शुक्रवार, ३१ मे, २०२४

आद्य मराठी-सारस्वतांचा निघंटु

गाळीव इतिहास

मुकुंदराज

गेल्या प्रकरणात आपण महाराष्ट्र आणि मराठी हे शब्द कसे आले ते पाहण्याचा प्रयत्न करून तो नाद सोडला. आता माणसे निमूटपणे बोलावयाचे सोडून लिहावयाला कशी लागली आणि त्यांच्यामागे असा कुठल्या संपादकाचा अगर प्रकाशकाचा तगादा लागला होता हे पाहावयाचे आहे.

मुकुंदराजाचा 'विवेकसिंधु' हा पहिला मराठी ग्रंथ म्हणतात. पण ते चूक आहे. आता मुकुंदराज हा आद्य लेखक कसा? शक्यच नाही. उद्या वाटेल तो स्वतःला आद्य म्हणेल. शिवाय हाताशी पाचपन्नास ग्रंथ असल्याशिवाय एवढा मोठा ग्रंथ होणे शक्य नाही. महाराष्ट्रात आधी खूप ग्रंथरचना होती. किंबहुना, आधी सगळे कोश, संदर्भग्रंथ वगैरे तयार करूनच दंडकारण्यातल्या राक्षस, यक्ष, वगैरे लोकांना मराठी शिकविले. काही दिवस मराठी ही त्यांची सेकंड लँग्वेज होती. राक्षसी, यक्षी वगैरे भाषा चालू होत्या. त्यांना प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच देत.

राक्षसी भाषेच्या पहिलीच्या पुस्तकात धडा होता :

Raakshasi Bhaashaa
मूळ पुस्तकातून साभार.

काका उठा
जबडा उघडा
हा रामा आला
त्याचा फडशा पाडा.

फडशा, जबडा, टांग, नरडे, गटागटा हे शब्द मराठीत राक्षसी भाषेतूनच आले. त्याशिवाय मग पैशाची भाषा सुरू झाल्यावर मोबदला, मानधन, अनुदान, पारितोषिके, परीक्षक, प्रश्नपत्रिका वगैरे शब्दांची भर पडली. त्या त्या अनुषंगाने संतापनिदर्शक शब्दांचीही भर पडली. वशिला, वजन, सरकारदरबार, गटबाजी, इ० इ०.

सगळीकडे मराठीच मराठी

एकदा सगळे कोश तयार झाल्यावर मग सगळीकडे मराठीच मराठी झाले. आणि एकदा इतके मराठी शब्द साचल्यावर ते मोकळे करणे प्राप्तच होते, म्हणून ग्रंथरचनेला सुरुवात झाली. काही दिवस सगळेच ग्रंथरचना करण्यात गढल्यामुळे घोटाळे होऊ लागले. म्हणून मग प्रत्येकाला निरनिराळी कामे नेमून दिली. ब्राह्मण, सोनार, न्हावी, कासार, लोहार, साळी, कोष्टी, शिंपी, सुतार वगैरे एकदा मराठीत तयार केले आणि मग त्यांना त्यांच्या त्यांच्या कामाला जुंपले. पूर्वी शिंप्याकडे बाराबंदी शिवावयाला कुणी टाकत नसे. कारण 'बाराबंदी' हा शब्द मराठीत नव्हता. एकदा वस्त्रकोश तयार झाल्याबरोबर शिंपी भराभर शिवू लागले.(३) ब्राह्मण वगळले तर बाकीच्यांच्या मराठीची उत्तम सोय झाली. पण ब्राह्मण मात्र संस्कृतचे पंडित. त्यामुळे त्यांची मराठी संस्कृतभ्रष्ट किंवा धेडगुजरीसारखी 'धेडगीर्वाणी' असावयाची. इतरांचे प्यूअर मराठी असल्यामुळे त्यांच्यातले व्यवहार व्यवस्थित झाले. ब्राह्मणांचे वांधे आले. त्यांचे ते अधूनमधून मराठी घातलेले संस्कृत कुणाला बोललेले कळेना.

Kshaur Re Naapitaa
मूळ पुस्तकातून साभार.

एलिचपूरच्या एका पोथीत एक ब्राह्मण-नापित संवाद आहे :

ब्राह्मण : नापिता, क्षौर करावें एवं ईप्सा. (अपभ्रष्ट मराठी.)
नापित : काय म्हन्तोस रे बामना? तिच्यामारी. (४)
ब्राह्मण : (अभिनयें वर्तवीत) क्षौर रे नापिता.
नापित : हात्त्याच्या! डुई करायची म्हना की भटजीबावा! च्या**... सरळ बोलायला काय हुतं रे *ड**... (पुढचे शब्द आपल्याला लागत नाहीत; पण ब्राह्मणाला लागल्याशिवाय राहिले नसतील!)

वरील उदाहरणावरून स्पष्ट होईल की, मराठीच्या अज्ञानामुळे ब्राह्मण लोकांना गावगाड्यातल्या इतरांशी व्यवहार अवघड झाला. गावात गप्पा माराव्या म्हटले तर तीच तीच भटजी मंडळी. एका भूर्जपत्रावर पाचव्या शतकातल्या धोंडुभट्ट नामक ब्राह्मणाने स्पष्ट लिहिले आहे : “कस्मद्संगें वार्तालापावें इति अस्मद्...” पुढील अक्षरे अस्पष्ट झाली आहेत. तात्पर्य, बोलावयाला कोणी नाही, म्हणून ब्राह्मणांनी लिहावयाला सुरुवात केली आणि ह्यातून संस्कृत अपभ्रष्ट ग्रांथिक मराठी आणि चारचौघांची शुद्ध मराठी असे भेद पडले. इतर नुसते बोलत, त्यामुळे त्यांना वाचावयाची गरज नव्हती. हे लिहीत, त्यामुळे वाचावयाला शिकले. परिणामी लेखन-वाचन हे ब्राह्मणांकडे राहून इतर सर्व महत्त्वाची कामे इतरांकडे गेली. इतर शेती पिकवीत असताना ब्राह्मण शब्द पिकवीत होते. ते गवताचे भारे रचीत, हे कवितांचे भारे रचीत होते. त्यांतील बहुतेक ग्रंथ लिहिल्याचेच पुरावे आहेत, वाचल्याचे नाहीत. पण साहित्याच्या इतिहासात त्यांची नावे घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. नामस्मरणाचे आपल्या संस्कृतीत फार माहात्म्य आहे.

विवेकसिंधु

मुकुंदराजाचा ‘विवेकसिंधु’ हा ग्रंथ काहीसा विवेकासंबंधी आहे आणि थोडासा सिंधूसंबंधी आहे. मुकुंदराजाला संस्कृत कळत असले तरी त्याच्या शारंगधर राजाची सेकंड लँग्वेज पाली किंवा अर्धमागधी असल्यामुळे हा ग्रंथ मराठीत लिहिला गेला. नाहीतर शारंगधर राजाच्या समाजकल्याण खात्याने तो बक्षीसपात्र ठरवला नसता. अर्थात मुकुंदराजाला त्याची पर्वा नव्हती. तसा तो विवेकी असल्यामुळे जयंतपाळ नावाच्या व्यापाऱ्याकडून त्याने आधीच रिसर्च-ग्रांट मिळवली होती. मुकुंदराजाने स्वच्छ लिहिले आहे, जयंतपाळाने पाळलेला मी लेखक आहे : “नृसिंहाचा बल्लाळू । तेयाचा कुमरू जयंतपाळू । तेणें करविला हो रोळू । ग्रंथरचनेचा ॥” त्या काळातले लेखक आपल्याला ग्रंथ लिहावयाला कोणे पैसे दिले हे स्पष्ट सांगत असत. हल्ली आपल्याला कोण पाळतो ते सांगत नाहीत. तेही एक बरेच. तात्पर्य काय, आश्रय हवा. मुकुंदराजाची एक समाधी जोगाईच्या आंब्यास दाखवितात आणि आणखी एक समाधी नागपूर प्रांतात बैतूलजवळ खेडले ह्या गावी दाखवितात. आपण दोन्हीही पाहाव्या. (दुसऱ्याच्या खर्चाने जमल्यास उत्तम.) त्यानंतर (म्हणजे ‘विवेकसिंधु’ लिहिल्यानंतर; दोन समाध्या घेतल्यानंतर नव्हे.) मुकुंदराजाने ‘परमामृत’, ‘पवनविजय’ आणि ‘मूलस्तंभ’ हे ग्रंथ लिहिले, असे काही विद्वानांचे मत आहे; आणि हे ग्रंथ त्याने लिहिले नाहीत असे इतर काही विद्वानांचे मत' आहे.

हेमाडपंत

मुकुंदराजानंतर हेमाडपंत नावाचा ग्रंथकार झाला. ह्या गृहस्थाला ग्रंथ लिहावयाला वेळ केव्हा मिळत असे कळत नाही. देवगिरीच्या शासकीय राजस्व मंत्रणालयात तो नोकरीला होता व चढत चढत ‘श्रीकरणाधिप’ म्हणजे राजस्वप्रसचिव किंवा सर्वसाधारण लोक ज्याला चीफ रेव्हेन्यू सेक्रेटरी म्हणतात त्या हुद्द्यावर होता. ह्या गृहस्थाने मोडी शोधून काढून महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्यांतल्या पोरांच्या आणि इतिहासंशोधकांच्या शिव्या खाल्ल्या आहेत. एकदा मोडी गिरवावयाचे खर्डे काढकाढून पाठीच्या कण्याला आणि मांडीला रग लागल्यामुळे वैतागून परतणाऱ्या शाळेतल्या पोरांनी सचिवालयावर मोर्चा नेला आणि “मोडी मोडो, मोडी मोडो”, “हेमाडपंत खर्डाबाद, हेमाडपंत खर्डाबाद” अशा घोषणा दिल्या. हेमाडपंताला उपरती झाली. काम सुचेना. समोर फायलींवर फायली साचू लागल्या. त्यावरून त्याला कल्पना सुचली आणि दगडावर दगड रचून तो देवळे बांधीत सुटला. त्यांना हेमाडपंती देवळे म्हणतात. मोडी लिपीला ‘पिशाच्च लिपी’ म्हणत असत ते उगीच नाही. लिहावयास सोपे व वाचावयास अत्यंत तापदायक असे हे मोडी लेखन शाळाखात्याने बंद केले. स्वातंत्र्यानंतर सुखाची एवढीच एक झुळूक अंगावरून गेली. आता फक्त लिहावयाला सोपे आणि वाचावयाला मोडीसारखाच वैताग आणणारे म्हणजे वैताग-काव्य आणि सौंदर्यशास्त्रावरचे लेख. मोडी ही आधुनिक दुर्बोधतेची सख्खी आई नसली तरी खापरपणजी खास आहे!

त्या वेळी महाराष्ट्राची राजस्थानी देवगिरी ही होती. देवगिरीला कागदांचे व शाईचे कारखाने होते. काळ्या शाईला मषी म्हणत. हा म्हशीचा अपभ्रंश आहे. कागद व शाई स्वस्त असल्यामुळे तेथे घरोघरी ग्रंथलेखन होऊ लागले. साहित्यिकांना अनुदाने देता देता रामदेवराव यादव टेकीला आला व लवकरच राज्य बुडाले. तलवारी टाकून लेखण्या धरल्या की असे होते. “रामदेवरावाची राज्यसभा मराठी ग्रंथकारांनी गजबजलेली असे,” असे महाराष्ट्र सारस्वतकार भावे यांनी लिहिले आहे. चालू राज्यकर्त्यांनी या परिस्थितीची दखल घेऊन, साहित्यिकांची बक्षिसे बंद केली आहेत, ती रूढी चालू ठेवावी. रामदेवराव यांनी साहित्यिकांचे जे फाजील लाड केले त्यामुळे साहित्यिक चढले आणि देवगिरी पडली. रामदेवराव मेले आणि अनेक पंत चढले. मेलेल्याला मारण्यात काही अर्थ नाही म्हणून हे प्रकरण आम्ही इथेच मिटवीत आहो.

---

लेखकाच्या टीपा:

(१). लेखकाला मोबदला काय मिळत होता ह्याविषयी कुठेही शिलालेख अगर भूर्जपत्र वगैरेचा काहीमात्र पुरावा नाही. कुठल्याशा शाहिराला दरबारात काव्यगायन केल्याबद्दल म्हणे शिवाजीमहाराजांनी सोन्याचा तोडा दिला होता. काव्यगायनवाले पहिल्यापासून वस्ताद. पैशाशिवाय तोंड नाय उघडायचे!

(२). बरोबर आहे म्हटले की प्रकरण अर्ध्या पानात खलास. पैसे पानावर ठरले आहेत. प्रिय कंपोझिटर, हे वाक्य जुळवताना शब्दांची आलटापालट करावी, म्हणजे अर्थ फक्त आमच्या जातवाल्यांक तितको कळतलो– समजलां मां? थ्याँक्यु.

(३). हल्ली मराठी कोश नसल्यामुळे प्रगती साफ खुंटली आहे, एकदाचा तो विश्वकोश झाला की आपण नवे विश्व उभारू शकू.

(४). हे यादवकालीन शुद्ध मराठी आहे.

(५). परीक्षेच्या पेपरात ह्यांपैकी कुठलेही मत लिहिले तरी तपासणारे विद्वान ज्या मताचे निघतील त्यावर काय ते मार्क पडणार. म्हणून उत्तराच्या सुरवातीला मुकुंदराजाने हे ग्रंथ लिहिले आहेत असे लिहावे आणि शेवटल्या परिच्छेदात लिहिले नाहीत असे लिहावे.

(६). पूर्वी म्हशीचासुद्धा अपभ्रंश करीत. हल्ली फक्त दिलीप चित्रे इंग्लिश वाङ्‌मयाचा करतात.

- oOo-

पुस्तक: मराठी वाङ्‌मयाचा गाळीव इतिहास
लेखक: पु. ल. देशपांडे.
प्रकाशक: मौज प्रकाशन गृह.
आवृत्ती पहिली, चौदावे पुनर्मुद्रण.
वर्ष: २०१६.
१०-१५.

---

लेखाचे मूळ शीर्षक: ग्रंथकर्तृत्वाची सुरुवात


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा