गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

स्थितप्रज्ञस्य का भाषा

श्याम: वासूअण्णा... वासूअण्णा-

वासू:(समोर येऊन उभा राहतो. बोलत नाही.)

श्याम: अरे राम राम राम. हे सूत काढायचं काम इतकं अवघड असेल असं वाटलं नव्हतं मला. ह्या गीतानं मला सूत काढायला दोन दिवसांत शिकवते म्हणून वचन दिलं आणि स्वतः कुठं गायब झाली कुणास ठाऊक ! गीता आचार्याच्या बरोबर बद्रिनारायण शेठजींच्या घरी गेली का वासूअण्णा?

वासू: (मानेने नाही म्हणतो.)

श्याम:नाही गेली ? मग कुठे गेली ?

वासू: (खुणेने 'कोण जाणे' असा भाव व्यक्त करतो.)

श्याम: मग नीट सांग ना-हे असं (त्याने केलेल्या खुणेसारखे करीत) काय ? बोलायला काय झालं? अहो, गीता काय करतेय् ?

वासू: (खुणेने वाचते आहे असे दाखवतो.)

श्याम: वाचते आहे ? मग बोलत का नाही ?

तुझे आहे तुजपाशी

वासू: लावलंत बोलायला ? आचार्यांनी मला आजचा दिवस मौन पाळायला सांगितलं होत. सकाळपासून दहा वेळा मोडायला लावलं मला. अगदी भल्या पहाटे माळीबुवा आले ठणाणा करीत बागेतला पाईप फुटला म्हणून. मी त्याला पाटीवर लिहून सांगितलं की, प्लंबरकडे जा- आता एवढा म्हातारा झाला, त्याला प्लंबरमधला प्ल वाचता येईना. वाचून दाखवावं लागलं. मोडलं मौन ! बरं- ती दूधवाली गौळण ? ती बसली हुज्जत घालीत गाईच्या दुधात पाणी का बातलंस असं विचारलं म्हणून.

श्याम: कोणी?

वासू: मी !

श्याम: मग दुधवालीशी बोलताना मौन नाही मोडलं तुमचं ?

वासू: अहो, आधी मी तिला खुणाच करीत होतो. तर तिला काय वाटलं कोण जाणे ! हाय री दैंया म्हणून मुरकाच मारला तिनं आणि तोंडावर टिचकीनं दूध उडवलं. बरं, आमची बायकोही तिथंच उभी. आता काय मौन पाळता? खुणांचा अर्थ सांगावा लागला. नाहीतर भलती आफत व्हायची भय्या. शंभरदा ओरडून सांगितलं प्रत्येकाला, की भय्या, मौन आहे आमचं, मौन आहे. कुणी आमचं मौन ऐकायलाच तयार नाही.

श्याम: वासूअण्णा इतकी वटवट केलीत माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही देत? ... गीता कुठं आहे?

वासू: बसली आहे वाचत.

श्याम: काय वाचते आहे?

वासू: आता मी तिला काय वाचायला देणार ? तुमची पुस्तकं दिली, ती म्हणाली नको. ही इंजिनियरिंगची आहेत. उषाताईच्या कपाटाला कुलूप. शेवटी जगन्नाथ ड्रायव्हरकडे एक पुस्तक सापडलं ते दिलं.

श्याम: कसलं?

वासू: पिवळा डांबीस !

श्याम: काय?

वासू: पिवळा डांबीस ! शाय्‌डीवाल्याची रहस्यकथा आहे.

श्याम: वासुअण्णा, हे काय चालवलंय् तुम्ही ? आता हे आचार्यांना कळलं तर? वासूअण्णा, आता अगदी कसोशीनं मौन पाळ. एक अक्षर बोलू नको.

वासू: मी कशाला मरायला बोलेन ? पण खरं सांगू का श्यामभय्या? तुमचा हल्ली आचार्यांवर दाब जोर दिसतोय- आताशा बघतोय मी, ते तुम्हाला बरोबर नेतात. तुमच्याशी तास तास बोलतात.

श्याम: अरे बाबा, महान्-महान् माणूस आहे. आचार्य! त्यांच्या जोड्याजवळ उभं राहायची लायकी नाही आमची.

वासू: अगदी खरं बोलणं आहे तुमचं आमचं एक काम करा. त्यांना म्हणावं चाहेल तर हत्ती पाळायला सांगा, पण हे मौन पाळायला नका सांगू,

श्याम:अरे अरे अरे वासूअण्णा-वासूअण्णा तुमच्यात तुमच्यात (खिशातून वही काढतो आणि पाने उलटीत म्हणतो.) तुमच्यात हे-नैष्ठिक निग्रह नाही !

वासू: काय ? काय नाही?

श्याम: नैष्ठिक निग्रह! हे ऐक. आत्म्याचा विकास व्हायला नैष्ठिक निग्रहाची आवश्यकता आहे. तुम्हांला आत्मा आहे ना वासूअण्णा?

वासू: आत्मा? असेल एखादवेळी!

श्याम: शोधून काढा.

वासू: श्यामभय्या, आता काय काय म्हणून शोधून काढू? शुद्ध गाईचं तूप शोधून काढलं. हाताच्या घाण्याचं तेल शोधलं. हातसडीच्या तांदळाचं कार्यालय शोधलं, आता आणखी आत्मा शोधायला सांगता? अहो टाइम कोणाला आहे?

श्याम: अरे अरे अरे वासूअण्णा, अरे हे (वहीतून वाचत) हे अधःपतन आहे. ते जाऊ दे. जगन्नाथ आणि भिकूमाळ्याकडून गीतेतले श्लोक पाठ करून घ्यायला सांगितले होते मी--

वासू: त्यांनाच विचारा- (खिडकीतून हाक मारतो) जगन्नाथ-ए भिकूऽऽ इकडे या काम मग करा-मी ह्या दोघांसाठी माझं मौन मोडलं आहे बरं. पण दाद देत नाहीत-

[जगन्नाथ ड्रायव्हर येतो. कपडे खराब झाले आहेत. हातात मोटारची यंत्रे पुसायचे फडके.]

जगन्नाथ: क्या है जी वासूअण्णा?

भिकू: (गुलाबाच्या फुलांचा गुच्छ घेऊन येत) काय वासूअण्णा ? श्यामभय्या, हे घ्या. काकाजींनी ती दिल्लीहून रोपं आणली होती त्याची फुलं-

वासू: भिकूऽ- (शाळामास्तराच्या ढंगात) कालचा श्लोक पाठ झाला ?

जगन्नाथ: श्यामभय्या, भलत्या लफड्यात टाकू नका यार आम्हाला आज केव्हापासून बसलोय इंजन खोलून कार्बोरेटरमध्ये मिष्टेक येऊन गेली काय तरी. मी सगळे प्लग साफ करून राह्यलोय. मी सांगून दिलं माझ्या छोकर्‍याला तूच करून दे पाठ. तो म्हणून दाखवील.

भिकू: मी बी हेच म्हणून राहिलोय. सकाळपासून बागेत राबून राहिलोय मी. आज आंघोळसुद्धा नाही झाली.

श्याम: आचार्य काय म्हणाले? (वही उघडून पाने उलटीत) काय म्हणाले? हं-शरिराला रोज आंघोळ घालता, मनाला केव्हा घालाल? ते काही नाही. वासूअण्णा, गीतेचं पुस्तक घ्या ते- (वासू पुस्तक देतो.) हं म्हणा, स्थितप्रज्ञस्य का भाषा-

भिकू: श्यामभय्या तिथं झाडांना पाणी दिलंय मी–-

श्याम: स्थितप्रज्ञस्य का भाषा--

जगन्नाथ:साहेब, गाडी खोलली आहे ना मी, हत्यारं बाहेर पडली आहेत.

श्याम: वासूभय्या, तुम्हांला काय झालं न म्हणायला ?

वासू: श्यामभय्या, माझं मौन आहे आज. मी मनातल्या मनात म्हणतोय--

श्याम: काही नको, म्हण मोठ्यानं स्थितप्रज्ञस्य--

जगन्नाथ: पुन्हा सांगा---

श्याम: स्थितप्रज्ञस्य---

जगन्नाथ: थितस-प्रद्‌य-श्यामभय्या, पयले छूटच जबान अटकते आपली

श्याम: कशी जबान अटकते? कार्बोरेटर म्हणतां येतं! प्लग-मॅग्नेट हे शब्द म्हणता येतात आणि स्थितप्रज्ञ म्हणता येत नाही ?

जगन्नाथ: पण कार्बोरेटर म्हणजे काय मला माहीत आहे. तो दिसला की बराबर कळतं हा कार्बोरेटर. हा मॅग्नेट. पण तुम्ही आता काय म्हणता ती भानगड काय तेच कळत नाही ना. ती एकदा दाखवा आम्हांला, मग बराबर याद राहील. काय भिकू ?

भिकू: क्या बात है? कबीरजीने कहा है--

श्याम: भिकू, कबीरजी नको ! गीता |

[ गीता आतून येते. ]

- oOo -

पुस्तक: तुझे आहे तुजपाशी
लेखक: पु. ल. देशपांडे
प्रकाशक: परचुरे प्रकाश मन्दिर
आवृत्ती सतरावी (१९९६)
पृष्ठे: ३४-३८.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा