सोमवार, १८ डिसेंबर, २०२३

देवकथा बोलतात तेव्हा...

कांचीपुरम् किंवा कांची हे नाव आपण अनेकदा ऐकले आहे. कधी तिथल्या बालमजुरांच्या शोषणाबद्दलच्या हकिकती वाचून आपण हळहळलो आहोत, तर कधी तिथून आलेल्या शंकराचार्यांच्या आगमनाच्या, वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या वार्ता आपल्यापर्यंत पोहोचल्या आहेत. कधी तिथल्या रेशमी साड्यांचं प्राचीन, सुलक्षणी वैभव पाहताना आपण हरखलो आहोत, तर एखाद्या प्रवाशानं तिथल्या बाजारपेठेबरोबरच तिथल्या मंदिरांचं महत्त्वही आपल्याला ऐकवलं आहे.

जर दक्षिणेत गेलात तर कांचीला एकदा जरूर जा. प्रवासी माणसांचं प्रांजळ कुतूहल आणि उत्सुकता बरोबर घेऊन जा. मदुरा आणि कुंभकोणम्‌सारखंच हे देवळांचं गाव तुम्हाला दिसेल. हे कामाक्षीचं गाव. सारीपाट खेळताना शिवावर पार्वतीनं मात केली आणि आनंदाच्या भरात ती आदिमाया असं काही तरी बोलली की शिवमहेश्वराला ते बोलणं फारच लागलं, मुळातला तो साधाभोळा देव, पण रागावला की पहायला नको. त्यानं गौरीला म्हटलं, ‘कुरूप होशील आणि पृथ्वीवर जाऊन पडशील.’ शाप खरा ठरला आणि पार्वती कांचीला आली. इथं तिनं शिवाला प्रसन्न करून घेण्यासाठी मोठे तप मांडलं.

शिव मोठा अहंकारी नवरा निघाला. लहानशा थट्टेतल्या बोलण्यावरून तो इतका रागावला की, त्यानं पार्वतीला कुरूपच करून टाकलं. वर तिनं मांडलेल्या तपानंही त्याचं पुरे समाधान झालं नाही. मग त्यानं आपल्या जटेतून गंगेला खाली उतरवलं. मग नदीला पूर आला आणि पार्वतीचं पूजालिंग पाण्याखाली जाणार, या कल्पनेनं ती भयभीत झाली. पाणी वाढू लागलं तेव्हा स्वत:च्या जिवाची पर्वा न करता तिनं लिंग उचलून आपल्या छातीशी धरलं. ते पाहिलं आणि शंकर विरघळला. उतरून खाली आला. मग पुन्हा एकदा जगाच्या माता-पित्यांचा सुंदर विवाहसोहळा कांचीमध्ये साजरा झाला.

त्या सोहळ्याची आठवण कांचीनं कामाक्षीच्या रूपानं जपली आहे. पण कांचीत शिवपार्वतीचीच नव्हेत, इतरही पुष्कळ मंदिरं आहेत. वैष्णवांची आहेत. जैनांची आहेत. बौद्धांचीही आहेत. या मंदिरांभोवती अनेक पुराणकथा गुंफल्या आहेत. त्या ऐकाल तुम्ही. कांचीला गेला तर पुजाऱ्यांकडून ऐकाल, एखाद्या वृद्ध भाविकाकडून ऐकाल आणि ऐकता ऐकता त्या अ-लौकिक अशा देवकथांमधून लौकिक असा एक वेगळाच इतिहास तुमच्यापुढे उभा राहील. धर्माच्या बदलत्या प्रभावांचा कथात्म इतिहास.

लोक आणि अभिजात

उदाहरणार्थ पहा, कांचीमधल्या कच्छपेश्वराची कथा. हे मंदिर शिवाचं. मग इथं कच्छ म्हणजे कासव कुठून आलं? कथा अशी आहे की, विश्वाच्या प्रारंभी ज्योतिर्मय लिंगाच्या रूपात शिवाची इथं वस्ती होती. त्यानं इथूनच सारी सृष्टी निर्माण केली आणि ब्रह्म्यासह सरस्वतीला सृष्टीचे आदिदेव म्हणून पद बहाल केले.

मग नंतर एकदा समुद्रमंथन झालं. मेरुपर्वताची रवी समुद्राच्या पोटात फिरू लागली. पृथ्वीगर्भाला धक्का लागू नये, म्हणून कासव होऊन विष्णूनं तिला आधार दिला. पण या आपल्या कृतीचा विष्णूला इतका अहंकार वाटला की, त्यानं अमृत देवासुरांच्या हवाली करण्यासाठी चक्क नकार दिला. त्यानं देवांना आपल्या सामर्थ्याची भीती घातली आणि समुद्रालाही त्रास द्यायला सुरुवात केली. तेव्हा नाइलाजानं साऱ्यांनी शिवाला साकडं घातलं. शिव आला आणि त्यानं सहज विष्णुरूपी कासवाचा नाश केला. त्याला मारून त्याच्या कातड्याची ढाल आपल्या गळ्यातल्या श्वेतमालेत मध्यभागी धारण केली. म्हणून हा शिव कच्छपेश्वर.

पुढे विष्णूलाही आपली चूक उमगली आणि तो कांचीच्या स्वर्णलिंगाला शरण आला. तेव्हा शिवानं उदार अंत:करणानं त्याची पुन्हा वैकुंठात प्रतिष्ठापना केली. या कथेची आठवण देत कच्छपेश्वर कांचीला उभा आहे. ही कथा म्हणजे प्रत्यक्षात काय आहे, असं तुम्हाला वाटतं ?

वर वर पाहता ही एक साधी पुराणकथा आहे: अर्थहीन, भाकड वाटणारी पुराणकथा. पण धर्मेइतिहासाचा मागोवा घेणाऱ्या एखाद्या माणसासाठी ही कथा म्हणजे शैवांनी वैष्णवांवर मिळवलेल्या विजयाचं ते एक स्थानिक स्मारक असल्याचा पुरावा बनून जाईल. शैव-वैष्णवांचे झगडे या देशाच्या भूमीवर पुष्कळ झाले. धर्मप्रभावी अशा इतिहासाच्या एका कालखंडात दक्षिण भूमीवर या झगड्यांशी राजसत्ताही निगडित झाल्या. देवळांच्या रूपानं, दैवतकथांच्या रूपानं या झगड्यांची आणि त्यांतल्या जय-विजयाची नोंद आजही आहे.

आपल्यापुढे खुद्द कांचीत आणखीही दोन देवळांच्या कथा याच प्रकारचा धर्मेतिहास सांगणाऱ्या आहेत. त्यांतही एक कुमरकोट्टमची कथा. हे कुमाराचं म्हणजे कार्तिकेयाचं किंवा सुब्रह्मण्याचं मंदिर म्हणजे कांचीतलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. ब्रह्मदेवानं एकदा स्कंद कार्तिकेयासंबंधी उदासीनता दाखवली, तेव्हा कार्तिकेयानं त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेतली आणि शेवटी त्याला पोकळ ज्ञानी ठरवून कैदेत टाकलं. शिवाच्या मध्यस्थीनं ब्रह्म्याची सुटका झाली आणि कार्तिकेयानं कांचीत येऊन बापाच्या रागाची शांती व्हावी यासाठी पूजा आणि तप केलं. तेच हे ठिकाण कुमरकोट्टम्, कांचीत शिवाबरोबर शिवपरिवारातल्या इतर दैवताचं स्थान कसं निर्माण झालं आणि महत्त्व कसं वाढलं, याचीच ही स्पष्टीकरणकथा आहे, हे सहज लक्षात येतं.

याहीपेक्षा लक्षणीय आणि पुरेशी बोलकी आहे ती कैलासनाथ मंदिराविषयीची कथा. पल्लव राजा राजसिंहानं बांधलेलं हे शिवमंदिर पुढे महेंद्रवर्मा तृतीय यानं वाढवलं.

या मंदिराची कहाणी पुराण सांगतं ती अशी की, पूर्वी त्रिपूर नावानं तीन राक्षस होऊन गेले. ते मोठे वेदज्ञ आणि शिवभक्त होते. पण शैव उपासनेसंबंधी, आपल्या राक्षसरक्ताचा परिणाम म्हणून की काय, ते थोडे सांशकही होते. ते देवांवर टीका करीत. त्यांना त्रास देत.

यामुळे दुःखी झालेल्या देवांनी महाविष्णूच्या कानी आपलं गाऱ्हाणं घातलं, तेव्हा महाविष्णूनं यज्ञ करून, काही भूतपिशाच्चांना असुरांचा परामर्श घेण्यासाठी रवाना केलं. पण या शिवाच्या सहचरांची काहीही मात्रा त्या राक्षसांवर चालली नाही. मग विष्णूनं आपल्या शरीरातून आदिपुत्त नावाचा एक महापुरुष निर्माण केला. नारदाच्या सहकार्यानं असुरांची मती शिवभक्तीपासून भ्रष्ट करण्याचं काम त्यानं त्या आदिपुत्तावर सोपवलं.

नारद आणि आदिपुत्त यांनी त्या तीन शिवभक्त असुरांच्या मनात शैव सिद्धांताविषयी सतत किल्मिष निर्माण केलं आणि अखेर ते तीनही असूर शिवविरोधी बनले.

विष्णूचं काम साधलं. त्यानं शिवाला म्हटलं की, पहा, हे एके काळचे तुझे भक्त कसे तुझ्या विरोधात मातले आहेत! त्यांचा नाश तूच करायला हवा आणि शिवानं–कांचीपुरात राहणाऱ्या शिवानं त्या तिघांचाही नाश केला. शंकर फक्त हसला आणि तिघंही जळून खाक झाले. मग मात्र नारद आणि आदिपुत्त म्हणजे स्वतः बुद्ध यांना आपण केलेल्या शिवविरोधी कार्याचा पश्चात्ताप झाला. कांचीमध्ये येऊन त्यांनी कैलासनाथाचं एक भव्य मंदिर उभारलं नि पूजा आणि तपाला प्रारंभ केला.

शिव प्रसन्न व्हायला अवकाश लागला नाही. त्यानं त्या दोघांच्याही पापाला क्षमा केली आणि म्हटलं की, ‘खरं तर शिवविरोधी प्रचाराचं काम केलंत, हे पाप अनेक जन्मांचं आहे. पण तुम्ही इथं राहिलात, माझी पूजा मांडलीत, म्हणून तुमचं पाप बरंचसं घटलं आहे. आता इथं एक मुक्तिद्वार बांधा. त्यातून सतत या क्षेत्रात प्रवेश केल्यानं मुक्तीचा मार्ग मोकळा होईल.’

नारद आणि बुद्ध यांनी शिवाज्ञा शिरसावंद्य मानली आणि कांचीपुराचा शिवमहिमा अबाधित गाजत राहिला.

ही कथा म्हणजे शैव संप्रदायानं बौद्धांचा प्रभाव मोडून काढल्याचा स्पष्ट निर्देश करणारी कथा आहे, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. नुकतीच उडुपीला गेले होते. तिथंही तिथल्या चंद्रमौलीश्वराच्या मंदिराची अशीच एक कथा मला ऐकायला मिळाली. शिवाचा प्रभाव मागे सारून विष्णूचा प्रभाव वाढत गेल्याचा निर्देश करणारी ती एक पुराणकथा होती. मुळात उडुपी हे शिवप्रभावाचं स्थान होतं. आतासारखं कृष्ण-स्थान नव्हे. उडुप म्हणजे चंद्र. चंद्रानं इथं शिवोपासना केली, असं सांगतात. म्हणून इथला सर्वात प्राचीन देव शिव-चंद्रमौलीश्वर आहे. या गावाचं दुसरं नाव शिवाली.

पण पुढे म्हणे रामभोज नावाच्या क्षत्रिय राजानं यज्ञस्थळ नांगरताना घडलेल्या नागाच्या मृत्यूचं प्रायश्चित्त म्हणून नागासनाची पूजा केली आणि त्यावर त्याचा आराध्य देव विष्णू हा शिवरूपात अवतरला. विष्णूनं लिंगरूपात अवतरावं, अशी खुद्द शिवाचीच इच्छा होती.

आता उडुपीला मध्वाचार्यांनी कृष्णमूर्ती स्थापून वैष्णवभक्तीची एक प्रभावी परंपरा निर्माण केल्यानंतर मूळचा शिव हाही विष्णूच असल्याची कथा इथं जन्माला आली नाही तरच नवल...

आपल्याकडच्या पंढरपूरची कहाणीही याहून वेगळी नाही. पांडुरंगाविषयीच्या पुराणकथांपैकी काही कथा अशाच धर्मेतिहासाकडे अभ्यासकाला घेऊन जाणाऱ्या कथा आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? पंढरपूरच्या लोहदंड क्षेत्राची आणि दिंडीरवनाची महती सांगण्यासाठी निर्माण झालेली कथाच पहा. लोहदंड आणि दिंडीरवन या नावाचं स्पष्टीकरण देण्यासाठी ही कथा रचली गेली, हे स्पष्टच आहे; पण त्याचबरोबर शैव-वैष्णवांच्या धर्मपंथांच्या चढाओढीत शैव संप्रदाय फिका पडून वैष्णव संप्रदायाचं वर्चस्व इथं वाढत राहिल्याचं सूचनही या कथेत दडलं आहे.

कथा अशी आहे की, कृष्णाच्या मांडीवर राधेला पाहून रुसलेली रुक्मिणी कृष्णाला सोडून निघाली ती दिंडीरवनात आली. तिची समजूत घालायला पाठोपाठ कृष्णही आला. ही हकीकत विष्णूचं ध्यान करीत असलेल्या शंकराला पाहून कुतूहल वाटलेल्या पार्वतीला खुद्द शिवानं सांगितली आहे. पार्वतीनं उत्सुकतेनं विचारलं की, ‘रुक्मिणी रुसून आली त्या वनाला दिंडीरवन का म्हणतात ?’ आणि शिवानं तिची कुतूहलपूर्ती करताना सांगितलेली ही कथा आहे.

पूर्वी दिंडीरव नावाच्या राक्षसानं साऱ्या देवांचा छळ मांडला. तेव्हा दुःखी होऊन देवांनी विष्णूची प्रार्थना केली. विष्णू द्रवला आणि चंद्रसेन राजाचा मल्लिकार्जुन नावाचा पुत्र म्हणून जन्म घेऊन त्याने दिंडीरव राक्षसाचा लोखंडी गदेनं वध केला. तो राक्षस मरताना ‘हरे हरे’ म्हणाला. म्हणून विष्णू त्याच्यापुढे प्रकट झाला. त्यानं मागणं मागितलं, ‘देवा, माझ्या मृत्यूनंतर माझ्या नावानं हे वन ओळखलं जावं. लोहदंडानं माझा वध झाला, तेव्हा हे क्षेत्र लोहदंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावं. जिथे ती गदा नंतर पाण्यात पडली ते गदातीर्थ व्हावं आणि इथं येणाऱ्यांचा उद्धार व्हावा.’ विष्णूनं ‘तथास्तु’ म्हटलं आणि त्याप्रमाणे सर्व घडलं.

इथला शिव म्हणजे मल्लिकार्जुन हा अशा तर्‍हेनं मूळचा विष्णूच आहे, असं कथा सांगते. मूळचं शिवस्थान वैष्णवांनी आपलंसं केल्याचा हा कसा गमतीदार पुरावा आहे पहा.

पुराणकथांच्या निरर्थक वाटणाऱ्या संभारातून जेव्हा दैवतविज्ञान आणि धर्मेतिहास यांची अशी वेगळी जुळणी होत जाते, तेव्हा परंपरेच्या अभ्यासकांसाठी लोकसंस्कृतीनं पुढे केलेला तो मदतीचा हातच तर असतो.

-oOo-

पुस्तक: लोक आणि अभिजात.
लेखक: अरूणा ढेरे.
प्रकाशक: मंजुल प्रकाशन.
आवृत्ती पहिली.
वर्ष: १९९३.
पृ. १४८-१५२.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा