रविवार, २८ जानेवारी, २०२४

चिमण्या - ३ : निरोप

<< या सदराच्या निमित्ताने...
<< मागील भाग: चिमण्या - २ : दुरावा
---

गेल्या एप्रिलमध्ये मी माझ्या पुण्याच्या घरात आजारी पडलो. पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे मला अनेक दिवस कॉटवर पडून राहावे लागले. पायाच्या पायी मी सर्व बाजूंनी लंगडा झालो. या काळात मला चालता येत नव्हते. झोप लागत नव्हती. दिवसभर वेदना सोशीत मी अंथरुणावर पडून असे.

या वर्षी उन्हाळा फार होता. झोपायच्या खोलीतून मी माझे अंथरूण लिहायच्या खोलीत आणले होते. दारातील मनरंजनीच्या वेलाची फुलांनी डवरलेली तांबडीलाल डहाळी बघत, बहरलेल्या मोगऱ्याचा सुवास हुंगीत मी कॉटवर पडलो असताना एके दिवशी माझ्या घरात चिमण्यांची पाच-सहा जोडपी शिरली आणि सगळे घर धुंडू लागली. त्यांच्या दंग्याने घर भरून गेले!

मला मोठा आनंद झाला! कितीतरी दिवसांनी ही मंडळी पुन्हा माझ्याकडे आली होती. पण हे घर काही आमच्या जुन्या घराप्रमाणे चिमण्यांना सोयीस्कर नव्हते. येथे तुळया, खांडे नव्हती. कलचा नव्हत्या. दगडमातीच्या भिंती नव्हत्या. चिमण्यांनी जागा कुठे पसंत करावी आणि घर कुठे बांधावे ? भिंतीवर टांगलेल्या तसबिरीच्या मागे राहणे त्यांनी पसंत केले असते, पण माझ्या घरात फार मोठ्या तसबिरी नव्हत्या आणि भिंतीची उंचीही अगदी मामुली होती. विजेचे दिवे भितीला लागून असत, तर त्याच्या थरडीमागे त्यांनी इमला बांधला असता, पण इथे सगळे दिवे अधांतरी लोंबते होते. अंथरुणावर पडल्या-पडल्या मी चिमण्यांना सोयीस्कर अशी जागा बघितली, पण कुठेही जागा म्हणून नव्हती. भाडेकरूंच्याच नव्हे, तर चिमण्यांच्याही दृष्टीने आपले राहते घर फार गैरसोयीचे आहे, फार दिवसांनी आलेल्या चिमण्या निराश होऊन परत जातील, असे मला वाटू लागले.

दोन-तीन दिवस चिमण्यांनी सगळ्या घराची कसून तपासणी केली. घर बांधण्यालायक इथे प्लॉट नाही, अशी खात्री झाल्यावर त्या निघून गेल्या. खिडकीतून होणाऱ्या त्यांच्या भराऱ्या थांबल्या. बडबड ऐकू येईनाशी झाली. माझे अडीच खोल्यांचे घर पुन्हा ओके ओके वाटू लागले.

चार दिवस गेले. माझ्या उशाशी, डाव्या बाजूला भिंतीत कपाट होते. आणि उशाला तर खिडकी होती. भिंतीतील कपाट पुस्तकांनी भरलेले होते. कपाटावर अर्धवर्तुळाकार कोनाडा होता. त्यात मी माझा चित्रकलेचा लाकडी फळा ठेवलेला होता. एका चिमण्याच्या जोडप्याने कलेच्या आश्रयाने राहायचे ठरवले आणि भराभर बांधकाम सुरू झाले. अंथरुणावर पडल्या पडल्या एका अंगावर होऊन, मी हे बांधकाम पाहत होतो. ऐन उन्हातान्हात नवराबायको राबत होती. चोचीतून काड्यादोरे घेऊन येत होती, फळ्याखाली शिरत होती. बाराएकचा सुमार झाला की, माझ्या उशाच्या खिडकीत बसून ती दोघेही अंमळ विसावा घेत. हळू आवाजात पुढचे बेत बोलत. मधूनच चिमणा उडून जाई. एखादी काडी घेऊन येई. उन्ह इतकं होतं की, कधी-कधी ती दोन्हीही पाखरे आपल्या चिमण्या चोची उघडून धापा टाकीत गप बसून राहत. पण त्यांच्या कामात खंड पडला नाही. बांधकाम अर्धवट राहिले नाही.

रानमेवा

फळ्याआडचे बांधकाम केव्हा पुरे झाले ते मला कळले नाही. पण चिमण्यांच्या चोचीतून काड्या दिसेनात. चिमणा एकटाच असा खिडकीत बसू लागला तेव्हा मी ओळखले की, घर पुरे झाले आहे, आणि मी जसा बाबीच्या वेळेला प्रसूतीगृहाच्या व्हरांड्यात बापुडवाणा होऊन उभा होतो, तसा हा चिमणा आपल्या घराबाहेर उभा होता. आणखी काही दिवस गेले आणि एके दिवशी सकाळी उठल्या उठल्या माझ्या कानांवर नाजूक चिवचिव आली. चिमणीची सुटका झाली होती. बाळ-बाळंतीण सुखरूप होती. मग चिमणा एकटाच बाहेर काम करू लागला, बाळांना आणि बाळाच्या आईला खायला घेऊन येऊ लागला. पुढे बाळंतीणही हळूहळू घराबाहेर पडू लागली. पण बाळाच्या वडिलांप्रमाणे ती फार उशीरपर्यंत बाहेर राहत नसे. वरचेवर घराच्या दाराशी बसून, ती मुलांना हाका मारी–

“बाळांनो झोपला का रे? बाळांनो भूक लागली का रे?”

आईची हाक येताच मुले आतून ‘आई... आई’ करून ओरडत. त्यांचे ओरडणे कानी आल्यावर आईचे भित्रे मन निवांत होई. मग आत शिरून पोरांच्या वेढ्यात गुंतून न राहता, ती किडामुंगी टिपण्यासाठी पुन्हा बाहेर पडे. मुलांचा आवाज बंद होई.

मी वाट पाहत होतो. आता लवकरच मुले बाहेर पडतील, माझ्या एवढ्याशा घरात त्यांचे हिंडणे-फिरणे सुरू होईल. बाळांचे आईबाप त्यांना उडण्याचे धडे देतील. मुले घाबरून रडतील. मग आई म्हणेल–

“रडायचं नाही राजा, शहाणा ना तू, हं उचल पंख. हे बघ अस्से उचलायचे. उचललेस, आता हलव असे.”

“मला भीती वाटते.”

आई इतका सोशिकपणा आणि माया नसलेला बाप थोडा रागवेल आणि मुलांना दरडावील, “भीती कशाची वाटते? फाजील कुठला ! लोकांची मुलं बघ कशी भराभर उडतात. भागुबाई, म्हणे मला भीती वाटते!”

मग आई म्हणेल, “दटावू नका हो त्याला. दटावण्यानं जास्तच घाबरेल तो. हलव राजा पंख.”

“मी नाही जा. मला भीती वाटते.”

बाप आणखी रागावेल. “काही लाड नकोत. पडलास म्हणून काही पाय मोडत नाही. लागेल थोडेसे. कांगावा कशाला करतोस उगीच ?”

मग मुलगा उडेल आणि धडपडून पडेल. त्याचे अंग भितीवर आपटेल. मग आईबाप त्याला पोटाशी धरून समजावतील.

पडे-झडे माल वाढे! पडत-झडतच ही मुले उडायला शिकतील आणि मी जसा पुण्याला आलोय तशा कुठे तरी जातील. आपल्या आईबापांना बोटभर चिठ्ठी पाठवायची आठवणदेखील त्यांना कधी होणार नाही.

मी असे भविष्य रंगवीत होतो, पण झाले वेगळेच. मुले मोठी होऊन घराबाहेर पडायच्या आतच तो नाजूक आवाज एके दिवशी बंद झाला. चिमणा चिमणी दाणा घेऊन येईनात. रिकाम्या चोचीने घरट्याबाहेर बसून, चिमणी ओरडू लागली आणि चिमणा खिडकीत उगीच बसू लागला. मला काही कळेना. मी बायकोला म्हणालो, “विमल, चिमण्यांची पोरं ओरडेनात का ग?"

घरकामातून सवड मिळेल तशी विमल माझ्यापाशी बसत होती आणि चिमण्यांचे कुशल माझ्याकडून ऐकत होती. ती पोरे आणि ते नवराबायकोचे जोडपे हे कुटुंब तिच्याही चांगल्या परिचयाचे झाले होते. बाबीने पिले पाहण्याचा हट्ट धरला, तेव्हा तिला खांद्यावर उचलून तिने चिमणीचे घर दाखवले होते. पिले दिसली नाहीत. पण माझ्या मनगटी घड्याळाची टिकऽ टिकऽ कान लावून ऐकावी, तसे चिमण्यांच्या मुलांचे बारीक चिवचिवणे बाबीने कान देऊन ऐकले होते.

ती पोरे ओरडत नाहीत म्हणताच विमल म्हणाली, “ऊन फार आहे हो. झोपली असतील गप.”

“छे; गं, आज सबंध दिवसात मी त्यांचा आवाज ऐकला नाही. बघ तरी.”

विमल पायाशी स्टूल घेऊन वर चढली. वाकून पाहिले तरी चिमण्यांचे घर दिसेना. मी कॉटवर उठून बसून विचारीत होतो, “दिसतात का गं? आहेत?” लांबून पाहून दिसेना, तेव्हा विमलने हलक्या हाताने फळा उचलला आणि एकदम दचकून ती ओरडली, “अगं आई गं!”

“का गं, काय झालं? नाहीत पिलं?”

“आहे, ओंजळभर लाल मुंग्या लागल्यात इथं. मुंग्यांनी खाल्ली की हो बिचारी पोरं!”

मी गप्प झालो.

- oOo -

पुस्तक: रानमेवा.
लेखक: व्यंकटेश माडगूळकर.
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस.
आवृत्ती दुसरी, चवथे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०२२.
पृ. ४१-४४.

(पहिली आवृत्ती: २०१०. अन्य प्रकाशन)


संबंधित लेखन

२ टिप्पण्या:

  1. मुळातच हे इतकं दुःख आहे, तरी ते बोचतं जास्त कारण दुःखाला सजावट केली नाहीये.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आमच्या लहानपणी मांजरांनी पकडलेली चिमण्यांची पिले पाहून विदीर्ण झालेले मन आठवते. मांजरांच्या मागे लागले तर ती एकतर चपळ असतात, आपल्या तावडीत सापडत नाहीत आणि त्यांच्या तोंडातील शिकार सहजी सोडत नाहीत. त्यामुळॆ बहुतेक वेळा आम्ही हताश होऊन पाहण्यापलिकडे काही करु शकत नव्हतो. पाळलेली, पोटभर आयते खायला मिळणारी मांजरे अशी का वागतात असा प्रश्न त्या बालवयात पडायचा.

      हटवा