१९व्या शतकाच्या सुरुवातीला लीमन फ्रॅंक बॉम नावाचा लहानसा पत्रकार शिकागोमध्ये काम करत होता. पत्रकारितेमध्ये येण्यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये नाट्यलेखक आणि निर्माता म्हणून बस्तान बसवण्याचा त्याचा प्रयत्न अयशस्वी झाला होता.
तरी अंगातली लेखकाची ऊर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नीरस कंटाळवाण्या बातम्यांपेक्षा सर्जनशील लेखनाकडे त्याची ओढ होती. आपल्या चार मुलांना गोष्टी सांगताना तो रंगून जात असे. त्यातून त्याच्या कथेमध्ये एक काल्पनिक जग आकाराला येत होते. प्रत्येक कथनागणित त्यात नवे आकार नि रंग भरले जात होते. फ्रॅंकची पत्नी मॉड हिने हे सारे पुस्तकरूपात उतरवण्याचा तगादा लावला होता. पण फ्रॅंक ते फारसे मनावर घेत नव्हता.
अखेर एका निषादाने केलेल्या क्रौंचवधाने निर्माण झालेल्या करुणेतून रामायण-कथा अवतरावी तसेच काहीसे या पुस्तकाबाबतही घडले. चारही मुलेच असलेल्या मॉडला मुलीची आस होती. १८९८ मध्ये तिच्या भावाला, मुलगी झाली. मॉडला साहजिकच तिचा खूप लळा लागला. दुर्दैवाने मेंदूतील गुंतागुंतीमुळे ही भाची पाचच महिन्यात वारली. या घटनेचा मॉडच्या मनावर जोरदार आघात झाला. तिला बराच काळ मानसोपचाराला सामोरे जावे लागले.
तिच्या मनाला उभारी देण्यासाठी फ्रॅंकने आपली परीकथा अखेर कागदावर उतरवली. त्या परीकथेतील मुख्य पात्राला ’डोरोथी’ हे मॉडच्या भाचीचे नाव दिले. हे पुस्तकही त्याने आपल्या पत्नीलाच अर्पण केले. अमेरिकन पार्श्वभूमी असलेली ही पहिली परीकथा मानली जाते.
हे पुस्तक केवळ शाब्दिक कथा नव्हे तर चित्रकथा (Graphic Novel) म्हणून प्रसिद्ध झाले. फ्रॅंकच्या कथेला विल्यम डेन्स्लॉ याने चित्रकथेचे स्वरूप दिले होते.
फ्रॅंक आणि विल्यम या जोडगोळीने साकार केलेल्या ’द वंडरफुल विझर्ड ऑफ ओझ’ या पुस्तकाने इतिहास घडवला. वाचकांच्या मनावर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणार्या या कथेने दूरचित्रवाणी, संगीत, चित्रपट आणि नाटक या चारही क्षेत्रात मुसंडी मारली आहे.
१९३९ च्या 'द विझर्ड ऑफ ओझ' या चित्रपटातील ‘Somewhere over the rainbow’ या गीताने गीत आणि संगीतासाठी Oscar पुरस्कार मिळवले. हेच गाणे पुढे १९८१ मध्ये 'ग्रॅमी हॉल ऑफ फेम’मध्ये समाविष्ट केले गेले. त्याशिवाय त्या चित्रपटातील आणखी काही सांगितिक तुकडे आणि प्रसंग यांचे संकलनही २००६ साली याच बहुमानासाठी निवडले गेले. दिग्गज दिग्दर्शक व्हिक्टर फ्लेमिंग आणि जॉर्ज ककर यांची नावे या चित्रपटाशी जोडली गेली आहेत.
’द विझर्ड ऑफ ओझ’चे रूपांतर असलेल्या टिन-मॅन (२००७) या लघु-मालिकेच्या रंगभूषेसाठी लिसा लव आणि रेबेका ली यांना Primetime Emmy पुरस्कार मिळाला आहे.
१९७४ मध्ये विल्यम ब्राऊन या लेखकाने समकालीन आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या संदर्भात फ्रॅंकच्या मूळ कथेची फेरमांडणी केली. चार्ली स्मॉल या गीत-संगीतकाराने The Wiz: The Super Soul Musical "Wonderful Wizard of Oz" या लांबलचक नावाने तिला संगीतिकेच्या रूपात रंगमंचावर आणले. १९७५ मध्ये रंगभूमी क्षेत्रातील ऑस्कर मानल्या जाणार्या Tony पुरस्कारांमध्ये तिने सर्वोत्कृष्ट संगीतिकेसह एकुण सात पुरस्कार पटकावून इतिहास घडवला.
अशा तर्हेने चारही क्षेत्रातील सर्वोच्च मानले जाणारे पुरस्कार पटकावून या कथामालिकेने ’EGOT’चा(१) दुर्मीळ मान मिळवला आहे.
या खेरीज बॉमच्या या कथामालिकेचा चाहता असलेल्या डेविड मॅक्झिन याने १९०३ मध्ये रंगभूमीवर आलेल्या ’द विझर्ड ऑफ ओझ’ या संगीतिकेवर आधारित दोन सीडीजचा संच संकलित केला होता. २०१६ साली विंटेज रेकॉर्डिंग विभागात या अल्बमला आणि डेविडला ग्रॅमी पुरस्काराचे मानांकन देण्यात आले होते.
ही कथा आणखी एका बाबतीत उल्लेखनीय ठरली. या कथानकामध्ये डोरोथी ही मुलगीच कथेची ’हीरो’ आहे हे स्वत:ला मानवी स्वातंत्र्याचे अग्रदल मानणार्या अमेरिकनांनाही रुचले नाही. १९०० साली हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर त्यावर बंदी घालण्याची जोरदार मागणी झाली. आणि अनेक राज्यात ती लादलीही गेली. १९२८ मध्ये अमेरिकेतील बहुतेक सार्वजनिक ग्रंथालयांनी ’देवाच्या व्यवस्थेशी प्रतारणा करणारे' हे पुस्तक आपल्या ग्रंथालयात ठेवण्यास नकार दिला. अगदी ५०च्या, ६०च्या दशकातही या पुस्तकाबाबत धर्मपंडितांचे नि सनातनी शिक्षकांचे धार्मिक भावनेचे बेंड ठसठसतच राहिले होते.
१९८६ मध्ये सात धर्मनिष्ठ ख्रिश्चन कुटुंबियांनी टेनेसीमधील शाळेवर दावा दाखल करुन हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द करण्यास भाग पाडले. ’मानवी जीवन हे संपूर्णपणे देवाच्या अधीन असते’ या त्यांच्या धार्मिक समजाला यातील सहृदयी जादूगारिणींमुळे बाध येतो असा त्यांचा दावा होता. यातून मानवी स्वभाववैशिष्ट्ये ही भौतिक असतात, बदलता येतात असा सूर निघतो, आणि त्यातून सर्वशक्तिमान परमेश्वराच्या स्थानाला आव्हान दिले जाते असे त्यांचे म्हणणे होते. शेंडीपासून बेंबीपर्यंत ज्यांच्या धार्मिक भावना सतत दुखावत असतात अशा आपल्याकडच्या दिवट्यांचे हे भाऊबंद !
अमाप प्रसिद्धी मिळालेल्या या पुस्तकानंतर फ्रँकने ’लॅंड ऑफ ओझ’ मालिकेत एकुण चौदा पुस्तके लिहिली. पहिल्या पुस्तकाप्रमाणेच यातील काही पुस्तके चित्रपट, मालिका अथवा सांगितिकेच्या स्वरुपात साकार झाली. यापैकी 'ओझ्मा ऑफ ओझ' आणि 'द एमेराल्ड सिटी ऑफ ओझ' या दोन पुस्तकांवरुन लिहिलेल्या पटकथेवर ’द एमेराल्ड सिटी’ ही मालिका आधारित आहे. मूळ कथानकातील पात्रांचे रंग थोडेफार बदलून त्या परीकथेला व्यक्तीसंघर्षाचे नवे पैलू दिले आहेत. शिवाय विज्ञान आणि जादू यांच्यातील सुप्त संघर्षाचा एक धूसर धागाही त्यात मिसळून दिलेला आहे.
ही मालिका तिच्या पूर्वसुरींइतकी लोकप्रिय झाली नाही. परंतु तिच्या अखेरीस आलेल्या एका प्रसंगाने न्याय, निवाडा, सूड यांच्या संदर्भात एक वेगळा विचार समोर ठेवला. मालिकेच्या अखेरीस ओझ्माने विझर्डवर मिळवलेल्या विजयानंतर ती प्रासादाकडे येते त्यावेळचा हा प्रसंग आहे.
Series: Emerald City (2017)
Episode: No place like home.
वेगवेगळ्या व्यक्तींमधील परस्पर संघर्षाच्या अखेरीस चार दिशांच्या जादूगारणींपैकी जिवंत राहिलेल्या दोघींनी ओझची परागंदा युवराज्ञी ओझ्मा हिला ओझची राणी म्हणून घोषित केले आहे. त्यावेळी विझर्डच्या बाजूने लढताना त्या युवराज्ञीच्या आई-वडिलांची हत्या करणारा, पण त्यावेळी अजूनही बालकच असलेल्या ओझ्माच्या डोळ्यात आपल्या मुलीला पाहून हत्या करण्यास न धजावलेला लायन आत्मसमर्पण करतो. आता राणीसमोर प्रश्न असतो तो त्याला शिक्षा सुनावण्याचा. ती ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना हजर करण्याचा आदेश देते...
मानवी जीवनप्रवासाच्या सुरुवातीच्या काळात टोळ्यांच्या मानसिकतेमध्ये विरोधी टोळीतला कुणीही असला तरी ’पुरा तयाचा वंश खणावा’ अशी मानसिकता असे(२). तोच न्याय(?) होता. एका व्यक्तीला दुसर्या व्यक्तीबद्दल, एका टोळीला दुसर्या टोळीबद्दल भीतीची, अविश्वासाचीच भावना सर्वात प्रबळ असणारा तो काळ होता. स्वत:ला सुरक्षित राहायचे असेल तर इतरांना निखंदून काढले पाहिजे इतपतच बुद्धीचा विकास झालेला तो काळ होता. काहीही करुन प्रतिस्पर्धी टोळीचे बल खच्ची करावे, स्त्रिया नि बालके यांची सरसकट हत्या करावी, अन्यथा त्या स्त्रिया पुढे आणखी बालकांना जन्म देऊन प्रतिस्पर्ध्यांची संख्या नि बळ वाढवतील, ती बालके पुढे मोठी होऊन शस्त्रे परजून आपल्या टोळीला असलेला धोका आणखी वाढेल असा सोपा समज होता. आजही ही आदिम मानसिकता ’ते’ विरुद्ध ’आपण’ किंवा ’आम्ही’ या स्वरुपात अनेकांमध्ये दिसतेच.
पश्चिम दिशेची जादूगारीण असलेली ओझ्माची सहकारी- तिचे नावही वेस्ट असेच आहे - तिला तोच सल्ला देतेही. त्यानुसार ओझ्मा त्याच्या कुटुंबियांना हजर करण्याचा आदेश देते. त्यामुळे आता ओझ्माही त्याच्या कुटुंबियांसकट त्याला ठार मारणार यात कुणाच्या मनात शंकाच नसते. पण...
... ओझ्मा ही जादूगारीण आहे, सत्तेचे खेळ खेळणारी नृशंस सत्ताधारी नव्हे. पण ती जादूचा वापर करुन लायनच्या कुटुंबियांच्या स्मृतीकोषातून त्याची स्मृती पुसून टाकते, आणि त्याला परागंदा होण्याचा आदेश देते.
समोर उभे असलेले आपले कुटुंबिय आपल्याला ओळखतही नाहीत, आपले असे आता कुणी शिल्लक नाही ही वेदना तिने त्याला दिली आहे. आणि टोळीच्या मानसिकतेतून आपण बाहेर आल्याचे तिने दाखवून दिले आहे. तिने जरी त्या कुटुंबियांचा एक सदस्य त्यांच्याकडून काढून घेतला असला, तरी त्याचबरोबर ती गमावल्याची जाणीवही काढून घेतली आहे. त्यांना त्यांचे उरलेले आयुष्य जगताना कोणतीही जास्तीची वेदना तिने दिलेली नाही.
लायनला तिने दिलेल्या शिक्षेचा जाच हा फक्त त्यालाच होईल, त्याच्या सोबत इतर कुणी भरडले जाणार नाही याची काळजी घेतली आहे. आपले सारे बालपण कुटुंबाशिवाय, कुणाही ’आपल्या’ व्यक्तीच्या सोबतीशिवाय तिने काढले आहे. ते संदर्भहीन, जिव्हाळाहीन आयुष्य कदाचित मृत्यूहूनही वेदनादायी असेल हा तिचा होरा अनुभवातूनच आलेला आहे. त्याचा वापर करुन तिने शिक्षेची व्याप्ती फक्त गुन्हेगारापुरती ठेवताना त्याच्या कुटुंबियांना तिची यत्किंचितही झळ पोचणार नाही याची काळजी घेतली आहे.
न्याय आणि निवाडा या दोन कृतींमध्ये अनेकदा फरक दिसतो. राजेशाही, धर्मशाही, एकाधिकारशाही यांसारख्या लादलेल्या व्यवस्थांचे तर सोडाच, पण सर्वसामान्यांना किमान स्वातंत्र्य देऊ करणार्या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेकडून खरोखर न्याय मिळतोच असे नाही. त्याचे एक कारण म्हणजे न्याय ही संकल्पना आहे नि ती बरीचशी सापेक्ष आहे. याउलट निवाडा हा वस्तुनिष्ठ निकषांशी एकनिष्ठ राहिला, तर त्यातील सापेक्षतेचा परिणाम बराच कमी करता येतो. आणि म्हणून व्यवस्थांमध्ये न्यायव्यवस्था ही खरेतर निवाडा-व्यवस्था असते. त्यातून अनुकूल निवाडा मिळालेल्या बाजूलाही न्याय मिळाल्याची भावना होईलच असे नाही.
वेदनेतून उगम पावलेल्या कथेचा शेवट सूडात होऊच शकत नाही हे ओझ्माने (आणि फ्रॅंकनेही) ओळखले आहे. त्यामुळे ती लायनवर सूड घेत नाही, त्याच्या कृत्याची फक्त शिक्षा देते. हा फरक ज्याला जाणवतो त्याच्या संवेदना अजून जिवंत आहेत असे म्हणता येईल.
कुण्या जमातीतले लोक आपल्याला डोईजड होतील अशी निराधार भीती डोक्यात घेऊन, त्यातले दुबळे हेरून, झुंडीने घेरुन त्यांची हत्या करत आपले तथाकथित शौर्य साजरे करणार्यांची संख्या वाढत असताना, हे शहाणपण आसपास दिसणे दुर्मीळ झाले आहे. हजारो मैल दूर असलेल्या एखाद्या ठिकाणी ’त्यांच्या’ जमातीतील लहानगीवर बलात्कार करुन ’आपल्या’ लोकांनी तिची हत्या केली हे ऐकून कुत्सितपणे ’तिचं इवलसं गर्भाशय गेलं. खानेसुमारीची एक ओळ संपली.’ हे नेमाडेंच्या 'कोसला'मधील वाक्य भलत्याच संदर्भात उद्धृत करुन विकृत हास्य करणारेही इथे दिसतात.
शिक्षा आणि सूड यातील फरक ज्यांना उमगतो अशा वाचक/प्रेक्षकांना ओझ्माच्या निवाड्याचे महत्त्व कळेल. तुम्हा-आम्हाला तिच्याप्रमाणे कुणाच्या स्मृती पुसण्याची वा त्याच्या/तिच्या मनातील हिंसेचा डोंब विझवण्याची कला अवगत नाही. पण या निमित्ताने तिचा दृष्टिकोन आत्मसात करता आला तरी समाजपुरुषाच्या डोक्यावर फिरणार्या सूडचक्राची गती थोडी कमी करणे शक्य होईल.
- oOo –
(१) EGOT = एमी, ग्रामी, ऑस्कर आणि टोनी यांची आद्याक्षरे घेऊन केलेले संक्षिप्त रूप. त्यांची क्रमवारी अशी मांडली आहे की ई-गॉटचा उच्चार ही-गॉट (त्याने साध्य केले/मिळवले) या उच्चाराच्या जवळपास जातो आहे.
(२) इथे ’लॅरी गॉनिक’ या व्यंगचित्रकाराने त्याच्या मध्ययुगीन इतिहासाच्या पुस्तकात काढलेले एक चित्र आठवले, जे माझ्या मनात कायम कोरलेले आहे. त्यात मध्ययुगीन पती, पत्नी उभे आहेत. सामान्यपणे बोटावर कापल्याने वा लहानशी जखम झाल्याने माणूस प्रतिक्षिप्त क्रियेने बोट तोंडात घालतो तसे पत्नीने आपले एक बोट तोंडात धरले आहे. तिचा पती अतिशय तिला काळजीने विचारतो आहे, ’त्याला काय झाले? तुझे बोट कापले का?’ त्याचवेळी आसपास प्रतिस्पर्धी टोळ्यांच्या संहाराच्या खुणा विखरुन पडलेल्या दिसतात आणि त्या पतीने खांद्यावर घेतलेल्या भाल्याच्या टोकाला एक अर्भक ’टोचून’ ठेवले आहे. माणसाच्या मानसिकतेचे इतके मार्मिक विवेचन खंडीभर शब्दांनीही होऊ शकेल असे मला वाटत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा