गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

माणसे

पण दुर्दैवाने या रमण्यालाही भावल्यासारखी नाटकात कामे करायची खाज. एकदा कुठे काम मिळाले म्हणून त्याने भावल्याची मिशी उसनी घेतली. नाटक संपल्यावर काय झाले कोण जाणे, पण झोपायला जायच्या गडबडीत रमण्या मिशी कुठे विसरला. दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा मोफत द्यायच्या अटीवर आणलेली मिशी गहाळ झाली. पण भावल्याने रमण्याची गय केली नाही. प्रथम दोन प्लेट भजी आणि दोन कप चहा फस्त केला आणि मग भांडण सुरू केले. ताबडतोब मिशी आणून दे, नाहीतर खटला भरतो अशी त्याने धमकी दिली.

सारे प्रवासी घडीचे

रमण्या काही कोकणाबाहेरचा नव्हता. खटल्याचे आव्हान मिळताच त्याला स्फुरण चढले. चहाला लालभडक अर्क स्वतःच्या आणि दुसर्‍याच्या नरड्यात ओतणारा रमण्या स्वत:च्या मिशीला पीळ देत भांडायला सज्ज झाला. भावल्याने नुसते खटल्याचे नाव काढताच रमण्याने हायकोर्टाचे नाव काढले. एकदा काय व्हायचे ते होऊन जाऊ दे! पर्वा नाही हायकोर्टात जावे लागले तरी. चहाचे खोपट विकीन आणि खटला चालवीन. मिशी तर सोडाच, पण भावल्याला शेंडीचेसुद्धा चार केस देणार नाही अशी प्रतिज्ञा रमण्या भर बाजारात करू लागला. जिवा शिंग्याने दादू गुरवाची कापली तशी शेंडी कापली तशी मिशीसाठी भावल्या आपली शेंडी कापील या भीतीने रमण्याने डोईवर चोवीस तास टोपी चढवली. भावल्याने नाना यत्न केले, पण रमण्याची शेंडी काही हाती लागत नाही हे कळून चुकताच त्याने मारामारीवर प्रकरण आणले. गरम पाण्याचे मडके फुटले, कपबश्यांचा चुरा झाला आणि खोपटाचे बांबू मारामारीसाठी वापरले गेले. अर्थात मारामारी नावापुरतीच! हातात बांबू घेऊन एकमेकांच्या आईबापांवरून शिव्यांचीच उधळपट्टी अधिक झाली. बाजारकरांची तास-दोन तास करमणूक झाली. या भांडणाचे 'संगीत मिशीचा पीळ' असे नाटकी नाव ठेवून बाजारकर मंडळी मोकळी झाली.

असे विक्षिप्त लोक त्या वेळी जागो जागी होते.

रावजीनाना हा नारळाचा व्यापारी. नारळाचा व्यापार चालू असताना तो धर्मभावनेने तुडुंब भरलेला असायचा. श्लोक, अभंग, ओव्या त्याच्या ओठांवरून कधी हलल्या नाहीत. येणार्‍या-जाणार्‍याला त्याने नीतिमत्तेचे चार घोट पाजलेले नाहीत असे झाले नाहीत. तोच रावजीनाना रात्री सामसूम झाली म्हणजे काजळलेला कंदील हातात घेऊन नित्य नेमाने देवळाजवळ राहणार्‍या गंगू भाविणीकडे जायचा. पण गावातले लोक चावट. त्याला मुद्दा आडवे येत आणि विचारीत, "रावजीनाना, रात्री खंय? देवदर्शनाक?" म्हण म्हातारा रावजीनाना त्याहून खट. तो म्हणे, "होय तर! म्हातारपणात देवदर्शनाशिवाय दुसरो धंदो कसलो?" आणि मग झाले गेले गंगेला मिळाले अशा पद्धतीने हुश्श करीत गंगूच्या पडवीत पाय टाकी.

गंगू भावीण हे त्या काळचे मोठे प्रस्थ होते. मी गावात होतो तेव्हा ती पन्नाशीकडे आली होती. पण त्या वयातही मोठी रगेल आणि रंगेल दिसायची. पालखीच्या वेळी नथ घालून आणि शालू नेसून ती चवरी ढाळायची, त्या वेळी ती एखाद्या संस्थानिकाच्या पट्टराणीसारखी दिसायची. एखादी पोरगी जर नटली, थटली म्हणजे 'गंगू भाविणीसारखी नटून थटून जाणार कुठे?' असे तिची आई विचारायची. एखाद्या सुंदर बाईचे वर्णन करायचे झाले तर ते गंगूच्या तुलनेत व्हायचे.

आमचा सख्या होडावडेकर तिच्याकडे नेमाने जायचा. फार पूर्वी माझ्या आजोबांचे तालुक्याच्या गावी तांब्यापितळेचे दुकान होते. त्या दुकानात सख्या नोकर होता. पुढे दुकानाचे दिवाळे वाजल्यावर तो आमच्याकडेच राहू लागला. त्याचे लग्न झालेले नव्हते. त्याला जवळचे असे कुणीच नव्हते. काही किरकोळ कामे करायचा आणि आमच्या घरीच राहायचा. उन्हात बसून राहायचे त्याचे वेड. उन्हात खोबरे, मिरच्या, पापड सुकत टाकले म्हणजे हातात काठी घेऊन राखणदारी करीत उन्हात बसायचा, कावळ्यांना हाकलून लावायचा. मी शाळेत होतो तेव्हा त्याचे वय शंभरीकडे होते. कमरेतून काटकोनात वाकला होता. काठी घेऊन लडबडत लुटूलुटू चालायचा. तासन् तास उन्हात बसायचे एक वेड, आणि तास-दोन-तास गंगू भाविणीकडे जाऊन बसायचे दुसरे वेड. त्याला खायला दिलेला लाडू किंवा आंबा ति मुद्दाम राखून ठेवायचा आणि रोजच्या रोज गंगूला नेऊन द्यायचा. तिथे जायचा नि तास-दोन-तास पडवीत बसून नुसता टकट्क पाहात राहायचा. ती अधूनमधून या ना त्या निमित्ताने आतबाहेर गेली तर स्वतःच्याच डोक्यावर हात आपटीत चरफडायचा. न हलता समोर बसून राहायला सांगायचा. आणि ती समोर बसली की आपली मळकट बुबुळे स्थिर ठेवून तिला बघ बघ बघत राहायचा. पुढे त्याचए पाय सुजले आणि चालणेच अशक्य झाले तेव्हा तो गंगूकडे जायचा थांबला. पण तरीही तो न चुकता मला नेहमी विचारायचा, "आपू, आज देवळाकडे जातलंय?"

"कित्याक?"

"गेलंय तर एक लाडू देतंय तो गंगूकडे नेवन दी."

आम्ही सर्वजण त्याची गंगूवरून चेष्टा करत असू. पण सख्या होडावडेकर कधी लाजला नाही की हसला नाही.

गंगूकडे त्याला भेटणारा त्याचा प्रतिस्पर्धी म्हणजे झिलू केदार. तब्बल पन्नाशीकडला माणूस. अंगाबांध्याने मजबूत. मटण त्याच्या आवडीचे. ज्या ज्या वेळी शक्य असे त्या त्या वेळी दुसर्‍याच्या कोंबड्या तो चोरीत असे. पाण्यात भिजवलेले फडके पटकन कोंबडीवर टाकून तो कोंबडी उचलायचा आणि खांद्यावरल्या पटकुरीत टाकून धूम ठोकायचा. भिजलेले फडके अंगावर पडले की कोंबडी ओरडत नाही. त्यामुळे चोरी झाली तरी कोंबडीची ओरड नाही आणि कोंबडीच्या मालकाचीही ओरड नाही. आमच्याकडे मटण असले म्हणजे तो हमखास आमच्याकडे जेवायला यायचा. मटणाबरोबर आठ-दहा कांदे कराकरा चावून खायचा. पोटाला तडस लागेपर्यंत जेवायचा. तो जेवायला आला की सख्या चडफडत राहायचा. त्याला शिव्या द्यायचा आणि झिलू हसायचा. मटणातली नळी उचलून म्हणायचा- "सख्या, फोडतंय ही नळी?" आणि मग सख्या आपली अधांतरी लोंबकळणारी हनुवटी घट्ट आवळून धरायचा.

आणि हाच झिलू केदार एकदा अकस्मात उठला आणि आषाढी एकादशीला पंढरपूरला गेला. तुळशीची भली मोठी माळ गळ्यात अडकवून परत आला. त्यानंतर तो अनेकदा आमच्या घरी आला. पण एकदाही जेवला नाही. मटणाच्या घमघमीत वासाने विचलित झाला नाही. कारण चंद्रभागेत स्नान करून मांस, कांदा, लसूण अशा उत्तेजक पदार्थांवर त्याने पाणी सोडले होते. त्यानंतर उभ्या जन्मात तो कांद्या-मटणाला शिवला नाही. गंगूकडे गेला नाही. घरी बसून तो मुलाने वाचलेली ज्ञानेश्वरी वाचायचा आणि रात्री एकतारी छेडीत म्हणायचा- "पाहे तिकडे बापमाय| विठ्ठल रखुमाई||"

झिलू केदार मटण खात नाही, गंगूकडे जात नाही हे सख्याला कळले तेव्हा तो तुच्छतेने हसला. "समोर मासळी दिसत नाय तोवर बगळ्याचा ध्यान!" असे म्हणत सख्याने झिलूला फक्त हिणवले.

पुढे सख्याने डोळे मिटले. ते कळता झिलू धावून आला. गावातला एक जुना माणूस गेला म्हणून डोळे टिपत रडला. "बहू केला फेरा! येथे सापडला थारा||" असे म्हणत त्याने सख्याच्या तिरडीला खांदा दिला.

आमच्या घरी सर्वांना वाटले होते की, गंगू भाविणीकडे अधूनमधून लाडू, आंबे पाठवू असे सांगितले की सख्या पिंड घेईल म्हणून. पण दुपार उलटून गेली तरी कावळा पिंडाला शिवला नाही. शेवटी झिलू पिंडाकडे तोंड करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला, "मी जन्मात गंगूकडे जायचंय नाय!-" तसा भुर्रकन कावळा आला नि पिंड घेऊन गेला.

अशी एक एक माणसे जगावेगळी जगली. जगावेगळी मेली. भरड्या जमिनीत जन्मली आणि मुरमासारखी खडबडीत राहिली.

पावसाच्या पुराबरोबर येणार्‍या पाण्याशिवाय गावात दुसरे पाणी नाही. ते सुद्धा पावसाळ्याबरोबर बेपत्ता. उन्हाळ्यात तर प्यायच्या पाण्याचीसुद्धा मारामार. त्यामुळे धड शेती नाही. शेतीची भरपाई करण्यासाठी कसला जोडधंदा नाही. त्यामुळे सर्रास दुष्काळी दारिद्र्य. मूळची अभिमानी माणसे गरिबीत खितपत पडलेली. त्यामुळे स्वभावात एक प्रकारचा कडवटपणा खोलवर मुरलेला. मन नित्याचे असमाधानी आणि चरफडणारे! मूळचे डोके कुशाग्र पण ते गुंतवायला साधन नाही. त्यामुळे दुसर्‍याच्या गोष्टीत, विशेषतः भानगडीत लक्ष घालणे, त्याच गोष्टींचा रवंथ करणे हे एरवी फुकट जाणारा वेळ घालवायचे एकमेव साधन! कुणी नवखा माणूस आला, कुणी काही निराळे केले की आवाज मारून चर्चा झालीच. त्या मागोमाग टिंगल आलीच. चर्चेसाठी कुठे काही मिळाले नाही तर कुत्र्याने पुरलेले हाड उकरून काढावे तसे काही तरी उकरून काढले जाई.!-

बागाईतकर मास्तरांना लग्न होऊन बरीच वर्षे मूलबाळ झाले नाही, ही बाब असो किंवा हरबा जोशी साठीत असताना त्याच्या तिसरेपणाच्या बायकोला मुलगी झाली ही बाब असो, सारख्याच्य उत्साहाने आणि संशयाने अनेक तर्कवितर्क चालत. इंच-दोन-इंच लांबीची मिशी ती काय, आणि त्यासाठी भावल्या किलिंडर रमण्याशी मारामारी करतो काय, असे म्हणून भावल्याची निर्भर्त्सना करायला जिवा शिंगी जसा तयार असायचा, तसा रावजीनाना या म्हातारपणात गंगू भाविणीकडे जातो म्हणून त्याला आमचा सख्या खुदुखुदू हसायला मोकळा असायचा.
...

हाफम्याड तात्याचा मुलगा दिनक्या. दिनकर हे त्याचे सरळ स्वच्छ नाव. पण त्याला दिनकर कुणीच कधी म्हटले नाही. दिनक्या या नावानेच तो सर्वश्रुत होता. मुंबईतल्या अठ्ठावीस सालच्या संपात दिनक्याने भाग घेतला होता. त्यामुळे तो बेकारही झाला होता. पण संपामुळे तो इतका प्रभावित झाला होता की, दोन-चार दिवसांतच कामगारांची सत्ता येणार आणि स्वतःला कुठले तरी प्रमुख पद मिळणार अशा स्वप्नात होता. गावी येताच त्याने नायकाच्या दुकानात आसन ठोकून मार्क्सवादावर छोटेसे वक्तव्य केले. नायकाच्या दुकानावर रिकामटेकड्या बामणांचा अड्डा असायचा. मार्क्सवादानुसार सर्वत्र वर्गविग्रह होऊन कामगार आपली सत्ता स्थापन करणार असे दिनक्याने भविष्य वर्तवताच अंतू मठकर पंचाची कनवट आवळीत उभा राहिला. सारे श्रोते एकमेकांकडे पाहात कुत्सितपणे हसले. तेव्हा अंतू दिनक्याकडे बघत कुरकुरला, "आमका वाटला तुझ्या घराण्यात फक्त एकच हाफम्याड आसा म्हणून!" एवढेच बोलून अंतू बाहेर पडला. बाकीच मुंड्या हलवीत खो खो हसले आणि जागच्या जागी दिनक्याच्या प्रतिपादनाचा विचका उडाला. मार्क्सवादाची इतकी रोकठोक वासलात अन्यत्र कुठे लागली नसेल.

मार्क्सवादी, काँग्रेसवादी असे अनेक प्रकारचे वादी या गावात वेळोवेळी आले आणि गेले. पण कुठलेही वादी येथे रुजले नाहीत. फक्त वादी आणि प्रतिवादी हे दोनच वादी तेवढे मूळ धरून राहिले. दिनक्याने सांगितलेले भांडवलदारांच्या नफ्याचे आकडे लोकांना महत्त्वाचे वाटले नाहीत. कोर्टात पडणार्‍या तारखांचे आकडे आणि फार तर मुंबईहून येणार्‍या मनीऑर्डरवरले आकडे या आकड्यांशिवाय इतर आकड्यांची भुरळ आमच्या गावकर्‍यांना कधी पडली नाही.

वागण्यात थोडे तिरसट असले तरी या लोकांसारखे सनदशीर लोक दुसरीकडे कुठे सापडायचे नाहीत. किरकोळ भांडणे नेहमीचीच असतात. ती नसतात कुठे? पण शिव्याशापांनी न थांबलेली भांडणे कोर्टात जातील. त्यासाठी हाणामारी होणार नाही. देशावरचा शेतकरी कुर्‍हाड घेऊन खून पाडील. एका घावात शिर धडावेगळे करील, पण आमचा गावकरी तसे करणार नाही. सर्वांगाने उघडा राहून फक्त वितीची काष्टी कमरेला लावणारा आमचा शेतकरी कुणाच्या समोर कमरेच्या आकड्याला लावलेल्या कोयत्याला हात घालणार नाही. क्वचित त्याने हात घातला तरी कुणी घाबरणार नाही. कोयता हातात धरला तरी तो उगारणार नाही. उगारला तरी मारणार नाही आणि तोल सुटून त्याने मारला तरी तो लागणार नाही! संताप व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे आई-बहिणीचा उद्धार करणार्‍या शिव्या द्यायच्या. देण्यासारखे असे त्यांच्यापाशी एवढेच!

गांधीवधानंतर सर्वत्र जाळपोळ झाली. ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांची घरे लुटली. पण आमच्या इकडे तसे काही घडले नाही. "गांधीला मारले ते वाईट झाले, वैर होते तर मरेपर्यंत शिव्या नसत्या का देता आल्या? ठार कशाला मारले?" एवढीच प्रतिक्रिया आमच्या गावात झाली. पण जाळपोळ किंवा लुटालूट झाली नाही. नाहीतरी लुटायचे तरी काय? लंगोटीवाल्याने पंचाला हात घालायचा?

गावातले नायकाचे भुसारी दुकान हा गावचा सार्वजनिक अड्डा. सगळे रिकामटेकडे गावकरी आणि विशेषतः नेहमीच रिकामे असलेले बामण या दुकानावर येऊन बसायचे. सारी फुकट फौजदारी तिथून चालायची. नायकाचा पोरगा इंग्रजी दुसरीत जाताच त्याने मोरोबा टाककराचे 'पिकॉकबा पेनकर' असे नामाभिधान करून आपले इंग्रजीचे ज्ञान याच अड्ड्यावरून खर्ची घातले होते.

चरखा फिरवून स्वराज्य मिळणार असे गांधींनी म्हणताच 'चरखो फिरवून स्वराज्य गावला असता तर नांगर फिरव् न शेतात पीक आयला नसता?' एवढीच कुत्सित टीका या अड्ड्यावर झाली होती. बेचाळीस साली रातोरात काँग्रेस पुढार्‍यांना पकडल्याचे वाचताच "पिंजर्‍यात रात्रीचे उंदीर जातत तसे गेले मरे!" एवढी अल्पशी हळहळ याच नायकाच्या दुकानात व्यक्त झाली होती. बर्नार्ड शॉने दाढीवर रस सांडीत रत्नागिरीचे हापूस आंबे खाल्ले हे वाचताच कुणाला काही वाटले नाही. उलट 'म्हातारो आंब्याचो बाटो गळ्यात अडकून मेलो नाय ह्या खूप झाला!" असे उद्गार नायकाच्या दुकानावर निघाले होते. नेहरुंची भेट म्हणून पाठवलेले आंबे इंग्लंडच्या राणीला आवडले हे वाचताच "फुकट गावले तर वाय् ट कित्याक?" एवढे अर्थशास्त्रीय सत्य याच अड्ड्यावरून ध्वनित केले गेले होते.
...

शकुनी नाबर हा याच अड्ड्यातला एक सभासद. नायकाला न विचारता बरणीत विक्रीस ठेवलेल्या खोबरेल तेलाची धार हातात घ्यायचा आणि तेल माथ्याला चोळत घरी जायचा. पण नायकाने त्या गोष्टीला कधीच विरोध केला नाही. नाबराच्या घरी पाठवायची साखर मापताना त्यातून तेलाच्या धारेचे वजन आपोआप कमी व्हायचे. तेलाची धार डोक्यावर घेतली नाही तरी साखरेचे माप ढळणारच याची नाबरला खात्री, आणि साखरेचे माप हे ढळले नाही तरी तेलाची धार वाहणारच याची नायकाला खात्री!

सारे काही तिरकस नजरेने पाहायचे हे आमच्या अंगवळणी पडलेले. लहानपणापासून तेच एक बाळकडू!

- oOo -

पुस्तकः सारे प्रवासी घडीचे
लेखकः जयवंत दळवी
प्रकाशकः मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती चौदावी (ऑगस्ट २०११)
पृ. १२६ - १३४.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : सारे प्रवासी घडीचे >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा