सोमवार, १५ ऑगस्ट, २०२२

राष्ट्रीय एकात्मता - १ : अनेकता में एकता

"भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत..." अशी एक प्रतिज्ञा आमच्या शालेय क्रमिक पुस्तकांत पहिल्या पानांवर छापलेली असे, कदाचित अजूनही छापली जात असेल. ही प्रतिज्ञा प्रसिद्ध तेलुगु कवी पी. वेंकट सुब्बाराव यांनी लिहिलेली आहे. १९६२ मध्ये लिहिलेली ही प्रतिज्ञा १९६३ मध्ये विशाखापट्टणम्‌ मधील एका शाळेत सामूहिकरित्या म्हटली गेली. त्यानंतर तिला अधिकृतरित्या राष्ट्रीय प्रतिज्ञेचा दर्जा देऊन सर्व शालेय पुस्तकांच्या सुरुवातीला छापण्यात येऊ लागले.

भारत माझा देश आहे।
सारे भारतीय माझे बांधव आहेत.
माझ्या देशावर माझे प्रेम आहे.
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्‍या माणसांचा मान ठेवीन,
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे.
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे. 

यातील ’सारे भारतीय माझे बांधव आहेत.’ या पहिल्या वाक्यामध्येच समतेचे तत्त्व अधोरेखित केले होते. पुढेही विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान आहे’ म्हणताना एकाच परंपरेचे श्रेष्ठत्व लादण्याचा प्रयत्न करणार नाही हे मान्य केले होते. देशाबरोबरच देशबांधवांशी निष्ठा राखण्याचे वचन दिले जात होते. वैय्यक्तिक कल्याण आणि समृद्धी ही देश नि देशबांधवांच्या समृद्धीशी जोडण्यात आली होती. एकुणात भ्रातृभाव, बांधिलकी हा देशबांधवांना जोडणारा धागा असेल असे यातून मान्य करण्यात आले होते. ’राष्ट्रीय एकात्मता’ ही संज्ञा तेव्हापासून परवलीची होऊन गेली होती. चित्रपटांतून, माहितीपटांतून इतकेच नव्हे तर जाहिरातींमधूनही या राष्ट्रीय एकात्मतेचा धागा ठळक करण्यात येत असे.

तो काळ तसा तंत्रज्ञानाच्या बाल्यावस्थेचा होता. १९५९ मध्ये सुरू झालेले ’दूरदर्शन’ हे सरकारी मालकीचे एकमेव चॅनेल बातम्या, मनोरंजन, माहिती याबरोबरच संस्काराचे, प्रबोधनाचेही कार्य करत असे. ज्याला बहुसंख्य लोक आजही केवळ मनोरंजनाचे साधन समजतात त्या चलच्चित्रांच्या (Animation) माध्यमाचा वापरही यासाठी करुन घेतला जात होता. दूरदर्शनवर भीमसैन यांनी तयार केलेल्या अनेकता में एकता (१९७४) (रिमास्टर्ड: https://www.youtube.com/watch?v=csI3yilRPcY) किंवा एकता का वृक्ष (१९७२) यासारखे चलच्चित्र लघुपट राष्ट्रीय एकात्मतेची संकल्पना सोप्या स्वरूपात रुजवू पाहात होते.

याशिवाय देशोदेशी तयार झालेले अशाच स्वरूपाचे प्रबोधनात्मक चलच्चित्रपटही स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करुन दाखवले जात. इतालियन-अमेरिकन लेखक नि चित्रकार लिओ लिओनी याने जगण्याशी निगडित अनेक संकल्पना समजावणारी अनेक सचित्र पुस्तके प्रकाशित केली होती. त्यातील फिश इज फिश, अ कलर ऑफ हिज ओन, इंच-बाय-इंच, लिटल ब्लू अ‍ॅंड लिटल यलो, गोष्टी जमवणार्‍या उंदराच्या गोष्टींतून शब्दांचे सामर्थ्य, कथनात्म साहित्याचे माणसाच्या आयुष्यातील स्थान अधोरखित करणारा  फ़्रेडरिक (त्याच्या कथेमध्ये उंदरांचा देव उंदीरच असतो ! ) ,  यांसारख्या काही पुस्तकांवरुन चलच्चित्रपटांची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील स्विम्मी (१९७१) हा एकतेचा संदेश देणारा लघुपट सर्वाधिक गाजला.

आज आपल्यापैकी किती जण माहितीपट अर्थात डॉक्युमेंटरीज पाहतात? त्यातूनही प्राणिजीवनावरील माहितीपट वगळले तर माहितीपट पाहणारे अक्षरश: मूठभर उरतील. 'फिल्म्स डिविजन इंडिया’ ही संस्था ’राष्ट्रीय एकात्मता’ या एकाच विषयावर नव्हे तर काही सामाजिक व आर्थिक संकल्पना सोप्या भाषेत समजावून देणारे अनेक चलच्चित्रपट, लघुपट, माहितीपट तयार करत असे. दूरदर्शनच्या एकाधिकारकाळात ते दूरदर्शनवरुन दाखवले जात (आज किती चॅनेल्स त्या दाखवतात?) तसंच चित्रपटगृहांमधून चित्रपट सुरू होण्यापूर्वी एक-दोन माहितीपट दाखवले जात असत. यात अनुबोधपटांचाही समावेश असे.

यात कुटुंबनियोजनाची गरज, पंचवार्षिक योजनेची गरज आणि माहिती देणारा ’अ ग्रेट प्रॉब्लेम’, कुटुंबनियोजनाबाबत प्रबोधन करण्यासाठी शासनाने चालवलेल्या ’लाल त्रिकोण अभियानाअंतर्गत अ‍ॅंगल ऑफ द ट्रॅंगल, अफवाविरोधी प्रबोधनासाठी गुब्बारा, दैनंदिन वाहतुकीच्या स्थितीबाबत इंडियन ट्रॅफिक, स्वच्छतेचा संदेश देणारा हायजीन: द वे ऑफ लाईफ़, स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देणारा मीना लाल त्रिकोण अभियानाप्रमाणे ’हम दो हमारे दो’ कॅपेनच्या प्रचारासाठी अँगल ऑफ द ट्रँगल, द क्रेडल (पाळणा) असे विविध अशा अनुबोधपट दूरदर्शनने तयार केले होते. यात जी. के. गोखले हे प्रमुख चलच्चित्रकार आणि भीमसैन (खुराना) हे निर्माते-दिग्दर्शक यांचा मोठा वाटा होता.

एकता का वृक्ष (१९७२) हा आणखी एक चलच्चित्रपट बराच लोकप्रिय झाला होता. या सार्‍यांमध्ये सामायिक मुद्दा होता तो बांधिलकीचा. विविधतेतून एकता, परस्पर-बांधिलकी हे राष्ट्रीय एकात्मता या संकल्पनेचे मूलाधार होते.

पुढे चलच्चित्रांचा हात सोडून प्रबोधन चित्रपटांकडे सरकले आणि मिले सुर मेरा तुम्हारा (१९८८) बजे सरगम हर तरफ से (१९८९) सौ रागिनियोंसे सजा (२०१३) असे अनुबोधपट निर्माण झाले. पण नीट पाहिले तर इथे बांधिलकीचा हात सुटून देवत्वस्वरूप देशाप्रती बांधिलकीच नव्हे, तर समर्पणभाव रुजवणे सुरू झाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेची जागा देशभक्तीने घेतली. आणि त्यातून प्रथम ’कोण अधिक देशभक्त’ची अहमहमिका सुरू झाली आणि ती ’कोण अधिक देशद्रोही’ पर्यंत येऊन पोहोचली. लहान मुलांच्या म्हटलेल्या चलच्चित्रांमध्ये असलेला सुज्ञभाव मोठ्यांकडे सूत्रे येताच नाहीसा झाला.

(क्रमश:)

---

१. सुप्रसिद्ध हिंदी कवी पं. विनयचंद्र मौद्गल्य यांच्या ’हिंद देश के निवासी’ या कवितेमधील पहिले कडवे 'एक, अनेक और एकता' या अनुबोधपटाच्या शेवटी समाविष्ट केले आहे.

        पुढील भाग >> राष्ट्रीय एकात्मता - २ : सारे भारतीय माझे बांधव आहेत


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा