मंगळवार, २८ जून, २०२२

सत्तांतर

जानेवारी आला. हिवाळा ऐन कडाक्यात चालू झाला. जमीन दगडासारखी कडक झाली व शेतात, बागेत काहीच करता येण्यासारखं नव्हतं. तेव्हा मग मोठ्या कोठारात डुकरांनी बैठका घ्यायला सुरुवात केली. पुढच्या मोसमांत काय काय करायचं याच्या योजना आखल्या जाऊ लागल्या. डुकरांचं बौद्धिक वर्चस्व केव्हाचं मान्य झाल्यामुळे चर्चेची सर्व सूत्रं त्यांच्याच हाती असत. निर्णय त्यांनीच घ्यायचे असत. स्नोबॉल आणि नेपोलियन यांच्यात झगडा नसता तर ही व्यवस्था अशीच चालू रहायला हरकत नव्हती. पण त्याचं कुठल्याही मुद्यावर एकमत होत नसे. स्नोबॉल आपल्या ज्वलंत भाषणांनी सभा जिंकत असे पण मतदानाची वेळ आली की नेपोलियन ती कावेबाजपणे आपल्याकडे वळवण्यात बरेचवेळा यशस्वी होत असे. त्याला या कामी खरी मदत होत होती ती मेंढ्यांची.

चार पाय चांगले, दोन पाय वाईट,' हे घोषवाक्य त्यांनी चांगलंच आत्मसात केलं होतं. आणि (नेपोलियनच्या खुणेबरहुकूम) स्नोबॉलच्या भाषणात नेमक्यावेळी त्या घोषणा देऊन बैठकीत अडथळे आणत असत. स्नोबॉलला 'शेतकरी आणि पशुपालन' या मासिकाचे जुने अंक चाळायला मिळाले. त्यांच्या आधारे सुधारणेच्या छान छान योजना त्यानं तयार केल्या होत्या. प्राण्यांनी वेगवेगळ्या वेळेला शेतात, कुरणात जाऊन तिथंच सोनखत टाकावं म्हणजे बरेच श्रम वाचतील अशी एक योजना होती. गवताची साठवणी कापणी, मळणीची आधुनिक तंत्र, वेगवेगळ्या खतांचा उपयोग इत्यादी विषयांवर तांत्रिक शब्द वापरुन तो योजना मांडत असे. नेपोलियन मात्र स्वतः कसल्याही योजना न मांडता केवळ स्नोबॉलला विरोध एवढंच तंत्र अवलंबून होता. आणि त्याच्यावर मात करण्याची संधी शोधत होता. पवनचक्की प्रकरणावरुन त्या दोघांच्यात झालेली हमरातुमरी तर आजवर झालेल्या झगड्यात कळसाची होती.

अ‍ॅनिमल फार्म

शिवाराच्या एका बाजूला एक टेकाड होतं. ही त्या भागातली सगळ्यात उंच जागा होती. स्नोबॉलनं जागेची पहाणी केली आणि पवनचक्की उभारायला आदर्श जागा आहे असा निर्वाळा दिला. पवनचक्की उभारली की त्यापासून वीज निर्माण करता येईल. त्या विजेवर लाकूड कपाई, कडबा कटाई, यांत्रिक दूधपिळणी वगैरे कितीतरी कामं आपल्याला सुलभपणे करता येतील. गोठ्यांमधे दिवे येतील आणि त्यामुळे हिवाळ्यात ऊब मिळेल. असं छान गुलाबी स्वप्न सर्वांच्या मनात रंगवलं. यंत्र काम करू लागल्यावर फावल्या वेळात निवांतपणे रवंथ करता येईल. वाचन आणि सुसंवादाने मनं उल्हसित रहातील. त्याप्रमाणे लगेच आखणी सुरु झाली. तांत्रिक माहितीसाठी जोन्सच्या ग्रंथालयातली पुस्तक उपयोगी पडली. अंडी उबवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोलीचा उपयोग स्नोबॉल पवनचक्की प्रकल्पाची मुख्य कचेरी म्हणून करु लागला. तिथली जमीन छान गुळगुळीत लाकडाची होती. आपल्या खुराच्या फटीत खडूचा तुकडा धरुन स्नोबॉल रेघोट्या मारु लागला. एकदा या कोनातून तर कधी त्या कोनातून निरखून पहात पवनचक्कीचं चित्र तयार करू लागला त्या चित्रात वेगवेगळी दातचक्रं, दांडे, पट्ट्या भरल्या जाऊ लागल्या. सगळे प्राणी दिवसातून एकदा तरी तो आराखडा पहायला येऊन जात व कौतुकानं पहात. पण त्यांना कळत काहीच नसे. सगळ्यात फटकून राहिला होता नेपोलियन. बरेच दिवस फिरकलासुद्धा नव्हता. त्यानं पवनचक्की विरुद्ध आपलं मत सुरुवातीपासूनच जाहिर केलेलं होतं. अचानक एक दिवस तो खोलीत आला. त्या आराखड्याकडे नाक वाकडं करून तिरक्या नजरेनं, तुच्छतेनं त्यानं पाहिलं. उगाच ते चित्र हुंगल्यासारखं केलं. मग त्या चित्रावर उभे राहून लघवी केली आणि तडक निघून गेला.

शिवारातल्या सगळ्या प्राणीसमुदायामधे पवनचक्की प्रकरणावरुन सरळसरळ दोन तट पडले होते. स्नोबॉल पवनचक्कीची आवश्यकता पोटतिडकीनं पटवून देत होता. ती तयार झाल्यावर सगळ्यांचे श्रम खूप वाचतील. आठवड्यातून फक्त तीनच दिवस काम करुन भागेल, ही गोष्ट तो पटवून देत असे. आता पवनचक्की उभारणं हे अतिशय कठीण काम आहे हे त्याला मान्य होतं. दगडाच्या खाणी खोदून त्यातल्या दगडांच्या भिंती बांधाव्या लागणार होत्या. मुख्य चक्रासाठी पाती तयार करावी लागणार होती. खूपशा तारा लागणार होत्या. जनित्र आणावी लागणार होती. (ती कशी आणि कुठून पैदा करायची हे तो सांगू शकत नव्हता) परन्तु सगळं सुरळीत झाल्यास एका वर्षात पवनचक्की पूर्ण होईल असा त्याला विश्वास होता. याउलट नोपोलियननं एकच धोशा लावला होता. आज गरज आहे ती अधिक धान्य पिकवण्याची. पवनचक्कीसारख्या कामावर वेळ घालवला तर भुके मरायची पाळी येईल, वगैरे. दोन्ही गटांनी आपल्या घोषणा तयार केल्या होत्या. स्नोबॉलला मत म्हणजे तीन दिन काम फक्त, नेपोलियनला मत म्हणजे धान्याचं पोतं.

दोन्ही गटात नसलेला एकमेव प्राणी म्हणजे बेंजामिन गधा, त्याचं नेहमीप्रमाणे तिरकं मत होतं. धान्योत्पादनात वाढ होईल किंवा पवनचक्कीमुळं श्रम वाचतील, या दोन्ही गोष्टीवर त्याचा विश्वास नव्हता. पवनचक्की करा नाहीतर करु नका. जीवन हे असंच नेहमीसारखं रखडत चालणार.

पवनचक्कीइतकंच आणखी एका प्रश्नावरुन दोघांत वितुष्ट होतं. शिवाराचं संरक्षण गोठा युद्ध हरल्यानंतर शिवार परत मिळवायचा जास्त जोमाचा प्रयत्न जोन्स करील ही शक्यता होती. तसा प्रयत्न होण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली होती. कारण गोठा युद्धाची बातमी देशभरच्या शिवारातून पसरली होती. तिथल्या प्राण्यांमध्ये चैतन्याची नवी लाट उसळली होती. नेपोलियनचं म्हणणं होतं की सर्व प्राण्यांनी हत्यारबंद असायला हवं. बंदुकीचं शिक्षण प्रत्येकानं घेतलं पाहिजे, या उलट स्नोबॉलच्या म्हणण्याप्रमाणे कबुतरांची पथकं आपला संदेश घेऊन इतर शिवारांमधे वारंवार पाठवली पाहिजेत. बाहेरच्या प्राण्यांमधे बंडाचे विचार फैलावले पाहिजेत. एकाच्या मते जर आपण स्वतःच संरक्षण करु शकणार नसलो तर आपली हार अटळ आहे, तर दुसरा म्हणत होता बाहेर सगळीकडेच असं बंड झालं तर स्वसंरक्षणाची वेळच येणार नाही. इतर प्राण्यांची मात्र या द्वंद्वामुळे पंचाईत झाली. ज्या क्षणाला जो बोलत असेल त्याचं बरोबर वाटायचं.

बऱ्याच परिश्रमानंतर स्नोबॉलच्या पवनचक्कीच्या योजना आणि आराखडे पूर्ण झाले. खरा पेच आता यापुढेच होता. पुढच्या रविवारी सभा बोलावण्यात आली. पवनचक्कीच काम सुरु करायचं की नाही याबद्दल सार्वमत घ्यायचं होतं. प्रथम स्नोबॉल बोलायला उभा राहिला. मेंढ्यांनी अधूनमधून बेंबटून अडथळा आणायचा प्रयत्न करून सुद्धा आपल्या पवनचक्कीच्या योजनेची पुरेशी भलामण तो करू शकला. नेपोलियननं त्याला अत्यंत शांतपणे तीनचार वाक्यांत उत्तर दिलं, 'ही पवनचक्कीची योजना अत्यंत मूर्खपणाची आहे, आपला वेळ आणि श्रम निष्कारण वाया जाणार आहेत. सबब कोणीही त्या बाजूने मतदान करु नये.' त्यावर स्नोबॉल पुन्हा ताडकन् उभा राहिला. त्याबरोबर मेंढ्यांनी आपल्या घोषणा बेंबटायला सुरुवात केली. स्नोबॉलनं त्यांना चमकावलं आणि आपल्या योजनेची महती चमकदार भाषेत सांगू लागला. त्याच्या स्वप्नाची झेप केवळ वीजनिर्मिती, गवत कटाई यावर न थांबता नांगरणी, कापणी, गार गरम पाणी इथपर्यंत पोचली होती. जणू काही या पवनचक्कीमुळं औद्योगिक क्रांतीच घडून येणार आहे अशा पद्धतीने त्याने चित्र रंगविलं. त्याचं अत्यंत प्रभावी भाषण संपलं तेव्हा मतदान त्याच्याच बाजूने होणार असं स्पष्टपणे दिसू लागलं. त्याच क्षणाला नेपोलियन उभा राहिला. नेहमीप्रमाणे स्नोबॉलकडे पाहिलं आणि भयानक कर्कश आवाजात आरोळी ठोकली. आजवर असला आवाज कुणी कधी ऐकला नव्हता.

त्या आरोळीबरोबर कोठाराच्या बाहेरच्या बाजूला गजबज ऐकू आली आणि गळ्यात पितळेचे बिल्ले अडकवलेले, नऊ प्रचंड कुत्रे झेपा टाकत कोठारात घुसले. आले ते सरळ स्नोबॉलकडे झेपावले. स्नोबॉल क्षणार्धात आपल्या जागेवरून उडी मारून जीव घेऊन पळाला नसता तर त्या कुत्र्यांनी त्यांच्या वखवखलेल्या जबड्यांनी केव्हांच त्याचा फडशा पाडला असता. स्नोबॉल पुढे आणि त्याच्या मागावर कुत्रे अशी शर्यंत सुरु झाली. मधेच एकदा तो घसरला आणि एका जबड्यात तो सापडणार असं वाटत असतानाच स्नोबॉल पटकन उठला आणि जीवाच्या आकांतानं पुन्हा धूम सुटला. एका क्षणाला त्याची शेपटी एका कुत्र्याच्या तोंडात सापडलीही होती पण एका हिसड्याबरोबर ती सुटली. तेवढ्यात बाजूच्या कुंपणात बारीक फट दिसली त्यातून तो आत शिरला. पलीकडे गेला आणि नाहीसा झाला. जे काही घडलं त्यानं अवाक होऊन सगळे प्राणी कोठाराच्या दारात गर्दीनं जमले. तो जीवघेणा पाठलाग पाहून भितीनं चळचळा कापू लागले.

स्नोबॉल निसटल्याचं त्यांनी पाहिलं आणि भेदरलेल्या अवस्थेत पुन्हा कोठारात परतले. तेवढ्यात ते कुत्रे झेपा घेत पुन्हा परतले. सगळ्यांना प्रश्न पडला होता की हे कुत्रे आले कुठून ? पण ते कोडं सुटायला वेळ लागला नाही. जेसी आणि ब्लूबेल कुत्र्यांपासून झालेली जी नऊ पिल्लं तबेल्याच्या माळ्यावर नेऊन ठेवली होती तीच ही होती. नेपोलियनने त्याचं एकांतात संगोपन केलं होतं. शिकवून तयार केलं होतं. ते कुत्रे आता नेपोलियनचे आज्ञाधारक रक्षक बनले होते. एक गोष्ट सर्वांच्याच प्रकर्षानं लक्षात आली की जोन्सचे कुत्रे त्याच्याकडे पाहून ज्याप्रकारे शेपटी हलवत अगदी बरोबर तसेच हे नऊ कुत्रे नेपोलियनकडे पाहून शेपटी हलवत होते.

नेपोलियन वजनदार पावलं टाकत फळ्यांच्या घडवंचीवर चढला. कुत्रे मागोमाग होतेच. याच घडवंचीवर बसून बुढ्या मेजरनं पहिलं भाषण दिलं होतं. नेपोलियननं जाहिर केलं की रविवारच्या विशेष बैठकी बंद. कारण त्या विनाकारण वेळेचा अपव्यय करणाऱ्या आणि म्हणून अनावश्यक होत्या. यापुढं शिवाराबाबतचे कुठलेही प्रश्न, डुकरांची एक समिती सोडवील. त्या समितीचं अध्यक्षपद अर्थातच नेपोलियनकडे रहाणार होतं. या समितीच्या बैठका खाजगीत होतील आणि त्यात होणारे निर्णय फक्त इतरांना कळवले जातील. सर्व प्राणी रविवारी एकत्र जमतील, झेंडावंदन करतील, क्रांतीगीत गायलं जाईल. त्यानंतर आठवड्यातील कामाची वाटणी जाहिर होईल आणि मुख्य म्हणजे त्यावर कुठलीही चर्चा होणार नाही.

स्नोबॉलच्या हकालपट्टीमुळे आधीच धक्का बसलेले सर्व प्राणी या नव्या हुकुमांमुळे आणखीच बुचकळ्यात पडले. त्यावर प्रतिवाद करायला त्यांना काही मुद्दे सुचले असते तर त्यांनी विरोध दर्शविलाही असता. बॉक्सरसुद्धा गोंधळला होता. त्यानं आपले कान मागे ताणले, कपाळावर आलेली आयाळीची झुलपं हलवून आपल्या विचारांना काही चालना मिळते का ते पाहिलं. पण शेवटी काहीच सुचेना तेव्हा तो स्तब्ध झाला. पण तात्त्विक विरोध करायचा प्रयत्न केला डुकरांच्याच चार तरुण तुर्कांनी. चौघेही एकसाथ उभे राहून कर्कश आवाजात बोलू लागले. पण तेवढ्यात नेपोलियनच्या अवतीभोवती बसलेल्या कुत्र्यांनी गुरगुरायला सुरवात केली त्याबरोबर ती चार तरुण डुकरं पसार झाली. ते संपतंय तोच मेंढ्यांनी 'चारपाय चांगले, दोन पाय वाईट' ही आवडती घोषणा मोठमोठ्यांदा घ्यायला सुरवात केली त्याबरोबर चर्चेची उरली सुरली संधीही संपुष्टात आली.

त्यानंतर स्क्विलरला सगळ्या शिवारात नवीन व्यवस्थेबद्दल माहिती द्यायला प्रवक्ता म्हणून पाठवण्यात आलं.

'कॉमरेडस्, नेपोलियननं नेतृत्वाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यामधे जो स्वार्थत्याग दाखवला आहे त्याच कौतुक आपल्यापैकी सर्व प्राण्यांना असेल अशी माझी खात्री आहे. कॉमरेडस्, नेतेपद घेणं म्हणजे काही मजा नसून अत्यंत जोखमीची आणि कठीण अशी ती जबाबदारी आहे. सर्व प्राणी समान आहेत असं कॉमरेड नेपोलियन यांना ज्या तीव्रतेनं वाटतं तितकं इतर कुणालाही वाटत नाही. तुम्ही स्वतः आपापले निर्णय घ्यावेत असं नेपोलियनला फारफार वाटतं. पण प्रश्न असा पडतो की समजा तुम्ही स्वतंत्रपणे घेतलेले निर्णय चुकीचे ठर तर ? तर आपलं काय होईल ? समजा तुम्ही स्नोबॉलच्या पवनचक्कीच्या बेगडी योजनेला पाठिंबा दिला असतात तर ? आता स्नोबॉल हा गुन्हेगार होता हे कळून चुकलेलं आहे तेव्हा...

त्यानं गोठेयुद्धाच्यावेळी खूप शौर्य दाखवलं होत.' कुणीतरी मधेच बडबडले.

'शौर्य एवढी एकच गोष्ट पुरेशी नाहीये. स्क्विलरनं पुढे चालू ठेवलं.' निष्ठा आणि आज्ञाधारकपणा याचं मोल अधिक आहे. खात्री आहे की एक दिवस आपल्यालाही लक्षात येईल की गोठे युद्धातलं स्नोबॉलचं कर्तृत्व खूप फुगवून सांगण्यात आलं आहे. शिस्त, कॉमरेडस् शिस्त हाच आपला आजपासून परवलीचा शब्द आहे. शिस्त, अत्यंत कठोर शिस्त लक्षात ठेवा त्यामधे जराही गफलत झाली तर शत्रू आपल्या उरावर बसलाच म्हणून समजा. आणि माझी खात्री आहे की आपल्यापैकी कुणालाही जोन्स निश्चितच परत यायला नको आहे

पुन्हा एकदा बिनतोड मुद्दा होता. कुठल्याही परिस्थितीत जोन्स यायला नको होता. रविवारची चर्चासत्रं जर जोन्स परत यायला कारणीभूत होणार असतील तर चर्चा थांबवल्याच पाहिजेत. बॉक्सरला विचार करायला एव्हांना भरपूर अवसर मिळाला होता. त्यानं आपली प्रतिक्रिया थोडक्यात सांगून टाकली. 'कॉमरेड' नेपोलियन जर काही म्हणत असेल तर ते बरोबरच असलं पाहिजे. त्याक्षणापासून त्यानं आपलं ब्रीदवाक्य ठरवून टाकलं. 'नेपोलियन हा नेहमीच बरोबर असेल.' आणि हळूच स्वतःपुरतं हेही ठरवून टाकलं की मी याहून अधिक परिश्रम करीन.

काही दिवसातच हवामान बदललं आणि नव्या वर्षाची नांगरणी सुरु झाली. स्नोबॉलनं ज्या तबेल्यात पवनचक्कीचे आराखडे, योजना तयार केल्या होत्या ती खोली बंद करण्यात आली. आणि साहजिकच आतले आराखडे पुसून टाकले असावेत असा समज झाला. दर रविवारी सकाळी दहा वाजता सगळेजण पुढच्या आठवड्याच्या कामाची वाटणी ऐकायला कोठारात जमत. जमायच्या आधी झेंडावंदन होत असे आणि आणखी एका गोष्टीला अभिवादन करुन आत जावं लागत असे. झेंड्याच्या बाजूला बुढ्या मेजराची खोपडी साफसूफ करून एका उभ्या पुरलेल्या बंदुकीच्या टोकावर सन्मानपूर्वक ठेवलेली होती. आत शिरल्यावर एकत्र बसण्याची व्यवस्थाही पूर्वीपेक्षा बदलली होती. नेपोलियन आणि एक मिनिमस नावाचं नवखं डुक्कर, मंचाच्या पुढच्या भागात बसलेले असत. हा मिनीमस गाणी आणि कविता रचण्यात तरबेज होता. त्यांच्याकडे तोंड करून बाकीच्या प्राण्यांनी निमूट बसायचं असे. मग नेपोलियन आपल्या घोगऱ्या आवाजात खाकी लष्करी पद्धतीनं पुढच्या आठवड्यातील कामाची विभागणी जाहिर करत असे. त्यानंतर क्रांती गीताचं एकच आवर्तन होऊन सभा संपत असे.

स्नोबॉलची हकालपट्टी झाल्यानंतरच्या तिसऱ्या रविवारी जेव्हा आपण पवनचक्की बांधणार आहोत अशी नेपोलियननं घोषणा केली तेव्हा सगळे प्राणी चक्रावलेच. आपलं मत का बदललं याबद्दल कसलंही विवेचन न करता त्यानं एक ताकीदच दिली. पवनचक्की म्हणजे जादा काम. त्यासाठी कदाचित तुमचा शिधाही कमी करावा लागेल. सगळी योजना, आराखडे तयार आहेत. एक डुक्कर कमिटी त्यावर गेली तीन आठवडे काम करत होती. पवनचक्कीची ही सुधारीत योजना पूर्ण व्हायला साधारण दोन वर्षे लागतील.

त्या दिवशी संध्याकाळी स्क्विलरनं खाजगीत वार्ता पसरवली, की नेपोलियन खरं म्हणजे पवनचक्कीच्या विरुद्ध नव्हताच. खरं सांगायचं तर पवनचक्कीची मूळ कल्पना त्याचीच होती. स्नोबॉलनं तयार केलेले आराखडे नेपोलियनच्याच कागदपत्रावरुन चोरलेले होते. पवनचक्की हे नेपोलियनचच बाळ आहे. 'मग त्यानं एवढा प्रखर विरोध का केला ?' कुणीतरी मधेच पचकलं. स्क्विलर या वाक्या जरा वरमला पण पुढे म्हणाला, 'होय, ती कॉमरेड नेपोलियनची चलाखी होती. ' कारण स्नोबॉलसारख्या दगाबाज आणि हलकट प्राण्याला हाकलणं आवश्यक होतं म्हणून विरोधाचं नाटक नेपोलियननं केलं होतं. आता स्नोबॉलचा काटा निघाला आहे तेव्हा पवनचक्कीचं काम सुरळीत होईल. हा सगळा डावपेचाचा भाग होता. कॉमरेडस्, हे सगळे डावपेच असतात. लक्षात ठेवा डावपेच. हे म्हणत म्हणत स्क्विलर आपली शेपटी उडवत खिदळू लागला. आता बाकीच्या श्रोते प्राण्यांना या डावपेच शब्दाचा अर्थ काही नीट कळला नाही पण त्याच्या बाजूला असलेले तीन कुत्रे असे काही गुरगुरले की स्क्विलरनं दिलेलं स्पष्टिकरण बिनातक्रार मान्य झालं.

- oOo -

पुस्तक: अ‍ॅनिमल फार्म
लेखक: जॉर्ज ऑरवेल
अनुवाद: श्रीकांत लागू
प्रकाशक: साहित्य अकादमी
आवृत्ती पहिली, दुसरे पुनर्मुद्रण (२००६)
पृ.२७-३३.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा