बुधवार, १७ मे, २०२३

वारसा आणि विचार

काहीतरी उत्तर द्यायला कमल सरसावत होती. पण तितक्यात मागून कुणीतरी तिला डिवचल्याचे जाणवले. तिनं मागे वळून पाहिले तेव्हां शिवनाथ म्हणाला, “आतां ही चर्चा राहू दे."

कमलनें विचारलें, "कां ?"

शिवनाथने नुसतें उत्तर दिलें, "असंच सहज !" एव्हढेच बोलून तो गप्प राहिला. त्याच्या बोलण्याकडे कुणी विशेष लक्ष दिले नाहीं. त्या उदास आणि विचुक नजरेच्या मागें कोणती गोष्ट छपून राहिली होती ती कुणाला कळली नाहीं कीं कुणी कळून घ्यायचा प्रयत्न केला नाहीं.

कमल म्हणाली, "अं: ! असंच सहज का ? घरी जायची घाई झालीय वाटतं ? पण घर तर बरोबरच आहे !" असे म्हणून ती हंसली.

आशुबाबू ओशाळले, हरेंद्र अक्षय गालांतल्या गालांत हंसले, मनोरमेनें दुसरीकडे नजर फिरवली, पण ज्याला उद्देशून हे उत्तर आलें होतें त्या शिवनाथच्या सुंदर चेहेर्‍यावरची एक रेषासुद्धां बदलली नाहीं- जसा कांहीं एक दगडी पुतळाच - कांही दिसत नाहीं की कांही ऐकू येत नाहीं.

शेषप्रश्न

हा विक्षेप अविनाशला असह्य झाला होता. तो म्हणाला, "माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या."

कमल म्हणाली, "पण माझ्या पतीची परवानगी नाहीं. त्यांची अवज्ञा करणं योग्य का ?" असे बोलून ती हंसूं लागली.

अविनाशलाही हसल्यावांचून राहवले नाहीं. तो म्हणाला, "या बाबतीत तो दोष व्हायचा नाहीं. आम्हां एव्हढ्या लोकांचा मिळून आग्रह आहे. तुम्हीं बोला. "

कमल म्हणाली, “आजचा दिवस धरून आशुबाबूंना मी केवळ दोनच वेळ पाहिलंय. पण एव्हढ्याच वेळांत मला त्यांचा फार लोभ वाटू लागलाय- " असें म्हणून शिवनाथकडे बोट करून ती म्हणाली, "यांनी कां मला दटावलं तें आतां कळलं मला."

स्वतः आशुबाबू तिचें निवारण करून म्हणाले, "पण माझ्या दृष्टीनं तुला संकोच बाळगायचं कांहींच कारण नाहीं. हा बुढ्ढा आशु वैद्य अगदीचं भोळा माणूस आहे बरं कमल. दोनच दिवसांच्या भेटीत तू कांहीतरी ठरवलंस, आणखी दोन दिवस पाहिलंस म्हणजे तुला कळून येईल, की त्याची भीती बाळगण्यासारखी दुसरी कोणतीच चूक नाहीं. अगदी खुशाल बोल. तूं बोलशील तें ऐकायला मला खरोखरच आनंद वाटेल."

कमल म्हणाली, "पण एवढ्यासाठीच तर त्यांनी मला दटावलं. आणि एव्हढ्याचसाठीं अविनाशबाबूच्या प्रश्नाला उत्तर देतांना मला कठिण जातंय. स्त्री-पुरुषांच्या प्रेमाच्या व्यवहाराला मी महत्त्व देत नाहीं, आदर्श म्हणून मानीत नाहीं, असं उत्तर देणं मला खटकतंय."

आता अक्षयने तोंड उघडले. त्याच्या प्रश्नांत थोडीशी खोंच होती. तो म्हणाला, "तुम्ही मानीत नाहीं हें संभवनीय आहे- पण मानतां काय ते तरी आम्हांला ऐकवाल ?"

कमलनें त्याच्याकडे पाहिले पण उत्तर दिलें तें त्याला नव्हतें. ती म्हणाली, "केव्हांतरी एकदां आशुबाबूंनीं आपल्या पत्नीवर प्रेम केलं होतं. आतां ती हयात नाही. आता तिला कांहीं देता येत नाही की तिच्याकडून काही मिळण्याचाही संभव नाहीं. तिला सुखी करता येत नाहीं कीं दुःखही देतां येत नाहीं. ती मुळीं नाहींच. प्रेमाचं स्थान कसलीसुद्धां खूण न ठेवता पुसून गेलंय- आहे काय ती केव्हांतरी एकदां प्रेम केल्याच्या घटनेची आठवण. माणूस नाहीं- नुसती आठवण आहे - ही आठवण मनांत सारखी घोळवीत ठेवायची, वर्तमानकाळापेक्षां भूतकालच चिरस्थायी असं समजून आयुष्य कंठायचं, या वृत्तींत कांहीं मोठासा आदर्श आहे असं मला मुळींच वाटत नाही."

कमलच्या तोंडच्या या शब्दांनी आशुबाबूंना पुन्हां धक्का बसला. ते म्हणाले, "कमल, पण आमच्या देशांतल्या विधवांना ही आठवण म्हणजेच काय तो जगायला आधार असतो. पति निवर्तला तरी त्याची नुसती आठवण उराशी कवटाळून ती आपल्या विधवाजीवनाची पवित्रता सांभाळीत असते. सांग- एव्हढं तरी तूं मानतेस का ?"

कमल म्हणाली, "नाही. नांव मोठं दिलं म्हणजे एकादी गोष्ट खरोखरच मोठी होते असं नाही. उलट मी असं म्हणते, या भावनेच्या सक्तीखाली या देशांतल्या विधवांना जबरदस्तीने वैधव्यांत राहायाला भाग पाडले आहे- आपणच सांगा, खोटया गोष्टींवर सत्याचा मुलामा देऊन लोक त्यांना फसवतात असंच नव्हे का? -आपण तसं म्हणाल तर मी नाकबूल करणार नाहीं."

अविनाश म्हणाला, “असंच जर चाललंय, माणूस जर त्यांची फसवणूकच करीत आला असेल, तर विधवेच्या ब्रह्मचर्यात- नको - राहू दे, ब्रह्मचर्याची गोष्ट नाहीं काढीत- पण विधवेच्या आमरण संयमशील जीवनांत अत्यंत पवित्रतेलाही काही महत्त्व द्यायचं नाहीं का?"

कमल हंसली आणि म्हणाली, "अविनाशबाबू, हा पाहा आणखी एक शब्दाचा मोह. 'संयम' हा शब्द वापरतांना आज कित्येक दिवस त्याचं महत्त्व वाढत वाढत एव्हढं अनावर होऊन गेलं आहे, की त्याच्या बाबतीत स्थलकाल, कारण अकारण कुणी पाहातच नाहीं. हा शब्द उच्चारला की माणसाची मान आपोआप त्यापुढं झुकते. पण अवस्थाविशेषानं हा शब्द म्हणजे एक फुसक्या आवाजापेक्षा जास्त नव्हे, असं कबूल करायला कुणा साधारण माणसाला भीती वाटत असली तरी मला वाटत नाहीं. मी त्या जातीतली नाहीं. पुष्कळ लोक कोणतीही एकादी गोष्ट पुष्कळ दिवसांपासून अशीच आहे म्हणून म्हणत असले तरी मी ती हिशेबांत घेत नाहीं. नवर्‍याची स्मृती हृदयाशी कवटाळून दिवस कंठणाऱ्या विधवेची स्वतःसिद्ध पवित्रतेची कल्पना ही खरोखरच पवित्र आहे असं कुणी मला सिद्ध करून दिलं नाहीं, तर ती पवित्रता कबूल करणही मला खटकेल.”

अविनाशला यावर उत्तर सुचेना. क्षणभर वेड्यासारखा पाहात राहिल्यावर तो म्हणाला, "काय बोलतेस हें ?"

अक्षय म्हणाला, "दोन आणि दोन म्हणजे चार होतात हें सुद्धां मला वाटतं आपल्याला सिद्ध करून दाखवलं नाहीं तर आपण कबूल करणार नाहीं?"

कमलनें याचें उत्तर दिलें नाहीं कीं ती रागावलीही नाही. नुसती हंसली.

आणखी एका व्यक्तीला राग आला नाहीं. ते म्हणजे आशुबाबू. खरें पाहिले तर कमलच्या भाषणाने सर्वांपेक्षां जास्त फटका बसला होता तो त्यांना.

अक्षय पुन्हां म्हणाला, "आपल्या या सार्‍या घाणेरड्या कल्पना आम्हां उच्चवर्णीयांत प्रचलित नाहींत. पूर्वीपासून आहेत त्याच समजुती तिथं कायम आहेत."

कमल तशीच हंसतमुखानें उत्तरली, "उच्चवर्णीयांत या समजुती कायम आहेत हें मलाही माहित आहे."

बराच वेळपर्यंत सारे उगीच बसले होते. त्यानंतर म्हणाले "आणखी एक प्रश्न तुला विचारतो कमल. पवित्रता अपवित्रतेसाठी नव्हे पण स्वभावतःच ज्याला यांतून कांहीं निष्पन्न होत नाहीं- उदाहरणार्थ माझ्यासारखा माणूस - मणीच्या स्वर्गस्थ आईच्या जागी दुसरी कुणी आणून बसवावी अशी कल्पना सुद्धा माझ्या मनात कधी आली नाहीं त्याचं काय ?"

कमल म्हणाली, "आपण म्हातारे झाला आहांत आशुबाबू.'

आशुबाबू म्हणाले, "आज म्हातारा झालोय हें मी कबूल करतो, पण त्यावेळी कांही म्हातारा नव्हतो- पण त्यावेळी सुद्धा मला असं वाटलं नाहीं कसं ?"

कमल म्हणाली, "त्यावेळीही तुम्ही असेच म्हातारे होता. देहानं नव्हे- मनानं. एकेक माणूसच असा असतो, की तो म्हातारं मन घेऊनच जन्माला येतो. त्या म्हातारपणाच्या पांघरुणाखाली त्याचं थकलेलं विकृत तारुण्य लाजेनं मान खाली पासून कायमचं झाकून राहिलेलं असतं. ते म्हातारं मन खूष होऊन म्हणतं, अहाहा ! हेंच तर उत्तम ! दंगा नाही, गडबड नाहीं-, शांति ती हीच - माणसाच्या जीवनाचं हेंच शेवटचं तत्त्वज्ञान ! किती प्रकारची किती विशेषणं देऊन तो तारीफ करीत असतो. त्या तारिफेच्या दमाक्यानं दोन्ही कान भरून जातात. पण ते त्याच्या जीवनाचं जयवाद्य नव्हे, आनंदाच्या विसर्जनाचं शोकगीत आहे ही गोष्ट त्याला कळत नाही"

प्रत्येकाला वाटत होते, की यावर एकादें सणसणीत उत्तर द्यावे- बायकांच्या जातीच्या तोंडचे तें उन्मत्त यौवनाचे निर्लज्ज स्तुतिस्तोत्र सर्वांच्या कानांत तापलेल्या रसासारखं जाळीत जात होते. पण उत्तर देण्याजोगे शब्द कुणालाच सुचेनात. यावेळी आशुबाबू शांतपणे म्हणाले, “म्हातार्‍या मनाची तुझी व्याख्या काय आहे कमल ? मला जे वाटतं त्याच्याशी ताडून पहायचंय मला, की ते बरोबर आहे की ते चूक आहे ?"

कमल म्हणाली, “मनाचं वार्धक्य मी त्यालाच म्हणते आशुबाबू की जे पुढे पहायला तयार असत नाही. ज्याचं थकलेलं, जर्जर झालेलं मन भविष्यकालच्या सार्‍या आशांवर तिलांजली देऊन केवळ गतकालच्या आधारावर जिवंत राहू पाहतं- पुढं कांहीं करायचं आहे, काहीं मिळवायचं आहे असा आग्रहच नसतो त्याचा. वर्तमानकाल त्याच्या लेखी नसतोच- त्याला तो अनावश्यक वाटतो- निरर्थक वाटतो. आलाच नाहींसा वाटतो. गतकाल म्हणजेच त्याचं सर्वस्व- त्याचा आनंद- त्याच्या वेदना. तेंच त्याचं मुद्दल. तें मोडून खाऊन त्यावर आयुष्याचे बाकीचे जे कांहीं दिवस असतील ते कसेबसे कंठायची इच्छा असते त्याची. आतां पाहा ना तुम्हींच आशुबाबू, जमतं आहे का हें तुमच्या अनुभवाशीं ?”

आशुबाबू, हंसले आणि म्हणाले, “एकदां केव्हांतरी ताडून पाहीन मी."

ही सारी चर्चा चाललेली असतांना अजितकुमार मात्र एक शब्दही बोलला नव्हता. नुसता टक लावून सारखा कमलच्या तोंडाकडे पहात राहिला होता. इतक्यांत त्याला काय वाटले कोण जाणे, मन आवरणें त्याला अशक्य झाले. तो एकदम बोलला, "माझा एक प्रश्न आहे- असं पहा मिसेस-"

कमल सरळ त्याच्याकडे पहात म्हणाली, "तें ’मिसेस' कशाला ? कमल म्हणून हांक मारा ना मला."

अजित शरमेनें गोरामोरा झाला आणि म्हणाला, "छे, छे. असं कधीं "झालंय ? अशी ही रीत- "

कमल म्हणाली, "अशी ही रीत कसली ? आईबापांनी माझं जें नांव ठेवलं आहे ते कुणीतरी हांक मारण्यासाठी. त्याचा मला कशाला राग यायला हवा ? एकदम मनोरमेच्या चेहर्‍याकडे पाहात ती म्हणाली, "आपलं नांव मनोरमा- मी तशीच हांक मारली तर राग येईल का आपल्याला ?" मनोरमा म्हणाली, "हो, येईल !" ती असें उत्तर देईल अशी कुणाचीच अपेक्षा नव्हती. आशुबाबू तर संकोचाने एवढेसे झाले.

कांहीं वाटलें नाहीं ते कमलला स्वत:ला. ती म्हणाली, "नांव म्हणजे तरी काय- नुसता एक शब्द. पुष्कळांतून एका माणसाला टिपून काढायचं एक साधन. पण संवयीमुळे तेंहि कित्येकांना खटकतं हें ही तितकंच खरं. ते या शब्दाला नाना प्रकारांनी सजवून ऐकण्याची इच्छा धरतात. राजे लोकांचीच गोष्ट घ्या-  त्यांच्या नांवाच्या मागंपुढं कांहींतरी निरर्थक शब्द जोडले जातात- एकदोन श्री जोडल्याशिवाय तो शब्द ते दुसर्‍याला उच्चारू देत नाहीत- नाहींतर त्यांचा अपमान होतो-" असे म्हणून ती हंसत सुटली आणि शिवनाथकडे बोट दाखवून म्हणाली, “-जसे हें. कधी म्हणून 'कमल' म्हटलं नाही यांनी. म्हणतात 'शिवानी' म्हणूनच हांक मारा की ! शब्दही लहान आहे- अन् कळेलही सर्वांना - निदान मला तरी कळेल."

एव्हढी उघड उघड सूचना मिळाल्यावरही अजित बोलला नाहीं कां हेंच कळेना. प्रश्न त्याच्या तोंडच्या तोंडींच राहिला.

त्यावेळी दिवस मावळला होता. मार्गशीर्षातल्या धुरकट आकाशांत मळकट चांदणे दिसून येत होते, तिकडे बापाचे लक्ष वेधून मनोरमा म्हणाली, "दंव पडायला सुरवात झालीय बाबा. आता पुरे. आता तरी उठा."

आशुबाबू म्हणाले, "हा उठलोच पहा पोरी."

अविनाश म्हणाला, "शिवानी नांव फार छान. शिवनाथ गुणी माणूस- त्यामुळे त्यानं नावही दिलंय तें मोठं गोड. स्वतःच्या नांवाशीं तें खिळवलंयही मोठ्या खुबीनं.”

आशुबाबू उसळून उठून म्हणाले, "हा शिवनाथ नव्हे रे अविनाश तो- वरचा !" असे म्हणून त्यांनी आकाशाकडे नजर फेकली आणि म्हटले, “जगाच्या आरंभापासूनचा तो म्हातारा 'भद्रेश्वर दीक्षित' चोहीं बाजूनं पारखून अशी जोडपी जुळवण्यासाठीं आहार निद्रा सुद्धां गमावून जागत बसलाय ! जीते रहो !"

तितक्यांत अक्षय एकदम सरळ होऊन बसला. दोनतीन वेळ मान हालवून, आपले पिचके डोळे शक्य तितके टवकारून म्हणाला, "ठीक आहे- मी आपल्याला एक प्रश्न विचारू का ?"

कमल म्हणाली, "कसला प्रश्न ?'

अक्षय म्हणाला, "आपण तसा कांहीं संकोच बाळगीत नाहीं म्हणून विचारतों ! 'शिवानी' हें नांव मोठं सुंदर आहे- पण शिवनाथबाबूंबरोबर खरोखरच आपलं लग्न झालंय का ?"

आशुबाबूचा चेहरा काळवंडून गेला. ते म्हणाले, "हें काय बोलतां अक्षयबाबू ?"

अविनाश उद्गारला, "तुला काय वेड लागलंय ?”

हरेंद्र म्हणाला, "ब्रूट !"

अक्षय म्हणाला, “तुम्हांला माहित आहे, मी उगीच खोटी भीडभाड घरीत नाहीं."

हरेंद्र म्हणाला, “खऱ्या खोट्या भिडेची चाड तुला नसेल, पण आम्हाला तर आहे !"

कमल मात्र नुसती हंसत होती. जशी कांहीं ही थट्टेची बाबच होती. ती म्हणाली, “एवढं रागवायला कशाला हवं हरेंद्रबाबू ? मी सांगतें अक्षयबाबू- मुळीच कांहीं झालं नाहीं असं नाहीं. लग्नविधीसारखं काहीतरी झालं होतं- जे पहायला आले होते ते मात्र हंसूं लागले. ते म्हणाले, 'हें लग्न म्हणजे लग्नच नव्हे,- ढोंग !' यांना विचारलं तेव्हां हें म्हणाले, की हें लग्न झाल शैवपद्धतीनं. मी म्हटलं, ठीक आहे. कांहींतरी झालं खरं ! शिवाबरोबरचं लग्न जर शैव पद्धतीनं झालं तर मग त्यांत कसला विचार करायचा ?"

तें ऐकून अविनाशला वाईट वाटले. तो म्हणाला, “आपल्या समाजांत आतां शैवविवाह रूड नाहीं. उद्या जर यांना वाटलं, की हें लग्न झालंच नाहीं असं म्हणावं, तर तुला कांहींच पुरावा करता यायचा नाही.'

शिवनाथकडे पाहून कमलनें विचारले, “काय हो, असं कांहीं करणार आहांत वाटतं केव्हातरी ?"

शिवनाथ तसाच उदासवाण्या गंभीर मुद्रेनें बसला होता. त्याने कांहींच उत्तर दिलें नाहीं. तें पाहून हंसण्याच्या मिषाने कपाळावर हात मारून कमल म्हणाली, "हाय रे नशिबा ! झालं नाहीं म्हणून नाकबूल करायला हें जातील, आणि झालं आहे म्हणून इतरांपुढं शाबित करायला मी जाणार आहे होय ? त्यापूर्वी गळ्याला फांस लावायला एकादी दोरीसुद्धां नाहीं का मिळायची ?"

अविनाश म्हणाला, "मिळेल बरं- पण आत्महत्या म्हणजे पाप.' कमल म्हणाली, “पाप कसलं डोंबलाचं ! पण तें व्हायचं नाही. मी आत्महत्या करायला निघेन असं ब्रह्मदेवालासुद्धां वाटायचं नाहीं."

आशुबाबू एकदम म्हणाले, "हें मात्र माणसासारखं बोललीस कमल."

अर्जदाराचा आव आणून कमल त्यांच्याकडे पाहून म्हणाली, "पाहा तर खरं- अविनाशबाबू कशी माझी अब्रू घेताहेत !-" शिवनाथचा निर्देश करून ती म्हणाली "हें जातील मला झिडकारायला, आणि मी काय जाणार आहे माझा स्वीकार करा म्हणून यांच्या गळी पडायला ? सत्य गेलं चुलींत- अन् जे कसलाच विधि मानीत नाहींत त्यांना दोरीनं बांधून ठेवू का मी? मी का करायला जाणार आहे असं कांहीं ?" बोलता बोलतां तिच्या डोळ्यांतून ठिणग्या उडूं लागल्या.

आशुबाबू शांतपणे म्हणाले, "शिवानी, या जगांत सत्यापेक्षां दुसरं कांहीं मोठं नाहीं हें आपणां सर्वांनाच पटतं, पण लग्नविधी म्हणजे कांहीं खोटा नव्हे !"

कमल म्हणाली, “मी कुठं खोटा म्हणतेय ? प्राण जसा सत्य तसाच देहही सत्य- पण प्राण जेव्हां निघून जातो तेव्हां ?"

बापाचा हात धरून ओढीत मनोरमा म्हणाली, "फार दंव पडतंय बाबा. जातां उठलंच पाहिजे. "

"हा उठलोंच ग !"

शिवनाथ एकदम उठून उभा राहून म्हणाला, "चल शिवानी, आतां पुरे झालं. चल."

- oOo -

१. मणी: मनोरमेचे हाक मारण्याचे नाव.

२. गोविंद बल्लाळ देवल यांनी ’जरठ-बाला विवाह’ या विषयावर लिहिलेल्या 'संगीत शारदा' या नाटकातील लग्ने जुळवणारा मध्यस्थ. हा उल्लेख शरच्चंद्रांच्या कादंबरीत अर्थातच नाही. हा वरेरकरांनी जोडलेला मराठी संदर्भ आहे.

पुस्तक: शेषप्रश्न
लेखक: शरच्चंद्र चॅटर्जी (अनुवाद: भा. वि. वरेरकर)
आवृत्ती: तिसरी
प्रकाशक: नवभारत प्रकाशन संस्था
जुलै १९८०.
पृ. ६१-६९.


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा