रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४

स्वप्न-वास्तव-सत्ता(१)

“थोड्या वेळाने टोपलीवरील झाकण उघडले. तो क्षण दिव्य होता. ज्या क्षणी स्वप्न सत्य म्हणून जन्माला येते, आणि लालसेचा उगम म्हणजेच तृप्ती ठरते असा दुर्लभ क्षण ! मी पाहिलेली स्त्री शय्येवर राजवस्त्रांत होती. आणि तिच्या शरीरावर तर आता रत्नप्रकाशाचा उत्सव होता. आता तिने नागमुकुट कपाळावर ठेवला होता. तिच्या डोळ्यांत मात्र अथांग विषण्णता होती. पण तिचा गोरापान गळा व त्याच्याखालील रत्नमाला शोभणारा थोडा प्रदेश पूर्वीइतकाच उन्मादक, खुणावणारा होता. गळ्‍याशी धरून तिने मला धीटपणे उचलले, व आपल्या उरावर धरत मृदू शब्दांत म्हटले, ‘ये, आता तूच माझा सखा आहेस. एक देदिप्यमान साम्राज्य मावळत असता तूच त्याला आता निरोप दे.’

“त्यावर आयुष्यभर जपलेल्या वासनेने मी त्या गौर अंगावर दंश केला व पुन्हा पुन्हा दंश केले. त्या त्या ठिकाणी निळसर वर्तुळे पसरली, आणि अखेर शय्येवर पसरलेला राजवस्त्रांतील तिचा देह संपूर्णपणे सावळा होऊन ती पूर्णपणे माझी झाली. परिपूर्तीनंतर जी श्रांतता येते, सुख पूर्ण झाल्यावर जी आर्द्रता राहते, त्यांच्यामुळे मी इतका संथ झालो की येथे येईपर्यंत ऊन झगमगू लागले. पण हे अंधारे विवर, त्यातील सडलेली हवा, आणि त्यातच निर्जीवपणे जगणारे तुम्ही हे पाहिल्यावर माझ्यात सामर्थ्य आले. माझ्या सुखाला तुलना नाही इतके ते परिपूर्ण होतेच. पण तुमच्यासमोर आता त्यावर ईर्ष्येची झळाळी चढली आहे.”

सांजशकुन

जमलेल्या सापांत अस्वस्थ हालचाल झाली. कारण आता त्यांच्यात मत्सर निर्माण झाला होता. पण कोणीतरी बोलावे म्हणून त्यांनी तरुण सापास डिवचले. तो म्हणाला, “हा सारा तुझा भ्रम आहे, आणि त्या भरात तू असले काही असंबद्ध बडबडत आहेस. तूच काही एकटा बाहेर हिंडलेला नाहीस. मी देखील बऱ्याच वेळा प्रवास केला आहे. या ठिकाणी नागमुकुट घालणारी कोणी स्त्री नाही हे मी स्वानुभवाने सांगू शकतो.”

त्याच्या शब्दांवर इतर सापांचा विश्वास बसला, व त्या भ्रमिष्टाने असल्या मूर्खपणाने आपणाला फसविण्याचा प्रयत्न करावा याचा त्यांना विलक्षण संताप आला. हे सगळे त्या वृद्ध प्रमुख सापाला जाणवले. तो म्हणाला, “माझे दीर्घ आयुष्य तर बहुतेक बाहेरच गेले. आताच मी शरीर थकल्यावर येथे बंदिस्त झालो आहे. अशा तर्‍हेची स्त्री तर नाहीच, एवढेच नव्हे, तर ती असणे देखील शक्य नाही. कोणती स्त्री सापाला उचलून आपल्या उराला दंश करून घेईल, विषाचा आनंदाने स्वीकार करेल ? असल्या कपटाला आपण काय प्रायश्चित देतो हे तर तुम्हाला माहीत आहेच.”

त्याच्या अनुमोदनाची वाटच पाहत असल्याप्रमाणे तरुण साप वेगाने पुढे आला, व स्वतःच्याच स्वप्नात तृप्त असलेल्या सापात दात रुतवून त्याने त्यास बाहेर काढले. त्याक्षणी इतर साप त्याच्यावर तुटून पडले, व थोड्याच वेळात तो साप दुर्बल होऊन निर्जीव झाला. त्या गर्दीत काहीच करायला न मिळालेला वीतभर असलेला एक लहान साप पुढे झाला, व त्याने मृत सापात दात रोवून फरफटत नेले, व दूरच्या त्या स्मशानात टाकून दिले.

सारे साप पुन्हा विसावल्यावर प्रमुख साप तरुण सापाला म्हणाला, “मला थोडा वेळ मोकळ्या हवेत जायचे आहे, तेव्हा तू माझ्याबरोबर चल. आपण खडकाच्या टोकावर जाऊ. त्या ठिकाणी जाऊन मला किती तरी वर्षे झाली.” आणि त्याच्या उत्तराची वाट न पाहता तो खडकाकडे सरकू लागला.

त्याच्या शब्दांनी तरुण साप भयचकित झाला. मागच्या बाजूचा खडक जणू जमिनीपासून वर उडून जाण्याच्या सतत प्रयत्नात असल्याप्रमाणे सरळ उंचच्या उंच गेला होता. तरुण सापाने नम्रपणे म्हटले, “पण खडकाच्या टोकापर्यंत जाणे या वयात तुम्हाला निभावेल का ? परत उतरताना तुमच्या वृद्ध शरीराला वजन तोलणार नाही.”

“तसा प्रसंग येणार नाही,” वृद्ध साप तुटकपणे म्हणाला.

वृद्ध साप अत्यंत कष्टाने वर चढून आला. पण त्याला इतके शिणल्यासारखे वाटत होते की काही काळ तो स्वस्थ पडून राहिला. या ठिकाणी वाऱ्याचा जोर विलक्षण होता, आणि सूर्य तर येथून हातभरच उंच दिसत होता. उन्हाच्या तापापासून वाचण्यासाठी त्यांनी एका पसरट झुडुपाचा आधार घेतला, आणि तरुण साप त्या जराग्रस्त शरीराकडे पाहत थांबला.

“आणखी एक भ्रमिष्ट आपल्यातून गेला हे बरे झाले. एका सुंदर स्त्रीने म्हणे त्याला उचलून घेतले, व त्याच्याकडून दंश करून घेतला,” तो तिरस्काराने म्हणाला.

“तो भ्रमिष्ट नव्हता, सुदैवी होता,” वृद्ध साप म्हणाला, “तिने स्वतः दंश करवून घेतला की नाही हे मला सांगता येणार नाही, पण त्याचे त्या स्त्रीचे वर्णन एवढे सत्य होते की ती गोष्टदेखील त्याने प्रत्यक्ष घडल्यामुळेच सांगितली असावी. तशी स्त्री असणे केवळ शक्यच नाही, तर ती प्रत्यक्षात अस्तित्वात होतीच. कारण मी तिला स्वतः पाहिले आहे.

“मला स्वतःला त्या महालातील प्रत्येक सुबक खांब, प्रत्येक खिडकी माहीत आहे; कारण मी माझे बरेचसे आयुष्य तेथेच घालवले आहे. ती स्त्री खरोखरच एक सम्राज्ञी आहे. मी तिला राजवस्त्रांत पाहिले आहे; त्याच आरशासमोर दासी तिच्या केसांचा शृंगार करताना; हंसाकृती नावेत ती नदीप्रवाहावर विहार करताना; ती शय्येवर शांतपणे अर्धवस्त्रात झोपली असताना, प्रथम दुधाने, नंतर सुगंधी पाण्याने विवस्त्र स्नान करताना– मी अनेकदा तिला पाहिले आहे. त्याने सांगितलेली तीच तापल्या तारेसारखी वासना माझ्यातही निर्माण झाली होती, आणि त्याच उत्कटतेने मीही ती जोपासली होती. हे बघ, माझे शरीर विकल झाले आहे. त्या वेळचा माझा जोम नाहीसा झाला, आणि दंशात देखील पूर्वीचा विखार राहिला नाही. त्यावेळची एकच एक गोष्ट पूर्वींच्याच धगीने राहिली. ती म्हणजे तिच्याविषयी वाटत आलेली ही आसक्ती !”

“पण तुम्हीच त्याची हत्या करण्याची सूचना केलीत ना ?” तरुण सापाने विस्मयाने विचारले.

“होय, मीच तशी सूचना केली,” वृद्ध साप शांतपणे म्हणाला, “आता मी तुला जे सांगितले ते आधी सांगून देखील मी तुला त्याची हत्याच करण्याचा सल्ला दिला असता. परंतु ते मला तुला सगळ्यांच्या समोर सांगायचे नव्हते, म्हणून तर मी तुला येथे आणले. मी काय म्हणतो ते नीट ध्यानात घे. उद्या तू प्रमुख होशील. तुला त्या सापांवर सत्ता गाजवायची आहे. सत्ता आणि स्वप्ने एकत्र नांदू शकत नाहीत. अशा तर्‍हेने स्वप्न बाळगून राहणारा साप तुझ्या सत्तेखाली सौम्यपणे राहील असे का तुला वाटते? अशा तर्‍हेने मनाला पंख फुटले की ते संपत्ती काय, सत्ता काय, त्यांच्या जाळ्यात राहू शकत नाही. तेव्हा ज्या ज्या वेळी तुला अशा स्वप्नांची बीजे दिसू लागतील, त्या त्या वेळी तू सत्ताधारी या नात्याने ती निष्ठुरपणे ठेचून काढली पाहिजेस. या गोष्टीचा तू स्वतःला कधी विसर पडू देऊ नकोस.

“परंतु त्याच वेळी आणखी एक गोष्ट तू ध्यानात धरायला हवी. तू सत्ताधार्‍याप्रमाणेच एक व्यक्ती देखील आहेस, आणि अशा एखाद्या वेड्या, विलक्षण, दिवसाच्या आभाळात रात्रीच्या चांदण्या पाहणाऱ्या स्वप्नाखेरीज व्यक्तीच्या जीवनाला मात्र प्राण नाही. तेव्हा स्वतःच्या आयुष्यात मात्र तू असल्या स्वप्नाला फार कोवळेपणाने जपले पाहिजेस. लक्षात ठेव, असले स्वप्न सत्तेने किंवा बळाने निर्माण करता येत नाही. ज्याप्रमाणे असल्या स्वप्नावर कसली सत्ता चालत नाही, त्याप्रमाणे कोणी त्यांना अटकाव देखील करू शकत नाही. परंतु त्यांची देणगी भयंकर असते, मन सतत जळत राहते, रक्ताचे पाणी होते. जणू हे आधीच पुरेसे नसल्याप्रमाणे, असले स्वप्न येते, ते सोबत अशक्यतेची छाया घेऊनच. सहजासहजी प्राप्त होणाऱ्या, हात उंच करताच आवाक्यात येणाऱ्या स्वप्नांसारखे मलीन, क्षुद्र या जगात काहीच नसेल. जर असले एखादे स्वप्न तुझ्या आयुष्यात आलेच तर त्याचा ताप, त्याची अशक्यता, यांसह तू त्याचे आतल्या मनात कृतज्ञतेने स्वागतच कर; नाहीतर आपली निवड झाली नाही, असे स्वीकारून समजूतदारपणा दाखव.”

वृद्ध साप सरकत खडकाच्या अगदी कडेला आल्या, व दूरवर पाहत त्याने विचारलं, “तुला येथून काय दिसते?”

तरुण सापाने मागे राहूनच म्हटले, “समुद्राला मिळताना समुद्राएवढी झालेली नदी आता इतकी अरुंद दिसते, की माझ्या अंगाने मी ऐलतीर पैलतीर पसरू शकेन असे मला वाटते. शहरातील सारे भव्य प्रासाद आता खेळण्यांप्रमाणे दिसतात, आणि माझे घर तर मला येथून दिसतच नाही. ते इतके खाली दूर राहिले या विचाराने माझ्या मनाचा थरकाप होतो.”

“होय, तो देखील एक दृष्टिकोणच म्हणायचा, ” वृद्ध साप मान हलवत म्हणाला. “ती भूमी म्हणजे तर आपला आसरा आहे. आपला जन्म, मृत्यू, आपले आयुष्य सारे तिच्यावरच तिच्याखाली घडते. तरीदेखील जमिनीवर राहणाऱ्याने वर जाऊन ती कशी दिसते हे मधूनमधून पाहणे जरूर असते. आपले घर इतके खाली राहिले, असे म्हणण्याऐवजी आपण इतके उंच आलो असे देखील तुला म्हणता आले असते. म्हणजे एकंदरीने तुझ्या बाबतीत स्वप्नाबद्दल इशारा देण्याची फारशी गरज दिसत नाही. ती बाधा तुला होणार नाही. कारण त्याबाबतीत तू सुरक्षित दिसतोस. एखाद्या स्वप्नाने झपाटून जाण्याची आशा म्हण, अगर भीती म्हण तुला कधी त्रस्त करणार नाही. याला देखील एक प्रकारचे सुखच म्हणणारे प्राणी तुला भेटतीलही. तू आता खाली जा. इतर साप तुझी वाट पाहत असतील. ”

“आणि तुम्ही? तुम्हाला उतरताना तर विशेष मदत लागेल,” तरुण साप म्हणाला.

“नाही. कारण मी परतणार नाही,” वृद्ध सापाने निश्चयाने म्हटले, “माझे एकुलते एक स्वप्न आता भंगून अशक्यच झाले हे तू पाहिलेसच, आणि आज ना उद्या सत्ता देखील माझ्याकडून तुझ्याकडे जाणारच. सत्ता नाही आणि स्वप्नही नाही. तर मग मी कोण उरलो आहे? तर आता मी निव्वळ एक कात आहे, आणि टाकलेल्या कातेचे काय करायचे असते हे मला आणि तुला माहीत नाही, तर माहीत असणार कोणाला ?”

त्यावर तरुण साप काही बोलण्याआधीच वृद्ध साप पुढे सरकला, व त्याने आपले जीर्ण हताश शरीर उन्हाने धगधगलेल्या खालच्या खडकावर फेकून दिले.

- oOo -

पुस्तक: सांजशकुन
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन
आवृत्ती तिसरी, दुसरे पुनर्मुद्रण.
वर्ष १९९९. पृ. २५-३५.

---

(१). भासाच्या ‘स्वप्नवासवदत्ता’ या नाटकाच्या शीर्षकाशी अनायासे साधर्म्य दिसते आहे. परंतु कथाभाग सर्वस्वी भिन्न आहेत.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा