बुधवार, २९ मार्च, २०१७

वेचताना... : तुघलक

'महंमद बिन तुघलक' हे नाव ऐकले की मूठभर भारतीय वगळले तर बहुतेकांच्या चेहर्‍यावर एक कुत्सित हास्य उमटेल. (या अपवादांची बांधिलकीही वैचारिक असण्यापेक्षा धार्मिक असण्याची शक्यताच अधिक आहे.) 'तुघलकी निर्णय' असा वाक्प्रचार वापरला जातो तो प्रामुख्याने माथेफिरूपणे, सारासार किंवा साधकबाधक विचार न करता, संभाव्य परिणामांचा अंदाज न घेतलेल्या निर्णयाबद्दल. आणि याला संदर्भ असतो तो तुघलकाने आपल्या सुलतानी कारकीर्दीत घेतलेल्या दोन निर्णयांचा.

तुघलक

पहिला म्हणजे आपल्या राज्याची राजधानी ही दिल्लीहून देवगिरी (त्याचे दौलताबाद असे नामकरण करून) येथे आणणे आणि चामड्याची नाणी सुरू करण्याचा दुसरा! दोनही निर्णय साफ फसले हे त्याच्या आयुष्यातच त्याच्या ध्यानी आले आणि त्याने सरळ ते मान्य करून त्या दोनही चुका, भरपूर किंमत देऊन, दुरुस्तही केल्या.

परंतु तब्बल पंचवीस-सव्वीस वर्षे सुलतान असलेल्या या तुर्की शासकाची एवढीच ओळख आपल्यासमोर येते. आजच्या बलुचिस्तानचा आणि 'खैबर-पख्तुनवा'चा थोडा भाग वगळून सारा पाकिस्तान, दक्षिणेला केरळ तसंच तमिळनाडूचा अगदी थोडा भाग आणि उडिशा, झारखंड, छत्तीसगड वगळता सारा भारत - बांग्लादेशासह! - इतक्या विस्तीर्ण साम्राज्याचा हा सुलतान! शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांतूनही मुघल साम्राज्याचा इतिहास तपशीलाने शिकत असताना भारतातील या तुर्की साम्राज्याबाबत मात्र अगदीच त्रोटक माहिती दिलेली दिसते.

हा व्यक्ती म्हणून कसा होता, त्याच्यासमोरची आव्हाने कशी होती, त्याने घेतलेल्या या 'तुघलकी' निर्णयांमागची कारणमीमांसा काय होती, ते का फसले याचे विश्लेषण त्याने केले इतपत भानावर असलेला सुलतान जर तो असेल तर त्याची निर्णयपद्धती कशी होती असे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. कारण 'एक मुस्लिम शासक म्हणजे क्रूरकर्मा, या हिंदू देशाला मुस्लिम करून सोडण्यासाठीच आलेला, त्याच्यात काय गुण असणार?' असे 'संस्कार' आपल्यावर पहिल्यापासून असतात. वस्तुनिष्ठता, चिकित्सा हे गुण या देशात कवडीमोलाचेच असतात. 

आजचे जग हे ’पोस्ट-ट्रूथ'चे आहे असे ट्रम्प-विजयानंतर अमेरिकेत बोलले जाऊ लागले आहे. भारत मात्र सदैव पोस्ट-ट्रूथच्याच जगातच होता आणि भविष्यातही राहणार आहे. त्यामुळे इथे 'गिव एव्हरी डेविल हिज ड्यू' हे वाक्य फक्त सुभाषितच असते, जे अर्थातच अंमलात आणायचे नसते, 'आपल्या धारणा, पूर्वग्रह, भावना नि अस्मितांच्या चष्म्यातूनच जग पहायचे असते' ही बाळगुटी प्रत्येक भारतीय बाळाला त्याच्या आईबापांनी पाजलेली असते, मोठेपणीही पाजतच राहतात.

तुघलकाने हे जे दोन निर्णय घेतले ते खरंच एक काहीतरी वेगळे करण्याची लहर म्हणून (तसं असेल तर तुघलक आजच्या भारताचा शासक म्हणूनही शोभला असता असं वाटून जातं. काहीतरी वेगळं केलं की ते व्याख्येनुसारच योग्य नि फलदायी असतं असा ठाम विश्वास आजही बर्‍याच भारतीयांमधे रुजलेला दिसतो.) की त्यामागे काही विचार होता? दिल्ली ही राजधानी म्हणून त्याला का अयोग्य किंवा गैरसोयीची वाटत होती? दिल्ली त्याच्या साम्राज्याच्या सीमेजवळ तर देवगिरी ही मध्यवर्ती हा भौगोलिक फायदा तर होता. पण त्यापलीकडे आणखी काही विचार होता का जेणेकरून त्याने साम्राज्यातील अनेक व्यक्ती आणि संस्थांसह उचलून दक्षिणेत आणण्याचा खटाटोप करावासा वाटला? 

त्याला सोने आणि चांदी सोडून चामड्याची नाणी का पाडावीशी वाटली? आपण आज वापरतो त्या चलनाचा कागद तर त्या चामड्यापेक्षाही कवडीमोलाचा असतो हे ध्यानात घेतले तर त्याची ही कृती अगदीच मूर्खपणाची म्हणता येणार नाही. मग चामड्याचे चलन आणण्याचा त्याचा प्रयत्न का फसला? 

बरं त्याकाळीच काय आजतागायत कुण्याही शासकाने केली नसेल अशी आपली चूक मान्य करून ती सुधारण्याची दुर्मिळ कृती करण्याचे धैर्य नि प्रामाणिकपणा त्याच्यात असेल तर असा शासक 'वेडा महंमद' म्हणून हिणवून सोडून देता येईल का? आज केवळ अस्मिता-विद्रोहाचे साधन म्हणूनच उरलेला इतिहास खरंच समजून घ्यायचा असेल त्याला हे प्रश्न निश्चितच पडायला हवेत. याच प्रश्नांच्या अनुषंगाने कार्नाडांचा तुघलक उभा आहे.

तुघलक हे कार्नाडांचे पात्र काळ्या-पांढर्‍या रंगाचे अक्षरशः एकजीव मिश्रण म्हणावे इतके करडे आहे. केवळ भूभाग जिंकणे नि राज्य करणे एवढाच त्याचा उद्देश नव्हता. त्या पलीकडे जाऊन जनतेच्या हिताचा 'विचार' तो करत होता. यात निव्वळ वारशाने मिळालेल्या संस्कार-विचारांपलीकडच्या, (त्याच्या) परंपरेने स्पर्धकच नव्हे तर 'काफिर' मानलेल्या विचारधारांचाही अभ्यास तो करत होता. भिन्न उपासनापद्धती असलेल्यांच्या सहजीवनाबद्दल त्याच्याकडे ठोस उपाय नसले, तरी त्या दृष्टीने त्याची धडपड होती. असे असूनही एक सुलतान म्हणून इतिहासात अमर होण्याची त्याची महत्वाकांक्षाही धारदार होती. 

एकीकडे राज्याकडे दुर्लक्ष होऊ नये या हेतूने अन्य सर्व बंधनापासून मुक्त राहण्याच्या उद्देशाने अविवाहित राहून केवळ राज्यकारभाराकडे लक्ष केंद्रित करत असतानाच आपल्या वैचारिक आणि लष्करी विरोधकांना दडपून टाकण्यासाठी आवश्यक ते निष्ठुर उपाय योजायला तो कमी करत नसे. थोडक्यात मॅकियावेलीच्या व्याख्येनुसार तो एक आदर्श राजा होता.

एका बाजूने त्याने प्रत्येक पाक मुस्लिमाने पाच वेळा नमाज पढलीच पाहिजे अशी सक्ती केली होती, त्यावर लक्ष ठेवण्यासाठी खास नोकर नेमले होते तर दुसरीकडे 'हिंदूंनी जिझिया कर देऊ नये' असा आदेश काढला होता. 'तू हिंदू असलास तरी माणूसच आहेस' असे म्हणणारा मुस्लिम सुलतान अनेक मुस्लिमांना पसंत नव्हताच. 

त्यातच न्यायव्यवस्था ही इतकी स्वतंत्र असली पाहिजे की खुद्द सुलतानाविरुद्ध तिथे दाद मागता आली पाहिजे असा त्याचा दावा होता. कुण्या विष्णूप्रसादची जमीन सुलतानांनी अन्यायकारकरित्या ताब्यात घेतल्याबद्दल त्याला जमीनीसह पाच हजार दिनार दंड सुलतानांनी द्यावा असा निर्णय त्याने नेमलेल्या काझीनेच दिला होता. 

सुलतानाचे विरोधक अर्थातच हा सुलतानांनी आपली सहिष्णुता जनतेच्या मनात ठसवण्यासाठी घडवून आणलेला बनाव आहे असा दावा करत होतो. पुढे 'त्याच्या विरोधात सच्च्या मुस्लिमांनी बंड करावे' अशी चिथावणी देणार्‍या इमामुद्दिन या अवलियाचे ते बंड त्याने त्याचीच विश्वासार्हता संपुष्टात आणून कसे मोडले याचा किस्सा पाहता ही शक्यता म्हणून नाकारता येत नाहीच.

त्याचे व्यक्तिमत्व अशा विरोधाभासाने भरलेले आहे. तो सहृदयी आहे, तो कठोर आहे, त्याचे आपल्या सावत्र आईवर सख्ख्या आईपेक्षाही अधिक प्रेम आहे. पण तीच आई आपल्याविरुद्ध कट करते आहे हे तात्काळ समजावे इतपत बारीक लक्ष तिच्या हालचालीवर ठेवून आहे, तसे सिद्ध होताच तो तिला क्षमा न करता निष्ठुरपणे शिक्षा देतो आहे. तीच गत त्याच्या बालमित्राचीही होते आहे. सच्च्या मुस्लिमांना 'जिहाद' ची हाक देऊन त्याच्या विरोधात बंड करणार्‍यांना तो हिंदू एकनिष्ठ सैनिकांच्या सहाय्याने नामोहरम करतो, त्याचवेळी हिंदू-मुस्लिम ऐक्याचा देखावा करत, वास्तवात तो हिंदू दुय्यम नागरिक असल्याची त्यांची जाणीव जिवंत ठेवतो आहे.

या नाटकातला खाली निवडलेला प्रवेश त्याचे अंतर्विरोधांनी भरलेले व्यक्तिमत्व पुरेपूर समोर आणणारा. ज्याच्या मनात तुघलकाबद्दल काही पूर्वग्रह नाहीत (हे त्याचा धर्म आणि त्याच्याबद्दल प्रचलित धारणा यामुळे जवळजवळ अशक्यच दिसते) त्याला यात तुघलकाचे व्यामिश्र व्यक्तिमत्व दिसेल. ज्याला ते एकरंगी दिसेल त्याने आपण बव्हंशी एकांगी विचाराचे आहोत हे समजून चालावे. यात तुघलक दिसतो तो धूर्त, सावध राजकारणी. आपल्या विरोधात धर्माच्या नावावर लोकांना चिथावणार्‍या इमामुद्दिनचे आव्हान पेलणारा, नव्हे त्या आव्हानाला आपल्याच फायद्यासाठी वळवून घेण्याइतका पाताळयंत्री.

इमामुद्दिनच्या मागे धर्माच्या नावाचे पाठबळ आहे, तेव्हा त्याच्या बाबतीत दंडात्मक कारवाई करण्याने उलट तो अधिकच मोठा होत जाईल हे त्याने पुरेपूर ओळखले आहे. आपल्या विरोधात भाषणे करणार्‍याचे भाषण स्वतःच आयोजित करून तो भावनिक आणि चंचल बुद्धीच्या जनतेच्या मनात त्याच्याबद्दल संभ्रम निर्माण करून त्याची विश्वासार्हता डळमळीत करण्याचा डाव तो खेळतो. सुदैवाने त्याने टाकलेला हा फासा त्याला अनुकूल पडतो, निदान तो तसा पडला हे इमामुद्दिनच्या मनावर ठसवण्यात तो यशस्वी होतो.

दिल्लीचे लोक या भाषणाला येऊ नयेत म्हणून त्याचे सैनिक सर्वांना धमकावत होते असा आरोप त्याचे विरोधक पुढे करतात. तेव्हा भाषण आयोजित करणे हा कानपूर गाजवून आलेल्या इमामुद्दिनला 'दिल्लीत तुला काही किंमत नाही' हे अप्रत्यक्षपणे सांगून त्याचा आत्मविश्वास खच्ची करण्यासाठी केलेला बनावही असू शकतो... 'असू शकतो' असेच आपण म्हणू शकतो. कारण या संवादात इमामुद्दिन जे आरोप करतो त्यातही तथ्य दिसते, तर खुद्द तुघलकाचे संभाषण विश्वासार्ह, सच्चे, प्रामाणिक भासते. त्यामुळे या आरोप-प्रत्यारोपांच्या झडीमध्ये विरोधकांचे आरोप खरे की तुघलकाची राज्याप्रती दिसणारी कळकळ खरी यात आपण गुदमरून जातो. 

एका बाजूने इमामुद्दिनच्या पाठीशी केवळ धर्माचे पाठबळ आहे पण त्याच्याकडे राज्यासंबंधी कोणतीही ठोस योजना नाही. आहे ती व्यवस्था उधळून देणे इतकेच त्याचे मर्यादित उद्दिष्ट आहे. कुठल्यातरी पुस्तकात जगण्याच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे आहेत असे समजणारा खुजा जीव आहे तो. त्याची धर्माप्रती निष्ठा अतूट आहे आणि म्हणून त्याला बाध आणणारे तुघलकाचे वर्तन नि निर्णय निषेधयोग्य असून तो सुलतान असला तरी त्याच्या विरोधात बोलले पाहिजे इतका निर्भय तो आहे. 

पण दुसर्‍या बाजूने या निर्भयतेला राजकारणाच्या समजुतीची जोड मात्र नाही. म्हणूनच तुघलक धूर्त कोळ्याप्रमाणे त्याच्याभोवती फास आवळत जाताना दिसतो. सत्ता टिकवायची तर धर्माला नाकारता येणार नाही हे तुघलकाला पुरेपूर ठाऊक आहे. पण तरीही त्याच्या राज्यव्यवस्थेच्या व्हिजनमधे धर्माला स्थान नाही. पण हे जाहीर मान्य न करण्याचे भान तो राखतो आहे. जसे इमामुद्दिनला आपल्या धर्माच्या श्रेष्ठ व्यवस्थेबाबत अभंग अशी खात्री आहे, तशीच तुघलकाला त्याच्या सर्वसमावेशक राज्याबद्दल. दोघांमधील दिसण्याचे साम्य हा मुद्दा कार्नाडांनी वापरला आहेच तो या साम्याला सूचित करण्यासाठीच असावा.

पण या दोघांत एक महत्त्वाचा फरक आहे. आणि तो म्हणजे इमामुद्दिन पुरेसा धूर्त नाही. आपल्या भाषण कौशल्याने त्याने जनतेला सुलतानाच्या विरोधात भडकावले आहे नि त्याचा परिणाम कानपूरमधे अनुभवून तो पुढे आला आहे. आपल्या शब्दाची ताकद प्रचंड आहे या भ्रमात तो आहे. परिस्थिती, भूगोल आणि व्यक्ती बदलल्या की धोरण बदलावे लागते याचे भान त्याला नाही

याउलट इमामुद्दिन, शहाबुद्दिन, आइने उल्मुल्क आणि आपली सावत्र आई या आपल्या विरोधकांना संपवण्याचे हत्यार वेगवेगळे असायला हवे याची तुघलकाला अचूक जाण आहे. इमामुद्दिनच्या धर्मनिष्ठेचाच फास बनवून तो त्याच्याच गळ्यात अडकवतो. इमामुद्दिनलाच आपला सदिच्छा दूत म्हणून पाठवण्याची त्याची चाल दुहेरी आहे, आइने उल्मुल्क आणि इमामुद्दिन या दोघांनाही वठणीवर आणण्याची. 

यात इमामुद्दिनचा बळी जातो, त्यातून आइने उल्मुल्कबाबत जनतेत प्रतिकूल भावना तयार होते आणि या दोघांचेही काटे तुघलकाच्या वाटेतून अलगद दूर होतात.

या नाटकातील एक वेचा: फासा आणि फास


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा