बुधवार, ३ मार्च, २०२१

कला, कलाकार आणि माध्यमे

(यापूर्वी रमतारामाच्या विश्रांतीस्थळी लिहिलेला आणि 'अक्षरनामा’वर प्रसिद्ध झालेला हा लेख, विषयाच्या संगतीमुळे ’वेचित...’ वर हलवला आहे.)

दोन-एक आठवड्यांपूर्वी यू-ट्यूवबर एक चलच्चित्र लघुपट (Animation short-film) पाहात होतो. सोबत डिस्ने स्टुडिओजच्या ’मोआना’ या चित्रपटातील एका गाण्याची शिफारस दिसली. टेलर डेव्हिस नावाच्या एका कलाकाराने हे गाणे व्हायलिनवर वाजवलेले होते. कारोलिना प्रोत्सेंको या छोटीमुळे मी नुकतेच व्हायलिनवर वाजवलेली गाणी ऐकू लागलो होतो. त्यामुळे साहजिकच हे गाणेही ऐकले... पाहिलेही!

कारोलिनाचे सादरीकरण प्रामुख्याने पथ-प्रदर्शन (किंवा पथ-सादरीकरण) स्वरुपात होते. तिची अंगभूत लय वगळता त्यात सादरीकरणाची दृश्य बाजू नाही. तंत्राचा वापरही नाही. पण टेलर डेव्हिसचे वादन हे केवळ वादन नव्हते, तर तंत्राचा पुरेपूर वापर करुन केलेले आखीव सादरीकरण होते. पुढे तिची आणखी काही गाणी ऐकली, नि पाहिली. प्रत्येक गाण्यासाठी एक पार्श्वभूमी, विशिष्ट वेशभूषा यांची निवड होती. त्याशिवाय दृश्य रेकॉर्डिंग आणि संपादन तंत्राचा पुरेपूर वापरही होता. एका वैय्यक्तिक (सोलो) सादरीकरणाला तंत्राच्या साहाय्याने श्राव्य अंगाबरोबर दृश्य अंगाची जोडही दिलेली होती.

पण गायनाला सादरीकरणाची जोड पाश्चात्त्य संगीतात काही नवीन नाही. बहुतेक प्रसिद्ध गायक त्यांचे सादरीकरण हे स्टेज-शोजच्या माध्यमांतूनच करत आले आहेत. त्यामुळे त्यांना गायकांना गाण्याबरोबर सादरीकरणाकडेही लक्ष द्यावे लागते. त्यांना नृत्य-दिग्दर्शकाची सोबत लागते, नेपथ्य लागते, झगमगते दिवे, नाट्यमय प्रवेश वगैरे क्लृप्त्या लढवाव्या लागतात. एकुणात सारा नटवा मामला असतो. पण इथे फरक आहे तो माध्यमांचा. प्रत्यक्ष सादरीकरणापेक्षाही दृश्य माध्यमांतून जाण्याचा, आणि निवडलेल्या माध्यमांचे नवे आयाम ध्यानांत घेऊन सादरीकरणाला नवे वळण देण्याचा.

हे पाहात असताना दहा-एक वर्षांपूर्वी पाहिलेल्या ’Jota de Saura’ (इंग्रजी शीर्षक: Beyond Flamenco) या चित्रपटाची आठवण झाली. कार्लोस सॉरा अतारेस या स्पॅनिश दिग्दर्शकाने ’होता'(Jota) या स्पेनमधील पारंपरिक संगीत-नृत्याला दृश्य माध्यमांच्या आयामांची जोड दिलेली होती. चालू असलेल्या नृत्याचे पडद्यावर प्रक्षेपण, त्यासाठी नृत्यकलाकारांभोवती वापरलेले पडदे, त्यांच्यावर प्रक्षेपित होणार्‍या दृश्यांची संगती, विसंगती तसंच प्रक्षेपणाच्या वेगातील आणि काळातील फरक, दिव्यांचा चित्रपटीय अथवा नाटकाच्या पद्धतीचा वापर, आणि मुख्य म्हणजे कॅमेर्‍यांची सर्वस्वी नवी भाषा, या सार्‍यांच्या मिलाफातून त्या नृत्याला अनेक नव्या आयामांसह सादर करुन एक अलौकिक अनुभव समोर ठेवला होता. 

ज्याचे वर्गीकरण ’माहितीपट’ असे केले गेले असले तरी मला ते सयुक्तिक वाटले नाही. ही फिल्म कथाप्रधान नाही त्यामुळे रूढार्थाने हा चित्रपट नाही. तसेच माहिती देण्याच्या दृष्टीने न बनवल्याने, निवेदनाचाच काय शब्दांचाही वापर नसल्याने माहितीपटही नाही. कथा नसलेला, पण पटकथा असलेला असा अपवादात्मक चित्रपटच म्हणायला हवा. (याने त्यापूर्वी फ्लामेंको या प्रसिद्ध नृत्यप्रकारावर दोन आणि फार्दोस, आयबेरिया या प्रकारावरही असे ’माहितीपट’ बनवले होते.) पण हा झाला नृत्याला दृश्य माध्यमांत नेण्याचा, नवे आयाम देण्याचा प्रयोग. गाडी वळवून परत डेव्हिस आणि वैय्यक्तिक सादरीकरणाकडे नेतो.

फार पूर्वी वाचलेल्या कार्व्हरच्या चरित्रामध्ये त्याचे एक वाक्य मनात रुतून बसले होते, ते द्रष्टेपणाचे होते असे मला लगेचच जाणवू लागले. त्याच्या टस्कगी इन्स्टिट्यूटमधील रस्त्याची जागा बदलण्याबाबत ते म्हणाले होते, ’लोक आपला रस्ता सोडत नसतात. त्यांनी आपल्या रस्त्याने जावे असे वाटत असेल तर आपला रस्ताच त्यांच्या पायाखाली सरकवावा लागतो.’ किंवा असे म्हणू या की, ’आता महंमद पर्वताकडे येत नसतात, पर्वतालाच महंमदाकडे जावे लागते. आता रसिक राजा आहे. It's a buyer's market! तो कार्यक्रमासाठी थिएटरमध्ये येण्याची तसदी घेत नाही, त्याच्यासमोर आलेल्या पर्यायातून तो निवड करतो. याचसाठी नव्या व्यवस्थेत कलेआधी कलाकारच रसिकांपर्यंत पोचतो आहे!

पथ-प्रदर्शनाच्या माध्यमातून कारोलिन जशी थेट स्वत:च प्रेक्षकांसमोर जाऊन उभी राहते, त्याचप्रमाणे टेलर डेव्हिस ही यू-ट्यूब, पेट्रिऑन यांसारख्या माध्यमांतून तिच्या कलेला अपेक्षित श्रोत्या/प्रेक्षकांपर्यंत पोचते आहे. वास्तविक पथ-प्रदर्शन हा काही अलीकडचा शोध नव्हे. ज्यांना स्ट्रगलर्स म्हटले जाते असे उदयोन्मुख कलाकार सुरुवातीच्या धडपडीच्या काळात या तंत्राचा वापर अनेक दशके करत आले आहेत.

परंतु बर्‍यापैकी प्रस्थापित होऊनही त्या प्रकाराला सोडचिठ्ठी न देणे आता दिसू लागले आहे. कारण भांडवलशाही व्यवस्थेत पर्यायांचा मारा व्याप्तीने नि वेगाने इतका मोठा असतो की ’नजरेआडचा कानाआड’ (’Out of sight is out of mind’) या न्यायाने तुम्ही सोडलेली जागा इतर कुणी बळकावून, वर त्याआधारे पुन्हा तुमच्या वरच्या पायरीला धडका देण्यास सुरुवात करु शकतो. त्यामुळे विक्रेत्याच्या भूमिकेतील कलाकाराला सतत अपेक्षित ग्राहकाच्या (इथे श्रोते/प्रेक्षक) समोर राहणे आवश्यक ठरते.

माझा स्वत:चा भर माझे लेखन वा विचार शब्दांमधून व्यक्त करुन ब्लॉगमार्फत सादर करण्याकडे आहे. परंतु फेसबुकसारख्या समाज-माध्यमांत लिहिलेल्या फुटकळ पोस्टला जेवढा वाचक असतो, त्याच्या दशांशाने अभ्यासपूर्वक लिहिलेल्या ब्लॉग-पोस्टला नसतो. कारण पुन्हा तेच. वाचक तुमच्या ब्लॉगकडे यायची तसदी घेत नसतात. तुमचा ब्लॉगच तुम्हाला त्यांच्या डोळ्यांसमोर सरकवावा लागतो. 

पथ-प्रदर्शन, यू-ट्यूब चॅनेल्स यांच्यामार्फत कारोलिना आणि टेलर नेमके हेच साधत असतात. ज्यांना ही तंत्रे अवगत नसतात, त्यांची गुणवत्ता सादरकर्त्यांहून सरस असली तरीही ’विकली’ जात नाही. ’बोलणार्‍याची माती विकली जाते, न बोलणार्‍याचे सोनेही विकले जात नाही’ ही म्हण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये तंतोतंत अनुभवण्यास मिळते ती अशी.

ज्याप्रमाणे सिनेमा म्हणजे कॅमेर्‍यातून पाहिलेले नाटक नव्हे, त्याचप्रमाणे डिजिटल माध्यमांतले सादरीकरण म्हणजे प्रत्यक्ष सादर केलेल्या कार्यक्रमांचे रेकॉर्डिंग यू-ट्यूब चॅनेलवर अपलोड करणे नव्हे. माध्यमबदलाचे भान राखणे हे यात अत्यंत महत्वाचे ठरते. त्याचे स्वत:चे असे जे आयाम आहेत ते ध्यानात घेऊनच कलाकाराला तिथे शिरकाव करुन घ्यावा लागतो.

मराठीमध्ये ’भारतीय डिजिटल पार्टी’ अर्थात भाडिपा हे एक चटकन नजरेत येणारे उदाहरण. मुळात मराठी नाट्यक्षेत्रातील तरुण मंडळींनी हे माध्यम आपलेसे केले. हे करत असताना नाटकाचा प्रेक्षक आणि यू-ट्यूबवरचा प्रेक्षक आणि मुख्य म्हणजे व्याप्ती यांत असलेला फरक याचे भान त्यांनी राखले आहे. त्यामुळे त्यांच्या यू-ट्यूब चॅनेलवरचे कार्यक्रम आणि नाटकांच्या वर्ण्यविषयांत चांगलाच फरक आहे. आमच्या मित्रांपैकी अनेक ’रसिक’ मित्र त्यांच्या या चॅनेलवरील कार्यक्रमांबाबत नाराजी व्यक्त करतात. पण जे भाडिपावाल्यांना समजले ते त्यांना समजले नसावे, किंवा समजूनही ’माझेच खरे’ या दुराग्रहापासून त्यांना दूर जाता येत नसावे. 

भाडिपाच्या मंडळींनी डिजिटल माध्यम हा टीआरपीचा खेळ असतो हे पुरेपूर ओळखलेले दिसते. त्यामुळे रसिक म्हणून मिरवणार्‍या मर्यादित वर्तुळाबाहेरही आपल्याला पोहोचावे लागणार आहे याचे भान त्यांना असावे. त्यासाठी विषयांमध्ये सुलभता आणत प्रेक्षकवर्गाची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. त्याचसोबत टीव्ही चॅनेल्समध्ये असलेले प्रच्छन्न जाहिरातीचे (embedded marketing) तंत्र वापरुन जाहिरातीमार्फत आर्थिक लाभाचा एक स्रोत त्यांनी निर्माण केला आहे.

पण भाडिपाचे कार्यक्रम हे सामूहिक सादरीकरण आहे. भारतात हिंदी आणि इंग्रजी विनोदवीरांनी डिजिटल माध्यमांचा बर्‍यापैकी वापर केलेला दिसतो. ध्रुव राठीसारख्याने तर एक समकालीन घडामोडींचा एक विश्लेषक आणि भाष्यकार म्हणून इथे आपले स्वतंत्र स्थानच निर्माण केले आहे. पण मराठी कलाक्षेत्रात याची जाणीव कितपत रुजली आहे? या प्रश्नाचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नाही.

एरवी मराठी जगात चित्रपट संगीतांवर आधारित कार्यक्रम होतात, गझलगायनाचे कार्यक्रम होतात. खरेतर यात  एकदा पार्श्वसंगीत बसवले की ते वाजवणारे कलाकार प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहण्याची आवश्यकता नसते. कराओके तंत्राचा वापर करुन त्या संगीताचा वापर करुन एकटा गायक आपला कार्यक्रम सादर करु शकतो. पण एखादा गजलगायक असा कार्यक्रम कधी करताना दिसत नाही. 

रागसंगीतातही अनेक गायक इलेक्ट्रॉनिक तानपुरा अथवा मोबाईलवरील त्याचे अ‍ॅप वापरतात. परंतु तरीदेखील मागे तानपुरा घेऊन त्यांचे विद्यार्थी बसतात. पण ते त्या विद्यार्थ्यांना मैफलीचा सराव व्हावा म्हणून. पण ते अपरिहार्य नाही. तसेच इलेक्ट्रॉनिक तालमाला अथवा अ‍ॅप वापरुन तबलजीच्या साथीविना एकटा गायक गाणे सादर करु शकतो. असा प्रयोग फारसा होताना दिसत नाही. 

सुमारे दशकभरापूर्वी हजारभर कार्यक्रम झालेल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या संदीप-सलील द्वयींच्या कवितेवरील कार्यक्रमाचा एक ठळक अपवाद. कोणत्याही साथसंगतीखेरीज, आधीच ध्वनिमुद्रित केलेल्या पार्श्वसंगीताचा वापर करून ते दोघेच हा कार्यक्रम सादर करीत असत. हे तंत्र पुढे फारसे कुणी प्रचलित केले नाही. हे जमले, तर कारोलिन अथवा डेव्हिसप्रमाणे या गायक/वादक कलाकारांना स्वतंत्रपणे नवी माध्यमे, व्यावसायिकदृष्ट्या किफायतशीरपणे वापरणे सुलभ होईल असा माझा होरा आहे.

आपल्याकडे काही प्रमाणात हौशी कवितावाचकांनी, अगदी स्वान्त सुखाय स्वरुपाचे गाणार्‍या गायकांनी वा वादकांनी यू-ट्यूब चॅनेल वगैरेंचा वापर केला असला तरी त्याचा चोख व्यावसायिक वापर अजूनही बराच दूर आहे. सध्या कोरोनाच्या उद्रेकामुळे जाहीर कार्यक्रम बंद झाल्याने काही कलाकारांनी डिजिटल व्यासपीठांकडे मोर्चा वळवलेला असला तरी तो तात्कालिक आणि ’सिनेमा म्हणजे चित्रित नाटक’ या संकुचित दृष्टीकोनाप्रमाणेच जाहीर कार्यक्रमाचे कॅमेर्‍यामार्फत प्रक्षेपण इतक्या माफक विचाराने केलेला आहे.

पण या तंत्राचा नकारात्मक परिणाम म्हणजे सहकलाकारांची आवश्यकता संपुष्टात येते. यातून सुटे झालेले पेटी किंवा संवादिनीवादक स्वतंत्र वादनाचे कार्यक्रम करु शकत असले तरी त्यांचे प्रमाणही नगण्यच आहे. पूर्वी गोविंदराव पटवर्धन, नंतर अप्पा जळगांवकर आणि अलिकडे डॉ. अरविंद थत्ते वगळले तर इतर कुणाचे स्वतंत्र पेटीवादनाचे फार कार्यक्रम झाल्याचे दिसत नाही. 

त्याहून वाईट परिस्थिती असेल ती तबला अथवा एकुणच तालवाद्य वादकांची. झाकीर हुसेन यांच्यासारखा जागतिक कीर्तिचा तबलावादक, अनिंदो चॅटर्जींसारखे आणखी एक-दोघे यातच ही यादीही संपेल. तंतुवाद्ये, संवादिनी सारखी वाद्ये जी गायनाशी संगत करतात, त्यांना तेच सादरीकरण स्वतंत्रणे करण्याचा पर्याय आहे. ते कारोलिनप्रमाणे अथवा टेलर डेव्हिसप्रमाणे नवी व्यासपीठे शोधून आपली कला रसिकांपर्यंत पोचवू शकतील. पण तालवाद्यांना निव्वळ माध्यम नव्हे तर सादरीकरणाचेच नवे आयाम शोधावे लागणार आहेत. ते कुठले असतील हे आजतरी अंदाज करता येण्याजोगे नाहीत.

पण त्यासाठी कलाकारांनी आपल्या मानसिक चौकटीतून, बंदिस्त विचारातून बाहेर यायची तयारी ठेवायला हवी. केवळ वैयक्तिक कलेला नवे माध्यम अशा दृष्टीने न पाहता, नव्या माध्यमाच्या नव्या संधींकडेही लक्ष द्यायला हवे. टेलर डेव्हिसने वापरलेले परस्पर-सहकार्याचे, त्रयस्थ व्यासपीठाचा वापर करण्याचे तंत्र, सहकलाकारांशिवाय वैय्यक्तिक सादरीकरणाचे आत्मसात केलेले तंत्र (ज्यातून प्रयोग सुटसुटीत होऊन मर्यादित अवकाशात, फारशा नेपथ्याशिवाय सहजपणे सादर करता येऊ शकेल) नव्या दर्जेदार पण वाहून नेण्यास सोप्या कॅमेर्‍यांचा वापर, उच्च-तांत्रिक स्टुडिओंवर अवलंबून न राहता संगणकावर सहज वापरता येण्याजोग्या एडिटिंग संगणक-प्रणालींचा वापर यासारख्या बाबींवर लक्ष केंद्रित केले तर हे शक्य आहे.

पण नुसते माध्यम निवडून काम झाले असे म्हणता येत नाही. त्यातून आर्थिक प्राप्तीचे मार्गही शोधणे गरजेचे आहे. टेलर डेव्हिसच्या चॅनेलवर या दृष्टीने उपयुक्त असे दोन व्हिडिओ सापडले. (पैकी पहिला लेखाच्या सुरुवातीला दिला आहे. तर दुसरा शेवटी.) पहिल्यामध्ये तिने आपण या माध्यमांतून पैसे कसे मिळवतो याची कल्पना दिली आहे. तर दुसर्‍यामध्ये 'पॅट्रिऑन'सारख्या व्यासपीठांच्या मार्फत आपल्या कलेला रसिकांपर्यंत पोहोचवून अर्थप्राप्तीचा स्रोत कसा निर्माण करता येतो याची माहिती दिली आहे. 

या दोन पलिकडे डिजिटल माध्यमांनी अनेक पर्याय निर्माण केले आहेत. इंटरनेट रेडिओ, पॉडकास्ट, साऊंडक्लाऊड सारख्या शेअरिंग साईट्स वगैरे अनेक व्यासपीठे कलाकारांना उपलब्ध झाली आहेत. त्यांचाही वापर करुन कलाकार आपल्या कलेला प्रेक्षक अथवा श्रोते मिळवू शकतो आणि अर्थप्राप्तीचा स्रोत निर्माण करु शकतो.

टेलर डेव्हिसच्या अनुभवातून तांत्रिक बाजूचे महत्व अधोरेखित होते, तर कारोलिनच्या माध्यमांतून त्या माध्यमांचे सार्वजनिक असणे, किमान खर्चिक असणे. नाट्यगृह अथवा एखादे सभागृह भाड्याने घेऊन त्यात कार्यक्रम सादर करणे हे खर्चिक काम आहे. ते बहुतेक सामान्य कलाकाराच्या आवाक्याबाहेर जाते. त्यात पुन्हा सहकलाकार असतील तर सारा आतबट्ट्याच्या व्यवहार होतो. 

याउलट कारोलिनाला उपलब्ध असलेल्या ’नाक्यावरील सादरीकरणा’चा पर्याय जर उपलब्ध करुन दिला तर कलाकारांची मोठी सोय होईल. आठवड्यात एका दिवशी कमी वर्दळीचे पण बाजारपेठेलगतचे काही रस्ते जर 'नो-ड्राईव्ह झोन' म्हणून जाहीर केले, तर तिथे कलाकारांना आपली कला सादर करता येऊ शकेल. इथे कार्यक्रम-पूर्व आर्थिक गुंतवणूक नगण्य असल्याने प्राप्ती फारशी झाली नाही, तरी प्रत्यक्ष आर्थिक नुकसानही मर्यादित राहील. (आणि रस्त्यावर फक्त भिकारीच गातो हा समजही पुसता येईल.) नाट्यगृहांसाठी आग्रह धरण्यापेक्षा कलाकारांच्या संघटनेने अशा नुक्कड-कलाकारीला उपयुक्त जागांची मागणी केली तर तरी सर्वांच्या दृष्टीने सोयीची तर होईलच, पण नाट्यगृहांमध्ये होणारी बुकिंगमधील ’घराणेशाही’देखील टाळता येईल. (अर्थात तोच प्रकार कदाचित पुढे सोयीच्या दिवशी, मोक्याच्या जागांसाठी होऊ शकेल . पण तो टाळण्याचे उपायही योजून ठेवावे लागतील.)

टेलर डेव्हिस आणि कारोलिना या काही विशेष नव्हेत की त्यांच्या क्षेत्रातील दिग्गजही. पण अकरा वर्षांच्या कारोलिनने आजवर दोनशेहून अधिक कार्यक्रम सादर केले आहेत, तर टेलर ही पहिल्या दहा कव्हर आर्टिस्टसमध्ये गणली जाते. त्यांची उदाहरणे ही केवळ माझ्यासमोर आली म्हणून ती घेतली इतकेच. इतर कलाकार आणखी काही पर्यायही वापरत असावेत. हे लिहून होईतो नवे काही निर्माणही झाले असतील. कारण या ० आणि १ ने सुरुवात केलेल्या माध्यमाचा वेग, पल्ला आणि उपयुक्तता अमर्याद (infinite) आहे.

-oOo-


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा