही तुझी हद्द ही जिद्द पक्ष्यांत फार असते.

साध्या मैना बघा. नळावर बाया भांडतात, तशा त्वेषाने भांडतात. एकमेकींच्या अंगावर धावून जातात. लाथा झाडतात, मारतात. एकमेकींचे केस ओढतात.

मैना कशाला, साध्या घरचिमण्या भांडताना बघा! मोठं बघण्यालायक भांडण असतं. ही भांडणं हद्दीवरून होतात. खेड्यापाड्यांत शेताचा बांध रेटण्यावरून जशा हाणामार्‍या होतात, त्यापैकीच हाही प्रकार!

रानातली जनावरंही आपापल्या हद्दी ठरवून टाकतात आणि आपल्या हद्दीत दुसरा कोणी आल्याचं त्यांना मुळीच खपत नाही. कोल्हे, लांडगे, खोकड आपली हद्द जाहीर व्हावी म्हणून झाडांच्या खोडांवर, दगडांवर मुताची तुरतुरी सोडतात. गव्यासारखे दांडगे प्राणी शिंगानं झाडांच्या साली फाडून ठेवतात. आपल्या हद्दीतल्या झाडावर आपला वास ठेवण्यासाठी नरगवा आपल्याच मूत्रात लोळतो. त्या चिखलानं अंग भरवून घेऊन ते झाडाच्या बुंध्याला घासतो. आपल्याकडच्या हरणांच्या डोळ्यापाशी वासाची अशी एक ग्रंथी असते. ती ग्रंथी झाडांच्या फांद्यांना घासून ते आपला वास तिथं लावून ठेवतात. परहद्दीतल्या नरानं तो वास घ्यावा आणि समजावं की, हे रान दुसऱ्याच्या मालकीचं आहे. मग त्यानं दांडगावा करून मारामारी करावी, जय मिळवावा किंवा पराजय पत्करून माघार घ्यावी.

काही जनावरं आवाज उठवून आपली हद्द जाहीर करतात. पक्षी आवाज करतात, ते केवळ मादी धावत यावी म्हणून नव्हे; तर आपल्या हद्दीची खूण म्हणून! अर्थात बारा महिने तेरा काळ आपली हद्द सगळेच सांभाळत नाहीत. वर्षातले काही महिनेच ही बांधांची आखणी होते. एरवी कोणी कुठंही हिंडतो. हरणाच्या बाबतीत जेव्हा नर माजावर येतात, तेव्हाच माद्यांच्या कळपात शिरतात. एरवी वर्षभर माद्या- पोरं एका कळपानं आणि नर एका कळपानं असे हिंडतात. कळपानं राहणं एवढंच संरक्षण!

- oOo -

पुस्तक: जंगलातील दिवस.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती नववी.
वर्ष: २०२२.
पृ. २१-२५.

(पहिली आवृत्ती: १९८४. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा