(आज १० जुलै, गुरुनाथ आबाजीचा जन्मदिवस. त्या निमित्ताने त्याच्या कथालेखनाहून वेगळे, अनुभवनजन्य चिंतनशील लेखन असलेल्या ‘माणसे: अरभाट आणि चिल्लर’ मधील हा वेचा...)
काही विचारायला तुझ्याकडे आता यायचे ते अगदी कोडगेपणानेच. ‘हे सारे जाणून घेण्याचे तुला प्रयोजन काय ? मी सर्वत्र आहे, हे तू जाण. तेवढे बस्स आहे.’ अशी एक टपली तू प्रत्यक्ष अर्जुनालाच मारली आहेस. तेव्हा तू काय मला पायरीवर पाऊल टाकू देणार ?
तू सर्वहर, सगळ्यांचा मृत्यू आहेस, भविष्यकाळी उद्भव आहेस. हे सारे ठीक आहे. पण हे सारे आहे कशासाठी ? आधी सगळ्यांना जन्माला घालायचे, त्यांचे भोग त्यांना भोगू द्यायचे, आणि शेवटी ‘मी साऱ्यांना आधीच मारले आहे’, असे म्हणायचे. कुणी शरपंजरी पडलेले असल्यास त्यांस, शस्त्र खाली ठेवलेल्या वीरांस, ज्याच्या पावलात एका भिल्लाने मारलेला बाण लवकरच शिरणार आहे अशा निद्रिस्त महापुरुषास– –या सगळ्यांना तू आधीच मारले आहेस. सामान्य माणसे मरतात, थोरांचा अवतार संपतो. पण दोघांनाही मृत्यू समान असतो. त्याला तूच जबाबदार आहेस. मग हे सारे निर्माण तरी कशासाठी केलेले ?
आम्हांला जन्माला न येण्याचे कधी स्वातंत्र्य होते का ? जगण्यातील पाप-पुण्याचे जे नियम तुला मान्य आहेत, त्यांची आम्हांला कसली तरी जाण होती का ? आणि शेवटी मरण तरी न स्वीकारण्याचे आम्हांला स्वातंत्र्य आहे का ?
“अर्जुना, तू लढ, कारण मी सगळ्यांना आधीच मारले आहे. तू नाममात्र हो.” एवढे अमर्याद सामर्थ्य असणाऱ्याला कोणाची तरी नाममात्र म्हणून का बरे गरज वाटावी ? आणखी एक गोष्ट आहे. प्रत्येक जीव जन्माला येत असतानाच आपल्या मृत्यूचे गाठोडे सोबत घेऊन येत असतो. तो जगत असतानाच एकेक कण मरत असतो. मग मी सगळ्यांना आधीच मारले आहे, ही शेखी कशासाठी ? जन्मलेल्या जिवाला मी मरणमुक्त केले आहे असे एखादे तुझे उदाहरण असेल तर ते प्रौढीने सांग. जे अटळ आहे, ते आपण घडवणार आहो, हे कसले सांगणे आहे ?
बरे, सगळेच जण नाममात्र असतील तर त्यांना श्रेय व दोष तरी का द्या ? मग पुण्य, पाप ठरवायचे ते तरी कशाच्या आधारावर ? त्यांत तरी काही सुसंगती आहे का ? अश्वत्थामा नाममात्र होता का ? तुझ्याच सांगण्यावर त्याने नारायणास्त्र एका अजात बालकाकडे वळवले, तर त्याला रक्तपिती झाली. का अगदी जवळची काही लाडकी माणसे तेवढीच नाममात्र म्हणून पाप-पुण्यमुक्त असतात, आणि नतद्रष्ट माणसे आपल्या कर्माची फळे भोगतात ?
नरो वा कुंजरोच्या वेळी धर्मराजाने वकिली चलाखीने या बोटावरची थुंकी त्या बोटावर केली. कदाचित त्या वेळी देखील तुझीच सूचना असावी. त्या वेळी तो अप्रत्यक्षरीत्या का होईना, द्रोणाचार्याच्या मृत्यूला कारणीभूत झाला. नंतर स्वर्गाला जाताना धर्मराजाला प्रायश्चित्त मिळाले, ते कशाबद्दल ? तर खोटे बोलल्याबद्दल. आणि ते कसले ? तर त्याची करंगळी गळून पडली. एखाद्याने टाइम बाँब ठेवून हत्या केली, तर त्याच्या मिशांची टोके कातरण्याची शिक्षा देण्यासारखे हे आहे. द्रोणाचार्यानी आंगठा मागून एकलव्याला नामशेष केले, म्हणून कदाचित करंगळी देऊन धर्मराजाने अद्दल घडवली असेल ?
कोणत्याही कारणामुळे करंगळी गळून पडणे ही काय शिक्षा झाली ? एखाद्या खेडेगावातील शाळेत अगदी बिगर यत्तेत आलेल्या बुजऱ्या लहान मुलांखेरीज कुणाचेच करंगळीशिवाय काही अडत नाही. तो जर नाममात्र असेल, तर त्याला तेवढी देखील शिक्षा नको. नाममात्र नसेल तर त्याला याहून जास्त शिक्षा हवी. पार्शियालिटी अंपायर, पार्शियालिटी अंपायर...
जर आम्ही सगळेच नाममात्र आहोत, तर काचेच्या नळीतून सरकणाऱ्या पाऱ्याच्या थेंबाप्रमाणे आम्हांला निर्लेप जाऊ दे. मग पापाचे प्रायश्चित्त नको, आणि पुण्याचे कसले श्रेय नको. आणि जर तू साऱ्याचाच उद्भव आहेस, तर आम्ही असे सदोष आणि अपूर्णच जन्माला आलो हे तुला माहीत नाही का ? आणि आम्ही तसे तडकलेले, हिणकस झालो, याची जबाबदारी तुझीच नाही का ? तू केलेल्या बाहुल्या सगळ्या भेगाळलेल्या झाल्या म्हणून युगानुयुगे त्या बाहुल्याच का तू झोडपत राहणार ?
आकाश भेदून येणारा, ज्वालामुखीच्या स्फोटातून प्रकट होणारा, संतप्त सागरांच्या गर्जनेतून अवतरणारा भयंकारी विश्वशब्द इतका अतिमानवी असतो की तो आमच्यासारख्या क्षुद्रांना ऐकूच येत नाही, आम्हांला त्याचे व्याकरण कळत नाही, की त्याचा अर्थबोध होत नाही. तो शब्द भयचकित करणारा असतो, पण त्यात कशाचेही उत्तर असतं नाही.
“–तू अत्यंत उध्दट, मूढ आहेस. तू येथून चालता हो, येथे पाऊल टाकण्याची तुझी योग्यता नाही. तू बाहेर जा, तू चालता हो, चालता हो.”
योगेश्वरा, बाहेर हाकलला जाणे, चालता हो असे शब्द ऐकणे मला नवीन नाही. ते माझ्या अंगवळणी पडले आहे. जेथे विश्वरूप प्रकट होते, त्या ठिकाणी तर माझ्यासारख्या संस्कारहीन व्रात्याला थारा देखील मिळणार नाही, हे मला प्रथमपासूनच माहीत होते. तेव्हा येथून हाकलला जाण्यात मला आश्चर्य नाही, की वैषम्य नाही.
माझ्या रानगडद अज्ञानाकडे तू दुर्लक्ष कर. पण तू दिवस, महिना, वर्ष या मापनातील काळ आहेस, फसवणाऱ्यांमधील द्यूत आहेस. मग कदाचित तू माझ्या अज्ञानातील मध्यबिंदू असशील. जर तेथे तू असशील तर ते किती अमर्याद आहे, हे तुला माहीत असणारच. तू जर तेथे नसशील, तर तू जेथे नाहीस, असे ते एक अद्वितीय स्थान असेल. मग ते सर्वस्वी माझे असल्याने मला त्याविषयी विशेष ओढच असणार, नाही का ?
तू मला हाकलले आहेसच. मी जातोच, पण जाण्यापूर्वी एकच. हे अज्ञान आहे, म्हणूनच मी अस्तित्वात आहे. ज्ञानानंतर माझे मीपण राहणारच नाही. एक थेंब सागरात मिळून जावा त्याप्रमाणे ते नाहीसे होईल. आतापर्यंत तरी मला असले विसर्जन मोहवणारे वाटत आलेले नाही. म्हणून एकच प्रार्थना आहे. माझ्या अज्ञानातील संशयाला संरक्षण दे. “O Lord, Protect my doubt...”
- oOo -
पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १२२-१२५.
---
सदर वेच्यामधील मोठे परिच्छेद मोबाईलच्या छोट्या पडद्यावर वाचण्यास सुलभ व्हावेत या दृष्टीने मजकुरात कोणताही बदल न करता लहान-लहान परिच्छेदांमध्ये विभाजित केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा