बुधवार, २९ जून, २०२२

प्रतीक्षा

मी पोहोचतो दुसऱ्या दिवशी, पत्त्यावर. सूरज-व्हिलाचा खालचा मजला सगळा वाढवून त्याचं कॅफेत रूपांतर करण्यात आलंय. उत्पन्नाचं ते साधनही असावं बहुधा. खालचा मजला जुनाच ठेवलाय, फारशी देखभाल नाही. पण वरचा मजला डागडुजी करून रंगवलाय. तिथं ती राहत असावी. कॅफेचा मालक (किंवा व्यवस्थापक) रसिक हौशी आहे. तिथं जुनी गाणी वाजवली जातात.

'ए मेरी जोहराजबीऽ' हे गाणं न चुकता रोज ऐकवलं जातं. 'सिंदूर' मधलं 'तूफान से कश्ती टकराई' आणि 'दिया जलाकेऽ आप बुझाऽया'चे स्वर या कॅफेत गुंजतात रोज. एक लाकडी जिना आहे वर जायचा. त्याला पॉलीश नाही. पण तिथं दरवाजा आहे रंगवलेला. तिथं 'प्लॅटफॉर्म' आहे. ती दोनदा तिथं येऊन उभी राहते आणि कॅफेतल्या सर्वांना 'दर्शन' देते, अजूनही. चाहते (अजूनही) आलेले असतात. त्यांची संख्या कमी आहे, पण ठरलेली आहे. ती आली की जल्लोष होतो. ती हात हलवते. उभी राहते. तिचं तारुण्य त्या क्षणी परत येतं. ती त्या वेळेस सुंदर दिसते. 'फ्लाइंग किस' देते आणि जाते. साडेअकराला आणि चार वाजता. हे सगळं अर्थात नंतर समजतं मला.

ऐसा दुस्तर संसाऽर

मला शुक्लाजी सापडत नाहीत. कोणी सांगतही नाही. मी पण वाट पाहत थांबण्याचं ठरवतो. अंतराअंतरानं मांडलेली टेबल्स. काही गोल. काही चौकोनी. माणसं बसली आहेत काही खाद्यपदार्थांसह. पण वातावरण बकाल नाही. काही तरी अदब आहे, शिस्त आहे. वेगळाच माहोल आहे. वेगळा म्हणजे किती वेगळा ? इथं नव्या जमान्याचं कोणीच नाही बहुधा. मी जिन्याकडे पाहतो. चौथऱ्याकडे पाहतो. मला काही तरी परिचित वाटतं. नंतर लक्षात येतं. ‘सिंदूर' सिनेमातली नायिका अशीच, नाटकी जिन्याच्या चौथऱ्यावर उभी राहून नायकाला साद घालते. तिची प्रसिद्ध अदाकारी. कृष्णधवल सावल्या. प्रकाशाचा खेळ. वाऱ्यानं उडणारे केस. भिरभिरती नजर. तोच 'सेट' इथं उभा केलाय. लगेच लक्षात येतं, कॅफेचा आतला भाग 'सेट' सारखाच आहे.

कुठंच दिसणार नाही असं एक दृश्य. एका टेबलावर एक चित्रकार 'स्केच' काढतोय समोर बसलेल्या एका स्त्रीचं. ती स्तब्ध आहे; गंभीर अशी. चित्रकार शांत, गंभीर. टेबलावर कप, चहाचे. कोपऱ्यात एक दुःखी दिसणारा माणूस 'माऊथ ऑर्गन' - बाजा- वाजवतोय, हळुवार काही धून छेडतोय. आपल्या आपल्यात तो मश्गूल. आणि एक माणूस 'बुद्धिबळ' मांडून बसलाय एकटाच. दाढीवाला, सुरकुतलेला खादीचा कुर्ता घातलाय त्यानं. मी त्याच्या जवळ जाऊन बसतो. विचारतो, दबत्या आवाजात 'जोहराजबी'बद्दल. तो आश्चर्याने पाहतो. पण बोलत नाही.

मी म्हणतो,

“एकटेच खेळताय ?"

आता खरं तर ते दिसतंच आहे. पण मला संभाषण सुरू करायचंय.

"हो! एकटाच. "
"पार्टनर ?"
“पार्टनर दगा देऊन गेले! खरं बुद्धिबळ तर स्वतःशीच खेळायचं असतं!"
“अं?”
“कोणतं प्यादं मरणार हे माहीत असतं आणि ते वाचवायचंही असतं. तुम्हीच दुष्मन, तुम्हीच दुष्मनला सामील.'
"मी तुम्हांला पाहिलं आहे! तुम्ही के.सी. जाल आहांत! हो ना? दिग्दर्शक-निर्माते ?"
“छे! वो तो कबका मर चुका! अब यादें भी न रही होंगी." “तकदीर की नैया, बिजली-सिंदूर- बावरे नैन."

मी लेखकाचा हरामीपणा विसरत नाही. मला जखमेवरची खपली काढायची आहे. मला ‘जोहराजबी'ला भेटायचंय. तिला बोलतं करायचंय. मी पाहतो त्याचा वाढलेला श्वास. त्याची थरथर तो स्वतःवर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला जास्त शंका येतेय.

"जाल साब."
“जाऊ द्या! उकरू नका. गुजर गया सबकुछ- आप ?"

मी स्वतःबद्दल सांगतो. कालच्या भेटीबद्दल सांगतो. कार्ड दाखवतो. शुक्लाजींबद्दल विचारतो. 'जालसाब' बोलत नाही. बुद्धिबळाचा नवा डाव मांडतो. मग म्हणतो,

"येतील शुक्लाजी! कुठं जातील? यहीं आना है. "

मी पाहतो आसपास. माऊथ ऑर्गनवाला तल्लीन आहे- स्वतःत. आणि तिकडे स्केचही चाललंच आहे. बाहेरचा वेग, धावपळ, गतिमानता इथे नाही. इथं जणू सगळं स्तब्ध आहे, थांबलंय, इथली वेगळी दुनिया आहे. भिंतीतल्या दोन गवाक्षांतून (त्यांचा आकार गोल आहे.) मऊ प्रकाश आत येतोय. हा प्रकाश दुसऱ्याच दुनियेचा आहे जणू. कारण तो इथं, इथल्या सर्वांवर पसरतोय आणि सगळ्याला बांधून ठेवतोय. काही 'चाहते' आलेत. गरीब दिसणारे. वाट पाहत थांबलेत. माझ्या लक्षात येतं की, 'चौथऱ्यावर' एक 'स्पॉट' लावून ठेवलाय कायम असा, पण तो प्रकाशमान नाही. नंतर समजतं की, 'बाँबेटाकी'तून एका चाहत्या स्पॉटबॉयनं हा स्पॉट आणून बसवला होता. ती येऊन उभी राहिली की हा आनंदानं बेभान व्हायचा. स्पॉट टाकायचा तिच्यावर. जल्लोष व्हायचा मग. नंतर तो मेला. तेव्हापासून स्पॉट पेटत नाही. 'दिया जलाकेऽ आप बुझाऽया'ची रेकॉर्ड मात्र लावलीय कुणी. मी आसपास पाहतो. जालसाब मात्र विचारतो,

“और आपने मुझे कैसे पहचाना?"

मी हसतो. उत्तर देत नाही. विचारतो 'तिच्या' बद्दल. त्यांच्याकडे उत्तर नसतं. सगळे मात्र वाट पाहताहेत. थांबलेत, जमलेत वाट पाहताहेत.

***

स्केच घेऊन चित्रकार आलाय जालसाहेबांजवळ. हळूहळू, कुजबुजत काही बोलतोय. बोलणं आनंदाचं नाहीय. काही तक्रार आहे बहुधा, त्या समोरच्या स्त्रीबद्दलची.

“फिर सादी बनाता?"
"अब क्या बनाना? आणि ठेवू कुठं ?"

काही शरमेचे मुद्दे आहेत. म्हणजे आता कोणी विचारत नाही. आता काम मिळत नाही, पण आर्थिक गरज तर असतेच. अभिमान बाजूला ठेवायचा तर जखमी करतात. जगणं दिवसेंदिवस मुश्किल होत जातं आहे. 'जालसाब'जवळ या सगळ्यांचं उत्तर नाही. तो ऐकतो, कुजबुजतो, प्यादी मांडता मांडता. मला 'गुजरा जमाना' आठवतोय. जालसाबनं मास्टर भगवानच्या आधीच ’उघड्या टपाच्या गाड्या’ मुंबईत आणल्या होत्या आणि मला आठवत की,’भागंभाग'ची योजना याचीच होती. चित्रकार सांगतोय खूप शरमेनं की, भारतभूषण परवा 'काम दिलवा दो' म्हणून सेटवर सांगायला आला होता. नवीन पोरं त्याच्याकडे लक्षही देत नव्हती. जालसाब विचलित न होता ऐकतोय, पटावर नजर ठेवून.

मी पाहतो की अचानक काही तरी, नाटकीय परिवर्तन झालंय. खूप कंटाळवाण्या पण अपरिहार्य दृश्यानंतर 'कॉमेडियन'ला दाखवावं तसं. ते दोघे येतात. खरं तर ठरवून 'एंट्री' घेतात. वाट पाहणाऱ्यांपैकी दोघे टाळ्या वाजवतात, हसतात. एक डाव्या पायानं लंगडा आहे, दुसरा उजव्या. दोघांचे कपडे सारखेच. म्हणजे शेरवानी आणि हैद्राबादी टोप्या. एकाचा डावा डोळा 'काणा' आहे, दुसऱ्याचा उजवा. दोघे एकत्रच चालत येतात-झुलत आणि हसणं दोघांचं ठरवून. एकाच्या डाव्या हातात ट्रे. दुसऱ्याच्या उजव्या. ते दोघे टेबलावर मद्याचे पेले ठेवताहेत भराभर, प्रशिक्षित पद्धतीने आणि थांबतात. ठरवून केलेल्या काही कृतींप्रमाणे एकमेकांना टाळ्या देतात आणि नाटकीपणे एक म्हणतो,

"खुदाबक्षऽ."
“और मैं देवदत्तऽ!"

मग सुरू होते त्यांची काही क्षुल्लक प्रहसनात्मक शेरेबाजी, चुटकुली आणि 'आयटम्स.' मी पाहतोय. मला उगाचंच काही आठवतंय. मी डोकं खाजवतो. त्यांतला एका खराच लंगडा आहे का याची मला शंका येते.

"ये दोनो, जालसाब.
"हां!"
"मैने कहा- "
“पुरानी बात है! क्यूं साद दिलाते हो?"
"हा खरंच लंगडा आहे ?"
“असे प्रश्न इथे विचारायचे नसतात."
"हे दोघे वेटर ?"
“आता काय काय विचारणार तुम्ही ?"

त्यांचा कां विरोध आहे प्रश्न विचारायला ते मला समजतं अचानक. एक त्यांतला नसरत हुसैन आहे. मी त्याचे, त्या वेळचे सिनेमे पाहिलेत. हाही वारला असं मला वाटत होतं. पण हा इथं आहे, बहुधा पगारी. मला करुण वाटतं. मी 'जालसाब'कडे पाहतो. त्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. मी ओळखलंय हे ते ओळखतात.

"पेहचाना ?"
"हो!"
“शैतान हो तुम. "
“शुक्रिया!"
“हा तेव्हा शेक्सपीयरची नाटकं करायचा, पार्सी रंगभूमीवर! कदाचित आठवत असेल."
"मी वाचलंय! पण पाहिलं नाही. ब्रिटिश कंपनी आली तेव्हा."
"बरोबर. यानं मग उर्दूत पण बसवलं होतं हॅम्लेट!"
“आता ?"
"आता इथं आहे! 'भागंभाग' मध्ये दोघेही होते."
"मास्टर भगवानचा ?"
“त्या आधीचा! द रियल भागंभाग!"
“पण पाहिला नाही."
“कसा पाहाल? रिलीजच झाला नाही. मैं तो डूब गया ना."

त्यात या दोघांची अदाकारी असणार होती. सिनेमा बनला नाही. पण डोक्यावरलं भूत उतरलं नाही. आता इतक्या वर्षांनंतर जणू, मधला काळ अस्तित्वातच नाही. अजूनही ते दोघे एकत्र, ती अदाकारी करताहेत इथं. हसवताहेत आणि गुमनामीच्या अंधारात निघून जाताहेत. खूप टक लावून पाहिलं तर अस्वस्थ होतायत, भेदरतायत. त्यांना ओळखायचं नसतं. त्यांना प्रकाशात आणायचं नसतं. त्यांना 'जलील(१)' करायचं नसतं. हसायचं असतं आणि विसरायचं असतं."

“दोघेही खरं तर देवदत्तच ना ? खुदाबक्ष म्हणजे-"
"ही त्यांची सिनेमातली नावं होती. "
“ही मस्करी किती वेळ चालते?"
“ती येईपर्यंत!"
“कम्मो ?”
“बरोबर! तिचं खाजगीतलं नाव कम्मो ! ती आतापर्यंत यायला पाहिजे होती. "

मी पाहतो; त्या दोघांना. ते आता थकले आहेत. 'लॉरेल हार्डी'सारखं काही तरी त्यांचं चाललं आहे. त्यांचं 'ओल्ड स्कूल' आहे. संदर्भ जुने आहेत. 'गोप'चं ते नावं घेतात. 'राधाकृष्णा'चं नाव घेतात. ही नावं आता कोणाला माहीत नाहीत. पण जमलेले जुनी दर्दी आहेत. पुराने पापी. ते हसतात, दाद देतात, पण 'कम्मो'ची वाट पाहतात. अचानक माझ्या आठवणी तीव्र होतात. मला नसरत हुसैन आठवतो, त्याची अदाकारी आठवते. यानं 'हॅम्लेट' केलं होतं उर्दूतलं. मग याला संवाद पाठ असतील. मी न राहवून म्हणतो,

“मला त्यांना भेटायचंय- हॅम्लेटला.'

जालसाब राजाला शह देतो. विचारात पडतो. म्हणतो,

"मुनासिब नहीं होगा! दुखेल, तळमळेल तो! जुन्या आठवणी त्याला आवडत नाहीत."
"एकबार. "
“मी विचारतो त्याला! तो मानी कलावंत आहे. थांबा तुम्ही!"

मी तर थांबलोच आहे. शुक्लाजींची मला वाट पाहायची आहे. 'जोहराजबी' (कम्मो) ची मला वाट पाहायची आहे. तिची भेट घ्यायची आहे. आणि आता हा 'हॅम्लेट' याच्या भेटीगाठीसुद्धा मी थांबलोच आहे. गवाक्षातले दोन रंगाचे प्रकाश-किरण आता बदललेत. कॅफेतलं जुनं सामान प्रकाशमान झालंय. त्या दोघांची मस्करी संपत आलीय. पण 'कम्मो' अजून येत नाही, वरचा दरवाजा बंदच आहे. आणखी काही 'दर्दी'-कदरदान आलेत. ते सभ्यपणे येऊन बसलेत. मी पाहतो त्यांना आणि माऊथ ऑर्गनवाल्या त्या संगीतकारालासुद्धा. चित्रकार स्तब्ध बसलाय. पण तो 'खुदाबक्ष, देवदत्त'च्या कॉमेडीच्या पलीकडे काही तरी पाहतोय वाटतं.

मला त्याची ओळख पटत नाही, पण संगीतकाराची थोडी ओळख पटू शकेल. थोडं ओळखीचं वाटतंय, त्याचं बघणं, त्याचं वाजवणं. त्याची खिन्न नजर. पोर्ट्रेटवाली स्त्री स्तब्ध बसलीय. जणू तिचं अजूनही चित्र काढलं जातंय. तिच्या नजरेतसुद्धा केव्हाची थांबून राहिलेली वेदना आहे. खुदाबक्ष, देवदत्त लंगडताहेत, गिरक्या घेतायत आणि त्यांचं काही 'डायलॉग' म्हणताहेत. पण मधेच, एक क्षणभर मला त्यात हॅम्लेटचं दर्शन होतं- क्षणभरच. ताठ उभं राहणं, खर्जातलं उच्चारलं जाणारं एखादं वाक्य. पण इतकंच. जालसाब पटावर सोंगट्या मांडतो पुन्हा आणि पुन्हा पुन्हा. मग माझी चित्रकाराशी ओळख करून देतो, माझ्याकडे न पाहता.

"पुराने माहीर है- सब जानते है."

चित्रकार माझ्याकडे निरखून पाहतो. मला त्याची- त्याची मला, ओळख लागत नाही. तो कपाळाला हात लावून 'आदाब' करतो. मग 'स्केच' दाखवतो. मी खिशात हात घालू लागतो. पण तो हात पकडून जखमी हसून म्हणतो,

"नहीं- पैसे नहीं!"

देवदत्त आणि खुदाबक्ष गेले आहेत. पण अजून 'वरचं दार उघडलेलं नाही. अजून 'कम्मो' आली नाहीये. नजरा वर आहेत, सर्वांच्या. दूर माऊथ ऑर्गनची खिन्न धून. स्तब्ध बसलेली स्त्री. पटावरच्या सोंगट्या. गवाक्षातला बदलता प्रकाशझोत आणि काही तरी न सांगता येईल असं पसरलेलं अस्फुट दुःख, या सर्वांतलं. मी पाहतो हे सर्व आणि शुक्लाजींची वाट पाहतो.

"लो, आ गया -"
"कोण ? शुक्लाजी ?"
"नहीं-"

मी पाहतो. तो व्यवस्थापक असणार. पांढऱ्या दाढीचा, उदास, अंतर्मुख डोळ्यांचा. त्यानं तबकडी लावलीय गाण्याची. मग तो डोळे मिटून बसून आहे. मी गाणं ऐकतो आणि थरारून जातो. शब्द ओळखीचे आहेत. आवाज ओळखीचा नाही.

***

'जल गया कारवाँ... लुट गये, हम यहाँ -' शब्द तर पोहोचताहेत, पण हा आवाज, हा आवाज. मी थरारून 'जालसाब'कडे पाहतो. त्याला माझी तडफड जाणवते.

"ओळखलंत?"
"नाही!"
“हे कम्मोनं स्वतः गायलेलं गाणं आहे! एकमेव रेकॉर्ड राहिलीय ती!... बाद में इसे तलतने भी गाया. कुछ बदलकर!... शब्द पण बदलले त्यांनी!... हे गाणं मी माझ्या नव्या सिनेमात घेणार होतो!... खैर!... चला गया सब !... जल गया कारवाँऽ"

मी ऐकतो, जालसाबला इतकं बोलताना प्रथमच. पण ते गाणं सुरू झालं असताना त्याचं मेणासारखं वितळणंही मी प्रथमच पाहतो. जालसाब तरल झाला आहे. विचलित झाला आहे. कठोर एकाकीपणा त्याचा विरविरीत होतोय.

"हे जीवघेणं गाणं आहे!... हो ना?"
"हो!"
“हे ऐकलं की एका मिनिटानं आयुष्य कमी होतं आणि अर्ध्या मिनिटानं वाढतं!”

मी सहानुभूतीनं हसतो.

- oOo -

पुस्तक: ऐसा दुस्तर संसाऽर
लेखक: भारत सासणे
प्रकाशक: मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती पहिली (२०११)
पृ. ३-९.

---
संबंधित लेखन:
वेचताना... : नॉर्मा आणि कम्मो >>
---


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा