शुक्रवार, ८ डिसेंबर, २०२३

एका गोष्टीची गोष्ट

“ता-त्या”

“काय बाबा?”

“मला गोष्ट सांगा की!”

“कशाची सांगू?”

अंधारात माझ्याशेजारी झोपलेल्या पाच वर्षाच्या बाबानं विचार केला. मी म्हणालो, ‘आता आपली परीक्षा आहे. गोष्टी लिहिणं हा जन्माचा उद्योग आहे, पण पोरांना गोष्ट सांगणं हे काम भलतंच कठीण! त्यांना कसली गोष्ट आवडेल ह्याचा अंदाज कधीच येत नाही. सांगून परिणाम पाहावा म्हटलं, तर अपेक्षेपेक्षा वेगळाच परिणाम दिसतो.’ पुष्कळ गोष्टी माहीत नसतात, शब्द ओळखीचे नसतात. पंचतंत्रातल्या काही कथा सांगून पाहिल्या, त्या बाबाला रंजक वाटल्या नाहीत. सिंह जाळ्यात सापडला. जाळ्यात म्हणजे कशात? (आम्ही खेड्यात जन्माला आलो आणि वाढलो, त्यामुळे ही अडचण आली नाही.) गाढवानं वाघाचं कातडं पांघरलं. कसं? त्याला हात कुठं असतात पांघरून घ्यायला? रंगाच्या भांड्यात पडलेला कोल्हा जनावरांना म्हणाला कसा? कोल्ह्याला बोलता कसं येईल? त्या तळ्यात खूप मासे होते. तळं म्हणजे काय? तात्पर्य– पंचतंत्राचा उपयोग नाही.

“वासराची सांगता?”

“तू वासरू कुठं बघितलंस?”

“आहे की जगतापाच्याकडं. गाय आणि तिचं छान लहान वासरू आहे.”

‘बरं, म्हणजे कथानायकाचा परिचय आहे.’

“सांगा वासराची.”

प्रसंग बाका होता. कारण गोष्ट सांगणं प्राप्तच. नाहीतर लगेच बाबाचा माझ्याविषयीचा आदर कमी होतो. मला पतंगाला कन्नी बांधता येत नाही हे जेव्हा त्याला कळलं, तेव्हा त्याला जबर धक्का बसला होता. त्याची अशी ठाम समजूत आहे की, आपला बाप सर्वज्ञ आहे. त्याला सगळं येतं.

“सांगा ना वासराची.”

बाजार

“एक वासरू होतं.”

“नेहमी आईजवळ असायचं, पण एकदा त्याला वाटलं की, एकटंच बाहेर जाऊन यावं. गाय आणि बाकीची गुरं बांधलेली असायची, पण वासरू मोकळं असायचं. त्यानं कुंपणाबाहेर उडी टाकली आणि पळालं.”

“हं, कुठं गेलं पळत पळत ”

“गावाभोवती जंगल होतं. डोंगर होते. जंगल फार दाट होतं. उंच-उंच झाडं, बुटकी झुडपं, काटेरी जाळ्या, रानटी वेल, गवत. माणसांनासुद्धा नीट पाऊलवाटेनं गेलं तर जाता येई. नाहीतर माणसं चुकत. त्यांना घरी परत येण्यासाठी वाट सापडता सापडत नसे.”

“मग?”

“वासरू एका वाटेनं गेलं. झाडं, पक्षी, फुलं बघत-बघत, उड्या मारत, कोवळं गवत खात असं मजेत खूप दूर गेलं.”

“आईनं हाका नाही का मारल्या?”

“हो, मारल्या; पण तोपर्यंत वासरू लांब गेलं होतं. त्याला हाका ऐकू नाही आल्या.”

आता पुढं काय सांगावं बरं, म्हणून मी थोडा गप्प. एक आशा की, त्याला झोप लागावी. एका मिनिटाची स्तब्धता, पण वासरामागोमाग बाबाही जंगलात शिरलेला होता.

“त्याची दूध प्यायची वेळ झाल्यावर ते परत आईकडे आलं?”

“नाही.”

कारण मग गोष्ट संपलीच की! काहीतरी घडणं आवश्यक होतं. एखादा समरप्रसंग... काय बरं नेमकं घडेल? माझ्याअगोदर बाबालाच सुचलं.

“त्या जंगलात वाघ नव्हते?”

“होते. एक मोठा वाघ होता. तो सावलीला झोपलेला.”

“हं.”

आता समरप्रसंगाला वाव होता. वाघाची व्यक्तिरेखा चांगली गडद हवी. तो कथेतला खलनायक.

“हा वाघ दुष्ट होता. त्याला शेळीची लहान-लहान बाळं, हरणं खायला आवडायची. जाळीत तो झोपला होता आणि एकाएकी त्याला वासराचा वास आला.”

इथं सांगण्यात तपशील चुकला, म्हणून मी थांबलो. वाघ ह्या प्राण्याचं घ्राणेंद्रिय फार तीक्ष्ण नसतं.

“हं.”

या हुंकाराबरोबर बाबा जवळ आला. माझा दंड त्यानं धरला. त्याच क्षणी मला वाटलं की, आता पंचाईत आहे. वासरावर काही प्रसंग येता कामा नये. वाघानं तर त्याला खाता उपयोगीच नाही. तपशील चुकला; पुढे चुकता उपयोगी नाही; पण काही नाट्यपूर्ण घडलं पाहिजेच. काय बरं? विचार करायला फुरसत नाहीच.

“हं, पुढे काय झालं?”

“वाघानं डोळे किलकिले करून पाहिलं, तर दूरवरून लहानसं वासरू कान हलवत वाटेनं येतंय. आपल्याकडंच येतंय.”

“पण वासराला नाही का वाघाचा वास आला?”

“कसा येणार?”

वारा वाघाच्या दिशेनं वाहत होता, हा तपशील ह्याला कळणारच नाही.

“वासरू आनंदात होतं. फुलांचे, झाडांचे वास त्याला माहीत होते. वाघाचा वास कसा माहीत असणार? त्यानं तो कधी घेतलाच नव्हता अगोदर. आणि ते मजेत होतं. पुढे वाटेवरच झाडाखाली वाघ झोपलेला आहे, हे त्याला माहीतच नव्हतं. ते सरळ वाघाच्या समोरच आलं.”

“हं.”

दंडावरची छोटी पकड घट्ट झाली. आता घटना, संवाद झाले पाहिजेत आधी. “वाघ उठून उभा राहिला. मोठा, उंच, रंग तांबडा, अंगावर काळे पट्टे, डोळे हिरवे. वासरू धीट होतं. ते वाघाकडे बघत उभं राहिलं. वाघ म्हणाला, ‘थांब, मला फार भूक लागली आहे.’ ”

वाघ बोलेल कसा, हा प्रश्न येणार म्हणून मी थांबलो; पण आला नाही. टेन्स प्रसंगात श्रोत्याला भान राहत नाही, हे खरंच.

“वाघानं जीभ ओठांवरून फिरविली. शेपटी वर-खाली हलवली. तो म्हणाला, ‘मी तुला खाणार.’

“वासरू म्हणालं, ‘खा, पण मी माझ्या आईला सांगून आलो नाही. ती शोधत राहील. तू थोडा थांबशील, तर मी आईला सांगून परत येईन ’

“नक्की?

“हो, देवाची शप्पथ! सुटली बोल.

“बरं जा, आणि लगेच परत ये. वाट सापडेल का?

“हो, सापडेल.”

इथपर्यंत ठीक जमलं.

आता पुढे काय? लबाडी करून वासरू परत आलंच नाही तर? पण त्यानं देवाची शप्पथ घेतली होती. खोटं कसं बोलणार? खोटं बोलणं हे पाप.

“हं, पुढे काय झालं?”

“गेल्या वाटेनं वासरू परत आलं. आई काळजीत होतीच. तिला आनंद झाला.”

“रागावली नाही?”

हा मुद्दा राहिलाच. आई रागावणार, ही गोष्ट सुसंगत होती.

“रागावली थोडी. म्हणाली, ‘असं न सांगता जायचं नाही पुन्हा. लहान आहेस तू.’

“वासरू म्हणालं, ‘नाही जाणार पुन्हा कधी. पण आई, मला वाघ भेटला ’

“बाई गं! आणि रे?’

“तो म्हणाला, मला भूक लागली आहे. मी तुला खाणार. मी म्हणालो, माझी आई शोध करील, तिला विचारून येतो.’

“असं म्हणालास?’

“हो. तो म्हणाला, नाही आलास तर? मी म्हणालो, देवाची शप्पथ येईन.’

“आईनं विचार केला. ती म्हणाली, ‘तू जाऊ नकोस; मी जाते.’ ”

आपली वासराची गोष्ट आता शिवलीलामृतातल्या व्याधहरिणीकडं चालली आहे, हे माझ्या ध्यानात आलं. पुढं आता शेवटपर्यंत सगळं सोपं होतं.

“मग आई गेली. वाघ वाट बघतच होता. ती म्हणाली, ‘माझ्या मुलाऐवजी मी आले आहे.’

“वाघ म्हणाला, ‘मला काय, भूक भागल्याशी कारण. तुला खातो.’

“गाय म्हणाली, “पण मुलाचे वडील माझा शोध करतील. त्यांना विचारून आलं पाहिजे.’ ”

माझ्या गोष्टीनं वेगळीच कलाटणी घेतली होती. वाघाची कॅरॅक्टर सिंपथी खाऊन जात होती.

“वाघ म्हणाला, ‘जा, लवकर विचारून परत ये.’ ”

शिवलीलामृतातली गोष्ट मला आठवेना. बहुधा व्याधाच्या मनात परमेश्वर उभा राहिलेला असणार. इथं त्याचा काही उपयोग नव्हता. आता गोष्ट आपणच तडीला न्यायला पाहिजे. वाघाच्या मनात परमेश्वर उभा राहणं खरं नाही.

“आई गेल्या वाटेनं परत आली. वासराचे वडील होतेच. त्यांना म्हणाली, ‘अहो, तो वाघ म्हणाला की, मला भूक लागलीये. तुला खातो. तर मी म्हणाले, तुम्हाला सांगून परत येते.’

“वडिलांनी विचार केला. म्हणाले, ‘तू जाऊन आपल्या वासराला दूध कोण पाजणार? मी जातो.’ आणि बैल त्या वाटेनं निघाला.”

बाबाला आता वाटलं होतं की, वासरू सुटलं, आई सुटली. वडील लोक शूर असतात. ते वाघाची जिरवणार.

मला प्रश्न पडला की, आता बैलोबा काय करणार? एका बैलाला वाघाची जिरवता येणं शक्य नाही.

“हं पुढं?"

“बैल वाटेनं चालला, चालला. तिकडं वाघ जिभल्या चाटीत उभा होताच. मग बैलानं ठरवलं की, असं चालायचं नाही. वाघाला उद्या भूक लागेल, परवा लागेल. रोज एकाला तो खाईल. त्याला धडा शिकवला पाहिजे. रानात आणखी बैल चरत होते. त्यांच्याकडे तो गेला. सर्वांना एकत्र करून म्हणाला, मला मदत करा. सगळे बैल धष्टपुष्ट होते. त्यांची शिंगं टोकदार, कठीण होती. ते म्हणाले, चला आपण वाघावर हल्ला करू. आणि निघाले. वाघाला आवाज ऐकू येऊ नये म्हणून हळूहळू निघाले. गळ्यातल्या घंटासुद्धा वाजवल्या नाहीत.

“वाघ वाट बघतच होता. त्याला आता फार भूक लागली होती. वासराचे वडील आले की, काही एक न बोलता-सवरता त्यांना खाऊन फस्त करायचं, असं त्यानं ठरवलं होतं.”

मला श्रोत्याचा रिस्पॉन्स कळत नव्हता. बाबा गप्प होता. कदाचित प्रसंग गंभीर म्हणून असेल. कदाचित झोप डोळ्यांवर उतरली असेल. मुद्दामच मी थोडा वेळ थांबलो.

“हं, पुढे?”

“मग सगळ्या बैलांनी वाघाभोवती गोल केला. त्याला घेरून मध्ये घेतला आणि शिंगं रोखून ते त्याच्या अंगावर धावून गेले. बैलांचे डोळे तांबडे-लाल झाले होते. नाकातून फुस्कारे निघत होते.”

पुन्हा दंडावरची पकड घट्ट झाली. रडव्या आवाजात प्रश्न आला, “त्यांनी मारून टाकलं वाघाला?”

घोटाळा माझ्या लक्षात आला. वाघाची कॅरॅक्टर आपण सिंपथेंटिक केली, त्याचा हा परिणाम आहे. ही शोकान्त गोष्ट होता कामा नये. म्हणजे पुन्हा पंचाईत.

“अं? त्या बैलांनी वाघाला मारून टाकलं?”

“छे! मारलं नाहीच. इतके बैल आपल्या अंगावर धावून येताहेत, हे बघताच वाघोबाची घाबरगुंडी उडाली.”

बाबाला एकदम खदखदून हसू आलं. अगदी अनपेक्षित परिणाम !

हसतच प्रश्न : “हो?”

“हो. तो फार घाबरला आणि शेपूट पायात घालून, कान खाली पाडून धूम पळाला.”

मला मिठी मारून पुन्हा मोठ्यांदा हसू.

“हो? घाबरून धूम पळाला?”

“हो आणि ते बघून बैलांना अगदी हसायला आलं. सगळे खाली बसले आणि मोठ्यांदा हसायला लागले तोंड वर करून.”

त्या कोरसएवढं हसू! ते थांबेच ना!

तेवढ्यात पलीकडे असलेल्या खऱ्या आईचा आवाज : “बाबा, पुरे आता. झोपा बघू. ताई तिकडे अभ्यास करतीये ना!”

एकदम शांतता. मग गोष्टीवरच विचार. मला वाटलं, हा झोपला.

तेवढ्यात अगदी हळू आवाजात प्रश्न : “मग तो वाघ उपाशीच राहिला?”

बाप रे! आता कुणाचीही हत्या न होऊ देता ह्या वाघाला खाऊ काय घालावं? काहीही झालं तरी वाघ गवत खाणार नाही. फळं खाणार नाही. दूध पिणार नाही. काय खाईल तो? त्यानं खाल्लं हे पाहिजेच. उपाशी कसा झोपणार? माझ्यापुढे मोठा प्रश्न!

काय? काय? काय?

दोन-तीन मिनिटं शांतता. एकदम सुचलं. तपशील चुकीचा, पण गोष्टीत खपून जाण्याजोगा. हळू आवाजात म्हणालो, “छे! उपाशी कसा राहील? तो गेला आणि एका झुडुपाला मोठं मधाचं पोवळं त्याला दिसलं. सगळ्या मधमाशा मध गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. वाघानं पंजानं ते पोळं ओढून घेतलं आणि पोटभर मध खाल्ला. बरं का बाबा!”

नो रिस्पॉन्स! वासराला झोप लागली होती.

चला, सुटलो!

-oOo-

पुस्तक: बाजार.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती पाचवी, तिसरे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ७३-७८.
(पहिली आवृत्ती: ??? दुसरी आवृत्ती १९९२, अन्य प्रकाशन).

---

(१). पुस्तकामध्ये ही कथा ‘गोष्ट’ या नावाने समाविष्ट आहे.


यांसारखे आणखी:
     वाळूचा किल्ला
    अबोला


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा