सोमवार, ८ मे, २०२३

तहान

दुपारची डुलकी झाल्यावर, पुन्हा कोवळी पानं, भेंड, कळे, मोहाची दोडी फळं खात, उड्या हाणीत हळूहळू वानरांची टोळी पाण्याच्या दिशेनं सरकू लागली.

कडक उन्ह होतं. अशा उन्हात जिवाचं पाणी-पाणी होणं अगदी साहजिक होतं. पण पाण्यावर जाणं, ही या निर्मनुष्य अरण्यात फार जोखमीची गोष्ट होती. इथं पाण्याच्या आसपास आणि पाण्यात काळच दबा धरून बसला होता. पाणी हे जीवन होतं, तसंच मरणही होतं. म्हणून वानरं कधी मोठ्या जलाशयावर तहान भागविण्यासाठी जात नसत. ओढ्या-ओघळींच्या डबक्यातलं चुळकाभर पाणी त्यांना पुरेसं होई.

सत्तांतर

आता उष्णकाळ होता. जंगलातलं सगळीकडचं पाणी आटलेलं होतं. तळ्याच्या काठी जाऊन पाणी पिण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.

या झाडावरून त्या झाडावर उड्या टाकत, तळ्याकाठच्या एका उंच सागावर हळूहळू सगळी टोळी जमा झाली. हे झाड पाण्याच्या काठावर होतं. सुमारे साठ पावलांचं अंतर होतं आणि ते अंतर पार करून पाणी पिऊन, परत झाडावर येणं हीच गोष्ट फार जोखमीची होती. साग झाडीच्या कडेवर होता. मागे टेकडी होती आणि गर्द झाडं-झुडपं होती. या जाळकटात दबा धरून कोणीही हिंस्र पशू बसला असण्याची शक्यता होती.

मुडा आपल्या टोळीसह या झाडावर काही वेळ बसला. सर्वांनी आपल्या तीक्ष्ण नजरेनं आजूबाजूचं रान निरखून घेतलं. काही गडबड न करता सगळी टोळी गप्प अशी सागाच्या झाडावर काही वेळ बसून राहिली.

कोणतीही धारिष्ट्याची गोष्ट करताना आणीबाणीचे क्षण अगदी थोडे असतात आणि त्यांना सामोरं जाणं हीच खरी परीक्षा असते.

ही जोखीम घेण्याची जबाबदारी आता सर्व टोळीपैकी फक्त दोघांवर होती- तरणीवर आणि मुडावर. या दोघांपैकी कोणी पुढं झाल्याशिवाय, तहानेनं व्याकूळ झालेल्या वानरांपैकी कोणीही जागचं हलणार नव्हतं.

टोळीतील सर्व जाणती वानरं आता फार गंभीर दिसत होती. मुडा विशेष गंभीर होता. तरणीही विशेष गंभीर होती.

अखेर मुडानं धारिष्ट केलं. तो सरासरा झाडाचं खोड उतरून दाणादाण उड्या घेत उतार उतरला आणि सावधगिरी म्हणून पाण्यापासून पंधरा-वीस पावलं अंतरावर गवतात बसून राहिला.

सगळी वानरं स्तब्ध राहून बघत होती.

बाजूच्या झाडीतून झेपावत काळ आला, तर जिवाच्या करारानं, सगळं बळ एकवटून वाऱ्याच्या वेगानं सुसाट पाठीमागं पळणं आणि उतरला तो साग चपळाईनं पुन्हा चढणं एवढंच मुडाला करता येण्यासारखं होतं. पळण्यावाचून दुसरं कोणतंही संरक्षक हत्यार त्याच्यापाशी नव्हतं. त्याला तीक्ष्ण नख्या नव्हत्या, अक्राळविक्राळ जबडा नव्हता. पोलादी कवच नव्हतं. माथ्यावर जबरदस्त शिंगं नव्हती.

सावकाश असे काही ताणलेले क्षण गेले. काही वावगं घडलं नाही.

मग शेपूट वर करून पावलं टाकत मुडा पाण्याच्या अगदी काठाशी गेला. ओल्या काठाशी जाऊन बसला. त्यानं चौफेर बघून घेतलं. काही धोकादायक असं दिसलं नाही.

पण खरे आणीबाणीचे क्षण इथून पुढे होते. पाणी पिण्यासाठी दोन्ही हात जमिनीला टेकून मुडाला वाकावं लागणार होतं. तोंड लावून पाणी प्यावं लागणार होतं आणि एकवार तोंड पाण्याला लावल्यावर मागून कोण येत आहे, हे त्याला मुळीच समजणार नव्हतं. गंभीरपणानं पाण्यातल्या आपल्या प्रतिबिंबाकडे बघत मुडा बसून होता.

तरणीनं मग धारिष्ट्य केलं. ती सरासरा साग उतरून झेपावत थेट पाण्याकाठी आली आणि मुडाच्या पाठीशी हातभर अंतरावर बसून तिनं चौफेर नजर टाकली. मागून कोणी नकळत येणं फारच कठीण आहे, हे तिला माहीत होतं. कारण अजून सागाच्या झाडावर बसून राहिलेल्या टोळीनं तत्काळ चीत्कार करून तिला सावध केलं असतं.

मागं 'तरणी' आहे, हे बघताच दोन्ही हात गवतात ठेवून मुडा खाली वाकला आणि त्यानं पाण्याला तोंड लावलं.

तब्बल चार-पाच क्षण त्यानं पाण्याला लावलेलं तोंड वर उचललं नाही. मग तीन पोरं धिटावून खाली उतरली आणि मुडाच्या ओळीत पंगतीला बसावी, तशी पाण्याच्या काठी बसली.

आकंठ पाणी पिऊन होताच तत्काळ मुडा उडाला आणि या धोकेबाज पाण्याकाठी क्षणभरही न रेंगाळता सागाकडे धावला.

धीट पोरं मागं बसलेली बघून तरणीनं, मुडानं ज्या जागी पाण्याला तोंड लावलं होतं, त्याच जागी तोंड घातलं. तिचं पाणी पिऊन अजून संपलं नाही, तोवरच एक पोर पुढं होऊन ओणवं झालं. त्यानं पाण्याला तोंड लावलं. दोघं पोरं राखणदारासारखी मागं बसूनच होती.

अशा पद्धतीनं पाणी पिण्याचा हा विधी चांगला अर्धघटका चालू राहिला आणि निर्वेधपणानं पाणी पिऊन सगळी टोळी पुन्हा उड्या ठोकीत पांगली.

- oOo -

पुस्तक: सत्तांतर.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
आवृत्ती बारावी, पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ९-११.

(पहिली आवृत्ती: १९८२. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा