गुरुवार, ११ मार्च, २०२१

छान छोटे वाईट्टं मोठे

स्वत:ची राष्ट्रभक्ती सिद्ध करण्याचा सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे इतर कुणावर तरी राष्ट्रद्रोहाचा आरोप करणे.
- (Moronous ग्रहावरील एक प्राचीन म्हण )

अलीकडच्या काही वर्षांत या म्हणीचा प्रत्यय अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांपासून भारतापर्यंत अनेक देशांत प्रकर्षाने येऊ लागला आहे. राष्ट्रभक्तीच्या एका सकारात्मक भावनेला गल्ली-नाक्यावर विकल्या जाणार्‍या गजर्‍याचे स्वरूप आले आहे. जिला हवा तिने घ्यावा नि केसांत माळून मिरवावा

गजरा विकत घेण्यासाठी निदान चार पैसे खर्च करावे लागतात. पण देशभक्ती त्याहून स्वस्त क्रयवस्तू होऊन बसली आहे. यात पैसे खर्च न करता फक्त चार शब्द खर्च करुन भागते. आणि ते शब्द पानाच्या पिंकेसारखे एखाद्यावर थुंकून त्या मलीनतेकडे बोट दाखवून ’हा बघा राष्ट्रद्रोह’ म्हटले, की आपण आपोआप राष्ट्रभक्त होऊन देश नावाच्या मॉलमधील privileged customer होऊन बसतो... असा बहुतेकांचा समज असतो.

स्पर्धात्मक अर्थव्यवस्थेमुळे जिंकण्याची ईर्षा निर्माण व्हावी, त्यातून इतर स्पर्धकांपेक्षा आपले उत्पादन अधिक दर्जेदार करण्याची अहमहमिका सुरू व्हावी, आणि ग्राहकाला अधिकाधिक दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत असा मूळ हेतू आहे. परंतु वास्तव नेमके उलट दिसते. स्पर्धा ही गुणवत्तावाढीपेक्षा त्या उत्पादनांच्या किंमतींमध्ये अधिक होते. आणि किंमती कमी करण्याच्या स्पर्धेत गुणवत्तेच्या सुधारणेपेक्षा वेगळे, सोपे मार्ग वापरले जातात. 

मूल्य आणि किंमत यांतील फरक इतका स्पष्टपणे कधीच दिसून आलेला नव्हता. गुणवत्तेशी समप्रमाणात असलेल्या मूल्याची ऐशीतैशी करत केवळ किंमतीच्या स्पर्धेत उत्पादक उतरतात आणि ग्राहकाला lesser of the evil किंवा ’वासरांतील लंगडी गाय’ निवडण्याची वेळ येते. आणि ती तशी आली की स्पर्धा गुणवत्तेच्या बाबतीत संपृक्त पातळीवर पोहोचली असे समजायला हरकत नाही.

आता आपल्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्याऐवजी स्पर्धकाच्या गुणवत्तेबद्दल संभ्रम निर्माण करणे सुरु होते. थोडक्यात आपली रेघ मोठी करण्याचे कष्ट न घेता शेजारची रेघ खोडून लहान करण्याकडे लक्ष केंद्रीत केले जाते. कारण पुन्हा तेच. तो उपाय कमी खर्चिक असतो. मग ’इतर पेस्टमध्ये कोळसा आणि मीठ यांसारखे कडक पदार्थ असतात, त्यातून तुमच्या दातांवर चरे पडून त्यांची हानी होते.’ असा थेट, किंवा ’आमच्या उत्पादनात रसायने नाहीत’ असा तद्दन खोटा दावा करताना ’इतर स्पर्धक उत्पादनात असतात' आणि 'ती असणे म्हणजे काहीतरी भयंकर बाब आहे.’ असा अप्रत्यक्ष संशय निर्माण करणे सुरू होते.

सुरुवातीला उद्धृत केलेल्या काल्पनिक म्हणीची व्याप्ती सर्व देश, धर्म, समाज आणि भाषा व्यापून राहिली असल्याने तिला सर्वभाषिक, सर्वदेशीय, सर्वधर्मीयांनी आता आपापल्या भाषा-व्यवहारात सामावून घ्यायला हरकत नाही. कारण सामाजिक-राजकीय पातळीवरही परिस्थिती याहून वेगळी नसते. लोकशाहीच्या कृपेने आज जगातील बहुतेक देश आणि समाज बर्‍याच अंशी स्थिर आणि म्हणून प्रगतीशील झाले असले, तरी आदिम टोळी-मानसिकता त्यांच्या जाणिवेच्या तळाशी सुप्त स्वरूपात पहुडलेली असते. एखाद्या आणीबाणीच्या, अभावाच्या प्रसंगी दोषांचे खापर फोडायला कुण्या ’त्यांची’ गरज भासते, त्यावेळी ती उफाळून वर येते

एखाद्या राजकीय नेत्याला आपला गट वाढवण्याची गरज असते, तेव्हा तो या तळाशी पडलेल्या जाणिवेला हलवून जागे करतो. संघर्ष उभे करतो आणि त्यावर आपल्या स्वार्थाची पोळी सुखाने भाजून घेतो. अमेरिकेत ट्रम्प जेव्हा ’अमेरिका सोशलिस्टांच्या ताब्यातून सोडवा’ म्हणतात तेव्हा ते नेमके हेच करत असतात, मुस्लिम जिहादी जेव्हा 'काफर देशांत आपल्या पवित्र धर्माचे खच्चीकरण होत आहे' असे म्हणतात तेव्हा हेच करत असतात, आणि भारतातले हिंदुत्ववादी गणिताची ऐशीतैशी करत, ८४ टक्के हिंदूंचा देश 'लवकरच संपूर्ण हिरवा होणार आहे' असे म्हणतात, तेव्हाही नेमके हेच करत असतात.

या सार्‍यांकडे आपापली गुणवत्ता सुधारण्याचे उपाय नाहीत, ते निर्माण करण्याची त्यांची कुवत नाही. सकारात्मक, रचनात्मक विचारच त्यांच्याकडे नाही. त्यामुळे त्यांनी आपली रेघ मोठी करण्यापेक्षा शेजार्‍याची खोडून लहान करण्याचा सोपा उपाय स्वीकारलेला आहे. आणि अशा खोट्या प्रचाराला सर्वच देशांतील सामान्य सहज बळी पडत असल्याने द्वेषाची, तिरस्काराची अग्निकुंडे सतत धगधगत राहतात. आणि या द्वेषाच्या आगीत लहान मुले, अर्भकांचा बळी द्यायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. 

त्यांना फक्त 'आपले अधिक मेले की त्यांचे' एवढ्या तपशीलातच रस राहतो. प्रत्येक व्यक्ती ही त्यांच्या दृष्टीने केवळ एक मोजण्याचे एकक बनूनच राहिलेली असते. इतकेच काय त्यासाठी त्या लहान मुलांच्या हाती शस्त्रे किंवा त्यांच्या तोंडी आपल्या क्षुद्र प्रचाराला साहाय्यक असे शब्द घालण्यासही त्यांना काडीची लाज वाटत नाही.

शेल्डन हा एक नऊ-दहा वर्षांचा मुलगा. त्याच्या आवडीच्या ब्रेडची चव बदलली, आणि याचे कारण म्हणजे स्थानिक बेकरी आता कार्पोरेट कंपनीने ताब्यात घेतली नि उत्पादनाचे यांत्रिकीकरण केले हे त्याला समजते. त्या ब्रेडच्या 'उत्पादकांनी मूळ चव परत आणावी' अशी मागणी करण्यासाठी तो रिटेल स्टोअर समोर उभा राहून नागरिकांच्या सह्या गोळा करत असतो.

त्या छोट्या गावात बहुतेक त्याला परिचित; तरीही त्याला टाळून, मागच्या दाराने पळ काढतात, सही करण्याचे टाळतात. त्या एका सहीने त्यांचे काही बिघडणार असते असे नाही. पण तरीही त्या एका साध्या मागणीला पाठिंबा देण्याइतके धैर्य त्यांच्यात नाही. वरकरणी लोकशाहीचा गजर करणार्‍या समाजातील ही अदृश्य दहशत या निमित्ताने उघडी पडते. पुढे ती शेल्डनच्या कुटुंबातही प्रकर्षाने दिसून येते.

भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काम करणार्‍या माध्यमांना निव्वळ बातम्या अथवा निव्वळ न्यूजमध्ये रस नसतो. त्यांना ’ब्रेकिंग न्यूज’ हवी असते. आणि ती मिळवण्यासाठी खर्‍या अर्थाने काही मोडावे लागले तरी त्यांची हरकत नसते. 'Tomorrow Never Dies' या बॉण्डपटातील Elliot Carver हा माध्यमसम्राट त्याच्या नव्या सॅटेलाईट वाहिनी-साखळीच्या उद्घाटनाला विशेष आणि सनसनाटी कव्हरेज देता यावे यासाठी दोन जागतिक महासत्तांमध्ये युद्धाची कलागत लावण्यासही कमी करत नाही.

इथेही शेल्डननेच बोलावलेल्या चॅनेलची प्रतिनिधी त्याला ’तुला कार्पोरेट कंपनी नको, मग काय कम्युनिस्ट व्यवस्था आणायची आहे का?’ असा प्रश्न विचारते. त्या व्यवस्थेत आपला जुना ब्रेड परत मिळेल एवढ्याच हेतूने तो ’हो’ म्हणतो. मग ती त्याची ’ब्रेकिंग न्यूज’ बनवते. त्या स्थानिक चॅनेलवर आता ती ’भयंकर’ बातमी पुन्हापुन्हा चालवली जाते. चॅनेलची लोकप्रियता (TRP)  कैकपट वाढते.

या शेल्डनहून बराच लहान म्हणजे दोन-तीन वर्षे वयाच्या तैमूर या करीना आणि सैफ यांच्या या मुलाला माध्यमांचा जाच सतत सहन करावा लागतो. एखाद्या बाहुलीसारखे व्यक्तिमत्व असलेल्या तैमूरचे फोटो काढण्यासाठी बातमीदार सतत त्याच्या मागावर असत. अति झाले तेव्हा ते मूलही एकदा वैतागून एका पत्रकाराच्या अंगावर ओरडले, ’नो... नो!’. झाले. लगेच ’तैमूर पत्रकारांवर ओरडला’ हीच बातमी फिरवण्यात आली. 

आता तो 'तैमूर' असल्याने ’त्या’ पार्टीतला. मग त्या एवढ्याशा पोराच्या द्वेषाने पछाडलेले ’इकडचे’ लोक सक्रीय होऊन समाजमाध्यमांवर त्याच्यावर आगपाखड करु लागले. स्वत: तीन लहान मुलांची आई असलेल्या एका स्वयंघोषित राष्ट्रभक्त स्त्रीने त्याची तुलना इतिहासातील तैमूरसोबत करत एकप्रकारे हाही तसाच क्रूरकर्मा निपजेल असा अंगुलिनिर्देश करणारी पोस्ट* लिहिली. यावरून अलान कुर्दी या परागंदा छोट्याचा समुद्रातच झालेला करुण अंत आणि त्यावर फ्रेंच नियतकालिक चार्ली हेब्दोने प्रसिद्ध केलेले अश्लाघ्य भाष्यचित्र आठवते.

द्वेषाने आंधळे झालेले, सतत 'आपण विरुद्ध ते’ या किडक्या मानसिकतेमध्ये राहणारे हे लोक लहान मुलांनाही त्यातून सोडत नाहीत, इतके विकृत पातळीवर उतरलेले दिसतात. इतकी किळसवाणी मानसिकता माणसात येते कुठून हेच मोठं कोडं आहे. जनावरेही अन्न आणि मादी या दोन साध्यांखेरीज इतर मुद्द्यावर कुणाशी संघर्ष करण्याच्या फंदात पडत नाही. ती यांच्यापेक्षा अधिक सुसंस्कृत म्हणावी लागतील.

शेल्डन टेक्सस या दक्षिणी राज्यात राहात असतो. अमेरिकेच्या यादवी युद्धात गुलामगितीच्या बाजूने उभ्या राहिलेला, सनातन प्रवृत्ती प्रबळ असलेला हा भाग. त्यात टेक्सस हे ’वेस्टर्न’पटात आपण पाहिलेल्या काऊबॉय संस्कृतीचे माहेरघर. तिथे व्यवस्थेच्या न्यायापेक्षा बंदुकीचा न्याय अधिक परिणामकारक असतो असे मानणारे पांढरपेशांतही बहुसंख्येने. ती बातमी पाहून सारे परिचित उलटतात. शाळेपासून शेजार्‍यांपर्यंत सारे शेल्डन कुटुंबाला टाळू लागतात. लोक शेल्डनच्या वडिलांच्या प्रिन्सिपलला फोन कर-करुन त्यांना नोकरीवरुन काढण्याची मागणी करु लागतात.

शेल्डनची आजी असेल, वडील असतील वा आई, यांच्यातील कुणालाही ’हा सारा मूर्खपणा आहे. कम्युनिजम म्हणजे काय हे त्याला समजण्याइतका त्याचा अभ्यास नाही. चॅनेल प्रतिनिधींनी पराचा कावळा करुन हा मूर्खपणा पसरवून दिला आहे.’ अशी ठाम भूमिका मांडून शेल्डनच्या पाठीशी उभे राहण्याचे धैर्य नाही. शेल्डनचे वडील प्रथम धावाधाव करुन तळघरात टाकून दिलेला अमेरिकन झेंडा काढून लावतात. त्याची आजी तर सार्‍या घरावरच लहान मोठे झेंडे लावते. टेप लावून देशभक्तीची गाणी म्हणत बसते.

या संपूर्ण प्रकारात त्या नऊ-दहा वर्षांच्या मुलाला कम्युनिजम म्हणजे नक्की काय, नि त्यावर आधारित व्यवस्था म्हणजे काय हे समजत असेल का? असा प्रश्न एकाच्याही मनात येत नाही. याला एकच ठळक अपवाद आहे तो शेल्डनचा मोठा भाऊ जॉर्जी याच्या मैत्रिणीचा. ती अजूनही शिकते आहे, विद्यार्थी आहे. अद्याप तिचे निबर कातडीच्या नागरिकात- नव्हे मतदारात, रूपांतर झालेले नाही. राष्ट्रभक्तीच्या निव्वळ ढेकरा देऊनही समाजात आपली पत फुकटात वाढवता येते, याची तिला अजून जाणीव नाही.

कम्युनिस्ट व्यवस्थेबाबतचे ते विधान चॅनेल-प्रतिनिधीनेच त्याच्याकडून वदवून घेतले आहे, हे समजून घ्यायची बहुतेकांची इच्छा नाही. खोट्या राष्ट्रभक्तीच्या आणि कम्युनिस्ट-द्वेषाच्या आपल्या दंभासमोर एका लहान मुलाचा सामाजिक बळी द्यायलाही ते कचरत नाहीत. तो हो म्हणाला म्हणजे तो कम्युनिस्ट आहे, आणि तो कम्युनिस्ट आहे म्हणजे त्याच्या घरातून त्याच्यावर तेच ’संस्कार’ झाले आहेत असा ग्रह बहुतेक परिचित करुन घेतात.  

दुसर्‍याला स्वत:पेक्षा कमी देशभक्त, वा देशद्रोही ठरवायला सार्‍याच देशातले लोक हपापलेले असतात. आणि अशा एखाद्या लहानशा प्रसंगातही त्या उन्मादी समाजाचे जमावात, आणि जमावाचे अखेरीस मेंदूहीन झुंडीत रूपांतर होत असते.

सनसनाटीपणारूपी रक्ताला चटावलेली माध्यमे, देशभक्तीचा उन्माद, काल्पनिक शत्रूची भीती (paranoia) आणि भेकड नागरिक ही काही कुण्या एका देशाची मिरासदारी थोडीच आहे?

- oOo -


संबंधित लेखन

३ टिप्पण्या: