गौतमीपुत्र कांबळे या लेखकाचे 'परिव्राजक' हे पुस्तक मला सुमारे दहा एक वर्षांपूर्वी मिळाले नि जीएप्रेमी असलेला मी त्याच्या प्रेमात पडलो.
जीएंच्या पाउलखुणा जरी त्या लेखनात दिसत असल्या तरी त्यांनी घेतलेल्या वेगळ्या पार्श्वभूमीमुळे, जीएंप्रमाणेच त्यांच्या स्वतंत्र अशा भूमिकेमुळे, दृष्टिकोनामुळे यातील पाचही कथा वारंवार वाचत गेलो. वास्तवाचे नि कल्पिताचे सांधे जोडणार्या जीएंच्या दृष्टान्त कथांना वाट पुसतु जात असल्या, तरी सर्वच कथा वेगवेगळ्या असूनही एक सूत्र घेऊन येतात. निव्वळ विचारांबरोबरच तत्त्वज्ञानाचेही अधिष्ठान घेऊन उभ्या राहतात.
जीए आणि कांबळे यांच्यात एक फरक मात्र दिसतो तो म्हणजे कांबळे यांच्या कथा एका निश्चित निरासावर पोचतात, जो बहुधा आशावादी आहे. अर्थात केवळ शेवट आशावादी असणे हे कथांचे श्रेय मी मानत नाही. हा फरक म्हणूनच नोंदवतो आहे.
सर्वच कथांमधे एक सूत्र असे दिसते की एक मुख्य गाभा पकडून साहित्य, संगीत, शिल्पकला यासंदर्भात तो तपासला जातो आहे. अर्थात उच्च कलामूल्य वगैरे हत्यारे घेऊन येणार्यांचा भ्रमनिरास होईल (तसा त्यांचा तो बहुधा होतोच, तेच बहुधा त्यांचे साध्य वा हेतूही असतो.) कारण हे तीनही केवळ संदर्भ म्हणून पाहायचे आहेत, त्यात नवनिर्मिती वगैरे शोधायची नाही. हे केवळ कथांच्या पार्श्वभूमीचे काम करत आहेत हे विसरता कामा नये.
क्षुद्र परंपरांचा बडिवार, त्यांचे अर्थकारण, सत्ताकारण, सर्वसामान्यांची विचारविग्रहाप्रती असलेली उदासीनता, इतिहासाच्या ढिगार्याला विचारण्याचे नेमके प्रश्न सोडून केवळ कुतूहल शमवण्याची दिसणारी वृत्ती इ. गोष्टींना स्पर्श करत त्या कथा पुढे जात आहेत. परंतु दुर्दैवाने हे नेमके पकडून एका वेच्यात दाखवता येईल असा वेचा मला निवडणे शक्य झाले नाही हे आधीच कबूल करतो.
या पुस्तकातून मी तीन वेचे निवडले नि टाईप केले. कदाचित उरलेले दोन नंतर प्रकाशितही करेन. पण आज निवडलेला वेचा आहे तो बुद्धाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवरचा. तो संवाद आहे. त्यात आक्षेप आहेत, प्रश्न आहेत नि त्यांची उत्तरे आहेत नि एक संभाव्य कारणमीमांसाही.
-oOo-
विशेष आभारः या पुस्तकाची माझी प्रत गहाळ झाल्यामुळे बेचैन असताना मित्रांना साद घातली नि अपेक्षेप्रमाणे एक मित्र पावला. हे पुस्तक मिळवून दिले याबद्दल 'शरद पाटील' या फेसबुकमित्राचेचे आभार.
---
या पुस्तकातील दोन वेचे:
राजपुत्र >>
नातं >>
---
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा