बुधवार, १७ जुलै, २०२४

नकार : एक दैवी गुण

जो माणूस लिहितो, त्याने बोलावे; अशी अपेक्षा का बरे केली जाते? नुसती अपेक्षा नव्हे; तर आग्रह केला जातो, भीड घातली जाते, मध्यस्थ घातला जातो. आणि हे सगळे कशासाठी, तर व्याख्यान व्हावे म्हणून!

आज एकाएकी मला जाणीव झाली आहे की, व्याख्यान देणे हा अत्यंत फालतू उद्योग आहे. मी सहसा व्याख्यान देण्यासाठी कुठे जात नाही. नम्रपणे नकार देतो. पण पुष्कळदा मित्रांच्या शब्दाखातर किंवा नातेवाइकांच्या आग्रहाखातर मला कुठे-कुठे ‘हो’ म्हणावे लागते. असे दोन होकार मी नुकतेच देऊन बसलो होतो आणि आपण हा काय मूर्खपणा केला, म्हणून आता पश्चात्ताप पावत होतो.

मला गावोगावची फार निमंत्रणे येतात, असे मला म्हणावयाचे नाही; पश्चात्तापाचे ते कारण नाही. लोकप्रिय वक्ता म्हणून मला कोणी मोजत नाही. पण अधून-मधून कुणाच्या तरी भिडेला बळी पडून मी इंदापूर किंवा धामणगाव कॉलेजमध्ये जाऊन वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करावयाचे मान्य करतो आणि एस.टी.चा प्रवास सोडून एक तासभर भाषण देण्याचा मूर्खपणा आपण का केला, म्हणून पश्चात्ताप पावतो. हे मी का बरे पुनःपुन्हा करतो? काय आहे त्यात ? ना प्रसिद्धी, ना वैभव, ना चैन, ना मिळकत! पंच्याऐंशी मैल जायचे, दोन दिवस घालवायचे, हजार-बाराशेच्या समुदायापुढे बडबडायचे आणि परत यायचे - हा एवढा उपद्व्याप कशासाठी?

आता नटाकडून लेख मागविणारे लोक, लेखकाने व्याख्यान द्यावे असे म्हणणारच; त्यांना काय दोष द्यावा? पण आपण त्यांच्या आग्रहाला का बळी पडावे?

पांढर्‍यावर काळे

मी नकार देतो, तो आपला दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि स्वतः त्रास भोगू नये, या विचाराने. एखाद्या ठिकाणी मी जातो; तेव्हा ते गाव, तो हॉल, समोर बसलेले श्रोते, अध्यक्ष आणि स्वत: आपण– या सर्वांचाच मला विलक्षण राग आलेला असतो. मला पक्के माहीत आहे की, मी काही चांगला वक्ता नाही. भाषणाला उभा राहिलो की, एकीकडून मी बुजलेला असतो आणि उद्धटही असतो. मी वाक्ये विसरतो, गोंधळतो, खोकतो, खाकरतो ‘आणि, व, मग’ या शब्दांचा उच्चार पुनःपुन्हा करतो. सांगण्यासारखे मौलिक असे माझ्यापाशी काही नसते. श्रोत्यांना हसविण्याच्या खटाटोपात मी स्वतःचेच हसे करून घेत असतो आणि मला हेही माहीत आहे की, जेव्हा-जेव्हा मी एखाद्या गावी भाषण करतो, तेव्हा-तेव्हा बहुधा माझ्या शंभर ते दीडशे वाचकांना मी कायमचा मुकतो.

याचे मला दुःख होत नाही. कारण मी वक्ता नाहीच. हां, आता श्रोत्यांना सांगण्यासारखे असे माझ्यापाशी काही असते, त्याच्या जोडीला उत्तम आवाज असता, भव्य व्यक्तिमत्त्व असते; तर मी टेबलाशी बसून लिहिण्यापेक्षा वक्ताच झालो नसतो का? पुढारी नसतो का झालो, किंवा रंगभूमीवर नट म्हणून नसतो का प्रसिद्धी पावलो?

मला निवांत जागा, थोडे कोरे कागद, बऱ्यापैकी पेन द्या आणि उत्तम काम घ्या, स्वतःच्या पाठीवर शाबासकी घ्या. मला हॉल, टेबल-खुर्ची, अध्यक्ष, मायक्रोफोन अन् श्रोतृसमुदाय द्या आणि माझे काम बघून स्वतःच्या तोंडात मारून घ्या; पश्चात्ताप पावा!

आता पूर्वीप्रमाणे लिहिताना आपण 'प्रिय वाचक', 'रसिक वाचकहो' वगैरे संबोधून लिहीत नाही. तरीसुद्धा लिहिताना आपल्या डोळ्यांपुढे प्रिय आणि रसिक वाचकवर्ग असतोच. तो आहे, हे आपल्याला ठाऊक असते. पण मी जेव्हा भाषणासाठी कुठे उभा राहतो, तिथे हा वाचकवर्ग मला दिसत नाही. ते कोणी वेगळेच लोक असतात. वेळ घालवायला दुसरी काही जागा नाही म्हणून जमलेले. या लेकाच्याची पच्ची कशी होते, ते पाहण्यासाठी आलेले. त्यांत आपण या वर्षीं नवा चेहरा मिळविला, एवढेच समाधान मिळवून, लांब चेहऱ्याने बसलेले कार्यवाह असतात. ‘काय बेटा बोलतोय!’ असे मनाशी म्हणणारे अध्यक्ष असतात.

सभेला सुरुवात होते. परिचय करून देणारे श्रोत्यांना सांगतात– आजच्या आपल्या पाहुण्यांचे मी फारसे काही वाचले नाही, पण ते लोकप्रिय लेखक आहेत आणि आज आपल्या कानांना तासभर उत्तम भाषणाची मेजवानी मिळणार आहे. मी फार वेळ घेत नाही. आपण उत्सुक आहात ते पाहुण्यांचे शब्द ऐकण्यासाठी वगैरे... आणि दुष्टपणे आपल्याकडे बघून हसून खाली बघतात.

मी उभा राहतो. टिंगलबाज कुजबुज, हसू कानांवर येते. आपल्याकडे रोखलेले हजार-बाराशे डोळे दिसतात आणि मी मनाशी प्रतिज्ञा उच्चारतो, ‘आता पुन्हा कधीही हा मूर्खपणा करणार नाही– ही शेवटची वेळ!’

समजा श्रोत्यांमध्ये काही खरोखरीच चांगले, अगत्यशील, ऐकून घेण्याच्या इच्छेने आलेले लोक असले; तरीसुद्धा त्यांना व्याख्यानरूपे सांगण्यासारखे माझ्यापाशी काही नसते. याच तेवढ्या लोकांना बाजूला घेऊन बसावे आणि गप्पा माराव्यात, असे मला वाटते. म्हणजे असे की, लोकांना माझ्यात रस नसला, तर आपण बोलून त्यांना का बेजार करावे, म्हणून मी नाउमेद असतो. एकूण, सगळा वैतागच असतो.

उत्तम वक्ता असला... माझ्या बरोबरीच्या लेखकांत दोघे-चौघे आहेत... की, तो स्वतःच्या व्यक्तित्वावर, आवाजावर खूश असतो. केवढ्या आत्मविश्वासाने तो उठून उभा राहतो. कसलेल्या योद्धाप्रमाणे एकवार श्रोत्यांवर नजर फिरवितो. पहिल्या दहा-पाच वाक्यांतच तो नाठाळ घोड्यावर स्वार व्हावे; तसा श्रोत्यांच्या मनावर स्वार होतो आणि मग सुखाने दऱ्या-खोरीसुद्धा फिरतो. तो स्वतः रंगतो, श्रोत्यांना रंगवितो. याउलट वाईट वक्ता उभा राहताना हैराणच असतो. त्याचा आवाज, डोळे, चेहरा– सगळेच असे असते की, पहिल्या पाच-दहा मिनिटांतच श्रोते हैराण होतात. सगळे अवघड आणि अशुद्ध होऊन जाते!

माझ्या मनात येते की, मी आणि माझ्यासारखेच दहा-बारा वाईट वक्ते तेवढे सहज मिळतील– यांनी जर मनावर घेतले व गावोगावी वाङ्मय मंडळे, साहित्य परिषदा, स्नेहसंमेलने गाजवून सोडली, तर एक-दोन वर्षांच्या आत या महाराष्ट्र देशात केवढा तरी दरारा निर्माण होईल! यापुढे कोणा लेखकाला कधी व्याख्यानाची म्हणून गळ घालायची नाही, असा निश्चय सर्व लोक करतील. समस्त लेखकांची एका वार्षिक आपत्तीतून सुटका होईल आणि असेच जर वर्षानुवर्षे चालू राहिले, तर ‘लेखकवक्ता’ ही जात नामशेष होऊन जाईल. सुख आणि शांततेचे राज्य सर्वत्र पसरेल. माझ्यासारखे अनेक लेखक आणि श्रोते समाधान पावतील. खरे तर माझ्या पूर्वीच्या पिढीतील लेखकांनी हे करायला हवे होते. ते त्यांनी केले नाही, म्हणून मला दोन ठिकाणी जावेच लागणार होते. मी हे पांढऱ्यावर काळे केले, म्हणून काही ते लोक क्षमा करणार नाहीत. समारंभ रहित करणार नाहीत. मला जावेच लागेल. सुटका नाहीच!

समोर श्रोते असतील– प्राथमिक शाळेतील मुले, ट्रेनिंग कॉलेजच्या मुली, अध्यापक आणि अध्यापिका, पालक आणि प्रौढ आया असतील. परिचय करून देणारे काही तरी बोलतील. मी माझ्या खुर्चीत अवघडलेल्या अवस्थेत बसून असेन. मनातून भयंकर धास्तावलेला.

शेवटी मी उठेन... बोलू लागेन....

अरेरे! मी त्या दोन लोकांना होकार का दिला? मी अत्यंत निर्धाराने नाही का म्हणालो नाही?

‘चुकणे’ हा माणसाचा स्वभाव आहे आणि ‘नकार’ देणे, हा दैवी गुण आहे.

- oOo -

पुस्तक: पांढर्‍यावर काळे.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
पाचवी आवृत्ती, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ५८-६१.

(पहिली आवृत्ती: १९७१. अन्य प्रकाशन)


हे वाचले का?

बुधवार, १० जुलै, २०२४

लेखकजिज्ञासायोग

(आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...)

माणसेः अरभाट आणि चिल्लर

काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ?

तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्या पावलात एका भिल्लाने मारलेला बाण लवकरच शिरणार आहे अशा निद्रिस्त महापुरुषास– –या सगळ्यांना तू आधीच मारले आहेस. सामान्य माणसे मरतात, थोरांचा अवतार संपतो. पण दोघांनाही मृत्यू समान असतो. त्याला तूच जबाबदार आहेस. मग हे सारे निर्माण तरी कशासाठी केलेले ?

आम्हांला जन्माला न येण्याचे कधी स्वातंत्र्य होते का ? जगण्यातील पाप-पुण्याचे जे नियम तुला मान्य आहेत, त्यांची आम्हांला कसली तरी जाण होती का ? आणि शेवटी मरण तरी न स्वीकारण्याचे आम्हांला स्वातंत्र्य आहे का ?

“अर्जुना, तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे. तू नाममात्र हो.” एवढे अमर्याद सामर्थ्य असणाऱ्याला कोणाची तरी नाममात्र म्हणून का बरे गरज वाटावी ? आणखी एक गोष्ट आहे. प्रत्येक जीव जन्माला येत असतानाच आपल्या मृत्यूचे गाठोडे सोबत घेऊन येत असतो. तो जगत असतानाच एकेक कण मरत असतो. मग मी सगळ्यांना आधीच मारले आहे, ही शेखी कशासाठी ? जन्मलेल्या जिवाला मी मरणमुक्त केले आहे असे एखादे तुझे उदाहरण असेल तर ते प्रौढीने सांग. जे अटळ आहे, ते आपण घडवणार आहो, हे कसले सांगणे आहे ?

बरे, सगळेच जण नाममात्र असतील तर त्यांना श्रेय व दोष तरी का द्या ? मग पुण्य, पाप ठरवायचे ते तरी कशाच्या आधारावर ? त्यांत तरी काही सुसंगती आहे का ? अश्वत्थामा नाममात्र होता का ? तुझ्याच सांगण्यावर त्याने नारायणास्त्र एका अजात बालकाकडे वळवले, तर त्याला रक्तपिती झाली. का अगदी जवळची काही लाडकी माणसे तेवढीच नाममात्र म्हणून पाप-पुण्यमुक्त असतात, आणि नतद्रष्ट माणसे आपल्या कर्माची फळे भोगतात ?

नरो वा कुंजरोच्या वेळी धर्मराजाने वकिली चलाखीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली. कदाचित त्या वेळी देखील तुझीच सूचना असावी. त्या वेळी तो अप्रत्यक्षरीत्या का होईना, द्रोणाचार्याच्या मृत्यूला कारणीभूत झाला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले, ते कशाबद्दल ? तर खोटे बोलल्याबद्दल. आणि ते कसले ? तर त्याची करंगळी गळून पडली. एखाद्याने टाइम बाँब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशांची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे. द्रोणाचार्यानी आंगठा मागून एकलव्याला नामशेष केले, म्हणून कदाचित करंगळी देऊन धर्मराजाने अद्दल घडवली असेल ?

कोणत्याही कारणामुळे करंगळी गळून पडणे ही काय शिक्षा झाली ? एखाद्या खेडेगावातील शाळेत अगदी बिगर यत्तेत आलेल्या बुजऱ्या लहान मुलांखेरीज कुणाचेच करंगळीशिवाय काही अडत नाही. तो जर नाममात्र असेल, तर त्याला तेवढी देखील शिक्षा नको. नाममात्र नसेल तर त्याला याहून जास्त शिक्षा हवी. पार्शियालिटी अंपायर, पार्शियालिटी अंपायर...

जर आम्ही सगळेच नाममात्र आहोत, तर काचेच्या नळीतून सरकणाऱ्या पाऱ्याच्या थेंबाप्रमाणे आम्हांला निर्लेप जाऊ दे. मग पापाचे प्रायश्चित्त नको, आणि पुण्याचे कसले श्रेय नको. आणि जर तू साऱ्याचाच उद्भव आहेस, तर आम्ही असे सदोष आणि अपूर्णच जन्माला आलो हे तुला माहीत नाही का ? आणि आम्ही तसे तडकलेले, हिणकस झालो, याची जबाबदारी तुझीच नाही का ? तू केलेल्या बाहुल्या सगळ्या भेगाळलेल्या झाल्या म्हणून युगानुयुगे त्या बाहुल्याच का तू झोडपत राहणार ?

आकाश भेदून येणारा, ज्वालामुखीच्या स्फोटातून प्रकट होणारा, संतप्त सागरांच्या गर्जनेतून अवतरणारा भयंकारी विश्वशब्द इतका अतिमानवी असतो की तो आमच्यासारख्या क्षुद्रांना ऐकूच येत नाही, आम्हांला त्याचे व्याकरण कळत नाही, की त्याचा अर्थबोध होत नाही. तो शब्द भयचकित करणारा असतो, पण त्यात कशाचेही उत्तर असतं नाही.

“–तू अत्यंत उध्दट, मूढ आहेस. तू येथून चालता हो, येथे पाऊल टाकण्याची तुझी योग्यता नाही. तू बाहेर जा, तू चालता हो, चालता हो.”

योगेश्वरा, बाहेर हाकलला जाणे, चालता हो असे शब्द ऐकणे मला नवीन नाही. ते माझ्या अंगवळणी पडले आहे. जेथे विश्वरूप प्रकट होते, त्या ठिकाणी तर माझ्यासारख्या संस्कारहीन व्रात्याला थारा देखील मिळणार नाही, हे मला प्रथमपासूनच माहीत होते. तेव्हा येथून हाकलला जाण्यात मला आश्चर्य नाही, की वैषम्य नाही.

माझ्या रानगडद अज्ञानाकडे तू दुर्लक्ष कर. पण तू दिवस, महिना, वर्ष या मापनातील काळ आहेस, फसवणाऱ्यांमधील द्यूत आहेस. मग कदाचित तू माझ्या अज्ञानातील मध्यबिंदू असशील. जर तेथे तू असशील तर ते किती अमर्याद आहे, हे तुला माहीत असणारच. तू जर तेथे नसशील, तर तू जेथे नाहीस, असे ते एक अद्वितीय स्थान असेल. मग ते सर्वस्वी माझे असल्याने मला त्याविषयी विशेष ओढच असणार, नाही का ?

तू मला हाकलले आहेसच. मी जातोच, पण जाण्यापूर्वी एकच. हे अज्ञान आहे, म्हणूनच मी अस्तित्वात आहे. ज्ञानानंतर माझे मीपण राहणारच नाही. एक थेंब सागरात मिळून जावा त्याप्रमाणे ते नाहीसे होईल. आतापर्यंत तरी मला असले विसर्जन मोहवणारे वाटत आलेले नाही. म्हणून एकच प्रार्थना आहे. माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. “O Lord, Protect my doubt...”

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १२२-१२५.

---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.


हे वाचले का?