शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३

माकडे, माऊली आणि मुली

चित्रे आणि चरित्रे

गुडालबाईची ही माकडं सर्वांत जास्त हुशार, चिंपॅन्झी जातीची. दिसायला भीतिदायक आणि शक्तीनं दांडगी (एकेका पूर्ण वाढलेल्या माकडाला तीन पुरुषांचं बळ असतं.), तीही वर्षानुवर्षं जंगलात स्वैर राहिलेली. माणसांचा वारा त्यांना माहीत नाही. आपण म्हणतो, माकडं शाकाहारी असतात. फळं, कोवळा पाला, कोंब, धान्यधुन्य– असलं काहीबाही खातात. शाखामृगच ते! पण ही समजूत निदान चिपॅन्झीच्या बाबतीत तरी खोटी. ती केवळ शाकाहारी नाहीत; अधून-मधून त्यांना कच्चं मांस खायला आवडतं. गोम्बे स्ट्रीम ह्या भागातही चिंपॅन्झी माकडं दंगाधोपा करून एखादं हरिण किंवा रानडुकराचं पोर अचानकपणे पकडत आणि बोल-बोल म्हणता त्याचा फन्ना उडवत.

बाबून माकडं, तांबडी कोलोबस माकडं, निळी माकडं, तांबड्या शेपटीची माकडं– ही लहान जातीची माकडंसुद्धा त्यांचा घास होत. गोम्बे स्ट्रीम भागात गुडालबाई जाण्याच्या आधीच दोन आफ्रिकन बाळं ह्या माकडांनी पळवली होती. एका पोराची सुटका झाल्यावर दिसून आलं की, त्यांचं थोडंसं अंग माकडांनी खाऊन टाकलं आहे. म्हणजे, नरमांसही त्यांना वर्ज्य नव्हतं.

बाईंना मात्र ही गोष्ट आश्चर्याची वाटलेली नाही. त्यांनी लिहिलं आहे :

‘चिपॅन्झी माकडं माणसांची पोरं धरून खातात, ही गोष्ट काही लोकांना फार भयानक वाटते. पण त्यात विशेष काय आहे? चिपॅन्झींना माणसं ही बाबून माकडासारखीच एक जात वाटते. आणि चिंपॅन्झी माकडं पकडून त्यांची शिकार करून काही लोक खातात, ही डेलिकसी समजली जाते; हे भयानक का नाही?’


अगदी लहानपणापासून जेनला वन्य प्राण्यांबद्दल आकर्षण होतं. ही पोर एक वर्षाची असताना आईनं खेळणं म्हणून तिला कापडी बाहुलं दिलं. ते होतं भलंमोठं. केसाळ, काळंभोर असं चिपॅन्झी माकडाचं पोर. लंडनच्या प्राणिसंग्रहालयातली माकडीण पहिल्यांदाच व्याली होती आणि ज्युबिली नावाचं केसाळ पोर तिला झालं होतं. अशी खेळणी बाजारात लगोलग आली होती. पोरीला असलं खेळणं देऊ नका, ती भीती घेईल, असं शेजारपाजारणींनी जेनच्या आईला बजावलं; पण तसं काही झालं नाही. हे भयानक खेळणं जेनला फार आवडलं. कुठंही जाताना ती त्याला काखोटीला मारून घेऊन जाई. त्याच्यावाचून तिला चैन पडत नसे.

अगदी लहानपणीच एके दिवशी जेन घरातून नाहीशी झाली. कुठं गेली, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. घबराट झाली. शोधाशोध झाली, तरीही सापडली नाही. शेवटी रडवेल्या आईनं पोलिसांत वर्दी दिली. आणि पाच तासांनंतर ही पोर कोंबड्यांच्या खुराड्यातून बाहेर येताना दिसली. इतका वेळ तिथं बसून ती कोंबडी गुळगुळीत अंडी कशी घालते, ते बघत होती म्हणे!

(…)(१)

सगळी प्राथमिक तयारी झाली. पण ‘किगोमा’ ह्या भागातले सरकारी अधिकारी एका गोष्टीला अजिबात राजी होईनात. एक युरोपियन बाई जंगलात एकटी राहील कशी? तिच्या सोबतीला कोणी तरी गोरं माणूस पाहिजे. ते नसलं, तर आम्ही परवानगी देणार नाही, म्हणून ते हटून बसले. चांगलीच पंचाईत झाली. काय करावं?

शेवटी जेनची आई म्हणाली, “अगं, निराश का होतेस? मी राहीन तिथं तुझ्या सोबतीला.”

मग सगळा प्रश्न सुटला.

ह्या माय-लेकी प्रथम किगोमा ह्या लहानशा गावी गेल्या आणि तिथून लाँचनं ‘गोम्बे स्ट्रीम रिझर्व्ह’ला यायला निघाल्या. सरोवरातल्या स्वच्छ निळ्या पाण्यातून बोट चालू लागताच जेन मनात म्हणाली, ‘बहुतेक ही लाँच बुडेल किंवा मी एकटी सरोवरात पडेन आणि सुसरी मला खातील...’

पण तसं झालं नाही. लाँचमधे उभी राहून, सरोवराच्या पूर्व बाजूनं दूरवर पसरलेल्या टेकड्या जेननं पाहिल्या. अडीच हजार फूट उंचीच्या ह्या टेकड्या, जंगलतोडीमुळं कुठं कुठं उघड्या दिसत होत्या. ठिकठिकाणच्या दऱ्यांतून मात्र दाट झाडी होती. सात मैल प्रवास होताच डोंगराचं रूप एकदम बदललं. दाट जंगलानं भरून गेलेले उंच डोंगर दिसले. किनाऱ्यावर कुठं कुठं ठिपक्यांप्रमाणं कोळ्यांच्या झोपड्या दिसल्या. कधी न पाहिलेलं ते दाट जंगल बघून जेनची आई घाबरून गेली. सोबतीला असलेला अधिकारी मनात म्हणाला, ‘सहा महिन्यांच्या आत ह्या बाया गाशा गुंडाळून नाही पळाल्या, तर नाव बदला माझं !’

(…)

पुढं आजार आला, मलेरियासारखा. जेन आणि बरोबर आलेली तिची आई आजारी पडली. त्यात तीन महिने गेले. जेन लवकर बरी झाली. आईला बराच काळ अंथरुणावर पडून राहावं लागलं.

(…)

मग एका-एका चिपॅन्झीला जेन ओळखू लागली. कोणाचा चेहरा पाहून कोणी तरी ओळखीचं माणूस आठवलं की, त्याचं नाव ती त्या माकडाला देई.

एक म्हातारा टकल्या नर होता तिशी-चाळिशीतला. (प्राणिसंग्रहालयातला एक चिपॅन्झी सत्तेचाळीस वर्ष जगला, अशी नोंद आहे.) त्याच्या मानेवर, दोन्ही खांद्यांवरही केस नव्हते. जेननं त्याला नाव दिलं: ‘मिस्टर मॅक ग्रेगोर.’ हा नेहमी जेनला भीती दाखवायचा. भयानक ओरडायचा. झाडावर चढून डहाळी जोरजोरानं हलवायचा, डोकं हलवायचा आणि झाडीत शिरून दिसेनासा व्हायचा.

एक होती प्लाव, बेढब नाकाची आणि फाटक्या कानाची. तिला दोन वर्षाचं पोर होतं. त्याचं नाव फिफी. आईच्या पाठुंगळी बसून ते हिंडायचं. तिच्यापेक्षा मोठा होता पोरगा. सहा-एक वर्षांचा असावा, तो फिगन. आपली आई आणि धाकटी बहीण यांच्या भोवती-भोवती तो असायचा.

–आणि दोघं जण होते. एक गोलिथ आणि दुसरा डेव्हिड. बायबलमधली ही नावं जेननं त्यांना दिली होती. गोलिथ तरणा आणि पहिलवानासारखा सुदृढ बांध्याचा होता. त्याचं वजन शंभर पौंड असावं. डेव्हिडला पांढरी दाढी होती. तो स्वभावानं शांत होता. तो जेनला जवळून निरीक्षण करू द्यायचा.

ह्या डेव्हिड मे बिअर्डमुळं जेनला महत्त्वाचे दोन शोध लागले. तो तिला एकदा डुकराचं पोर खाताना दिसला. चिंपॅन्झी शिकार करून मांस खातात, हे तोपर्यंत तिला माहीत नव्हतं.

– आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात थोडासा पाऊस पडून गेल्यावर गवत उगवलं होतं. डोंगरांचे उतार हिरव्यागार गवतानं आणि रंगीबेरंगी फुलांनी भरून गेले होते. ह्या दरीतून त्या दरीत असे खूप भटकूनही जेनला काही बघायला मिळालं नव्हतं, ती वैतागली होती. ओल्या झाड-झाडोऱ्यांतून चालून ओलीचिंब झाली होती. एवढ्यात साठ-एक फुटांवर उंच गवतात काही हालचाल तिला दिसली. दुर्बिणीतून बघितलं, तर हा डेव्हिड होता.

तांबड्या मातीच्या वारुळाशेजारी तो बसला होता. जेननं नीट न्याहाळून पाहिलं, तर गवताची लांब काडी घेऊन त्यानं ती वारुळाच्या बिळात खाली घातली, बाहेर काढली आणि तिच्या टोकाला जे लागलं होतं, ते वेचून खाल्लं. साठ फुटांवरून त्यानं काय खाल्लं, हे दिसलं नाही; पण त्यानं अकलेनं साधनाचा उपयोग केला, हे तिला कळलं.

