भारतीय माणूस भूतकालभोगी आहे. सर्जनशीलता आणि वैचारिकता या दोन्ही पातळ्यांवर असलेला आळस, आपापल्या गटाच्या सोयीनुसार सोयीचा इतिहास पाहण्याची सोय, आपला तो खरा नि ’त्यांचा’ तो खोटा अशी मखलाशी करण्याचा धूर्तपणा आणि मुख्य म्हणजे शालेय अभ्यासक्रमात असलेली पाठांतराची, केवळ विचारशून्य आत्मसात करण्याची सोय असलेला इतिहास हा विषय आपला लाडका असतो.
पण इतिहास म्हटले की आपण बव्हंशी राजकीय इतिहास अभ्यासत असतो. राजे-रजवाडे, लढाया, हार-जीत या घटनाप्रधान इतिहासाचे आपल्याला अधिक आकर्षण असते. त्यातून आपापले नेते नि झेंडे निवडून, इतरांना दुसर्या बाजूला ढकलून देत, वर्तमानातल्या सुरक्षित शाब्दिक लढाया खेळून, आपल्या भेकडपणाला भासमान शौर्याचे उपरणे घालायला लोकांना आवडते. यात इतिहासाची सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यावहारिक बाजू बव्हंशी दुर्लक्षितच राहते.
नेहरूंच्या 'डिस्कवरी ऑफ इंडिया'वर आधारित 'भारत - एक खोज' ही मालिका बेनेगलांनी दूरदर्शनसाठी तयार केली. मुळातच अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तकाला बेनेगलांनी आणखी उंचावर नेऊन ठेवले. इतकी अभ्यासपूर्ण पटकथा पूर्वी कधी लिहिली गेली नसावी. केवळ मूळ पुस्तकावर अवलंबून न राहता, त्यातील कथावस्तूला अनुसरून भारतभरातील विविध कलापरंपरेतील कथानकांचा, संगीतप्रयोगांचा शोध घेत ही पटकथा साकार होते. कुठे सर्वसाधारण मालिकेप्रमाणे प्रत्यक्ष चित्रीकरण, कुठे कथकली सारख्या नृत्यपरंपरेचा, कुठे पंडवानीसारख्या कथनशैलीचा वापर करत कथानक मांडत जाताना, सर्व भारतातील परंपरांना कवेत घेत जाते.
इतक्या विचक्षणपणे, संशोधनपूर्वक नि कष्टाने सादर केलेल्या भारताच्या इतिहासाला द्यावी तितकी दाद थोडीच आहे. आज इतिहास म्हणजे केवळ राजकीय इतिहास असा समज रूढ होत असताना सामाजिक-सांस्कृतिक इतिहासाची इतकी सुरेख सांगड घातलेली पहायला मिळणे दुर्मिळ आहे.
इथे शेअर केलेला भाग आहे भारतातील जमीनदारी व्यवस्थेवरचा. देश वा राष्ट्राची संकल्पना तेव्हा अस्तित्वात नव्हती. व्यवस्था औपचारिक नव्हती. शेतकरी, कारागीर हा सर्वात तळाचा वर्ग त्यात शेतकरी हा एकप्रकारे त्याच्या जमिनीला बांधलेला, भूदास!१ एक प्रकारचा वेठबिगारच. त्यांच्यावर छोटे जमीनदार, जमीनदार आणि अखेरीस या उतरंडीच्या टोकावर असलेला राजा अशी व्यवस्था होती. आपापल्या पातळीवर प्रत्येक नायक/शासक आपल्याला हवी तशी व्यवस्था बांधत असे. प्रत्येक टप्प्यावरील शासकांचे आपल्या वरील आणि खालील शासकांशी परस्पर-सहमतीने देवाण-घेवाणीच्या नियमांवर आधारलेले संबंध प्रस्थापित झालेले असत.
आजची लोकशाही व्यवस्था लग्न हा दोन सज्ञान व्यक्तींमधील करार आहे असे मानते. त्यासाठी त्या दोघांचा निर्णय पुरेसा असतो. पण या मूलभूत हक्काची त्या व्यवस्थेत काय स्थिती होती हे या भागात दिसते. 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तील निवेदन आणि मस्ती वेंकटेश अय्यंगार यांच्या ’चिन्नबसव नायक’ या कादंबरीतील काही भागाच्या आधारे याची मांडणी केली आहे.
नीट पाहिले तर मल्लिगे आणि सगुणाच्या कथानकात त्याकाळातील समाजात असलेली सत्तास्थाने दिसतात. प्रत्येक टप्प्यावर मल्लिगे एक पायरी चढून वरच्या अधिकार्याकडे गार्हाणे मांडताना दिसते. यात प्रथम दिवंगत हेगडे म्हणजे जमीनदार, त्याच्यानंतर त्याच्या अधिकाराचा वारसा मिरवणारी त्याची पत्नी, तिचे आदराचे स्थान असलेले स्वामी२ आणि अखेरीस तेथील नायक अथवा राजकीय सत्ता राखून असलेला शासक असे तीनही टप्पे अंतर्भूत होतात. अर्थ, धर्म नि राजकीय अशा तीनही सत्तांसमोर आपली मागणी रेटतच मल्लिगेला आपले ईप्सित साध्य करावे लागते३. अशी सुदैवी मल्लिगे एखादीच, बहुतेक भूदासांना आपल्या मालकांच्या निर्णयासमोर मान तुकवावी लागते.
मालिकेचे वैशिष्ट्य सांगायचे म्हणजे ऐतिहासिक राजे-रजवाड्यांचा इतिहास भरजरी करुन मांडण्याचा बाजारूपणा इथे टाळला आहे. या मालिकेसोबतच प्रसारित होत असलेल्या रामायण आणि त्यानंतर आलेल्या महाभारत या मालिकांशी तिची तुलना करता येईल. पोशाखीपणासोबतच त्या दोन मालिकांनी रुजवलेल्या आणि गेल्या एक-दोन दशकांत ऐतिहासिक, पौराणिक मालिकांत सुळसुळाट झालेल्या संस्कृतप्रचुर बोजड भाषेचा उसना वेष तिने पांघरलेला नाही. त्यामुळे इतिहासाच्या त्या भागाकडे अधिक स्पष्टपणे पाहता येते.
रोशन सेठ नेहरुंच्या भूमिकेत प्रास्ताविक नि उपसंहार करतात. त्यातून त्या त्या कथाभागाबाबत नेहरुंचे मूल्यमापन मांडले जाते. ओम पुरीसारख्या दमदार आवाजाच्या गुणी नटाचा आवाज निवेदनाची सुरेख पार्श्वभूमी देऊन जातो. भारतीय परंपरेतील अनेक गोष्टी नेहरूंच्या मूल्यमापनातून समोर येतात. आपल्या इतिहासाबाबत कृतज्ञ राहताना, त्यातील अभिमानाची स्थाने शोधतानाही, माणूस डोळस नि भानावर कसा राहू शकतो याचे एक दुर्मिळ उदाहरण समोर येते.
भारतातील गणव्यवस्था नि राजव्यवस्था, त्यांचे परस्परसंबंध, विरोध नि सहकार्य; वैदिक, बौद्ध नि जैन या तीन परंपरांचे साहचर्य नि संघर्षही; गुप्तांच्या सुवर्णकाळाबाबत बोलतानाही त्यावर असलेला कुषाणांचा प्रभाव नोंदवत जाणे; कलेचा विकास, राजकीय र्हासांची कारणे, संघर्षातून मिळवलेले शहाणपण आणि विजयातून गमावलेले बंधुभाव याबाबत नेहरूंसारख्या विचक्षण आणि बेनेगलांसारख्या डोळस माणसांच्या सहकार्यातून उभे राहिलेले हे लेणे. आपल्या सुदैवाने, प्रसारभारतीच्या कृपेने ही संपूर्ण मालिका यू-ट्यूबवर उपलब्ध आहे.
अधिक नोंदवण्याजोगे म्हणजे या अलौकिक महालाचे खांब असलेले कलाकार. मूळ संस्कृत ऋचांचे वसंत देव यांनी केलेले रसाळ अनुवाद नि वनराज भाटियांचे संगीत, अशोक पत्कींचे संगीत संयोजन, अजित कडकडे, रविंद्र साठे, चंद्रकांत काळे, कविता कृष्णमूर्ती यांचे गायन आणि सुमारे तीस वर्षांपूर्वीच्या तंत्राआधारेही नेत्रदीपक कामगिरी करणारे वी. के. मूर्ती यांचे छायाचित्रण. आजच्या माध्यमातील मालिकांचा सातत्याने होत चाललेला बाजारू अधःपात पाहता या दर्जाची मालिका भविष्यात तयार होणे अशक्यच दिसते.'ऐसा बालगंधर्व पुन्हा न होणे' च्या चालीवर 'ऐसी मालिका पुन्हा न होणे' असे म्हणावे लागेल.
अधिक पैसा नि विकसित तंत्रज्ञान यांच्या हातात हात घालून येणार्या विक्रीयोग्यतेला महत्व येते. यातून गुणवत्तेचा आग्रह अडगळीत पडत जातो. दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ या अलौकिक नाटकाचे भरजरी, बटबटीत आणि द्वेषमूलक प्रचारकी रूप त्याच नावाच्या मराठी चित्रपटात मांडले गेलेले आपण पाहिले. त्यामुळे आधुनिकतेतून गुणवत्तेचा उत्कर्ष नव्हे तर र्हासच होतो हे माझे मत, वेगवान तांत्रिक प्रगतीच्या गेल्या दोन-तीन दशकांत ’भारत एक खोज’च्या तोडीची एकही मालिका पाहण्यास न मिळाल्याने दृढ झाले आहे.
कौटुंबिक, गुन्हेगारी, विनोदी, पौराणिक आणि ऐतिहासिक या पाच विषयांपलिकडे भारतीय चॅनेल-मालिका फिरकत नाहीत. वैज्ञानिक विषयांवरची कोणतीही मालिका गेल्या तीस वर्षांत माझ्या पाहण्यात नाही. सायन्स फिक्शन मध्ये आपल्या ’एक त्राता दे रे बापा’ मानसिकतेला साजेशा ’शक्तिमान’चे नाव घ्यावे लागते यातच आपल्या मालिकांचा दर्जा ध्यानात यावा. नेटफ्लिक्स, अमेजन प्राईम, हुलू, व्हूट वगैरे ओटीटी सेवांनी इंग्रजी भाषिक कार्यक्रमांमध्ये जी कामगिरी केली ती हिंदी मालिकांना साधता आलेली नाही. त्यांचे विषय अजूनही विक्रियोग्य परिघातच पोहत आहेत. त्यातही तळापर्यंत बुडी मारण्याचे धाडस फारसे कुणी करताना दिसत नाही.
- oOo -
१. या भागात जरी भूदास्य अंतर्भूत असलेली जमीनदारी व्यवस्था समाविष्ट केलेली असली, तरी भारतात तीन प्रकारच्या जमीनदारी व्यवस्था दिसून येत असत. पं. नेहरुंनी त्यांच्या ’डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्येही त्यांचा उल्लेख केला आहे. उत्तर आणि मध्य भारतात एका प्रकारची, पूर्वेला बंगालमध्ये दुसर्या प्रकारची तर दक्षिणेत तिसर्या प्रकारची व्यवस्था होती असे वाचल्याचे स्मरते. सवडीने तो भाग शोधून त्यालाही ’वेचित...’ वर आणण्याचा प्रयत्न करेन.
२. युरप/अमेरिकेमध्ये निव्वळ ख्रिश्चन असणे ही ओळख नसते, कोणत्या चर्चचे हे सांगितल्यावरच ती पुरी होते. तसेच कर्नाटकात कोणत्या मठाचे वा स्वामींचे अनुयायी हे सांगावे लागते.
३. इंग्लंडच्या राजघराण्यातील व्यक्तिंना आपल्या लग्नसंबंधांना ’राणीच्या मंत्र्या’मार्फत संसदेची परवानगी घ्यावी लागते. ती नाकारलीही जाऊ शकते हे नुकतेच ’द क्राऊन’ या मालिकेतून समजले. हा एक प्रकारे उलट न्याय म्हणावा लागेल.
---
तळटीप: प्रसारभारती हे शासकीय मालकीचे माध्यम असल्याने, आणि ही मालिका नेहरुंचे नाव मिरवित असल्याने, नजीकच्या भविष्यकाळात ती गायब होण्याची शक्यता बरीच आहे. त्यामुळे त्यापूर्वी ती अवश्य पाहा, आणि शक्य झाल्यास डाउनलोड करुन ठेवा.