शनिवार, ६ मे, २०२३

अ‍ॅलिस आणि आरसा

ही अॅलिस आहे.

-मग राणी एका झाडाला टेकून बसली, आणि आपुलकीने अॅलिसला म्हणाली, "आता तू थोडी विश्रांती घे." अॅलिसने आश्चर्याने भोवती पाहिले व ती म्हणाली, "म्हणजे आम्ही अजून त्याच झाडाखाली आहोत की !"

"होय तर! मग*, तुला काय हवे होते ?"

"आता आपण जेवढे धावलो, तेवढे जर आमच्या देशात धावलो, तर कुठून तरी निघून कुठे तरी निराळ्या ठिकाणी जाऊन पोहोचतो आम्ही." अॅलिस म्हणाली.

"मग तुझा देश अगदीच मद्दड असला पाहिजे. अगं, या ठिकाणी एकाच ठिकाणी राहायचे म्हणजे देखील अतिशय वेगाने धावत राहावे लागते."

माणसेः अरभाट आणि चिल्लर

ही अॅलिस आहे. ती एक लहान, चुणचुणीत स्वच्छ डोळ्यांनी पाहणारी मुलगी आहे. थपडा, चापट्या खाऊन ओल्या मातीला कसला तरी आकार येतो, तसला तिला अद्याप तरी आलेला नाही. तो तिला चुकणार नाही, पण सध्या तरी तो नाही हे खरे. अनेकदा ती विनयशील आहे. पण ती प्रसंगी सावध आणि स्पष्ट देखील आहे.

एकदा जेवायला बसल्यावर टेबलावर एका प्लेटमध्ये मटण आणून ठेवले जाते. तेव्हा राणी त्याची अॅलिसशी ओळख करून देते. मटण देखील प्लेटमधूनच किंचित वाकून तिला नमस्कार करते, आणि अॅलिस सुध्दा तसे करते. मग खाण्यासाठी एक तुकडा कापण्याचा तिचा विचार असतो, तर राणी रागाने म्हणते, "छट्, असे कधी होते की काय ? ज्याची ओळख करून दिली आहे त्याचा तुकडा कापणे हा का शिष्टाचार झाला ? वेटर, मटणाची प्लेट घेऊन जा."

मग पुडिंग येते. तेव्हा घाईघाईने अॅलिस राणीला म्हणते, "आता कृपा करून पुडिंगची ओळख मात्र करून देऊ नको. नाही तर मग पोटात काही सुध्दा जाणार नाही."

Let there be light and there was light, हे सामर्थ्य परमेश्वराचे. त्याखालोखाल सामर्थ्य कलावंताचे. त्याने कागदावर लेखणी टेकताच वादळ घोंगावू लागते, आणि व्याकुळ झालेला लियर माळरानावर भरकटू लागतो. सगळ्यांनी टाकलेला, सगळीकडून हाकलला गेलेला आंधळा इडिपस मृत्यू शोधत अथेन्समधील वनराईकडे चालू लागतो.

अॅलिसचे जग अगदी लहान, कोवळे आहे. पण त्या जगात मात्र ती तितकीच सामर्थ्यशाली आहे. "Let us pretend" म्हणताच तिला वाटेल ते शक्य होते. ती सरळ वर स्टँडवर चढून आरशातून पलीकडे जाऊ शकते. शिवाय काही वेळा तिची जीभ देखील तिखट होते. ती एकदा एका राणीला स्पष्ट सांगते, "मी मुळीच गप्प राहणार नाही. तुला विचारतेय कोण ? तुम्ही सगळीच जण पत्त्याच्या डावातील नुसती पाने आहात..." या तिच्या शब्दांनी मात्र तुटल्याप्रमाणे सगळेच वाऱ्यावर उडतात आणि खाली येऊन तिच्या अंगावर निर्जीव अवस्थेत पडू लागतात.

अॅलिस, तुझ्या बोलण्यात किती अर्थ भरून राहिला आहे, हे तुला नंतर कधी तरी कळून येईल. पण आता हे शब्द एका लहान कोवळ्या वृक्षातून आल्याप्रमाणे वाटतात. पत्त्यातील फक्त पाने... सम्राट व त्यांच्या राण्या, युगप्रवर्तक एक्के आणि दुऱ्या, तिऱ्या असली चिल्लर पाने... सगळीच वाऱ्यावर भरकटत खाली पडतात.

"आता ज्यूरींनी आपला निर्णय सांगावा." राजा म्हणाला. तसे म्हणण्याची त्याची ती विसावी खेप होती.

"छट्‌! असे कधी झालेय का ?" राणी म्हणाली, "ते काही नाही. आधी शिक्षा, मग न्याय- निर्णय!"

"हा काय आचरटपणा आहे ?" अॅलिस रागाने म्हणाली.

"ए, तू जीभ आवरून गप्प बस."

"मी मुळीच गप्प बसणार नाही." अॅलिस जोराने म्हणाली.

--आधी शिक्षा, नंतर निर्णय हे तुला चमत्कारिक वाटले, अॅलिस, कारण तू अजून कोवळी आहेस. आणखी थोड्या वर्षानी तुला तसे वाटणार नाही. आपल्या आयुष्यात तसल्याच गोष्टी अनेकदा घडतात. नंतर दूर कुठे तरी आपल्या सगळ्या कृत्यांचा, कर्माचा हिशेब होतो. निदान शहाणे तरी तसे सांगत असतात. पण त्याआधीच जगत असता आपली शिक्षा सुरू झालेली असते.

"हा काय आचरटपणा आहे ?" असे पुन्हा एकदा म्हण, अॅलिस. “Let us pretend” म्हणत तू आरशातील घरात सहज गेलीस. तुझ्या स्वच्छ, निर्लेप मनाला इकडची बाजू कोणती, आरशातील बाजू कोणती याची स्पष्ट जाणीव होती. माझे मात्र तसे नाही. काही वेळा खरे जग कोणते, आरशातले कोणते, हेच उमगत नाही. इकडे काही वेळा अशा घटना घडतात की आपण आरशात गेलो की काय, अशी शंका वाटते. तर काही वेळा जर कल्पनेने आरशात गेलो तर क्षणातच अगदी इथल्या जगातील घटनेप्रमाणे काही तरी कठोर विषारी घडते, तेथील तरल वातावरण नष्ट होते आणि पुन्हा मी ठिकाणी येऊन पडतो. अॅलिस, आमची खरी अडचण अशी आहे की, आम्ही इकडे नाही, व पूर्णपणे आरशात नाही; तर मध्येच काचेतच अस्ताव्यस्तपणे अडकून पडलो आहोत. त्यात आमचे आणखी हाल म्हणजे आमच्या बाबतीत एकच आरसा असत नाही. एका मोठ्या आरशासमोर दुसरा एक आरसा असतो. आरशामागील आरशांतील अनेक जगे, आमची अनेक चित्रे. मग त्यात खरी खोली कोणती, आरशातील कोणती, आरशातील कोणता मी खरा, हे काहीच कळत नाही, आणि मी भांबावून जातो.

काही समजतच नाही. काही समजतच नाही.

तू आरशात जाऊन पुन्हा परतलीस. ते कसे करावे, हे कुणी तरी तुला विचारून ठेवायला हवे होते. पण तरी देखील तुझ्या मनात एक शंका राहिलीच. हे सारे स्वप्न तुलाच पडले की तूच दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊन आलीस, याविषयी तुझ्या मनात संशय राहिला. तसला किती तरी जास्त धारदार संशय आम्हांलाही अनेकदा त्रस्त करतो. आम्हांलाच कसली तरी विषारी भयाण स्वप्ने पडत आहेत की आपणच वाट चुकून कुणाच्या तरी भीषण अर्थहीन स्वप्नात हिंडत आहोत, याविषयी भ्रांत वाटू लागते. आपण दुसऱ्यांच्या स्वप्नांत असतो काय, किंवा दुसरे येऊन आपल्याला छळत असतात काय ! म्हणजे एकंदरीने "Hell is other people" हेच खरे की काय ?

नदीकाठी गवतावर तू झोपली असता तुला पहिले स्वप्न पडले. म्हणून तू त्या ठिकाणी पुन्हा यावीस, तुला पुन्हा यापुढील स्वप्ने पडत जावीत. ती तू मला ऐकवावीस म्हणजे कदाचित आपल्या हाती काही तरी लागेल, मला काही तरी जास्त समजेल, असे मला फार वाटते, व त्या मोहाने मी त्या ठिकाणी थांबण्याचा विचार करतो. पण ही आशा अगदी फोल आहे, हे मला माहीत आहे. तुझा प्रवास इतरांप्रमाणे पुढेच असतो, व पुढे गेल्यावर तुला उलट मागे येता येणार नाही. फक्त भुते आणि आठवणी यांनाच उलटी पावले असतात. तू पुढे गेल्यावर आणखी एका अॅलिसला स्वप्ने पडतील, हे खरे आहे. पण तोपर्यंत थांबणे मला शक्य होणार नाही. एका जागी स्थिर राहायला किती वेगाने धावावे लागते हे तुला माहीत आहे. तेवढा वेग आता माझ्या पावलांना शक्य नाही.

असल्या बाबतीत कधी अखेरचा शब्द असू शकतो का ? असलाच तर तो कुणाचा असू शकेल ? योगेश्वराचा की भुशुंड काकराजाचा कृष्णशब्द ? की अॅलिसचा कोवळा, नवथर पण धीट निर्णय-- तुम्ही सारीच पत्त्यातील पाने आहात, आणि "मला तुमची कसलीच भीती वाटत नाही" हे शब्द ? काहीच समजत नाही. समजत नाही.

समजते ती एकच गोष्ट. अत्यंत विशाल असा अश्वत्थ वृक्ष गदागदा हलत आहे आणि दर क्षणाला त्यावरील पाने तुटून वाऱ्यावर भरकटत येऊन मातीत पडत आहेत. गडकरी यांच्या अंगणातील पिंपळाची मास्तरांनी आणलेली पाने उडालीच, पण खुद्द गडकरी गेले व दातार मास्तर देखील गेले. राम-लक्ष्मण, शिकंदर, व्यास, वाल्मीकी नाहीसे झाले, त्याप्रमाणेच दादा, आई, आजोबा ही पाने देखील गेली. टेक्सासमध्ये दूर कुठे तरी एक ओळखीचे पान आहे, पण ते देखील फार दिवस टिकणार नाही. माझा देखील कधी तरी अश्वत्थाशी असलेला संबंध तुटेल, आणि मातीच्या ओढीने मला खाली यावे लागेल.

अश्वत्थाची सळसळ अखंड चालूच असते, आणि भिरभिरणाऱ्या पानांचे तरंगत खाली येणे हे कधी थांबतच नाही. प्रत्येक पान खाली उतरताना कदाचित 'समजत नाही, समजत नाही असे म्हणत एक उच्छ्‌वास सोडत असेल. त्यांच्या उच्छ्‌वासामुळे वाऱ्याला सातत्य मिळते, त्याचा वेग जास्तच वाढतो व आणखी काही पाने खाली येतात व येताना म्हणतात, 'समजत नाही, समजत नाही, समजत नाही.'

की ’समजत नाही, समजत नाही’ हेच ते साऱ्याबाबतचे अखेरचे शब्द असतील ? ते देखील समजत नाही.

- oOo -

पुस्तक: माणसेः अरभाट आणि चिल्लर
लेखक: जी. ए. कुलकर्णी
प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
आवृत्ती पाचवी
वर्ष: मे २००७.
पृ. १३१-१३४.

 

* पुस्तकामध्ये इथे ’मग’ ऐवजी ’मला’ असा शब्द आहे, जो मला मुद्रणदोष आहे असे वाटते. तसेही एकुणात पुस्तकात मुद्रणदोष नि विरामचिन्हांचे घोटाळे बरेच दिसतात. स्वल्पविरामाचे अत्यंत चुकीचे वापर त्रासदायक वाटतात... अर्थात त्यांच्याकडे लक्ष गेले तर.
 


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा