बुधवार, १७ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता  << मागील भाग
---

मागील भागामध्ये शेअर केलेल्या ’अनेकता में एकता’, ’स्विम्मी’ आणि ’एकता का वृक्ष’ या तीनही चलच्चित्रपटांमध्ये एक समान धागा होता. एकजुटीचा, एकतेचा उद्घोष केला होता. यात एकत्र येणार्‍या व्यक्तिंना, पक्ष्यांना जोडणारा बाह्य धागा असा काही नव्हता. 'आपण सारे एक आहोत’ ही बांधिलकी मानणार्‍या सर्वांसाठी तो होता. एक प्रकारे ’मानव्याचे अंती एकच गोत्र’ हा अर्थ त्यातून ध्वनित होत होता.

पण काळ पुढे सरकला तसे दूरदर्शनवर चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट अथवा देशोदेशीच्या प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम पाहणारी पिढी मागे सरकली आणि हिंदी चित्रपटांच्या कृतक जगात रमणारी पिढी उदयाला आली. ज्याला बॉलिवूड असे म्हटले जाते त्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा बोलबाला सुरू झाला. स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती मागच्या पिढीच्याही स्मरणातून धूसर होऊ लागल्या.

साहित्यामध्ये खांडेकरी आदर्शवाद मागे सरकू लागला आणि फडकेंच्या गुलाबी कथांची सद्दी सुरू झाली. पुढे रणजित देसाई, शिवाजी सावंत यांनी पौराणिक/ऐतिहासिक कथानकावर आधारित कथनात्म साहित्याचा प्रवाह बळकट केला. हिंदी चित्रपट क्षेत्राने सामाजिक विषयांवरील चित्रपटांचे बोट सोडून ’अ‍ॅंग्री यंग मॅन’भोवती कथानके विणायला सुरुवात केली.

सामाजिक चित्रपटांमध्ये पारंपरिक संदर्भात का होईना पण नेमक्या भूमिका असणार्‍या अभिनेत्रींना आता या ’अ‍ॅंग्री यंग मॅन’ची जोडीदार इतकेच स्थान मिळू लागले. पुस्तकांची जागा नियतकालिकांनी घेतली आणि तिथेही हिंदी चित्रपटसृष्टीतील खमंग गॉसिप्स कोणताही विधिनिषेध न बाळगता विकली जाऊ लागली. हळूहळू हे कृतकवीर तरुणाईचे आदर्श होऊ लागले. मग आता प्रबोधनाचे माध्यमही त्यांना शरण जाणे अपरिहार्य होऊन बसले.

समाजातील मनोरंजनाचे केंद्र दूरदर्शनकडून हिंदी चित्रपटांकडे सरकत असताना दुसरीकडे राजकीय पातळीवरही उलथापालथ होत होती. मुस्लिम धर्मियांमधील ’तोंडी तलाक’ संदर्भातील मैलाचा दगड मानला गेलेल्या प्रसिद्ध ’शाहबानो खटल्याचा निकाल १९८५ मध्ये आला. हा आमच्या धर्मात हस्तक्षेप आहे असा आरोप करत मुस्लिम धर्मियांमधील एका मोठा गटाने आंदोलन सुरू केले. त्या दबावासमोर झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८६ साली संसदेत कायदा करुन या निकालास रद्दबातल केले.

या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांना काँग्रेसवरचा ’मुस्लिमधार्जिणेपणाचा’ आरोप अधिक जोरकसपणे करता येऊ लागला. यातून जनमतामध्ये झालेली हानी भरून काढण्यासाठी आजवर धार्मिक, पौराणिक कार्यक्रमांना कटाक्षाने दूर ठेवलेल्या दूरदर्शनवर रामायण आणि महाभारतावर आधारित मालिका दाखवण्याची सूचना राजीव गांधींनी केली. १९८७ मध्ये रामानंद सागर निर्मित रामायण दूरदर्शनच्या पडद्यावर राज्य करु लागले.

या दोन निर्णयांमुळे दोन्ही धर्मियांमध्ये कट्टरपंथी मंडळींचा वरचष्मा होऊ लागला. आणि त्याला छेद देण्यासाठी एकतेचा घोष ’राष्ट्रीय एकात्मता’ असा बदलून घेण्यात आला. पुन्हा राजीवजींच्याच प्रेरणेने जयदीप समर्थ (प्रसिद्ध अभिनेत्री नूतन यांचे बंधू) यांनी हा प्रस्ताव दूरदर्शनकडे नेला. १९८८ साली ’मिले सुर मेरा तुम्हारा’ हा संगीत-पट ’लोकसेवा संचार परिषद’ या सस्थेतर्फे निर्माण करण्यात आला. यात प्रथमच मानवी एकतेचा, बांधिलकीचा गजर मर्यादित करुन केवळ ’देशबांधवांच्या एकतेचा’ पुकारा करण्यात आला.

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा
मिले सुर मेरा तुम्हारा

(कॉशुर)
चॉन्य् तरज़ तय म्यॉन्य् तरज़
इक-वट बनि यि सॉन्य् तरज़

(ਪੰਜਾਬੀ)
ਤੇਰਾ ਸੁਰ ਮਿਲੇ ਮੇਰੇ ਸੁਰ ਦੇ ਨਾਲ
ਮਿਲਕੇ ਬਣੇ ਇਕ ਨਾਵਾਂ ਸੁਰ ਤਾਲ

(हिन्दी)
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा

(سنڌي)

معهڳنجو سعر تعهڳنجي ساان پٿاارا مڳلي جادينه
گييت اساانجو مادهعر تاراانو باني تادينه (اُردُو‎)
سر کا دریا بہ کے ساگر میں میل

(ਪੰਜਾਬੀ)
ਬਾਦਲਾਂ ਦਾ ਰੂਪ ਲੈਕੇ
ਬਰਸਾਂ ਹੌਲੇ ਹੌਲੇ

(தமிழ்)
இசைந்தால் நம் இருவரின் சுரமும் நமதாகும்
திசை வேறு ஆனாலும் ஆழிசை ஆறுகள் முகிலாய் மழையாய் பொழிவதுபோல் இசை...
நம் இசை

(ಕನ್ನಡ)
ನನ್ನ ಧ್ವನಿಗೆ ನಿನ್ನ ಧ್ವನಿಯ,
ಸೇರಿದಂತೆ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯ

(తెలుగు)
నా స్వరము నీ స్వరము సంగమ్మమై
మన స్వరంగా అవతరించెయ్

(മലയാളം)
എന്റെ സ്വരവും നിങ്ങളുടെ സ്വരവും
ഒത്തുചേർന്നു നമ്മുടെ സ്വരമായി

(বাংলা)
তোমার সুর মোদের সুর
সৃষ্টি করুক ঐক্যসুর (2x)
সৃষ্টি করুক ঐক্যতান

(অসমীয়া)
সৃষ্টি হউক ঐক্যতান

(ଓଡିଆ)
ତୁମ ମୋର ସ୍ୱର ର ମିଲନ
ସୃଷ୍ଟି କରେ ଚାଲୁ ଚତନ

(ગુજરાતી)
મળે સૂર જો તારો મારો
બને આપણો સૂર નિરાળો

(मराठी)
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

(हिन्दी)
सुर की नदियाँ हर दिशा से बहते सागर में मिलें
बादलों का रूप ले कर बरसे हल्के हल्के
मिले सुर मेरा तुम्हारा
मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा (3x)
तो सुर बने हमारा (2x)
---
LyricsTranslate.Com येथून साभार.

या संगीतपटाची संगीत-कल्पना भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची होती. भारतीय रागसंगीतामध्ये हिंदुस्तानी आणि कर्नाटक असे दोन प्रवाह आहेत. दोन्हीं संगीतांच्या रागविस्ताराच्या दृष्टिकोनात फरक असला तरी मूळ रागकल्पना कर्नाटक संगीतामधूनच आलेली असल्याने काही रागांमध्ये साम्यही दिसते. या दोन्ही प्रवाहांचे प्रातिनिधित्व करणार्‍या, जिला सदासुहागन रागिणी म्हटले जाते त्या भैरवीला मुख्य आधार म्हणून घेत रागसंगीतामधील इतर काही रांगांच्या छटा अधेमध्ये वापरण्यात आल्या.

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी यात हिंदी, असमी, तमिल, तेलगु, कश्मीरी, पंजाबी, हरयाणवी, सिन्धी, उर्दू, कन्नड़, मलयालम, बंगाली, उडीया, गुजराती, मराठी अशा अनेक भाषांमधली कडवी समाविष्ट करण्यात आली. प्रत्यक्ष पडद्यावर दोन भारतरत्न पं. भीमसेन जोशी आणि विदुषी लता मंगेशकर यांच्यासह बालमुरली कृष्ण (यांनी गायलेला तुकडा माझ्या मते यातील सर्वोत्कृष्ट म्हणावा लागेल. कितीहि उद्विग्न मनाला शांत करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे), कविता कृष्णमूर्ती यांच्यासारखे गायकांसोबतच जावेद अख्तर, नरेन्द्रनाथ चक्रवर्ती, सुनील गंगोपाध्याय यांच्यासारखे कवीही हजेरी लावून गेले.

वर म्हटल्याप्रमाणे नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतून अमिताभ बच्चन, शर्मिला टागोर, वहिदा रहमान यांच्यासारख्या तारे-तारकांसह हरीष पटेल, वीरेन्द्र सक्सेना यांच्यासारख्या सहकलाकारांचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय नुकत्याच जिंकलेल्या विश्वचषकामुळे क्रिकेटचाही सुवर्णकाळ चालू होत होता. त्यातूनही सय्यद किरमाणी, अरुण लाल यांच्यासारखे खेळाडू चमकून गेले. इतर खेळांतूनही काही जणांची निवड केली होती. प्रसिद्ध चित्रकार आणि तत्कालिन कार्टूनिस्ट मारिओ मिरांडा यांचाही समावेश केला गेला होता.

२०१० साली प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ’झूम टीव्ही’ चॅनेलने या संगीतपटाची पुनर्निर्मिती (Redux) केली. त्याच वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने याचीच एक आवृत्तीही प्रसारित केली होती. पुढेही वेळोवेळी अनेक गायक नि गायिकांनी या गाण्याला ’कव्हर’ केले आहे. युवा मराठी गायिका आर्या आंबेकर हिने २०२० मध्ये स्वातंत्र्यदिनी गायलेल्या या गीताचा हा व्हिडिओ.

पुढच्याच वर्षी (१९८९) मध्ये ’बजे सरगम हर तरफ से’ हा आणखी एक संगीत-पट निर्माण करण्यात आला. यात बॉलिवुडी तारकांचा चमचमाट नव्हता. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ मध्ये भारताचे भौगोलिक वैविध्याचे दर्शन प्राधान्याने घडवले होते. ’बजे सरगम’ मध्ये भारतातील विविध संगीत, नृत्य परंपरांचा अंतर्भाव करत सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवण्यावर भर देण्यात आला होता. ’मिले सुर...’ ने भैरवी रागाला आधार-स्वर मानून संगीताची मांडणी केली होती तर ’बजे सरगम...’ साठी देस रागाची निवड करण्यात आली होती.

’मिले सुर...’ मध्ये केवळ गायक, गायन आणि अभिनेते यांचाच समावेश होता. ’बजे सरगम’ने पं. रविशंकर, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद अमजद अली खाँ, पं. रामनारायण यांच्यासारखे तंतुवाद्यवादक, हरिप्रसाद चौरसियांसारखे बासरीवादक, उस्ताद अल्लारखा आणि त्यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसैन यांच्यासारखे तबलावादक, अशा वाद्यवादकांचाही समावेश केला होता.

यासोबतच ओडिसी नृत्यांगना प्रोतिमा बेदी, कथ्थक नर्तकी शोभना नारायण यांच्यासह कथकली, कुचिपुडी, मोहिनिअट्टम्‌, भरतनाट्यम्‌ आणि मणिपुरी नृत्यांचाही समावेश केला होता.

त्यानंतर बराच काळ अशा स्वरुपाचे कार्यक्रम नव्याने तयार झालेले दिसत नाहीत. परंतु १९९२ मध्ये बाबरी मशीदीचा विध्वंस झाला, नि त्यापाठोपाठ दंगली उसळल्या. देशात पुन्हा एकवार हिंदू-मुस्लिम द्वेषाचे तांडव सुरू झाले. अशा वेळी राष्ट्रीय एकात्मतेचा नारा पुन्हा एकवार बुलंद करण्याची गरज वाटू लागली. हा खाली दिलेला संगीत-पट (म्हणा की गीत म्हणा) हे १९९३ मध्ये चित्रित करण्यात आले. ’मिले सुर मेरा तुम्हारा’ प्रमाणे यातही त्या काळातील प्रसिद्ध बॉलिवुडी अभिनेत्यांचा समावेश होता. यात आणखी एक महत्वाचा बदल असा होता की आता या बंधुभावाची शिकवण बालपणापासूनच बिंबवायला हवी हे ध्यानात घेऊन हे गीत त्या पिढीलाच उद्देशून लिहिले गेले होते.

सुन सुन सुन मेरे नन्हे सुन,
सुन सुन सुन मेरे मुन्ने सुन
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सुन सुन सुन मेरी नन्ही सुन,
सुन सुन सुन मेरी मुन्नी सुन
प्यार की गंगा बाहे देश मे एका रहे

ख़त्म काली रात हो, रोशनी की बात हो
दोस्ती की बात हो, ज़िन्दगी की बात हो
बात हो इंसान की, बात हिन्दुस्तान की
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

अब न दुश्मनी पले, अब न कोई घर जले
अब नही उजड़े सुहाग, अब नही फैले ये आग
अब न हो बच्चे अनाथ, अब न हो नफ़रत की घात
सारा भारत ये कहे, प्यार की गंगा बहे
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे

सारे बच्चे बच्चिया, सारे बूढ़े और जवां, यानी सब हिंदुस्तान
एक मंजिल पर मिले एक साथ फिर चले
एक साथ फिर रहे, एक साथ फिर कहे... फिर कहे...
प्यार की गंगा बहे, देश मे एका रहे...
देश मे एका रहे, सारा भारत ये कहे
सारा भारत ये कहे, देश मे एका रहे

---

हे गीत मी अनेकदा पाहिले नि ऐकले होते. परंतु बर्‍याच काळाने त्याच्याबद्दल एक रंजक माहिती मला मिळाली. त्यानुसार ’सारा भारत ये कहे’ (१९९३) हे गीत संजय दत्त अभिनीत ’खलनायक’ या शीर्षकाच्या चित्रपटातील आहे. हे ऐकून मला धक्काच बसला होता.

’नायक नहीं खलनायक हूँ मैं’ हे त्यातील गाणे आणि एकुणच कथानक गुन्हेगारीचे उदात्तीकरण करीत असल्याचा आरोप झाल्याने तो वादग्रस्त ठरला होता. एकुणच बॉलिवुडी मसालापट परंपरेतील असलेल्या या चित्रपटात हे गाणे अगदीच अस्थानी दिसले असावे. कदाचित असेही असेल की मूळ कथेमुळे चित्रपट वादग्रस्त ठरल्यामुळे त्याच्या विरोधातील धार कमी करण्यासाठी हे गाणे नंतर समाविष्ट करण्यात आले असावे. प्रत्यक्षात सिनेमागृहांतून दाखवलेल्या प्रतीमध्ये हे होते की नाही मला ठाऊक नाही. परंतु दूरदर्शनवर मात्र त्याचे प्रसारण अनेकदा पाहण्यात आले.

’सारा भारत ये कहे’ नंतरचा काळ हा भारताचा संक्रमणकाळ ठरला. मनमोहन सिंग प्रथम अर्थमंत्री नि नंतर प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचे दरवाजे उघडले. आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरण यांचा बोलबाला सुरू झाला. हिंदी चित्रपटांनी 'खलनायक’ची परंपरा स्वीकारून गुन्हेगारी, बटबटीत शृंगार, चोख मनोरंजन करणारे विनोद आदींची कास धरून ’अर्थस्य हि पुरुषो दास:’ ही म्हण तंतोतंत अंमलात आणायला सुरुवात केली. खासगी चॅनेलच्या वावटळीमध्ये ’दूरदर्शन’ एका कोपर्‍यात फेकले गेले. तांत्रिक, आर्थिक प्रगतीची घोडदौड वेगाने सुरू झाली. देशाचा आर्थिक विकास ज्याने होतो ते ते सारे समर्थनीय ठरू लागले. त्यासाठी ज्याचा उपयोग नाही ते सारे निरुपयोगी ठरून बाहेर फेकले गेले.

या दरम्यान रामजन्मभूमी आंदोलनाने जोर धरला आणि सामाजिक समता, सौहार्द, राष्ट्रीय एकात्मता या गोष्टी पाचोळ्यासारख्या उडून गेल्या. मंडल आयोग लागू झाल्यानंतर धार्मिक अस्मितांसोबतच जातीय अस्मिताही धारदार होऊ लागल्या. देशभर मोकाट सुटलेल्या अस्मिता-सांडांच्या धुमाळीमध्ये ’राष्ट्रीय एकात्मता’ नावाची गाय परागंदा झाली.

त्यानंतर जवळजवळ वीस वर्षांनी प्रसिद्ध गायक पं. जसराज यांची कन्या दुर्गा जसराज यांनी पुन्हा एकवार या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने 'भारत को एक सलाम’ शीर्षकाखाली नवा संगीत-पट निर्माण केला. ’सौ रागिनियों से सजा भारत अनोखा राग है’ या गीताभोवती हा संगीत-पट उभा आहे. परंतु त्याच्या गीताचे बोल पाहिले तर यात भारतीय भौगोलिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक वैशिष्ट्यांबद्दल काहीच उल्लेख नाही. एखाद्या देवाची स्तुती करणारी आरती असावी असे ते गीत लिहिले आहे. (दुर्दैवाने याचा लेखक कोण हे समजू शकले नाही.)

'देश हा आपणा सर्वांना जोडणारा समान धागा' या व्याख्येपासून सुरुवात करुन ’तुम्हा-आम्हा नागरिकांपासून वेगळा असा काहीतरी एक 'देश नावाचा देव नि आपण त्याचे भक्त’ इथपर्यंतचा प्रवास इथे पुरा झाला आहे.

सौ रागिनियों से सजा,
भारत अनोखा राग है।
ये प्यार का संगीत है।
ये शांती का गीत है।
ये एकता का राग है।
भारत अनोखा राग है ॥१॥

भारत के इस तारे पे,
गूँजे है जो जो रागिनी।
सब मिल गाएँ एक धुन बानी।
इस धुन पे नारा एक है।
इसका तराना एक है।
ये राग सबका राग है।
भारत अनोखा राग है ॥२॥

जय हिंद, जय हिंद।
जय जय जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।
जय हिंद, जय हिंद।

इस देश की रीत एक है।
हैं धडकने एक ताल में।
सुर अनगिनत गीत है।
ये देश सबका देश है।

क्या बोल हैं, क्या राग है।
सब गाएँ ऐसा राग है।
बहुरूपमें अनुराग है।
सौ रागिनियों से सजा।
भारत अनोखा राग है ॥३॥

जय हिंद, जय हिंद, जय हिंद...

हे गीत अनेक गायक-गायिकांनी गायले आहे. यात संगीतमार्तंड पं. जसराज, आपल्याला प्रामुख्याने चित्रपटगीत-गायक म्हणून ठाऊक असलेले कर्नाटक संगीतातील प्रसिद्ध गायक पं. येसूदास, शंकर महादेवन यांच्यासह कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक, सोनू निगम, जगजित सिंग आणि अनूप जलोटा यांचा समावेश होता. जावेद अख्तर यांच्यासारखे कवी, शबाना आझमी यांच्यासारख्या अभिनेत्रीही हजेरी लावून गेल्या आहेत.

'भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’ म्हणत १९६३ मध्ये सुरू झालेला राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेचा संगीत-प्रवास २०१३ साली ’भारत अनोखा राग है’ पाशी थांबला. एकात्मतेला श्रद्धांजली वाहून देशभक्तीचा गजर सुरू झाला आणि कोण अधिक देशभक्त याची चढाओढ सुरू झाली

१९९२ मध्ये आलेल्या स्पर्धाव्यवस्थेने देशभक्तीमध्ये स्पर्धा रुजवली. त्या व्यवस्थेत अपरिहार्यपणे गुणवत्तेपेक्षा उपलब्धतेला महत्त्व येऊन, स्वत:च्या गुणवत्तेपेक्षा इतरांमधील तिच्या अभावाची चर्चा होते. तेच देशभक्तीच्या क्षेत्रातही होऊ लागले. ’सारा भारत ये कहे’ मधील संस्कार आणि आता व्हॉट्स-अ‍ॅप सारख्या अनियंत्रित माध्यमांतून होणार प्रचार यातील फरक स्पष्ट दिसू लागला आहे. त्या गीतामध्ये बालकांवर केलेले बांधिलकीचे संस्कार कुठे आणि आज देशभक्तीच्या नावाखाली त्यांच्या मनात रुजवला जात असलेला द्वेष कुठे.

हातात हात घालून चालणारे नागरिक आता हात सोडून शेजार्‍याच्या पुढे राहण्यासाठी जिवाच्या आकांताने धावू लागले. प्रसंगी दुसर्‍याची धाव खंडित करण्यासाठी एकमेकाच्या पायात पाय घालून पाडूही लागले. ’सारे भारतीय माझे बांधव आहेत’ पासून ’आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत’ पर्यंत मजल आपण मारली आहे.

(क्रमश:)

- oOo -

पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - ३ : आम्ही सारे भारतीय अलग-अलग आहोत


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा