रविवार, ३० जानेवारी, २०२२

वेचताना... : तुझे आहे तुजपाशी

मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझीच भूमिका घ्यायला हवी.

भूतकालभोगी जनतेमध्ये बहुसंख्य मंडळी भूमिकाच काय पण जगण्याची चौकटही भूतकालातून, इतरांकडून स्वीकारत असतात. आणि तीच आपल्यासाठी योग्य आहे हे स्वत:ला नि इतरांना पटवण्यामध्ये आपले आयुष्य व्यतीत करत असतात. आपली भूमिका, जगण्याची चौकट ही स्वत:ची निर्मिती नसली, तरी निदान आपली निवड असावी इतपत स्वातंत्र्य घेण्याचीही त्यांची तयारी नसते. त्यामुळे वारशाच्या कुबड्यांनाच ते आपला आधार करून जगत राहतात

कारण 'लादलेल्या भूमिकेहून वेगळी भूमिका घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही' असा बहुतेकांचा समज असतो. आणि 'ते आहे' याचे भान असलेल्या इतरांतील बहुसंख्या स्वातंत्र्य या संकल्पनेलाच घाबरून असते. आणि म्हणून ते सारे सामाजिक, कौटुंबिक वारशाचे जोखड फुलांचा हार असल्याचे मानून मिरवत असतात. अनेक जण आणखी पुढे जाऊन त्या वारशाच्या गाठोड्याला अभिमानाचे, अभिमानाला अस्मितेचे आणि अखेरीस अस्मितेला परपीडनाचे रूप देत आपल्या मनातील न्यूनगंडावर मात करण्याची धडपड करत असतात.

तुझे आहे तुजपाशी

सुरुवातीला उद्धृत केलेलं वाक्य पुलंच्या ’तुझे आहे तुजपाशी’ नाटकातील आहे. ’यात मुद्दाम उद्धृत करण्यासारखे काय आहे?’ असा प्रश्न बहुतेकांना पडेल, पडणारच. वरील परिच्छेदात विशद केलेल्या आपल्या सामाजिक दृष्टिकोनाची ती परिणती आहे. त्यातून हे वाक्य त्यातील अशा एका पात्राच्या तोंडी आहे जे पात्र नाटक पाहून/वाचून झाल्यावर अगदी पुलंप्रेमींच्याही (खरेतर त्यांच्याच अधिक) स्मरणातून सहजच निसटून जाते. पण ’तुज आहे तुजपाशी’ पाहिले वाचले तेव्हा दोन पात्रांची तुलना माझ्या मनात उमटून जाते. पैकी एकाला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्व प्रेक्षकांनी दिले आणि दुसर्‍याला अनुल्लेखाच्या अडगळीत टाकून दिले.

पहिलं पात्र अर्थातच काकाजी देवासकरांचं आहे. या नाटकाचा उल्लेख झाला, की बहुतेक रसिक प्रेक्षकांना काकाजीच प्रथम आठवतात. तसे पाहिले तर ’तुझे आहे तुजपाशी’ हे श्याम-आचार्य आणि उषा-गीता या जोड्या केंद्रस्थानी असणारे नाटक. काकाजी हे पात्र नाटकात येते ते पुढच्या घटनाक्रमाची पार्श्वभूमी म्हणून, आणि अखेरीस नाट्याचा उपसंहार करणारं, आख्यानातील सूत्रधारासारखं. ज्यांना काळे-पांढरे, देव-दानव, नायक-खलनायक अशा जोड्यांमध्ये विचार करण्याची सवय आहे, त्यांनी काकाजी हा आचार्यांचा अ‍ॅंटि-थिसीस (anti-thesis) म्हणूनही पाहायला हरकत नाही.

ज्याला मी ’सुष्टांच्या संघर्षाचं नाटक’ म्हणतो, त्या दारव्हेकरांच्या ’कट्यार काळजात घुसली’ आणि हे 'तुझे आहे तुजपाशी’ यांच्यात या एका बाबतीत थोडे साम्य आहे. 'कट्यार...' हे मुख्यत: सदाशिवचे नाटक. त्याची संगीताप्रती असणारी आस, जगण्यातील संघर्ष पेलूनही ध्येयाकडे जाण्याची त्याची धडपड मांडणारे. उस्ताद अल्ताफ हुसेन खाँसाहेब, उमा, झरीना, बांकेबिहारी आणि पंडित भानुप्रसाद ही त्याच्या भोवती असणारी, त्याच्याविषयी सद्भाव असणारी माणसे, आणि त्यांच्यात परिस्थितीवशच निर्माण होणारा संघर्ष असे त्याचे स्वरूप. पण या पाचांमधल्या खाँसाहेबांच्या पात्राला वसंतराव देशपांडे यांनी इतके उंच नेले, की ते नाटक जणू खाँसाहेबांचेच आहे, असा समज दृढ झाला आहे.

वसंतराव आणि खाँसाहेब हे समीकरण जसे पक्के झाले, तसेच दाजी भाटवडेकर आणि काकाजी हे ही. भाटवडेकरांचा हा काकाजी असा बहारदार उमटला, त्यांच्या तोंडी असणारी काही वाक्ये इतकी लोकप्रिय झाली, की ’तुझे आहे तुजपाशी’ हे काकांजीचेच नाटक मानले जाऊ लागले. त्यातच रसिकाग्रणी रामूभय्या दाते यांच्यावर हे पात्र बेतलेले असल्याचे गृहित धरल्याने (बहुधा पुलंनीच सूचित केल्यामुळे) त्यांच्या प्रचंड मित्रपरिवारानेही त्या पात्राला अधिक उचलून धरले.

इतकेच नव्हे तर, यामुळे हे नाटक आचार्यांचे मूर्तिभंजन करणारे आणि काकाजींच्या सुखवादी जीवनदृष्टीचा पुरस्कार करणारे आहे, असा अनेक प्रेक्षकांचा समज झाला. अनेकांनी तर काकाजी, सतीश, श्याम, वासूअण्णा वगैरेंच्या खुसखुशीत संवादावर पोटभर हसत इतर कथाभागाकडे दुर्लक्ष करुन टाकलं. हे नाटक सर्वोदयाच्या संकल्पनेचे, त्या मार्गावर चालत असलेल्या वीतरागी व्यक्तिंचे, गांधीवाद्यांचे मूर्तिभंजन आहे अशी समजूत करुन घेऊन अनेकांना गुदगुल्या झाल्या... ऑर्वेलच्या 'अ‍ॅनिमल फार्म'मधील एकाधिकारशाहीवरचे भाष्य ही केवळ कम्युनिस्टांवरची टीका आहे, अशी सोयीस्कर समजूत करुन घेणार्‍यांना झाल्या तशा!

हे नाटक अध्यात्माच्या फोलपणाला नव्हे, त्याच्या अवडंबराला अधोरेखित करते आहे. ते बदलांना नकार देण्याचा दुराग्रह (आचार्य) आणि न पेलणारा बदल स्वीकारण्याचा अट्टाहास (श्याम) यांना परस्परांसमोर ठेवते. त्याचवेळी अध्यात्मिक कल असणारे शेठजी, त्यांच्या स्त्रिया आणि ’अतिविशाल महिला मंडळा’च्या सदस्या यांचा बदलांचे फायदे घेत असतानाच बदल-पूर्व परिस्थितीशी आचरणशून्य बांधिलकी दाखवण्याचा दांभिकपणाही समोर मांडते आहे.

यात ना अध्यात्माचा निषेध आहे ना सुखवादी जीवनप्रवाहाचा. असलाच एक अंगुलिनिर्देश, तारतम्य, विधिनिषेध नि भानावर राहण्याच्या आवश्यकतेकडे केलेला. 'कट्यार...' जसे ’सुष्टांच्या संघर्षाचे नाटक’ आहे, तसेच ’तुझे आहे तुजपाशी’ हे ’भानावर येणार्‍यांचे नाटक’ म्हटले पाहिजे. सतीश म्हणतो तसे,'अध्यात्माचं अजीर्ण झालेल्या देशासाठी' हे स्वादिष्ट विरेचन चूर्ण आहेच, पण त्याचबरोबर नवतेच्या प्रवाहाबरोबर वाहात जाणार्‍या आणि तोच काय तो प्रगतीचा एकमेव मार्ग आहे असे मानणार्‍या विरुद्ध गटाच्या अहंमन्यतेला नेमकी चपराकही आहे.

या नाटकात 'गव्हर्मेंट सर्व्हंट्सच्या बायकां'ची टोपी उडवल्याबद्दल आमची सनातनी-फेमिनिस्ट मैत्रिण पुलंवर प्रचंड उखडून होती. पुलं म्हटले की ’स्त्रियांची टवाळी करणार्‍याचे लेखन मी वाचत नाही’ असे ती फणकार्‍याने म्हणे. पण त्या शासकीय अधिकार्‍यांच्या पत्नींचे ’उसाशेजारचा एरंड’ हे चित्रण जसे या नाटकातील एका प्रसंगात आहे, तसेच सर्व पुरुषांसमोर ठाम उभी राहणारी, आपल्या जगण्याचे नियंत्रण संपूर्णपणे आपल्याही हाती आहे हे बजावणारी उषाही या कथानकाचा कणा आहे तिचे काय? पण ती ही अखेरीस आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व राखूनही उसन्या, आवंतून आणलेल्या मार्गापासून दोन पावले माघार घेते (जो खरेतर सुज्ञपणाच आहे, किंवा असे म्हणू आपल्या मर्यादांचे भान येणे आहे.) हे तिला खटकले असते.

मोठ्या झाडाशेजारी वाढणार्‍या, उशीरा उगवलेल्या झाडाचा जीवनरस कसा आटत जातो हे दाखवणारे, पण तरीही स्वतंत्र बाण्याचे गीता हे पात्र आहे. कदाचित तिथे गीतेची भूमिका नीट न समजून न घेता ’स्त्री बिचारी दाखवली’ असा victimhood अप्रोच तिने घेतला असता अशीच शक्यता अधिक आहे. आई-वडील दोघेही लहानपणीच गमावल्यानंतर आचार्यांच्या आश्रमात आलेली, बालपणापासूनच जीवनविन्मुख केली गेलेली गीताची भूमिका तिच्याप्रमाणेच बहुतेक प्रेक्षक/वाचक/समीक्षकांकडून दुय्यम समजून दुर्लक्षिली गेलेली आहे.

नाटकाचा कथाप्रवाह सुरु होतो तो आचार्य पोफळे गुरूजी यांच्या आगमनाने. त्यांच्या आगमनापूर्वी इंदुरातील ती बापू्भैय्या देवासकरांची कोठी म्हणजे एकदम सुखवस्तू, निवांत होती. कोठीमध्ये भिंतीवर लटकलेले प्राचीन घड्याळ बंद पडले तरी त्याची फिकीर नसलेले हे कुटुंबिय. मागील पिढ्यांची संपत्ती जरी फारशी उरली नसली तरी वडिलार्जित कोठी आणि त्यांच्या काळातील सुबत्तेच्या नि कलासक्त काळाच्या स्मरणरंजनात रमलेली नोकरमंडळीही खाऊनपिऊन सुखी. 

या देवासकर कुटुंबियांचे अध्वर्यू म्हणजे फॉरेस्ट खात्यात काम केलेले काकाजी. आपल्या जंगलातील वास्तव्याबद्दल बोलताना,’तिथे तर भय्या दोनच वेळा, दिवस नि रात्र’ असे म्हणणारे. तिथे ’अकरा वाजले म्हणून का सांगितलेस, दहा अठ्ठावन्न झाले म्हणून का सांगितले नाहीस? दोन मिनिटे ही काय सहज डावलण्याजोगी गोष्ट आहे?’ असे म्हणून गीतेला रागे भरणार्‍या आचार्यांचे आगमन झाल्याने देवासकर मंडळींचे आयुष्य ढवळून निघणार हे उघड होते.

बहुतेक आचार्य मंडळी असतात तसेच हे आचार्य जगण्यातील स्थितीशीलता मानणारे. प्रगतीचे वारे आपल्या छातीवर अडवू पाहणारे. यांत्रिक प्रगतीला यांचा विरोध. जोडीला देशीवाद. यंत्रविरोधी देशीवादाला अनुसरून हातसडीचे तांदूळ, शुद्ध मध, हाताने दळलेले पीठ यांच्या वापराचा अट्टाहास. आपण हट्टाने बदल नाकारला तरी भवताली ते होतच असतात. आपण नाकारल्याने बदलांचे चक्र उलटे फिरत नसते; उलट त्या अट्टाहासामुळे आपण इतरांसाठी त्रासदायक होत जातो याचे भान नसलेले हे आचार्य. 

एका बाजूने यंत्राचा धिक्कार करणारे, पण त्याचवेळी जी घड्याळ नावाच्या यंत्राखेरीज सांगता येणे शक्य नाही, इतकी अचूक वेळ सांगण्याबद्दल आग्रही असणारे. स्नानाला विहिरीचं पाणी नाही तर नळाचं म्हणजे ’परावलंबी’ असा शेरा मारताना, ’विहिरीचं असतं तरी ते स्वत: न शेंदता इतर कुणीतरी शेंदून दिलं असतं, म्हणजे तरीही ’परावलंबीच’ राहिलं असतं हे ही विसरणारे. पाश्चात्त्यांनी केलेली नळाची व्यवस्था हट्टाने नाकारण्याच्या नादात दांभिक होत जाणारे. कॉलेजमधील शिक्षणावर विश्वास नसणारे आणि ते मत गीतावर लादून तिच्या शिक्षणाची आणि कदाचित अधिक समृद्ध आयुष्याची दारे हेकटपणे बंद करणारे... एकुणात खेळ, मनोरंजनाला अनैतिक मानणारे.

जगणे अधिकाधिक सुखकर होत असताना, असे दु:ख साजरे करणारी किंवा समाजातील इतर शोषितांप्रती कळवळा दाखवण्यासाठी स्वत:च दु:खाच्या वा रुक्षतेच्या मखरात बसणारी वा इतरांना बसवू पाहणारी ही जीवनदृष्टी हळूहळू माघारीची वाट चालू लागणार, हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज नसते. नव्या वाटांमधील बर्‍यावाईटाची निवड साधकबाधक विचाराने करण्याऐवजी बदलांना सरसकटच नाकारण्याचा हा हट्ट फारतर, स्वत:पुरता आचरणात आणता येईल, इतरांवर लादता येणार नाही याची प्रचीती त्यांना यथावकाश येत जाते.

गंमत म्हणजे शोषित, पददलितांचे दु:ख "तुम्ही 'डी-क्लास’ अर्थात वर्गविहीन (म्हणजे काय याची त्यांची व्याख्या त्यांच्या 'लाडका सैतान' म्हणजे मध्यमवर्गीय असण्याच्या व्याख्येइतकीच व्यक्ति-सापेक्ष असते.) झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही" असे म्हणणारे कम्युनिस्ट वेगळ्या अर्थाने आचार्यांचीच री ओढत असतात. आचार्यांची वीतरागी वृत्ती धार्मिक, आध्यात्मिक आणि देशीवादासारख्या प्रादेशिकतावादातून बीजातून आलेली, तर कम्युनिस्टांचे डी-क्लास होणे हे सामाजिक बांधिलकीतून उगवलेले. दु:ख, दैन्य यांची दखल स्वत: त्या पातळीवर उतरून समजून घेण्याची इच्छा सारखीच.

पण सामान्यांना त्यांचे दु:ख नुसतेच शेजारी बसून समजून घेणार्‍यांपेक्षा ते दूर करु इच्छिणार्‍यांची- त्यातही ती कुवत असणार्‍यांची सोबत साहजिकच अधिक हवीशी वाटत असल्याने या दोनही मार्गांचे जगण्याचे आधार म्हणून महत्व केव्हाच लयाला गेले आहे. पोट व्यवस्थित भरलेले, जगण्यातील तडजोडींनी अपराधगंड निर्माण केलेले सुखवस्तू लोक सामाजिक प्रतिमा उजळण्यासाठी एखाद्या बुवा-बाबाचा, एखाद्या देवाचा उत्सव साजरा करत चार दिवस या निरासक्तीच्या मखरात मिरवून घेतात. तर सर्व सोयीसुविधांसह चोख मध्यमवर्गीय आयुष्य जगणारे तोंडाने भांडवलशाहीच्या पापांची, मध्यमवर्गीयांच्या स्वार्थीपणाची उजळणी करणारी तोंडी वाफ दवडत डी-क्लास होणे वगैरे फक्त मठाधिपती बुवा-बाबाच्या प्रवचनाच्या पातळीवरच आणून ठेवत असतात.

अर्थात यात ना धर्मतत्त्वांचा दोष ना मार्क्सचा. दोष असतो तो माणसाच्या सोयीचे तेवढेच स्वीकारण्याच्या प्रवृत्तीचा आणि त्याचवेळी त्याच दुर्गुणाबद्दल इतरांना दोष देण्याच्या सवयीचा. तत्त्वांपेक्षा, अनुसरणापेक्षा कर्मकांडांना नि बोलभांडपणालाच श्रेयस मानण्याचा.

जगाचे भले करण्याच्या वेडाने झपाटलेली, पण ज्यांच्यासाठी आपण जगण्याची वाट वळवली त्यातील अनेकांची दांभिकता पाहून भ्रमनिरास झालेली उषादेखील आचार्यांचीच अनुचर म्हणावी लागेल. स्वत:च्या तथाकथित देशसेवेचा भार इतरांच्या खांद्यावर सक्तीने ठेवू पाहणारी किंवा त्यांच्या मदतीनेच स्वत:ला उदात्त वाटणारे आपले ध्येय वगैरे साध्य करू पाहणारी. 

'न पेलणार्‍या गोळ्या चढवल्या म्हणजे असं होतं. मग त्या देशसेवेच्या असोत, अध्यात्माच्या असोत, नाहीतर भांगेच्या असोत.' हे काकाजींचं विधान ज्याच्या संदर्भात केले आहे तो श्याम, उषेने दिलेला नकारही खिलाडूवृत्तीने स्वीकारून आनंदी आयुष्याची चाकोरी न सोडणारा सतीश आणि उषा, आचार्य आणि अखेरीस श्यामच्या देशसेवेच्या अथवा नैतिकतेच्या प्रयोगांचा काच सहन करणारे घरचे नोकर ही या दोघांच्या भोवताली असणारी अन्य पात्रे.

पण एकुण नाटकाबाबत लिहिणे हा माझा उद्देश नाही. त्यामुळे यांच्याबाबत वा एकुण कथानकाबद्दल मी बोलणार नाही. मला देणं द्यायचं आहे ते त्यातील दुर्लक्षित पात्राचे, गीताचे. 'मला कुणाचीच भूमिका घ्यायची नाही. मला माझी-माझीच भूमिका घ्यायला हवी’ म्हणणार्‍या गीतेच्या पात्राकडे प्रेक्षकांचे फारसे लक्ष जात नाही. तिला केवळ ऑल्सो-रॅनचा घोडा समजून प्रेक्षक आपले लक्ष मुख्यत: काकाजी, श्याम आणि आचार्य यांच्यावर केंद्रित करतात. त्यांच्यासोबत हॅपी-गो-लकी वृत्तीच्या सतीशलाही थोडे फुटेज मिळते.

माझ्या मते गीता हे पात्र कुण्या प्रसिद्ध अभिनेत्रीने न रंगवल्याने दुर्लक्षित राहिले असावे अशीही शक्यता आहे. त्या भूमिकेचे महत्व कदाचित निर्माता-दिग्दर्शकालाही न समजल्याने त्यांनी तिथे दुय्यम अभिनेत्रींची निवड केली असावी. एखादी सशक्त अभिनेत्री त्या परिस्थितीशरण असूनही स्वतंत्र बाण्याच्या त्या भूमिकेला न्याय देऊ शकली असती. शिवाय प्रेक्षकही कथानकात पात्राचे स्थान काय आहे, त्याचे महत्व किती आहे, यापेक्षा ते कुणी प्रसिद्ध अभिनेत्याने अथवा अभिनेत्रीने साकार केले यावर त्याची किती दखल घ्यायची हे निश्चित करत असतात. (वर म्हटल्याप्रमाणे काकाजींचे पात्रही भाटवडेकरांमुळे अधिक लक्षवेधी ठरले.)

दुसरे कारण असे असावे, की उषाच्या वागण्यातला कणखरपणा, काकाजी आणि सतीशच्या वाट्याला आलेले नर्मविनोदी संवाद आणि त्यांची सुखवादी वृत्ती, वासू-जगन्नाथ-भिकू यांनाही मिळालेली एकदोन चमकदार वाक्ये जशी लक्षात राहतात, तसे विशेष लक्षात राहावे असे गीतेच्या व्यक्तिमत्त्वात वा संवादात काही नाही. जे आहे ते विचारांमध्ये आहे, आणि कृतीमध्ये! या दोन्हींपेक्षा बोलणार्‍याकडे अधिक लक्ष देणार्‍या भारतीय वृत्तीला ती सापडत नाही ती त्यामुळेच.

असे असले तरी बदलाची उद्गाती किंवा प्रेरणा तीच आहे. एका अर्थी नाटकातील घटनाक्रम आणि कथानक यांची तीच प्रेषक आहे. उषा स्वत:च्या स्थितीबद्दल,वर्तनाबद्दल विचार करु लागते ते गीतेशी झालेल्या संवादानंतरच. 'खेळातील प्रतीकात्मक हिंसाही निषिद्ध' असे आचार्यांचे संस्कार असतानाही कुतूहलाने 'मला बुद्धिबळ खेळायला शिकवाल का? असे श्यामला विचारणारी तीच आहे. त्यातील नियम समजून घेताना ’तिरका जाणारा उंट मरेल पण सरळ जाणार नाही...’ हे ऐकून ’तिरकी चाल हा उंटाचा धर्म असेल तर माझा धर्म कुठला?' हा प्रश्न तिला पडतो. तिथेच तिच्या खांद्यावरचे वारशाचे जोखड हलके होण्यास सुरुवात होते.

'प्रश्न पडणे' हा माणसाच्या मानसिक गुलामगिरीतून सुटका होण्याचा पहिला टप्पा आहे, आणि इतर कुणाच्याही आधी गीताने तो साध्य केला आहे. त्यापाठोपाठ अनुकरणापेक्षा विचारनिष्ठ स्वीकारालाही तिनेच सुरुवात केली आहे. आपल्या विचारांचा आपल्या वास्तवाशी संबंध असला पाहिजे याचे तिला भान आहे. म्हणूनच दागिन्याने मढलेल्या शेठजी-स्त्रियांच्या आध्यात्माच्या ढोंगाला वैतागून त्यांच्यापासून दूर राहणारी गीताच खर्‍या अर्थाने प्रथम पुढच्या घटनाक्रमाला चालना देते आहे. पुढचे unraveling अथवा पत्त्याच्या डोलारा कोसळणेही तिने काढून घेतलेल्या या पहिल्या पत्त्याने घडून येते. याच्या नेमके उलट वर्तन करणारे आचार्य विचार नि अनुभव या दोहोंनाही दूर ठेवत पूर्वसुरींच्या वचनांची पोपटपंची करताना दिसतात.

अगदी पाचव्या वर्षापासून ’मरणं प्रकृती शरीराणाम्‌’ वगैरे न पेलणार्‍या सुवचनांची(?) पारायणे करत पाप-कल्पनांचे गाठोडे शिरावर घेऊन जगत आलेली गीता, आपली ती अपरिहार्यता असली तरी आपले भागधेय आहे असे मानत नाही. भजी खाल्ली म्हणून ’मी चोर आहे’ असे आश्रमातील सर्वांना सांगत फिरण्याची शिक्षा मिळते, तेव्हाही आपले काही चुकले असे तिला वाटत नाही. बर्‍यावाईटाच्या आपल्या निवाड्याला केवळ आचार्य म्हणतात म्हणून बदलण्याची शरणागत वृत्ती तिच्यात नाही.

'आचार्यांनी प्रार्थना म्हण म्हटलं की प्रार्थना म्हणायची. सूत काढ म्हटलं की सूत काढायचं. रस्ते झाड म्हटलं की रस्ते झाडायचे. ही माझी अपरिहार्यता होती, नाईलाज होता, स्वीकार नव्हता. श्यामचा गैरसमज झाला तसे मी कशाच्याच शोधात निघालेले नाही. आधी मला माझाच शोध घ्यायचा आहे.’ असे म्हणते तेव्हा तिच्यातील स्वतंत्र, विचारी व्यक्तिमत्वाचे प्रेक्षकांना दर्शन घडते... पण प्रेक्षक त्याकडे दुर्लक्ष करुन काकाजी, श्याम वा सतीशचा पुढचा विनोद कधी ऐकायला मिळेल यासाठी कानांत प्राण आणून बसलेले असतात.

त्यामुळे मग ’जोर्जेटची साडी नेसल्याबद्दल तुला पश्चात्ताप वाटत नाही का?’ या आचार्यांच्या प्रश्नावर 'पश्चात्ताप वाटूनच घ्यायचं ठरवलं तर पुढल्या सगळ्या आयुष्यात मला पश्चात्तापच करीत बसावं लागेल' म्हणून ठणकावणार्‍या गीतेची अनाग्रही, संयत स्वतंत्र वृत्ती त्यांच्या ध्यानात येत नाही हे ओघाने आलेच. तिच्यासमोर 'समाजाने दिलेले ओझे वागवण्यापलिकडे आपण काय करु शकतो' ही शरणागत वृत्ती असलेले, पण उच्च-नैतिकतेची करडी झूल पांघरुन त्याखाली तिला दडपून टाकणारे आचार्य खुजे भासू लागतात.

’स्वधर्मे निधनं श्रेय:’ असो वा ’जुने जाऊ द्या मरणालागुनि’, त्या त्या उक्तीचा विचार तारतम्यानेच करायला हवा. ’अधिकस्य अधिकं फलम्‌’ म्हणतानाच मनात कुठेतरी ’अति सर्वत्र वर्जयेत्‌’ची खूणगाठही बांधून ठेवायला हवी. वाहणं नि वाहवत जाणं यातील फरक- आपल्यापुरता का होईना, ओळखता यायला हवा. आणि या तारतम्यासाठी मुळात माणसाच्या मनातील स्वतंत्र विचार जिवंत हवा; अनुकरणाची शरणागत वृत्ती लगामबद्ध केलेली असायला हवी. ’तुझे आहे तुजपाशी’मध्ये गीतानेच सर्वप्रथम हे साध्य केले आहे. आणि म्हणूनच वेचतानाचे हे दोन शब्द तिच्यासाठीच राखून ठेवले आहेत.

- oOo-

१. इतका की त्यांच्या नातवाने ’कट्यार’ रंगभूमीवर आणले, तेव्हा त्यातील पंडितजी हे पात्रच वगळले, तरीही प्रेक्षकांना त्यात काही खटकले नाही.

२.
'सगळे उद्योग हातांनी करावेत असे म्हणतात ना हे आचार्य लोक? मग हातगाडीवर घालून आण त्याला.’
'हे वय काय आचार्यांना वचन देण्याचं आहे? तुझ्याएवढा होतो, तेव्हा दहा पोरींना वचनं गेली होती माझी...'
'तो पाहा- तो गधा चालला आहे ना सडकेवरून, त्या गाढवासारखा दिसतो. त्याला आनंद नाही, दु:ख नाही, लाज नाही, लज्जा नाही. तो आंब्याच्या साली आणि कागद एकाच चवीनं खातो. तसा दिसतो स्थितप्रज्ञ!'

३. नाटकातले काकाजी देवासकर आणि रामूभैय्या दाते हे दोघेही इंदूरचे.

४. अर्थात सर्वच मराठी लेखक हे ’मेले स्त्रीद्वेष्टे’ आहेत असे तिचे परदेश-फेमिनिस्ट-प्रभावित नि आचरणास सोपे असे मत आहे. त्यातून ’आम्ही ब्वा फक्त इंग्लिश वाचतो’ हे उच्च-नासिकादर्शक वाक्य ध्वनित होत असल्याने एकुण मराठी लेखक-वाचकांना तुच्छ लेखण्याचा कार्यक्रमही अनुल्लेखाने पार पडत असे.

५. ही व्यक्तिनिष्ठा बॉलिवूड-टॉलिवूड चित्रपटांमध्ये पार टोकाला जाऊन प्रेक्षक कथानकालाही बाजूला ठेवून आपल्या हीरो वा हीरोईनच्या संवादफेकीवर वा ’लुक्स’वर चित्रपटाचे यशापयश मोजतात.

---

’तुझे आहे तुजपाशी’ या नाटकातील एक वेचा ‘स्थितप्रज्ञस्य का भाषा’.
हा गीताच्या रंगमंचावरील प्रवेशापाशीच संपला आहे हे औचित्यपूर्ण आहे. कारण इथले भाष्य प्रामुख्याने तिचाच वेध घेते आहे.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा