शुक्रवार, १५ जानेवारी, २०२१

प्रत्यय

शर्माजींचा तबला घुमू लागला. बाईंनी हात करून थांबवलं त्यांना. वाद्याला नमस्कार डोळे मिटले.

पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते |
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ||

आसावरीची आलापी सुरू झाली. समेवर येतानाची कोमल रिषभावरची डोळे पाणावतील अशी सत्यजितची आर्त मिंड... सरोद घेतलेल्या बाईचं रूपही एखाद्या पवित्र नदीच्या सात्त्विक प्रवाहासारखे भासणारं... सत्यजित रंगात आला. आसावरीत तो शिरल्यावर बाई अवचितपणे थांबल्या.

सत्यजितची रुंद लांब बोटं... नागाने सण्णकन काढलेल्या फण्यासारखा त्याचा टण्णकार. शेवटच्या लयीची बढ़त... तो घामाघूम होऊन थांबला. समाधानाने बाईंकडे पाहिलं. बाईंनी डोळे मिटलेले... स्तब्धच त्या.

आर्त

'अम्मा... " सत्यजितच्या आवाजात अधीरता. बाईनी डोळे उघडले. म्हणाल्या, "आज मी काही बोलणार नाही. तू तुझं परीक्षण करायचं."
शर्माजीचा संथ ठेका चालू होता. धा धिं धिं धा...
सत्यजित काही क्षण विचार करत राहिला. हळूहळू शर्माजीही थांबले.

"नाही... " तो म्हणाला. "नाही जमला मला आसावरी."
"कां असं वाटलं?" बाईनी उत्सुकतेने विचारलं,
"अम्मा, दादांचं ऐकलं की असंच वाटतं. वाटतं, मी कधी आणि कसा पोहोचेन तिथपर्यंत?"

"शर्माजी, जरा चहाचे बघता?" बाईंनी सुचवलं. शर्माजी आत गेल्यावर बाई त्याला म्हणाल्या,
"लहान वा मोठे गायक-वादक ऐकलेच पाहिजेत. आपण कुठे आहोत ते कळतं त्यामुळे. पण त्यांची - आपली तुलना ती नसते. कधी ती करूही नये."
सत्यजित हातातल्या त्याच्या जवाकडे बघत ऐकत होता. "हो, तू सांगितले आहेस मला... प्रत्येक कलावंताच्या मस्तकावर कलेने ठेवलेला हात वेगळा असतो."
"आणि जित, आपल्याकडे जे संचित आहे कलेचं, ते सांभाळणं जास्त महत्त्वाचं. मग? हे तर मी तुला नेहमीच सांगते."

सत्यजित आता अस्वस्थ झालेला.

'अम्मा खरं म्हणजे तुला आवडत नाही मी दादांकडे गेलो की." तो म्हणाला.
"का? मी तुला अडवलंय कधी की म्हटलय तसं?" बाईनी थेट विचारलं. काहीसं लागलंच त्यांना ते.
"नाही, अम्मा... मी काहीतरीच म्हणून गेलो.'' तो अपराधीपणे म्हणाला
"आश्चर्य वाटलं. मी तर तुला नेहमी सांगते, दादांचं ऐकशील ते त्यातलं चांगलं काय आहे, ते समजून ऐक. तयारी बघ. किती जिवाच्या कराराने, जीव ओतून ते वाजवतात ते बघ. तरी तू म्हणतोस मी-"
"सॉरी म्हटलं नं अम्मा... पण अम्मा, मला त्रास फार व्हायला लागला आहे अलीकडे."
कसला? विचारेपर्यंतच बाईच्या ते लक्षात आलं होतं. "कायम अम्मा, लोक काही ना काही बोलतातच. इतकी वर्ष मी दुर्लक्षच करतोय- पण..."
"काय बोलतात तर हेच ना, तुझे दादा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. मला तुझ्या दादांचा हेवा वाटतो, हे तर मीही ऐकत आलेच की." त्या थोड्याशा हसल्या. "तुझ्या मनाला ते लागत आलंय इतकी वर्ष, ते काय मला समजत नव्हतं?"
मग त्या परत हसल्या. म्हणाल्या,
"मला नकोच होती लोकप्रियता. कलेवरची माझी निष्ठा मी नितान्त जपली तेवढी. तिला परिपूर्ण रूप देण्याचाच प्रयत्न ठेवला. नाव कमावलं की यशस्वी झालो, हे गणित मी कधी मानलं नाही." पण त्या थांबल्या. हेदेखील किती वेळा सांगत राहायचं? आपली निष्ठा आपणच सांगायची म्हणजे..."

शर्माजी चहा ठेवून गेले.

"तर आता तुझ्या आसावरीबद्दल बोलते." बाई सत्यजितला चहा देत म्हणाल्या. "तुला जमला नाही आसावरी हे तुझंच निरीक्षण! पण ते खरं आहे. कारण माझ्या मते, तू 'आसावरी च्या गाभ्यापर्यंत पोहोचलासच नाहीस."
"म्हणजे अम्मा- "
"म्हणजे तू दादांची शैली उचलू पाहत होतास. अलीकडे तुझं असं होऊ लागलय. तू दादांना ऐकून आलास की जास्त. प्रभाव पडतो आपल्यावर कुणाचा ना कुणाचा, पण अनुकरण नाही करू.'
"तेच ना." सत्यजित रागाने म्हणाला. "तुला नाही आवडत दादांना मी भेटलो की. तू सांग ना स्पष्ट मग," तो उखडला होता. मग उठून ताडताड तो निघून गेला. हेही आता ठरून गेलं आहे. अबोल राहायचं नाहीतर टोकाचा संताप- बाईंच्या मनात आलं.

"निघू ना मी?" शर्माजी विचारत होते. बाईंनी तंद्रीत त्यांच्याकडे पाहिलं.
"जरा बोलायचंय तुमच्याशी." त्या म्हणाल्या. "मी आणि नाथ वेगळे झालो. या दहाएक वर्षात चुकूनही माझ्या तोडून नाथांबद्दल, त्यांच्या शैलीबद्दल टीकेचा शब्दही निघाला नाही. मनातसुद्धा नाही. तो त्यांचा मार्ग होता. माझा वेगळा आहे त्यांच्यापेक्षा, असं मी मानलं. मग आज..."
"तुम्ही गुरू आहांत सत्यजितच्या." शर्माजी म्हणाले. "ही टीका थोडीच आहे? सावध केलंत तुम्ही त्याला. नाथांबद्दल अनादर राहू दे. एक हळहळ वाटते तुम्हांला अजूनही."
बाईंनी त्यांच्याकडे पाहिलं. म्हणाल्या,
"जितला फार ओढा आहे नाथाचा. लहानपणापासून. ते दूर गेले म्हणून तो अजूनच वाढत गेला. किती आतल्या गाठीचा होत गेला सत्यजित मग. कुणात मिसळायचा नाही. अबोलही होत गेला. भित्राही झाला बराच."
"बाई, स्पष्ट बोलू का?"
"कायम वडीलकीचा आधार देत आलात मला. असं का विचारता?
"तसं नाही." शर्माजी ओशाळवाणे हसले. "बऱ्याचदा अप्रत्यक्षपणे सुचवून पाहिलं मी. नाथांकडे सत्यजितचं येणं-जाणं टाळायला हवं होतं. अहो, नाथांचं व्यक्तिमत्त्वच जबरदस्त! शिवाय ते प्रसिद्धीचं वलय... सामान्य लोक आकर्षित होतात. सत्यजित तर... "
"म्हणूनच तर नाही अडवलं मी. आधीच आपल्या इतक्या जवळच्या माणसाचा सहवास दुणावला की ओढ जास्तच वाढते. दुसरं, त्याच्या मनात माझ्याबद्दल एक अढी मात्र बसली असती."
"तुम्ही कायम समतोल दृष्टी ठेवून विचार करता- वागता. पाहत आलोय इतकी वर्ष. तुमची कलेवरची ती भक्ती, तो ध्यासही. फार कमी असतात असे तुमच्यासारखे कलाकार. लोक म्हणू देत; पण ते जाणतात नाथांपेक्षाही तुम्ही-' .
“शर्माजी-" बाईंनी अडवलं. "खूप ऐकली की ती तुलना, उघड उघड, दबकी... नाथांची बायको पण बरी वाजवते की! मुख्य म्हणजे स्त्री असूनही? तीही सरोद?'- जाऊ दे ते सगळं."
"सत्यजितला जाऊ दिलंत नाथांकडे ते एकवेळ मान्य केलं बाई, तरी नाथांनी मात्र तुमच्याबद्दल आजदेखील-"
बाईंनी पापण्या मिटून मूकपणेच त्यांना थांबवलं.
"आयुष्यातून जातात माणसं... वाटतं त्या त्या वेळी, घडीच विस्कटली. पण कधी आयुष्याचं उद्दिष्ट त्यामुळेच स्पष्टही होतं. निदान माझं झालं." बाई म्हणाल्या.

सकाळचं मृदू ऊन आता राकट, उग्र होऊ लागल होत. एक कवडसा रोज या घरावर हक्कच असल्यासारखा आत येई. दिवसभर त्याचं हलकंसं हलत राहणं, बाहेरचं ऊन ती गडद होवो. पण हा कवडसा मात्र सौम्यसा... शर्माजींचे लक्ष कवडशावरच होते. ते उठले.

"काळजी वाटते शर्माजी, ती वेगळीच. मोकळेपणाने जित नाही बोलत. पण तो कला पुरती हाती येण्यापूर्वीच नाव, कीर्तीच्या मागे तर लागणार नाही?"
"अहो, तसा तो तुमचाही मुलगा आहेच की." शर्माजी म्हणाले.
हो. म्हणून विश्वासही वाटतो आतून. माझ्या गुरुजींसारखा. गुरूची विद्या म्हणजे एक विश्वासही. त्यांच्या स्वरांतूनच तो आपोआप सोपवला जातो शिष्यापर्यंत." त्या समाधानाने इसल्या, "आणि आत्मप्रत्यय हो गोष्ट तर सावधच करणारी प्रत्येक कलावंताला..."

- oOo -

पुस्तक: 'आर्त’
लेखक: मोनिका गजेंद्रगडकर
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह
आवृत्ती दुसरी (२००९)
पृ. १२१ - १२४.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा