गुरुवार, २७ मार्च, २०२५

उठाव

  • स्वातंत्र्य आले घरा

    ते थोडे चालले असतील नसतील, तोच त्यांच्या मागे जलद पावलांचा आवाज ऐकू आला. हेन्नरने मागे वळून पाहिले. चांदण्यांच्या प्रकाशात एका स्त्रीची आकृती आपल्याकडेच वेगाने येत असलेली हेन्नरला दिसली. तिने लांब झगा घालून डोक्यावरून झाकून घेतले होते. तिला एकटीलाच पाहून त्याला फार आश्चर्य वाटले.

    “मला भेटायचं आहे तुम्हाला, लेफ्टनंट,” तिने हलक्या आवाजात म्हटले, पण यूनीला पाहताच ती थबकली.

    “सार्जंट, तू छावणीत जा परत.” हेन्नरने यूनीला पाठवून दिले. मान हलवीत यूनी चालू लागला. “हल्ली ससेच उलट कुत्र्यांच्या मागे लागू लागले आहेत ! दिवसच बदलून गेले अगदी!” जाता जाता त्याने बोलभाषेत काढलेले उद्‌गार हेन्नरच्या कानांवर पडले.

    “मला ते सांगितल्यावाचून राहवेना, लेफ्टनंट,” यूनी गेल्यावर ती म्हणाली, “जर तुम्ही ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी गेलात, तर तुम्ही आणि तुमचे पेन्सिल्व्हानियन डच शेतकरी, यांपैकी एकही सहीसलामत जिवंत येणार नाही.”

    “तुमच्या राजनिष्ठ मित्रांनी हे मुद्दाम सांगण्यासाठी पाठवले आहे का तुम्हाला?” हेन्नर तिरस्काराने म्हणाला.

    “मी माझ्या मनाप्रमाणे आले,” ती थोडी रागावून म्हणाली, “तुम्ही आता कोणासाठी, कशासाठी झगडत आहात, याची तुम्हाला काहीतरी कल्पना आहे का? ज्या ज्या लोकांनी तुम्हाला छळून घेतलं, असे तुम्हाला वाटते ती सारी माणसे आता बंडाच्या बाजूची झाली आहेत याची दखल आहे तुम्हाला?”

    “ही कसली बनवाबनवी चालली आहे आता?” हेन्नरने विचारले.

    “चला, आपण चालता चालता बोलू. ते जास्त सहज दिसेल,” ती म्हणाली, “माझं बोलणं खोटं वाटत असेल, तर स्क्वायर व शेरीफ यांनादेखील येऊन विचारायला हरकत नाही.”

    “ते होय? त्यांना काय विचारायचे! ते तर इरसाल राजनिष्ठ आहेत.” हेन्नर म्हणाला. पण तिने त्याला मागे वळवायला लावले तेव्हा त्याच्या मनात पुसटशी शंका निर्माण झालीच.

    “तीच तेवढी माणसे नव्हेत,” ती पुढे म्हणाली, “आजच माझ्या भावाकडून फिलाडेल्फियाहून पत्र आले आहे. तो क्वेकर हेजीस तुम्हाला माहीत आहे. त्यानेदेखील एक तुकडी उभी केली आहे, बंडखोरांना मदत करण्यासाठी!”

    “छट् त्यावर माझा विश्वास बसत नाही,” हेन्नरने ठासून सांगितले, “क्वेकर माणसाचं रक्तच मुळी कोमट असतं!”

    “एवढ्यानेच भागलं नाही,” ती शांतपणे सांगू लागली, “जहाजांचे व्यापारी समनेर आणि ब्लिस तुम्हाला आठवत असतील. तुमच्या मुलुखातील माणसांची मालमत्ता लुबाडणारे! आता त्यांनीदेखील स्वतःला देशभक्त म्हणवून घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांचे हस्तक तुमच्या पक्षाचे पाठीराखे झाले आहेत.”

    हेन्नर काही बोलला नाही. त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या बापाची फुटकी पेटी, त्यातून लुबाडून नेलेले सामान, आईबापांच्या आठवणींच्या नाहीशा झालेल्या अनेक वस्तू दिसू लागल्या. पण मिस् अॅमिटी निर्दयपणे तशीच पुढे सांगू लागली, “माझ्या भावाने तुम्ही ज्या जहाजावरून आलात त्या सेंट अँड्र्यू जहाजाच्या कप्तानाविषयीदेखील लिहिले आहे. आमच्या बंदरांची नाकेबंदी झाल्याबद्दल त्याला काय वाटते, माहीत आहे? तर देशभक्तीवर सात्त्विक संताप ! तोदेखील आता स्वातंत्र्यभक्त झाला आहे. आणि याच माणसाने उपाशी पोरांसाठी एका गरीब बाईच्या थाळीत दगडकाटक्या घालून तिला हाकलून लावले होते, असं तुम्हीच सांगत होता. तुम्हाला हे एकदा सारं कळून चुकावं म्हणून मी सांगितलं– जहाजाचा कप्तान, क्वेकर हेजीस, समनेर आणि ब्लिस, स्क्वायर रॉइड आणि शेरीफ– या असल्या माणसांसाठी तुम्ही उद्या बोस्टनकडे कूच करणार आणि उघड्या डोळ्यांनी मृत्यू स्वीकारणार!”

    “छट् साफ झूट आहे हे सगळे !” हेन्नर घोगरेपणाने म्हणाला. पण बाजूच्या एका खिडकीतून आलेल्या प्रकाशातून चालत असता त्याला तिचे उभार रेखीव नाक दिसले आणि ती सांगत आहे त्यातील अक्षर न् अक्षर खरे आहे अशी त्याला मनोमन खात्री वाटली.

    “आणि असल्या माणसांच्या स्वातंत्र्यासाठी तुमची ही सारी जीवघेणी धडपड !” त्याला खिजवीत ती म्हणाली, “आणि आता उद्या तुम्ही बोस्टन वाचवण्यासाठी कूच करणार! आणि याच बोस्टनने तुमच्या मुलखातील माणसांची कत्तल करणाऱ्या कप्तानाला निर्दोष सोडून दिले आणि तक्रार करणाऱ्यालाच तुरुंगात डांबले !”

    हेन्नरने विव्हळल्यासारखा आवाज केला व झट्‌दिशी चेहरा बाजूला वळवला. मॅसॅच्यूसेट्सहून बातमी आल्यापासून त्याने ती हकीकत आठवणीतून बाजूला ठेवण्याची सतत धडपड केली होती.

    “जर तुम्ही शहाणे असाल, तर बोस्टनला जायचा विचार सोडून द्या.” ती म्हणाली, “ही वसाहत, ही माती म्हणजेच तुमचं खरं घरदार आहे.”

    “तुमची जीभ म्हणजे सैतानाची जीभ आहे,” तो संतापाने शब्द फटकारत म्हणाला, “त्या यमदूताविषयीचा माझा संताप तुम्ही चांगलाच घुसळून काढलात ! मी सांगितली ती प्रत्येक गोष्ट त्यांच्या हातून घडली आहे. त्यात तीळमात्र काही असत्य नाही. त्यांचा गळा चिरडण्यासाठी माझ्या मुठीत सापडत नाही, म्हणून निराशेने कित्येक रात्री मी झोपेशिवाय काढल्या आहेत. आता तुम्ही येता आणि ती सारी माणसे आता आमच्या पक्षात घुसून बसली आहेत असं सांगता! ठीक आहे, बायबलमध्ये म्हटलंच आहे की जी माणसं आपल्या बाजूला असतात, ती विरुद्ध बाजूला असत नाहीत. आणि तुम्ही सांगता त्या माणसांची श्रद्धा जर माझी श्रद्धा ज्या गोष्टीवर आहे, त्याच गोष्टीवर आहे, त्याच गोष्टींवर असेल तर माझे काय, मी तोंड बंद ठेवीन आणि मूठ उघडी ठेवीन ! आणि त्या माणसांत जर काहीजणांना आम्हाला खरोखरच प्रामाणिकपणे मदत करायची असेल, प्राणार्पण करून स्वातंत्र्यसैनिकाचा मृत्यू स्वीकारायचा असेल, तर त्यांच्या खांद्याभोवती हात टाकून त्यांना पाठबळ द्यायचीदेखील माझी तयारी आहे. अगदी प्रत्यक्ष सैतान जरी आमच्या पक्षात आला, तरी आमच्या कार्याचे बळ, त्याची न्याय्य बाजू ही तीळमात्रही कमी होणार नाहीत. तेव्हा तुम्ही आता तोंडची वाफ आणखी दवडण्यात अर्थ नाही. ठरवल्याप्रमाणे आम्ही उद्या बोस्टनला कूच करणारच!”

    ती बराच वेळ न बोलता चालली होती. ती दोघेही आपल्याच विचारात इतकी गर्क होती की आपण स्क्वायरच्या घराजवळून पुढे गेलो आहो ही गोष्ट त्यांच्या ध्यानात आली नाही.

    “मीदेखील बंडखोरांपैकीच एक झाले आहे, असं मी सांगितलं तर तुम्हाला काय वाटेल? त्यामुळे तर तुमचे बोस्टनला जाणे रहित होईल ना? कारण मी ज्या बाजूला आहे, त्या बाजूसाठी तुम्ही तर खासच लढणार नाही.”

    “तुम्ही बंडखोर?” धक्का बसून हेन्नर म्हणाला, “छट् त्यावर माझा कधीच विश्वास बसणार नाही. काही झालं तरी इंग्लिश आहात—”

    “होय, मी इंग्लिश आहे खरी,” तिने लगेच उत्तर दिले, “आणि माझ्या इंग्लिश रक्ताला असह्य वाटाव्या, अशा पुष्कळच गोष्टी घडल्या आहेत. त्या माझ्याच देशाकडून घडल्या आहेत म्हणून काय झालं! करांचा बोजा, नाकेबंदी यांकडे एखाद्या वेळी दुर्लक्ष करता येईल. खुद्द इंग्लंडमध्येदेखील पार्लमेंटमध्ये अनेकांनी त्या गोष्टींना विरोध केला. पण येथील माणसांवर गोळ्या झाडून जी कत्तल झाली, त्यांच्या घरांची जी जाळपोळ झाली, ती मात्र स्वीकारून गप्प बसणे केवळ अशक्य होते. लेक्झिंग्टनला जो रक्तपात झाला, तेव्हापासून अनेक सच्चा राजनिष्ठांनीदेखील आपली मते बदललेली मला माहीत आहेत. आम्ही इंग्लिश माणसे ताठर असू, पण त्याचबरोबर आम्ही न्यायप्रियदेखील आहोत.”

    “न्यायप्रिय!” मोठ्या कष्टाने तो शब्द उच्चारत हेन्नर म्हणाला “म्हणजे तुम्ही फार न्यायप्रिय आहात असं तुम्हाला वाटतं तर!”

    मिस् अॅमिटी एकदम ताठरल्यासारखी झाली, हे हेन्नरला जाणवले.

    “मग आम्ही कसे आहोत, असं तुमचं मत आहे?” तिने विचारले.

    “सांगतो,” तिचं आव्हान स्वीकारत हेन्नर म्हणाला, “तुम्ही लोक वागायला बोलायला ठीक आहात, तुम्ही आपुलकीने बोलता, पण तुम्हाला तुमच्या वरच्या स्थानाचा, उच्च दर्जाचा मात्र कधी विसर पडत नाही. तुम्ही म्हणजे कोण? तर मालक, मालकीण. तुम्हाला खर्च करायला खूप पैसा हवा, झकपक ऐटबाज पोषाख, तालेवार रीतीभाती, डौलाचे दरबारी बोलणे आणि रात्री फार उशीरा झोपणे... हे सारं तुम्हाला पाहिजेच. आणि हे सारं करायला जो पैसा लागतो, तो ज्या धंद्यात मिळतो, तो धंदा तुमच्या दृष्टीने मोलाचा; मग तो चांगला का वाईट, हिताचा का अन्यायाचा हा प्रश्नच मुळी अप्रस्तुत असतो.”

    “तुमची जीभ बरीच वाहवत जात आहे, लेफ्टनंट,” ती गोठल्यासारख्या थंड शब्दात म्हणाली, “आणि झकपक पोषाखाविषयीचे बोलायचे तर तुमचे कपडे काही कमी भपकेदार नाहीत.”

    “होय, आहेत खरे, पण ते आहेत युद्धासाठी,” कबूल करीत हेन्नर म्हणाला. “पण त्या दिवशी देखील तुमच्या पोषाखात नखरा काही कमी नव्हता,” ती उसळून म्हणाली, “आणि मी म्हणते, तुम्ही आणि तुमचे लोक यांनी जर आयुष्यातील रुबाबदार आणि सुबक, कलात्मक गोष्टींकडे थोडे जास्त लक्ष दिले, तर तुम्हाला जास्त अभिमान आणि वजन वाटू लागेल, शिवाय मागाहून तक्रार करीत त्यांच्यापासून निसटण्याची धडपड करण्यासारखे अपमानाचे प्रसंगदेखील भोगावे लागणार नाहीत!”

    ती दोघे एकमेकाकडे रागाने पाहात होती. आता भोवती वस्ती संपून मोकळा भाग सुरू झाला होता व त्यांना रस्त्याच्या बरोबर मधून चालावे लागत होते.

    “तुमच्या रीतीभाती स्वीकारणे मला या आयुष्यात जमणार नाही,” तो म्हणाला.

    “आताच तुम्ही अनेक रीतीभाती स्वीकारल्या आहेत. तुम्ही काही अगदीच जहाजावर पाहिलेल्या ओबडधोबड आडदांड पोरासारखे राहिला नाहीत.”

    त्या शब्दांमुळे त्याने आपले ओठ घट्ट आवळून धरले, पण आपल्या या गप्पपणामुळे ती जास्तच अधीर झाली आहे असे त्याला वाटले.

    “आता आपण मागे फिरावे हेच बरे,” ती अगदी निवून गेल्याप्रमाणे म्हणाली.

    ती परतली आणि स्क्वायरच्या घरापाशी आली. तोपर्यंत कोणीच काही बोलले नाही, पण हेन्नरच्या मनात कसलीतरी खळबळ उडाली होती.

    -oOo -

    पुस्तक: स्वातंत्र्य आले घरा
    लेखक: कॉनराड रिक्टर
    अनुवाद: जी. ए. कुलकर्णी
    प्रकाशक: परचुरे प्रकाशन मन्दिर
    आवृत्ती दुसरी
    वर्ष: २०१०.
    पृ. १०३-१०७.
    (पहिली आवृत्ती: १९६८).

    ---

    संबंधित लेखन: वेचताना...: उठाव


संबंधित लेखन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा