ग्रेसचे ‘चर्चबेल’ वाचून बराच काळ लोटला. त्यातील काही अनुभव अधूनमधून मनाच्या तळातून पृष्ठभागावर येत असतात.
अलीकडे विशिष्ट हेतूने व्यंकटेश माडगूळकरांची बरीच पुस्तके आणली. त्यातील ‘वाटा’मध्ये त्यांनी गुलमोहरावर एक सुरेख लेख लिहिला आहे. तो वाचून चर्चबेलमधला ग्रेसचा गुलमोहर आठवला.
रोचक बाब म्हणजे या दोन लेखकांच्या मूलभूत प्रवृत्तीचे प्रतिबिंब या दोन लेखांत उमटलेले आहे. ग्रेस अंतर्मुख, त्यांच्या मनाच्या तळाशी जे रसायन मंदपणे उकळते त्याला वाट पुसतु जाणारे; तर माडगूळकर जगण्यातील अनुभवांकडे चालत जाणारे, त्यांना वेचून आपली पोतडी भरत जाणारे. ग्रेसचा गुलमोहर त्यांनी साक्षीभावाने अनुभवलेला, नेणिवेत मुळे रोवणारा; गाडगूळकरांचा क्रियाशील आमंत्रणानंतरही निसटून जाणारा.
एकापाठोपाठ वाचण्यासाठी हे दोनही लेख इथे एकाच पोस्टमध्ये समाविष्ट केले आहेत.
लहानपणी दहा-बारा वर्षांचा असताना मी कांचनवाडीला गेलो होतो. कांचनवाडीला नदी नाही आणि डोंगरही नाही. मला आवडणाऱ्या खेड्याच्या चित्रात किमानपक्षी एखादी नदी, नाहीतर पाण्याचा नदीसदृश प्रवाह, डोंगर आणि देऊळ असावयास पाहिजेतच. त्याशिवाय मी खेड्याचे अस्तित्व कल्पनेच्या पातळीवरही गृहीत धरू शकत नाही. खेडे असो की नगर, त्यांच्या आकर्षणांच्या भौतिक आणि लौकिक दृश्यांवरून अनुभूतीचा उत्कट प्रदेश माझ्या मनोभूमीत रुजत नाही. शहर, नगर आणि खेडे यांच्या अनुभूतीच्या सौंदर्याचे माझे निकष थोडे वेगळे आहेत.
सूर्योदय आणि सूर्यास्ताची भिन्न भिन्न अंशांतून, भिन्न भिन्न कोनांतून परावर्तित होणारी आभा हाच तो निकष होय! एखाद्या अत्याधुनिक शहरातील सूर्योदय मी माझ्या पद्धतीने स्वीकारतो, भोगतो. व्हिक्टोरियन पद्धतीच्या एखाद्या टुमदार बंगल्यावरून उतरणारी संध्याकाळची सूर्यशोभा तुम्ही पाहिली आहे काय ? मी पाहिली आहे. केरळात. सूर्याची मंद, कोमट, हळुवार आणि थकलेली किरणे फादर ग्रीनच्या खिडकीवरून जायची, त्यावेळी फादर ग्रीन ख्रिस्ताच्या मूर्तीसमोरील मेणबत्तीच्या निळसर काचा स्वच्छ करीत उभे असायचे. पठाणांप्रमाणे असलेल्या त्यांच्या तांबूस देखण्या दाढीवर अस्तगामी सूर्याचे चिमूटभर ऊन कितीतरी वेळ रंगाळत राहायचे...
ज्या खेडयात नदी नाही, डोंगर नाही, देऊळ नाही, तिथली सूर्ययात्रा निष्पर्ण पारावर भरलेल्या बाजारासारखी मला वाटते; कोरडी आणि भगभगीत. डोंगरामागून सूर्य यावा आणि देवळातील झांझरत्या घाटेने कातर होऊन नदीच्या पाण्यात बुडून जावा म्हणजे प्राणांच्या चिद्विलासात उभ्या असलेल्या माझ्या खेड्याची दिवेलागण होऊ लागते !
कांचनवाडीचा स्वीकार एक खेडे म्हणून मला करता आला नाही तो एवढ्याच करता. मला वाटते, आपल्या सगळ्यांच्याच स्वीकार नकाराच्या तर्हा कमी-अधिक फरकाने याच रेषेवरून जात असाव्यात. ती रात्र चैत्र पौर्णिमेची होती. निदान असावी असे वाटते. नीटसे आठवत नाही. मध्ये पुष्कळ वर्षे निघून गेलीत. पण अंगावरून वाहून गेलेला चांदण्याचा लोळ मात्र अजूनही कायम आहे; माझ्या देहात. आमच्या घराशेजारी असलेल्या गोशाळेपासून साधारणपणे एक-दोन फर्लांगावर तीन एकरांचे एक शेत होते. त्या शेतात फक्त गुल्मोहराचीच झाडे दिसत होती. सोन्याच्या मऊशार लगडीसारख्या जमिनीत कोणत्या महाभागाने ती गुल्मोहराची नगरी वसवली होती देव जाणे! परवा कलकत्त्याला गेलो होतो. तेथील रेड रोड पाहिला. अंदाजे मैल दीड मैल रस्त्याच्या दोन्हीही बाजूंना गुल्मोहराची झाडे दिसत होती. तांबड्या, शेंदरी आणि लाल फुलांच्या झुबक्यांनी लगडलेली. उन्हाची मधोमध उमटलेली दीर्घ अरुंद वाट सोडून मी गुल्मोहराच्या छायावाटेने रेड रोडला अनेकदा पांथस्थ झालो. या रेड रोडवरची उन्हाची दीर्घ वाटही तशी कमी सुखकारक नाही. हुगळीच्या पाण्यावरून निघालेल्या वायुलहरी इथपर्यंतही सोबत करतात ! कोणास ठाऊक, कदाचित आडभागाला असल्यामुळे असेल म्हणा पण हा रेड रोड मला कमालीचा निर्मनुष्य आढळला. अशा निर्मनुष्य वाटेवरून तुम्ही घोड्यांच्या गाडीत बसून एकट्यानेच कधी गेलात काय ? एका काळोख्या रात्री, या रेड रोडवरून मी घोडागाडीत बसून गेलो आहे. तान्यांनी खचलेल्या आकाशाच्या दृष्टिदग्ध पार्श्वभूमीचे अनंत किरण, हातातील अंगठीत बसविलेल्या रत्नाप्रमाणे गुल्मोहराच्या लाल, शेंदरी, तांबड्या झुबक्यांवर किणकिणत असतात आणि घोड्यांच्या मंदपणे सरकणाऱ्या टापांचे अपूर्व विश्व अधिक मूलगामी, अधिक गूढ़ होत जाते... अशा वेळी टॉलस्टॉलच्या ॲनाप्रमाणे आपणही घोडागाडीत एकटेच असतो आणि अंतर कापीत येणारा मॉस्कोच्या विक्राळ स्टेशनचा शूळ आपल्या ललाटावर रोखलेला असतो. काळोखी चांदण्यातील गुल्मोहराचे झुबकेदार रंगविश्व घोड्यांच्या टापांत उतरले की आपणही तक्रार न करता म्हणून जातो—
Why not put out the light when
there is nothing more to look at...
गुल्मोहराच्या नगरीत शिरताच एरव्ही सौम्य भासणारे चैत्रचांदणे मला एकदम भडक वाटू लागले. नंतर चूक लक्षात आली. गुल्मोहराच्या रंगधारांचा एक भाग म्हणजे चैत्रचांदणे होते. हा भडकपणा मात्र कोणत्याही स्थूल अर्थाचे निवेदन करणारा नव्हता. कांचनवाडीतील गुल्मोहराची चित्कळा मला भडक वाटली यांचे कारण गुल्मोहर हा एक भडक रंगाचा वृक्ष आहे, ही जाणीवच माझ्या संवेदनांना स्पर्शन गेली नव्हती. ही किमया चांदण्यामुळे तर घडून आली नव्हती ना ? किमयागार शक्तिमंत असावा लागतो. चैत्रचांदण्याच्या वेलीत हे बळ कुठचे असणार ? गुल्मोहराची विशाल झाडे, त्यांचे संघ चंद्रकिरणांचे पाणी शोषून घेत होते आणि मग परतलेले चांदणे आपला निळसरपणा सोडून लालभडक होऊन जात होते. मात्र गुल्मोहरी त्वचेचा आभास जोगवा नाकारणाऱ्या हट्टी भिक्षूप्रमाणे अभंग होता. माझ्या प्राणांत चांदण्यांची टिंबे, गुल्मोहराच्या भडक रंगाचे थेंब, की काळोखाची पिसे उमलत होती हेच कळेनासे झाले होतं. गुल्मोहर आणि मोर यांच्यात केवळ उच्चारसाम्यच नाही. आणखीही दुसरे नाते आहे. मोर हा प्राणी मला त्याच्या भडक आणि वेतासारख्या तंगणामुळेच आवडतो. गुल्मोहरही भडक आहे. रामायणातील श्रावणाची कथा काय थोडी भडक आहे ? तिचा भडकपणा नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर काय होईल ? मोर शिल्लक राहणार नाही; गुल्मोहराच्या झाडांचे आयुष्य नष्ट होईल आणि वाल्मीकीच्या प्रतिभेला होणारी जखम कधीही भरून येणार नाही. श्रावण काळोखाच्या तळ्यात आपल्या आई-वडिलांच्या तहानेचे पात्र बुडवितो आहे; बुडबुडणाऱ्या आवाजाचे चैत्रचांदणे दशरथाच्या प्रत्यंचेला ताणीत आहे आणि गुल्मोहराने आपल्या जीवनग्रंथींचा रस एकवटून सजविलेले रक्तदार बहरांचे लालभडक संगीत श्रावणाच्या काळजात रुतले आहे... श्रावणाच्या वृद्ध मातापित्यांची हाक वाऱ्याने उधळलेल्या मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे माझ्या सर्वागभर पसरली आहे...
पुस्तक: चर्चबेल.
लेखक: ग्रेस.
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन.
आवृत्ती दुसरी (पुनर्मुद्रण).
वर्ष: २०००.
पृ. ९-११.
-oOo -
अगदी लहान वयापासून मी काही महत्त्वाकांक्षा बाळगून होतो आणि त्या पुर्या करायच्याच असा दृढनिश्चय मी मनोमनी केलेला होता. अगदी पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण एक उत्तम बंदूक घ्यायची आणि रानोमाळ भरपूर भटकायचे. दुसरी गोष्ट म्हणजे आपली आपण अशी एक छान लायब्ररी करायची आणि त्या लायब्ररीतल्या टेबलाशी लिहिण्यासाठी खुर्ची ठेवायची, ती गर्रकन फिरणारी, मागे रेलणारी अशी. शिवाय या लायब्ररीच्या खोलीतून समोर पाहिले की, मखमली फुलांनी लहडलेला गुलमोहर दिसला पाहिजे.
माझा मी मिळवू लागलो आणि पहिल्या दोन-तीन वर्षातच मी बंदूक घेऊन टाकली. आपल्या आवडत्या लेखकांची पुस्तके खरेदी करणेही सुरू केले. पण स्वतःचे घर, लायब्ररीसाठी स्वतंत्र खोली, फिरती खुर्ची आणि गुलमोहोर हे व्हायला वयाची पस्तिशी उलटली!
घर बांधून होताच प्रथम मी गुलमोहोराचे रोपटे पैदा केले आणि एका कोपऱ्यावर लावूनही टाकले.
काय असेल ते असो, बागेत बाकीची एवढी झाडे लावली, पण त्यात हा गुलमोहोरच तेवढा वेड्यासारखा वाढला. त्याला मोठे होण्याची घाईच झाली होती. पांच-एक वर्षांत चांगला ताडमाड वाढून वृक्ष म्हणावा एवढा झाला. फांद्यांचा प्रचंड विस्तार दिसू लागला. येणारे-जाणारे विचारू लागले, "काय हो, प्लॉट घेतला तेव्हा हा गुलमोहर होता वाटतं?"
"छे, नंतर लावला. "
"हो? अरे वा! छान वाढला हं.
कोणी जाणत्याने धोक्याची सूचनाही दिली- इमारतीपासून दहा फुटांच्या आत मोठा वृक्ष असू नये. त्याच्या मुळ्या इमारत अधू करतात. मी या सूचनेकडे दुर्लक्ष केले. अद्यापि फुलावर आला नव्हता, तरी हा पुष्ट गुलमोहर माझ्या लेखनाच्या खोलीवर छत्र धरावे, असा पसरलेला होता. पाखरांच्या पंखाप्रमाणे असलेली त्याची हिरवीकंच पाने डोळ्यांना आल्हाद देत होती. बुलबुल, मैना, साळुंखी असले अपूर्वाईचे पक्षी त्याच्या थंडगार छायेला आले आणि मंजुळ शब्द करू लागले की, माझ्या दारी हा कल्पवृक्ष उभा आहे, असे मला वाटे. अंगणात त्याची सावली होतीच, पण आजूबाजूच्या झाडांमुळे, घरामुळे तो बराचसा रस्त्यावरही झुकला होता. भर उन्हात त्याची थंडगार छाया रस्त्यावर पडे. आजूबाजूच्या बांधकामावर काम करणारे मजूर, बाया, मुले-बाळे विसाव्यासाठी या छायेत येऊन बसत. हात उशाला घेऊन निवांत झोपही काढत. कधीमधी एखादी कोरी करकरीत गाडी वा सावलीला ठेवलेली दिसे. आतल्या सीटवर ड्रायव्हर थंड झोपलेला असे.
संध्याकाळ झाली, थोडा काळोख पडला की, इतरत्र निऑन ट्यूब्जनी उजळून टाकलेल्या या रस्त्यावर, गुलमोहोराची गडद छाया सुरेख आणि सोयीस्कर जग म्हणून प्रेमिकांच्या कामाला येई. सारखे मागे-पुढे पाहात कोणी मुलगी, कोणी मुलगा या-त्या दिशेने येऊन पटकन सावलीत शिरत. आमच्या गुलमोहोराखाली एक नवे गाणे जन्माला येई.
वयाने पाच वर्षाचा झाला आणि एका मार्च महिन्यात याची पाने गळाली. वळसेदार फांद्यांचे आकार स्पष्ट दिसू लागले. मग पोपटी रंगाच्या कळ्यांचे घोस फांद्यांवर आणि फांद्यांच्या टोकाशी दिसू लागले. रोज शेकडो कळ्या उमलू लागल्या आणि बघता-बघता शेंदरी रंगाच्या फुलांनी गुलमोहराचा प्रचंड विस्तार गजबजून गेला. ऐन एप्रिल महिन्यात तर दृष्टी ठरेना एवढा हा वृक्ष फुलला.
हा पत्ता पाखरांना कसा लागला कोण जाणे, पण गडद मोरपंखी रंगाच्या फुलचुक्या, बुलबुल, मैना, कावळे यांची तोबा गर्दी होऊ लागली. कधी न दिसणारी धनछडी आणि भारद्वार ही पाखरेसुद्धा आमच्या दारी दिसू लागली.
वैभव पाहिले की, त्याभोवती मागतकऱ्यांचा वेढा पडावा, हे साहजिकच आहे. फांद्या खूप खाली होत्या. त्यामुळे रस्त्याने जाता-येता पोरीबाळी डहाळे मोडून घरी नेत. गुलमोहराची फुले नुसती पाहावीतच, झाडापासून तोडून नेऊन त्याचा काही उपयोग नाही. ती माळता येत नाहीत. फुलदाणीत ठेवता येत नाहीत का देवाला वाहता येत नाहीत, हे त्यांना कोणी सांगावे? लहान पोरे तर फुले हाताशी येत नाहीत, हे लक्षात येताच धोंडे मारीत. धोंडे मारून झाडावरची फुले पाडावीत, असे या बालकांच्या मनात कसे येई कोण जाणे! (आपण म्हणतो, पण लहान मुलेही स्वभावाने क्रूरच असतात. मांजराचे शेपूट ओढावे, कुत्र्याला धोंडा मारावा, फुलपाखराला काटा टोचावा अशी बुद्धी त्यांना होते.)
गुलमोहरावर अशी बेसुमार फुले फुलत होती. रस्त्यावर आणि बागेत कोमेजल्या पाकळ्यांचा सडा पडत होता. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या पायांखाली मखमली पायघड्या घातल्या जात होत्या.
बरे, एकदा बहार आल्यावर थांबावे की नाही! काही हातचे राखले तर बिघडते का?
पण हा वेडा जुलै महिन्यात पुन्हा एकदा फुलला. आमच्या गुलमोहराला मोठे होण्याचे जसे वेड होते, तसे सतत पुन्हा-पुन्हा फुलण्याचेही होते.
वाळल्या फुलांचे आणि पानांचे ढीग जेव्हा छपरावर साठू लागले, तेव्हा आमच्या माळीबोवांनी विचारले, “साहेब, हा तर पत्र्यावर गेला. आत आलेल्या या दोन फांद्या तोडल्या पाहिजेत. बाहेर रस्त्यावर वाढून द्या खुशाल."
मी चालढकल केली. चांगले वाढलेले झाड तोडावे का? पण फांद्यांचे वाढणे शबिच ना. मनात सारखे येऊ लागले की, वाऱ्या वादळात कधी फांदी मोडली, तर माझ्या अभ्यासिकेचा कपाळमोक्ष होईल.
मग एकवार घट्ट मनाने मी फांद्या तोडायची परवानगी दिली. हत्तीच्या पायाएवढ्या जाडीच्या दोन लांबलचक फांद्या छाटल्या गेल्या आणि गुलमोहराचे रूपाचे बेरूपच झाले! माझ्या मनाला ही गोष्ट फार लागली.
कोणतेही झाड म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने एक कलापूर्ण बांधकामच असते. खोडाची जाडी, जागोजाग फुटलेल्या फांद्या, डहाळ्या, वरचा पानांचा विस्तार, एकंदर उंची, झाडाला मिळालेला तोल, आकार, जमिनीतल्या मुळ्यांची जाडी आणि विस्तार हे सगळे जर लक्षपूर्वक पाहिले; तर यामागे उत्तम रचना आहे. हे ध्यानात येते. एखाद-दुसरी फांदी जरी आपण तोडली, तरी हा सगळा तोल बिघडतोच.
आमचा गुलमोहर सालोसाल फुलत होता. पण त्याचे रूप आता पूर्वीसारखे देखणे राहिले नव्हते.
पुढे काही वर्षांनी कुठे जमिनीखालचा नळ फुटला आणि घरातले पाणी बंद झाले. खाजगी प्लंबर बोलावून आणला. त्याने बागेत थोडी उकराउकर केली आणि सांगितले की, हे काम म्युनिसिपालटीच्या परवानगीवाचून करता येणार नाही. कारण नळ रस्त्याखाली फुटला आहे.
झाले! मी इकडे तिकडे याला त्याला फोन केले आणि फुटलेला नळ दुरुस्त करण्याचे काम कोणाचे, त्याचा तपास लावून त्यांना वर्दी दिली. तीन-चार दिवस घरात पाण्याचा ठणठणाट झाला. शेवटी म्युनिसिपालटीचे एक साहेब आणि तीन-चार मजूर आले. त्यांनी रस्ता उकरला. तो नेमका गुलमोहराच्या बुडाशी. बाहेरच्या रस्त्यापासून तो आमच्या पाण्याच्या मीटरपर्यंत दहा-बारा फूट खोल चर खणावा लागला. गुलमोहराच्या बुडाशी प्रचंड खोदाखोद झाली. त्याच्या लहान-मोठ्या मुळ्या छाटून छाटून हा एवढा ढीग घातला गेला. नळाच्या वर-खाली जेवढ्या म्हणून मुळ्या होत्या, त्या तोडल्या गेल्या.
त्या दोन फांद्या गेल्या. मुळ्या गेल्या. गुलमोहराने हाय घेतली. पुढचा पावसाळा चांगला होऊनही पूर्वीसारखा तो जोमाने फुटला नाही. गडद हिरवा असा पानांचा रंग विटका झाला. पानांचा आकारही आकसला. मार्च महिन्यात थोड्या कळ्या आल्या, थोडी फुले उमलली. आमच्या गुलमोहराचे सारे वैभव नाहीसे झाले. आता आपले भरत आले, असे त्याच्या मनानेच घेतले असावे.
पुढच्या वर्षी पाने झडली. ती पुन्हा येतील, म्हणून मी वाट पाहिली; पण पाने आली नाहीत, कळ्या आल्या नाहीत, फुले फुलली नाहीत.
मी मनात म्हणालो, 'गुलमोहर वठला की काय?"
ही शंका खरी ठरली. एवढा प्रचंड गुलमोहर वठून गेला. त्याचा सांगाडा तेवढा उभा राहिला. एखाद-दुसरा होला भर दुपारच्या वेळी त्याच्या निष्पर्ण डहाळीवर बसून खित्रपणे घुमू लागला.
मला आशा होती की, अजूनही फुटेल. लोक म्हणाले, "अहो, वठलेले झाड दारात असू नये. हे काढून टाका!"
मी म्हणालो, "राहू दे, वठले तरी शोभा आहे."
कोणी एक डबाबाटलीवाला एके दिवशी दुपारी आला आणि म्हणाला, "साहेब, रद्दी नाही, तर नाही, हे झाड तरी मला द्या. दहा रुपये देऊन माझं मी तोडून वाहून नेतो "
मी म्हणालो, "नाही द्यायचं.'
ऑस्ट्रेलियात मी पाहिले होते- एका सुंदर बांधलेल्या घरात अगदी प्रवेशद्वारातच एक वठलेले लहान झाड तसेच्या तस्से उभे केलेले होते. ते किती कलापूर्ण दिसत होते. मी मनात म्हणालो, 'हा गुलमोहर मी असाच माझ्या अभ्यासिकेत ठेवेन.'
चार-आठ दिवस गावाला गेलो. परत येऊन पाहतो, तर गुलमोहरचा सगळा विस्तार तोडलेला. घरच्या मालकिणीने परस्पर निर्णय घेऊन माळीबाबांना सांगितले होते, "तुम्ही हे झाड तोडा आणि सर्पण न्या."
विस्तार नाहीसा झाला; तरी बारा-एक फूट उंचीचे खोड, तीन फांद्या असे हे झाड अद्याप माझ्या दारात उभे आहे. तसेच मुळातून काढून अभ्यासिकेत उभे करावे का? दिल्लीला 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा' या संस्थेत, अल्काझी या थोर नाट्यशास्त्रज्ञाची ऑफिसची खोली आहे. तिच्यात असे उभे केलेले झाड मी पाहिले आहे. पण माझा गुलमोहर फार प्रचंड आकाराचा आहे.
आता असे करावे- सरळ बुंधा आहे तो मधोमध चिरावा. चार तुकडे करावेत. सिमेंटने ओतलेले पाय करून हे चार-चार फुटांचे तुकडे त्यावर टाकावेत आणि बागेत बसण्यासाठी त्याचे बाक करावेत.
मी असेच करेन. या गुलमोहराचे सर्पण कदापि होऊ देणार नाही! इतके दिवस लक्षात आले नाही, या पावसाळ्यात आले- वठलेल्या गुलमोहराच्यापासून पाच-एक फुटावर, कोयनेल कुंपणाच्या अडचणीतून डोके वर काढून गुलमोहराचे एक पोर उठले आहे. रुजून किती काळ झाला कोण जाणे, पण आजच ते माझ्या उंचीचे झाले आहे.
असो! गुलमोहराचा वंश बुडाला असे जे वाटत होते, ते खरे नाही! जगले वाचले, तर हेही पोर पाच वर्षात ताडमाड वाढून फुलाने बहरू लागेल.
-oOo -
पुस्तक: वाटा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती सहावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१८.
पृ. १३-१६.
(पहिली आवृत्ती: १९७६. अन्य प्रकाशन)