एक तासभर त्याचा हा उद्योग चालला होता. डेव्हिड निघून गेल्यावर जेन वारुळापाशी गेली आणि गवताची गाडी तिनं एका बिळात खुपसली. लगेच तिला जाणवलं, की काडीला ओढ लागली आहे. काडी बाहेर काढताच तिला चिकटलेल्या अनेक वाळवी तिला दिसल्या. लहान-मोठ्या डोक्याच्या शिपाई वाळवी होत्या. काही कामकरी होत्या.


पुढं निरीक्षणात जेनला दोन गोष्टी पाहायला मिळाल्या. एका माकडानं बी फोडण्यासाठी दगड वापरला. आणखी एकदम दिसलं की, जमिनीच्या आत पोळं लागलं आहे. माकडं त्या भोकात काड्या खुपसताहेत आणि त्यांना लागलेला मध चोखताहेत.

जेन लिहिते, 'आजवर माणसाची व्याख्या विशिष्ट पद्धतीची साधनं, हत्यारं बनवून त्याचा वापर करणारा प्राणी अशी होती. आता एक तर ही व्याख्या बदलली पाहिजे, नाही तर चिंपॅन्झीला माणूस म्हटलं पाहिजे.'

हा शोध फार महत्त्वाचा होता. जेननं लगेच तो तारनं डॉ. लुईंना कळविला.

ह्या शोधामुळंच अमेरिकेतील नॅशनल जिऑग्राफी सोसायटीने जेनला आणखी एक वर्ष अभ्यास करण्यासाठी ग्रँट दिली.

जेनला पहिल्या पाच महिन्यांत आईची फार मदत झाली. तिची आई आजूबाजूच्या खेडुतांना औषधं देई आणि त्यांच्याशी मैत्री करी. त्यामुळं मुक्काम सुसह्य झाला. पुढं आई इंग्लंडला निघून गेली. जेन एकटीच राहिली. रात्री कॅपमध्ये शेकोटी पेटल्यावर फक्त दिव्याभोवताली जमलेले कीटक खाण्यासाठी नेहमी येणारा मोठा बेडूकच तिच्या सोबतीला राहिला.

(…)

जेन दिवसभर डोंगरात अठरा महिने काम करीत राहिली. पहाटे साडेपाचलाच गजर लावून ती जागी होई. ब्रेडचा तुकडा आणि कॉफीचा कप घेऊन डोंगरात जाई. जंगलात भटकताना अन्नाची गरजच तिला भासली नाही. डोंगरमाथ्यावर पाणी होतं आणि तिथं केलेल्या कॉफीला विशेष चव होती. अंधार पडायला लागल्यावर ती खाली उतरे आणि कँपवर आल्यावर दिवसभर जे पाहिलं, त्याची टिपणं करीत रात्री उशिरापर्यंत जागे. साहजिकच, अंगावरची चरबी झडली आणि जेन फार वाळलेली दिसू लागली.

दरम्यान, चिपॅन्झीचे फोटोग्राफ घेण्यास तिची बहीण ज्युडी आली. नॅशनल जिऑग्राफिक सोसायटीला हवे होते, म्हणून.

जेनची कळा बघून ती हादरून गेली. आपली बहीण अंगानं सुधारावी, म्हणून ती रोज काहीबाही चांगलंचुंगलं, गोडधोड करून ठेवू लागली; पण जेनला काही इच्छा नसे. कस्टर्ड, पॉरिज, हॉर्लिक्स वाया जाऊ नये, म्हणून ज्युडीच दोघींच्या वाटचं खाऊ लागली. त्यामुळं ती फार लठ्ठ झाली.

डिसेंबर महिन्यात कँप संपवावा लागला, कारण लुईनं जेनचं नाव पीएच.डी. साठी केंब्रिज विद्यापीठात दिलं होतं. तिला अॅडमिशनही मिळाली होती. बी.ए. ही पदवी नसतानासुद्धा पीएच.डी. करणारे जे अगदी थोडे विद्यार्थी होते, त्यांपैकी एक जेन होती. 'वन्य प्राण्यांच्या सवयी' हा तिचा पीएच.डी.चा विषय होता.


नैरोबीला ह्या दोन्ही बहिणींना लुई भेटला आणि लगोलग त्यानं जेनच्या आईला तार केली :

‘Girls arrived safely Stop One thin one fat’

‘दोन्ही मुली सुखरूप पोचल्या. एक लुकडी– एक जाडी’

-oOo-

पुस्तक: चित्रे आणि चरित्रे .
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती चौथी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२१.
पृ. ६४-६५, ६७-६८, ६९, ७१, ७१-७३, ७५.

(पहिली आवृत्ती: १९८३).


(१) मूळ पुस्तकामध्ये (…) इथे काही मजकूर आहे, या वेच्यासाठी निवडलेल्या सूत्राशी सुसंगत नसल्याने तो वगळलेला आहे.


हे वाचले का?