मंगळवार, ८ ऑक्टोबर, २०२४

गेले... ते दिन गेले

वेगवेगळी फुले उमलली
रचुनी त्यांचे झेले
एकमेकांवरी उधळले गेले...
ते दिन गेले...

भ. श्री. पंडितांची ही कविता जेव्हा केव्हा ऐकते, तेव्हा तेव्हा गेल्या दिवसांविषयीची माणसाच्या मनातली हुरहूर किती सार्वत्रिक आहे, हे जाणवून मी नवल करीत राहते. अगदी लहान असताना रानात एकट्या पडलेल्या लाकूडतोड्याच्या मुलाची गोष्ट मी ऐकली होती. एक लहानगा सुंदर पक्षी त्याला मित्र मिळाला आणि न पाहिलेल्या जगाविषयीची किती तरी अद्भुत गाणी न् गोष्टी लाकूडतोड्याचा मुलगा त्या पाखराकडून ऐकत राहिला. मग त्याला वाटलं की, या पाखराला कायमचंच जवळ का नये ठेवू? त्यानं एक सुरेख पिंजरा बनवला, पण पाखरानं तो पिंजरा पाहिला मात्र, ते जे उडून गेलं, ते परत कधीच त्या मुलाला भेटलं नाही.

लहानपणी ऐकलेल्या त्या गोष्टीतली अद्भुतता आणि सुंदरता आता उरलेली नाही मनात; पण वाटतं की, आपण माणसंही पुष्कळ वेळा त्या लाकूडतोड्याच्या मुलासारखी होतो. हातून निसटलेलं आयुष्य पकडून कायमचं जवळ ठेवण्याची तीव्र इच्छा करणारी, जुने निर्मळ आनंद साठवून हुरहुरणारी माणसं.

लोक आणि अभिजात

आमचे देव तरी आमच्यापेक्षा वेगळे कुठे आहेत ? भवभूतीचा ‘उत्तररामचरिता’मधला राम आठवतो का? वनवासातून रावणवधानंतर परतलेल्या रामसीतेनं अयोध्येचं राज्य स्वीकारलं आहे. वनात जाण्यापूर्वी ते अगदी किशोरवयीन होते. आता चौदा वर्षांनंतर ते पक्व तरुणपणात आले आहेत. कुणा एका चित्रकारानं काढलेली रामाच्या आयुष्याची चित्रकथा पाहताना अयोध्येतले जुने दिवस आठवून राम म्हणतो,

जीवत्सु तातपादेषु नवे दारपरिग्रहे
मातृभिश्चिंत्यमानानां ते हि नो दिवसा गताः।

वडील हयात होते आणि माता सर्व प्रकारची काळजी घेत होत्या. नुकताच विवाह झाला होता. ते दिवस गेले आता !

– रामाच्या मनातली ही खळबळ राम गणेश गडकऱ्यांनी किती सुंदर मराठीत उतरवली आहे, तुम्हाला माहीत असेल. ‘प्रेमसंन्यास’ या त्यांच्या नाटकातल्या लीलेच्या तोंडी घालण्यासाठी त्यांनी उत्तररामातल्या या श्लोकाचा कविताबद्ध भावानुवाद केला आहे. ते त्यांचं स्मृतिगीत फार गोड आहे.

आठवतो का सांग सखे तो काळ विवाहाचा
बाळपणाचा, मुग्धपणाचा, निर्मळ भावाचा ?

तो मुग्धपणाचा काळ असा होता की, जेव्हा चिमुकल्या मनाचं पुरेसं उमलणं झालेलंच नव्हतं. आई-वडील काळजी घेत होते, मुलाचं बाळपण बघून स्वतःचं बाळपणही पुन्हा आठवत होते, पण बघता बघता गेलेच ते दिवस !

तू सीता ती, राम तोच मी, आज त्याच माता
परि जे गेले दिन ते आता येतिल का हाता ?

सुकल्या फुलाला सुगंध जसा पुन्हा यायचा नाही, तसे ते गेले दिवस पुन्हा यायचे नाहीत.

अगदी हाच भाव केशवसुतांच्या ‘हरपले श्रेय’ या कवितेत व्यक्त झाला आहे. लुटुपुटीचा संसार मांडणारी लहान, अजाण मुलगी असते. त्या लटक्या संसाराच्या खेळात जो आनंद, जे सुख ती अनुभवते, ते खऱ्या संसारातही तिला गवसत नाही आणि मग चुकचुकत राहतं मनात. बावरते वृत्ती. पण जे हरपतं ते गवसत नाही पुन्हा.

त्रिखंड हिंडुनि धुंडितसे
न परि हरपले ते गवसे

लहान मुलीचं अजाण, निष्पाप मन, त्या अजाणतेपणामुळेच जगातल्या दुःखांविषयीची, विपरीततेविषयीची, मोह-द्वेष-वंचनेविषयीची तिला मुळीच न लागलेली चाहूल, ते निश्चित, निर्भरपण आणि त्या लटक्या खेळापासून दूर असलेलल्या प्रत्यक्ष संसारातल्या अडीअडचणी. त्याचं अवघडपण– तसं आयुष्य पुन्हा नाहीच गवसत, मला वाटतं, जगभरच्या गायकानी कधी तरी कुठे तरी अशा हुरहुरीची गाणी गायली असतील, कवींनी आणि लेखकांनी कविता आणि लेख लिहिले असतील, चित्रपटांनी आणि नाटकांनी, वाद्यांनी आणि कुंचल्यांनी असे तरल क्षण अनेकदा पकडले असतील,

माणसाचं वाढतं वय आणि जगाच्या अनुभवांनी मरत जाणारं त्याच्यामधल निरागसपण यामुळे बाळपण आणि यौवन या दोन काळांविषयी त्याच्या मनात सदैव एक असोशी आहे. ‘डेज दॅट आर नो मोअर !’ यासारखे उद्‌गार प्रौढ माणूस मधूनमधून काढतच असतो. एखादा आंग्ल कवी आपल्या बाळपणाचं जणू प्रतीक बनलेल्या फरच्या उंचच्या उंच झाडांची आठवण करताना म्हणतो, ‘ती झाडे इतकी उच होती की, आभाळाला टेकली आहेत असं वाटायचं, तेव्हा तो आमचा मूल म्हणून भाबडेपणाचा विचार होता खरा, पण त्यात केवढा तरी आनंद भरलेला होता. आज मात्र तो आनंद उरलेला नाही. कारण त्या वेळी जसं आकाश जवळ होत, तसं ते आता मुळी उरलेलंच नाही.’

लोकांच्या नेहमीच्या बोलीत, म्हणींमध्ये, वाक्प्रचारांमध्ये आणि मनमोकळ्या गीतांमध्ये या भावनेचं प्रतिबिंब न पडतं तरच नवल. अभिजात कवींनी आणि लेखकांनी ज्या हृद्यपणे आणि सूक्ष्मपणे या भावनेला वेगवेगळ्या संदर्भात व्यक्त केलं आहे, त्यापेक्षा वेगळं आणि वास्तव, अधिक ठोस असं या भावनेचं रूप आपल्याला लोकपरंपरेत दिसतं.

एरवी साधं बोलताना सुद्धा घरातल्या आयाबाया मुलींना-लेकींना म्हणतात पहा, ‘खेळून घे बाई किंवा हासून घे बाई. एकदा नवऱ्याघरी गेलीस की मग या गोष्टी करू म्हटलं तरी करता येणार नाहीत’ किंवा कधी असंही कुणी काकू-मावश्या म्हणतात, ‘आता लहान आहात तोवर सगळं करून घ्या. नंतर मग आहेच आमच्यासारखं खस्ता खाणं.’

जाणारा काळ परत येत नाही तेव्हा तो मनमुराद उपभोगावा, हे दैनंदिन आयुष्यातलं सत्य गाथासप्तशतीमधल्या एका गाथेमधल्या कुणा बाईच्या तोंडून वदवलं गेलं आहे,

नदीच्या पुरासारखं असतं तरुणपण,
दिवस-रात्र गेले की नाहीच परतून यायचे.
मुली, का मग असे उभे जळायचे ?

यौवनाचा उपभोग घ्यायला नकार देऊन दुःखात चूर झालेल्या कुणा तरुण मुलीला तिच्या समंजस सखीनं किंवा कुणा प्रौढ अनुभवी नातलग स्त्रीनं केलेला हा उपदेश आहे; तिची काढलेली समजूत आहे. यामध्ये वाया जाणाऱ्या यौवनाबद्दलची हळहळ अधिक आहे. त्याबद्दलच्या सावधतेचा इशारा अधिक आहे.

ओरिसातल्या एका आदिवासी गाण्यात मात्र हाच भाव बिंबलेला दिसला, तरी त्यामध्ये आईच्या हृदयाचं लेकीविषयीच्या प्रेमाचं भरतं आणि तिच्याविषयीची आतड्याची माया अधिक आहे. एखाद्या आधुनिक कवितेलाही मागे सारील असं हे मुंडा करमा आदिवासींचं नृत्यगीत आहे. करमा हेच त्यांच्या नाचाचं नाव. तरुण-मुलामुलींच्या मनाचं प्रतीकच जणू! या गाण्यातली आई म्हणते आहे–

ग माझे बाई
तरुणपण आहे,
नाचून घे हा करमा नाच
नंतर संपून जाईल हे नाचणं
थांबेल नाच.
मग संसार मांडशील
अन् डाळभाताची काळजी करशील.
तेव्हा माझे बाई
हे गाण्याचे हसरे शब्द
दिवस-रात्र भरून टाकणारे,
कायमचे हरवतील.
किती दुःख करशील,
हळहळशील किती !
पण माझे बाई,
ही गेलेली पोरपणाची वर्षे
परत कशी येतील ?
कशी येतील ?

-oOo-

पुस्तक: लोक आणि अभिजात.
लेखक: अरूणा ढेरे.
प्रकाशक: मंजुल प्रकाशन.
आवृत्ती पहिली.
वर्ष: १९९३.
पृ. १२७-१३०.


संबंधित लेखन

1 टिप्पणी: