गुरुवार, १ फेब्रुवारी, २०२४

साहित्याचे भवितव्य

नुकताच एका युवकाने (हा शब्द अलीकडे आला. मागे ‘पोरसवदा’ म्हणत.) मला प्रश्न विचारला, “लेखक व्हावं, असं मला फार वाटतं. मी प्रथम काय करू?” मी गंभीरपणे म्हणालो, “फेरविचार.”

“म्हणजे?”

“लेखन करून त्यावरच आपला चरितार्थ चालवावा, अशी तुमची जर योजना असेल; तर हा निर्णय घेण्याअगोदर तुम्ही फेरविचार करावात, हे बरं, कारण मला तरी इथून पुढे साहित्याचं भवितव्य फारसं उज्ज्वल दिसत नाही. मी हे अगदी मनापासून बोलतो; काही तरी चमकदार बोलावं म्हणून नाही.”

पांढर्‍यावर काळे

‘आम्हां घरी धन, शब्दांचे भांडार’ किंवा ‘हे शब्द-सृष्टीचे ईश्वर,’ हा शब्दाचा महिमा जाऊन आता देखाव्याला महत्त्व प्राप्त होत आहे. दृष्टीची मागणी आधी पुरी करावी, ही बालवाडीत उपयोगात आणावयाची पद्धत आता सर्वत्र लागू होत आहे.

रंगीबेरंगी चित्रपट, रंगीबेरंगी नाटके, लोकनाट्ये, खेळ, नाच हे सगळं इतक्या भडक देखाव्याने दाखविले जात असताना, तीन-चारशे पानांची लठ्ठ कादंबरी घेऊन वाचत कोण बसेल? आणि बसू म्हटले, तरी तेवढी निवांत जागा त्याला मिळेल का? सतत होणाऱ्या नाना आवाजांची आपल्याला आता इतकी सवय झाली आहे की थोडी शांतता असली की, तिथे मुलांना असुरक्षित वाटते. मग ती रेडिओ लावतात. बिनाकाच्या पार्श्वसंगीतावर त्यांचा अभ्यास शांतपणे होतो. बागेत, टेकडीवर कुठेही गेले तरी ट्रान्झिस्टर सोबतीला हवा. (पुढे आता अशी वेळ येईल की, बटण फिरवून शांतता ओतणारे यंत्र शोधून काढणे अत्यंत निकडीचे होईल. मग आज घरातील एखादी खोली जशी वातानुकूल करून घेतात, तशी श्रीमंतलोक आपली घरे शांततामय करून घेतील.)

वाचताना ताप घेऊन शब्दांपासून किंवा कल्पनाविलासापासून आनंद घेण्यापेक्षा डोळ्यांनी देखावा पाहून खूश होणे सोपे आणि सहजसाध्य असते. मी लहानपणी पुस्तकात डोके घालून जेवढा बसत असे, तेवढी माझी मुले आता बसत नाहीत. मी ‘पंचतंत्र’, ‘हितोपदेश’ वाचले. ही मुले आता ‘फान्टम बुक्स’ वाचतात. यांची पुस्तके चित्रमय असतात, मजकूर उगीच तोंडी लावण्यापुरता असतो. मासिकेसुद्धा भरपूर चित्रे, रंगीत फोटो देणारी तेवढी चिकार खपतात, नुसता मजकूर देणारी मरून जातात. (जिज्ञासूंनी मराठी नियतकालिकांचा इतिहास पाहावा.)

सिनेमाचे खेळ रोज तीन या प्रमाणात पंचवीस, पन्नास आठवडे होतात; नाटकाचे सहासहाशे प्रयोग होतात, लोकनाट्ये पाचशे प्रयोगांनंतरसुद्धा पहिल्या प्रयोगाइतकी रंगतात. आता एका प्रयोगाला किमान पाचशे प्रेक्षक तरी असतील? पण पुस्तकाची पाच लाखांची आवृत्ती कधी काळी निघाली आहे का? तीन कोटी मराठी भाषकांच्या या कल्याणकारी राज्यात दोन हजारांची आवृत्ती खपायला तीन ते पाच वर्षे लागतात, असे ललित वाङ्मयाचे प्रकाशक म्हणतात आणि आमच्या रॉयल्टीचा हिशेबही तेच सांगतो.

मधून-मधून काही पुस्तके तडाखेबंद खपतात आणि आपल्याला वाटते की, साहित्याला आता बरे दिवस आले. पण या खपामागील कारणे पुष्कळदा वाङ्मयबाह्यही असावीत. स्वस्त पुस्तकयोजनेत लोक पुस्तके घेतात. ती वाचण्यासाठी की, दहा रुपयांची वस्तू पाच रुपयांत खरेदी केली, हा आनंद उपभोगण्यासाठी? गेल्याच वर्षी एका लोकप्रिय इंग्रजी मासिकाने सुमारे साडे-तीनशे पृष्ठांच्या पुस्तकाची जाहिरात केली. त्यांनी पाठविलेल्या कार्डावर केवळ ‘बरोबर’ची खूण करून ते पोस्टात टाकायचे आणि सोबतचा भाग्यक्रमांक मात्र आपल्यापाशी कापून ठेवून द्यायचा. लगेच तुम्हाला अडुसष्ट रुपये किमतीचे एक रंगीत फोटोंचे आणि बेतास-बात मजकुराचे पुस्तक व्ही.पी.ने येईल. ते घ्यावयाचे आणि आपल्या नशिबाचा खेळ पाहायचा. हा भाग्यक्रमांक लागला, तर तुम्हाला नवी मोटारगाडी किंवा रेकॉर्डप्लेअर मिळेल. हे जरी नाही मिळाले, तरी काही ना काही भेट तरी प्रत्येक ग्राहकाला मिळेलच.

माझी खात्री आहे की, अडुसष्ट रुपये किमतीच्या या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या असतील. कारण माझ्या परिचयाच्या अनेक घरांत मी ते पुस्तक पाहिले. या सर्वांनी वाचण्यासाठी का ते पुस्तक घेतले होते?

एखादा चित्रपट पाहायचा चुकला की, चुटपुट लागते. नाटक बघायचे राहून गेले की, हळहळ वाटते. खूप चाललेले लोकनाट्य आपणच तेवढे अजून पाहिले नाही, याचे दुःख होते. पण एखादी उत्तम कादंबरी, कथासंग्रह किंवा कवितासंग्रह वाचला नाही, म्हणून कोणी हळहळताना दिसत नाही. नाटक-सिनेमाच्या तिकीटखिडकीशी रांगा लागतात तशा पुस्तकभांडाराच्या दाराशी लागलेल्या कोणी पाहिलेल्या नाहीत.

शिक्षणाचे क्षेत्र सारखे वाढत आहे. नवे वाचक निर्माण होत आहेत, असे आपण मानतो. पण हे वाचक खरेच वाचतात का? काय वाचतात? का ते फक्त पाहतात? शब्दांची जादू पाहण्यासाठी आतला डोळा उघडावा लागतो. उलट, आहेत त्या डोळ्यांनी सिनेमा, नाटक, खेळ, नाच पाहणे सोपे. हे सगळे डोळ्यांना खिळवून ठेवणारे कसे होईल, हा विचारच प्रामुख्याने होतो आहे. (मराठी रंगभूमी आता सुतारांच्या आणि आतारांच्या ताब्यात गेली आहे, असे नुकतेच कोणी म्हटले होते.) शब्द गळले, आपल्या पदरचे बोलले तरी चालेल; पण नेपथ्य, वेशभूषा आणि प्रकाशयोजना उत्तम पाहिजे. चित्रपटाचे कथानक हे दुय्यम महत्त्वाचे; खरे महत्त्व गेवा कलरला, उत्तम फोटोग्राफीला आणि भव्य सेटिंग्जना, भव्य पोस्टर्सनी, भव्य जाहिरातींनी लोकांचे लक्ष वेधून त्यांच्या डोळ्यांना मेजवानी द्यायची, असा हा मामला असतो.

...आणि आता आपल्या देशात टेलिव्हिजन येणार म्हणून शहाजणे वाजू लागली आहेत. तो हां हां म्हणता येईलही. (परदेशी मदत आहे म्हणे!) आधी काळा-पांढरा येईल, मग रंगीत येईल. मोठा रुंद पडदा, रंगीत दृश्ये... मुलेबाळे त्यावर तुटून पडतील आणि उद्याची पिढी ही डोळ्यांनी पाहणाऱ्यांची होईल. आजवर जे ऐकायला मिळत होते, ते पाहायला मिळेल. हरएक चीज डोळ्यांनी पाहावी; डोक्याला ताप नाही.

टेलिव्हिजन करमणूक म्हणून प्रथम येतो आणि पुढे आजार होतो, असा पाश्चात्त्य देशांचा अनुभव आहे. त्याच्यामुळे वाचन आणि विचार करण्याची सवय लोपते, असेही ते लोक मानतात. हे सगळे आता फार दूर नाही, लवकरच ते घडणार आहे. सगळे युग डोळ्यांनी पाहण्याचे!

कथा, कादंबऱ्या, कविता वाचील कोण? मग ज्याप्रमाणे लघुनिबंध गेला, नाट्यछटा गेली, महाकाव्ये गेली; तसा प्रकार होईल. कथा-कादंबरीची जरुरीही राहणार नाही. ते प्रकार पुराणवस्तुसंग्रहालयात मांडले जातील.

माझे एक लेखक मित्र म्हणतात, “या पिढीतले मराठी साहित्यिक हे मोगल शहाजाद्यांसारखे आहेत. वडिलांचा खून करून त्यांना गादी हवी असते.” पण यापुढच्या काळात साहित्यिक-गादी राहणार आहे का?

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ७९-८१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा