पूर्वी ऐकलेलं समस्यापूर्तीचं एक कोडं आहे. शक्यतांचा पर्यायांचा विचार करत निर्णय घेण्याची आवश्यकता ठसवण्यासाठी ते वापरले जाते. मॅनेजमेंटच्या, टीम बिल्डिंगच्या, निर्णयप्रक्रियेच्या ट्रेनिंगमधे याचा वापर केला जातही असावा. प्रसंग असा आहे की तुम्ही रेल्वे रुळांजवळ पोचला आहात. समोरच्या रुळांवर काही मुले खेळताहेत. तुम्हाला दूरवरून गाडी येताना दिसते आहे जी त्या पाचांच्या अगदी जवळ पोचली आहे. पण तिकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. गाडीचा वेग पाहता तुम्ही धावत गेलात तरी त्या मुलांपासून हाकेच्या अंतरावर पोचून त्यांना ओरडून इशारा देण्याइतका वेळ तुमच्याकडे नाही हे ध्यानात येते आहे. पण अचानक तुमच्या लक्षात येते की तुमच्या जवळच रुळ बदलण्यासाठीची लिवर आहे, जी खेचून तुम्ही येणार्या गाडीचे रूळ बदलू शकता. गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्या शेजारी वापरात नसलेला एक मार्ग आहे. तुमच्या जवळची लिवर सांधा बदलून त्या मार्गावर गाडी नेण्यास सहाय्य करू शकते. पण त्या मार्गावरही एक मुलगा एकटाच खेळत बसला आहे. तुमच्यासमोर आता प्रश्न आहे की तुम्ही तो सांधा बदलून गाडी दुसर्या मार्गावर न्याल का?
या प्रश्नाला कसे सामोरे जाता त्यावरून तुमचे उत्तर बदलत जाते. उदाहरणार्थ तुम्ही केवळ पाच विरूद्ध एक असा संख्येचा विचार केला तर तुम्ही गाडीचे रूळ बदलण्याचा निर्णय घ्याल. परंतु हा केवळ संख्यात्मक विचार झाला. गुणात्मक बाजूने पाहिले तर गाडी ज्या रुळांवरून येते आहे त्यावर खेळणारी मुले ही बेफिकीर आहेत, तिथे खेळणे हे चूक आहे हे त्यांना समजायला हवे. याउलट वापरात नसलेल्या मार्गावर खेळणारा मुलगा हा सुज्ञ आहे. त्याने सुरक्षित जागा निवडली आहे. तेव्हा पाच बेफिकीर व्यक्तींना वाचवण्यासाठी तुम्ही एका सुज्ञाचा बळी देत आहात. आता या पार्श्वभूमीवर आपला निर्णय वेगळा असेल का? एखादा तरीही संख्यात्मक विचारांपाशी ठाम राहू शकतो. पण त्याच्यासाठी पुढची समस्या आहे.
जो वापरात नाही, ज्याची देखभाल होत नाही अशा जुन्या मार्गावर गाडी गेल्यास तिला अपघात होण्याची शक्यता वाढते. यातून ती रुळावरून घसरली तर कदाचित त्या खेळणार्या मुलांच्या संख्येहूनही अधिक बळी जाऊ शकतात. आता निव्वळ संख्यात्मक निकषांवरही तुमचा निर्णय चुकीचा ठरू शकतो. ही शक्यता नव्याने ध्यानात घेतली तर निर्णय तोच राहील का असा प्रश्न विचारला जाऊ शकतो.

पण त्याहीपूर्वी या 'गेम'ची इन्ट्रोडक्शन देणारी 'झीरो' लेवल आहे. ज्यात फक्त गाडी आणि ती येत असलेल्या रुळावर बांधलेली माणसे आहेत. तुमच्या जवळच ती लिवर तुम्हाला दिसते आहे. बस इतकेच. ती लिवर गाडी येत असलेल्या रुळालाच जोडलेली आहे का, ती अजून वापरात आहे का, ती खेचल्याने गाडी येणार्या रुळाचाच सांधा बदलतो का, त्या सांध्याची सध्याची स्थिती रुळ बदलण्याची आहे की आता ज्या रुळावरून गाडी येते आहे ती कायम ठेवणारी आहे असे अनेक प्रश्न कथेतील खेळाडूसमोर आहेत. म्हणजे आपण गाडीचे रुळ बदलून तिला पाच जणांना जिथे बांधून ठेवले आहे त्या रुळावरून बाहेर काढणार आहोत की उलट त्यावरच वळवणार आहोत याची त्याला कल्पना नाही. आणि तरीही त्याला लिवर ओढावी की ओढू नये हा निर्णय घ्यावा लागणार आहे. लिवर ओढली नाही आणि गाडी त्या पाचांच्या चिंधड्या उडवत गेली तर शक्य असूनही आपण त्यांचा जीव न वाचवल्याची बोच त्याला सलत राहणार आहे (तो तितपत संवेदनशील आहे असे मानू या). आणि लिवर ओढूनही तेच घडेल ही शक्यताही आहेच, कारण सांध्याची सध्याची स्थिती त्याला ठाऊक नाही.
खेळाडू धीर करून लिवर ओढतो आणि गाडीची दिशा बदलून ती शेजारील रुळावरून धडधडत निघून जाते. रुळावर बांधून ठेवलेल्यांचे प्राण वाचतात. गेमच्या पुढच्या - पहिल्या - लेवलवर पुन्हा तेच चित्र दिसते आहे. खेळाडू मागचा निर्णय आठवून बेफिकीरपणे पुन्हा लिवर ओढायला जातो इतक्यात त्याच्या ध्यानात येते की आता पलिकडचा रुळ मोकळा नाही, तिथे एका माणसाला बांधून ठेवले आहे. निर्णयाची पार्श्वभूमी बदलली आहे! निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्णयही कसा, कुण्या जीवांच्या जन्ममरणाचा अधिकारच त्याच्या हाती आला आहे. अधिकाराबरोबरच ती जबाबदारीही (अधिकार देणारी व्यवस्था अधिकाराला जोडून काही जबाबदार्या, काही कर्तव्येही नेमून देत असते याची जाणीव बहुतेकांना नसतेच) त्याला जाणवते आहे. वर दिलेल्या मूळ समस्येला तो सामोरा जातो आहे, संख्येच्या आधारे निर्णय घ्यावा की कसे. समजा ती पाच माणसे गुन्हेगार असतील ताणि तो एकटा निरपराध, सर्वसामान्य माणूस असेल तर? तर मग केवळ पाचांना वाचवण्यासाठी त्याला मारण्याचा निर्णय योग्य कसा ठरेल? या सार्या तणावातून तो अखेर एकट्या माणसाला ठार मारण्याचा निर्णय घेतो (बहुतेक लोक संख्येआधारेच निर्णय करतात) आणि धडधडत जाणारी गाडी त्या माणसाच्या चिंधड्या करत जाताना त्याचा गेम कन्सोल त्याला दाखवतो.
हे दृश्य प्रत्यक्ष पाहणे हे महत्त्वाचे आहे, तो मृत्यू आता केवळ शक्यता राहिलेला नाही तर वास्तव - गेममधील जगातील का होईना - झाले आहे आणि त्याचा खेळाडूच्या मनावर परिणाम होतो आहे, त्याच्या पुढच्या स्टेजवरील निर्णयाला या निर्णयाच्या परिणामाची पार्श्वभूमी राहणार आहे, हे ध्यानात घ्यायला हवे.
पुढच्या लेवलवर पुन्हा तेच दृश्य दिसते, फक्त एक फरक असतो. दुसर्या रुळावर कुणा माणसाला बांधून ठेवलेले नसते तर तिथे एक लहान मूल रांगत असते. आता पुन्हा एकवार निर्णयाच्या आवर्तात फेकला गेलेला खेळाडू अपेक्षेप्रमाणे पाच जणांपेक्षा लहान मुलाला वाचवण्याचा निर्णय घेतो. आता निर्णयामागचा विचार संख्येचा नाही, तो गुणात्मकही नाही. रांगते लहान मूल पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या तुलनेत शून्य गुण-कौशल्ये घेऊन उभे असते. त्याच्या अस्तित्वावर अन्य कुणाचे अस्तित्वही अवलंबून नाही. ते पाच जण आणखी काही जणांचे पोशिंदे असू शकतात. यांचा मृत्यू आणखी काही आयुष्यांची वाट खडतर करणार आहेत. तरीही खेळाडू त्या पाचांऐवजी त्या लहान मुलाला वाचवण्याचा निर्णय घेतो आहे. यात काही जणांना 'वर्तमान आणि भविष्य' अशी तुलना दिसू शकेल. कुणी असा विचार करील की त्या पाचांचा वाट्याला आजवर बरेच आयुष्य आले आहे, ते लहान मूल या जगात येऊन फारसा काळ झालेला नाही. म्हणून त्या पाचांऐवजी जगण्याची संधी मिळण्याचा त्याचा हक्क अधिक आहे. खेळाडूने इतका विचार केलेला दिसत नाही. पण त्याच्या निर्णयावर त्याहुनही अधिक प्रभाव आहे तो आपल्या भावनिक जडणघडणीचा, संस्कारांचा, उत्क्रांतीच्या वाटे आपल्या रक्तात रुजलेल्या पुढच्या पिढीच्या रक्षणाच्या प्रेरणेचा.
खेळाडू लिवर न खेचता गाडी आहे त्याच मार्गावरून पुढे जाऊ देतो आणि त्या पाच जणांच्या अंगावरून धडधडत गेलेली गाडी आणि तिच्यामागे झालेला रक्तामांसाचा चिखल त्याला पहावा लागतो. गाडी जसजशी जवळ येते तसे त्याचे ध्यान मरु घातलेले ते पाच जीव आणि त्याना चिरडायला येत असलेली ती गाडी यांच्यावर केंद्रित होते आहे. या दरम्यान त्याचे मुलाकडे दुर्लक्ष होते आणि ते मूलही दरम्यान रूळ ओलांडून नेमके पहिल्या रुळावरच पोचते आणि त्या पाचांबरोबर त्याचाही मृत्यू खेळाडूला पहावा लागतो. इथे प्रथमच वास्तव स्थिर नसते तर ते बदलत असते आणि निर्णयाची अंमलबजावणी होईतो तो निरुपयोगी वा क्वचित घातकही होऊन बसतो याची जाणीव त्याला होते.
इतक्यात खेळाडूच्या लक्षात येतं की अरे हा तर गेम आहे. ही दुसरी लेवल तो पुन्हा खेळू शकतो. तेव्हा तो पहिल्या लेवलला रिसेट करून दुसरी लेवल पुन्हा खेळू लागतो. यावेळी त्याला पुढे काय होणार ठाऊक असल्याने तो लिवर खेचून गाडी मूल रांगत असलेल्या रुळावर वळवतो. पण... आता ते मूल रांगत दुसर्या रुळावर जात नाही आणि त्याचा मृत्यू पुन्हा एकवार खेळाडूला पहावा लागतो. वास्तव नुसतेच अस्थिर असते असे नव्हे तर ते 'नियत' देखील नसते याचे भान खेळाडूला ही लेवल देऊन जाते. कदाचित यामुळेच आणखी एकदा लेवल रीसेट करून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न तो करताना दिसत नाही. उलट एकाचा बळी देऊन पाचांचे प्राण वाचवल्याचे समाधान करून घेतो. यावेळी संख्येचा विचार हा निर्णयापूर्वी केलेला विचार नाही, ती त्याची पश्चातबुद्धी आहे. पहिल्या लेवलवर निर्णयाचे 'कारण' म्हणून आलेला विचार आता 'समर्थन' म्हणून समोर येतो आहे. ही घडल्या गोष्टीचे समर्थन करण्याची, आपल्या निर्णय योग्यच असल्याचा समज करून घेण्याची ही प्रवृत्ती सनातन आहे, झाल्या परिणामांची भरपाई होणे शक्य नसेल तर भविष्यातील मन:स्वास्थ्याच्या दृष्टीने अपरिहार्यही.
कदाचित त्याची संवेदनशीलता, त्याची हवे ते घडवण्याची इच्छा इतकी प्रबळ नसावी की रीसेट करून हवा तो परिणाम घडेतो ती लेवल खेळत रहावी. इतरांच्या जीवनमरणाचा प्रश्न असला नि उत्तराचे पर्याय आपल्या हाती असले तरी योग्य ते उत्तर सापडेपर्यंत ते तपासत राहण्याइतकी चिकाटी आपल्यात नसते. पण त्यात जर स्वार्थ किंवा आपण स्वतः गुंतलेले असू तर...? जर समोर दिसणार्या त्या लहान मुलाच्या जागी आपले स्वतःचे मूल दिसत असते तर खेळाडूने आणखी एकवार, नव्हे पुन्हा पुन्हा लेवल रीसेट करून ते मूल वाचण्याचा परिणाम साध्य केला असता का? गेममधे का होईना आपलेच मूल चिंधड्या होऊन मृत्यूच्या स्वाधीन होताना त्याला पाहवले असते का? निदान या प्रश्नाच्या उत्तरासाठी फार विचार करण्याची गरज आहे असे नाही.
तिसर्या लेवलवर या दृश्यात सांधा बदलणारी लिवर दिसतच नाही, गाडी तर येतच असते. तितक्यात त्याला एक जाडा माणूस त्या रुळालगत चाललेला दिसतो. सांधा बदलणे शक्य नसल्याने तो त्या जाड्या माणसाला रुळावर ढकलून गाडी 'डी-रेल' होईल, घसरेल असा विचार करून त्या निरपराध जाड्याला त्याच्या केविलवाण्या हाकांना न जुमानता त्या रुळांवर ढकलून देतो. गाडी डी-रेल होते, पाच माणसांचे जीव वाचतात. (इथे मोठा अपघात होऊन गाडीतील काही बळी जातील अशी एक शक्यता पुढच्या टप्प्यात येऊ शकली असती. पण जावडेकरांनी तो धागा जोडून घेतलेला नाही.)
याआधीच्या टप्प्यावर निर्णय त्याचा असला तरी मधे लिवर, रुळांचे सांधे वगैरे अन्य व्यवस्थांचा सहभाग होता. अपेक्षित परिणाम न घडता तर खेळाडूबरोबरच या यंत्रणांवरही त्याची जबाबदारी येत असते. त्यांनी योग्य तर्हेने किंवा अपेक्षित काम करणे वा न करणे हे खेळाडूच्या निर्णयाव्यतिरिक्त परिणाम निश्चित करणारे आणखी एक कारण असू शकते. पण इथे मात्र आपल्या कृतीच्या बर्यावाईट परिणामाला सर्वस्वी तोच जबाबदार आहे. इतकेच नव्हे तर त्याने एका व्यक्तीचा स्वतःच्या हाताने प्रत्यक्ष खून केलेला आहे. खेळाडू हा प्रथमच त्या गेमचा भाग बनतो आहे.
पुढच्या लेवलवर पुन्हा तीच स्थिती, गाडी येते आहे, लिवर गायब आहे. आता पुन्हा बाजूला कुणी माणूस असेल त्याला ढकलावे म्हणून खेळाडू पुढे होतो. पण त्याला दिसते की आता तिथे जाडा माणूस नाही, खेळाडूच्या इमारतीत राहणारी कुणी एक देखणी स्त्री त्याच्या जागी दिसते आहे. ही स्त्री काहीशी सैल स्वभावाची, छानछोकीने राहणारी, सर्वांना हवीशी वाटणारी; जिच्याबद्दल अभिलाषा असावी पण प्राप्ती न झाल्याने चारित्र्यहीन असल्याचा ग्रह करून घ्यावा अशी. तिला रुळावर ढकलून देऊन तिने आपल्याला वश न झाल्याबद्दल तिचा सूड - गेममधे का होईना - घेता येईल या हेतूने खेळाडू सर्वशक्तीनिशी तिला रुळावर ढकलून देतो नि तिचा जीव घेतो. जाड्या माणसाचा जीव घेताना त्याचा स्वार्थ कुठेही नव्हता, आता स्त्रीला मारताना मात्र त्याचा निर्णय वैयक्तिक सूडाने प्रेरित झालेला होता.
या सार्या खेळात समोर घडू पाहणार्या संभाव्य मृत्यूबाबत खेळाडू संवेदनशील आहे, तो टाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या पलिकडे जाऊन त्याबाबत निव्वळ हतबल, किंकर्तव्यमूढ होऊन बसलेला साक्षीदार ही एक वास्तविक शक्यता शिल्लक राहते. त्यापुढे जाऊन आजच्या तंत्रप्रधान जगात संवेदनशीलता तर सोडाच मरत्यांना वाचवणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे याची जाणीवही नसणारा, हा सारा प्रसंग बेमुर्वतपणे मोबाईल कॅमेर्याने शूट करणारा नि सोशल मीडियावर तो वीडीओ 'व्हायरल' करणारा खेळाडू ही एक नवी शक्यताही जोडून द्यायला हवी.
कथा: गेम
लेखकः सुबोध जावडेकर
पुस्तकः पुढल्या हाका
1 टिप्पणी:
बापरे. आपण निर्णय कसे घेतो याचा अत्यंत ढोबळ विचार मनात होता. सुबोध जावडेकरांच्या कथेनिमित्तानं इथं तू विलक्षण नेमक्या शब्दात सगळे पेच सांगितलेस. नैतिक म्हणून घेतलेले किंवा वस्तुनिष्ठ वाटलेले निर्णयसुद्धा कशा पार्श्वभूमीवर बेतलेले असू शकतात याच्या कळा बघून मेंदूत आनंदाच्या कळा आल्या. न बघितलेली इंटरेस्टिंग अशी सिरीज सांगितलीस. ती बघेनच. थँक्यू!
टिप्पणी पोस्ट करा