-
जी. ए. कुलकर्णी यांनी USIS साठी (आता American Library) कॉनरॅड रिक्टर या अमेरिकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा अनुवाद केला होता. त्यांच्या नेहमीच्या पॉप्युलर प्रकाशनाऐवजी ‘परचुरे प्रकाशन मन्दिर’ कडून ही पुस्तके प्रकाशित झाली होती. रान (The Trees), शिवार (The Fields) व गाव (The Town) या तीन कादंबर्या मिळून एका कुटुंबाची, पर्यायाने एका वस्तीच्या स्थापना-विकासाची कथा सांगतात. ही The Awakening Land trilogy म्हणून ओळखली जाते. हे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या उदयकालावरचे रूपकच आहे.
या खेरीज ‘स्वातंत्र्य आले घरा’ (The Free Man) आणि ‘रानातील प्रकाश’ (The Light in the Forest) या दोन छोटेखानी कादंबरिकाही या संक्रमणकाळाच्याच कहाण्या सांगतात. या पांचातील सर्वात अदखलपात्र– होय, अ-दखलपात्र – पुस्तक आहे ते ‘स्वातंत्र्य आले घरा’ ही कादंबरिका. मूळ कथानक अत्यंत फिल्मी म्हणावे असे तर आहेच, पण जीएंचा अनुवादही अतिशय खरबरीत म्हणावा असा.
त्यांच्या पत्रव्यवहारात याबाबत उल्लेख आलेला स्मरतो. युसिसचे हे काम त्यांना प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांच्या शिफारशीवरुन मिळाल्याचा उल्लेख त्यांनी कृतज्ञतेने केलेला आहे. त्याला जोडूनच त्या काळात त्यातून मिळालेले पैसे किती मोलाचे होते याचाही उल्लेख येतो. कदाचित आयुष्यातील आर्थिकदृष्ट्या खडतर काळात हे काम झाले असावे.
आधी म्हटल्याप्रमाणे कथानक तद्दन फिल्मी म्हणावे असे आहे. सुरुवातीलाच एका हॉलिवुडी पद्धतीने जहाजावरुन याला-त्याला ढुशा देत एक तथाकथित डॅशिंग हीरो नव्या जगात प्रवेश करतो. येण्याच्या वाटेवर नि नव्या जगात आल्यावरही हीरोगिरीला साजेसे बाणेदारपण, बेडरपण मिरवित राहातो. अखेर ज्या स्त्रीशी – माफक – संघर्ष केला, तिच्याशी झालेल्या मीलनाने चित्रपट— आय मिन कादंबरी संपते. एकुणात या रुळलेल्या चित्रपटीय मार्गाने कथानकाच्या प्रवास होतो.
सुरुवात नि शेवट वर्तमानात नि मध्ये सारे कथानक निवेदनातून फ्लॅशबॅक पद्धतीने, सरधोपट एकदिश मार्गाने मांडलेले आहे. हे पाहता लेखकाचा उद्देशच चित्रपट-कथा लिहिण्याचा असावा असे म्हणता येते. हे पुस्तक प्रथम १९४३ मध्ये प्रसिद्ध झाले आहे. हा काळ हॉलिवूडमधील वेस्टर्न चित्रपटांचा उदयकाळ आहे. याचे कथानकही अशा चित्रपटाला साजेसेच आहे.
कथेला वरकरणी अमेरिकेच्या उदयकालाची पार्श्वभूमी असली, तरी त्या काळाच्या कोणत्याही अनुषंगांचा, घटनांचा कथानकावर निर्णायक असा परिणाम घडताना दिसत नाही. हे सारे कथानक अमेरिकेत न घडता, ऑस्ट्रेलियामध्ये किंवा कॅरॅबियन बेटांवर घडले असते, तरी कथा उभी राहिलीच असती. कोणताही प्रसंग वा व्यक्तिमत्व उणावले वा बिघडले नसते. कदाचित म्हणूनच रिक्टरच्या कथांवर पुढे ‘द सी ऑफ ग्रास’ (१९४७), ‘वन डिझायर’ (१९५५) हे दोन त्या काळाला सुसंगत म्हणता येतील असे चित्रपट निर्माण झाले असले, तरी या कादंबरिकेला ते साधले नाही. ‘द लाईट इन द फॉरेस्ट’ (१९५८) हा त्याच्याच कथेवरील चित्रपट मात्र अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांच्या निर्मितीनंतरच्या संस्कृती-संघर्षाच्या काळाला पडद्यावर आणतो.
थोडक्यात याला माझ्या मताने अमेरिकन उदयकालाचे प्रतिबिंब म्हणून, एका संक्रमणकाळाचा दस्तऐवज म्हणून शून्य किंमत आहे. पण या फिल्मी कथानकात एक प्रसंग मला सापडला जो तुमच्या-आमच्या वर्तमानाचे प्रतिबिंब दाखवतो. किंबहुना हे प्रतिबिंब कुठल्याही संक्रमणकाळाचे आहे असे म्हणता येईल. माणसांना एखाद्या संक्रमणाची चाहूल लागते, तेव्हा त्यांच्यात प्रथम चलबिचल होते. प्रथम जुन्याशी निष्ठा, मग संभ्रम नि अखेर नव्याची चाहूल बळकट होताना दिसते तेव्हा केलेला पक्षबदल, त्यामुळे नव्याचे वाढलेले बळ, नि त्यातून नवतेच्या आगमनाचा वाढलेला वेग— ही प्रक्रिया लौकिक आयुष्यातही वारंवार दिसते.
दुर्दैव हे की लेखकाने हे सारे निवेदनातूनच घडाघडा सांगून संपवले आहे. प्रसंग-मालिका, त्यांच्यातून निर्माण होणारे संघर्ष, बदलती नाती नि संबंध हे रंगवण्याइतकी तसदी त्याने घेतलेली नाही. परस्परविरोधी विचारांची किंवा थेट शत्रुत्वच बाळगणारी मंडळी जेव्हा एका झेंड्याखाली अपरिहार्यपणे एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील परस्पर-विश्वासाचा अभाव त्यांच्या नव-सामायिक ध्येयाला कसा बाधक ठरतो, हे मांडणे शक्य होते. नव्हे तर आवश्यकही होते. पण दुर्दैवाने ‘अवेकनिंग त्रयी’मध्ये त्याने विस्तारावर घेतलेले कष्ट इथे घेतलेले दिसत नाहीत.
हा माझ्या मते, एकमात्र दखलपात्र असलेला प्रसंग असा आहे— हा हेन्नर डेलिकर हा मूळचा पॅलॅटिनो डच/जर्मन; उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवून अमेरिकेत– पेनसिल्व्हानियामध्ये आणून कर्ज-दास (bonded-labour) म्हणून विकला गेलेला. (केवळ आफ्रिकनच तिथे गुलाम म्हणून विकले गेलेले नाहीत! ब्रिटिशांनी अनेक गरीब युरपिय राष्ट्रांतूनही गुलाम तिकडे नेले होते.) प्रसंगात त्याच्या सोबत आहे ती त्याची तेथील माजी मालकीण. तिच्या बंधनातून पळून गेलेला हेन्नर एका (रेड) इंडियन पाड्यावर राहात असतो. (हा संदर्भही अतिशय दुबळाच आहे. रेड-इंडियन्स ऐवजी इतर कुणीही– पेनसिल्वानियात नसलेले– ‘हिलबिली’ असते तरी फारसा फरक पडला नसता) राहतो. त्या पाड्यावर त्याने ब्रिटिशविरोधी बंडासाठी एक लहानशी सैनिक-तुकडी उभी केली आहे. जिचा तो लेफ्टनंट म्हणवून घेतो आहे. तिथे एका दुकानात काम करुन तो पैसे कमावतो नि तिचे देणे फेडतो. त्यानंतरचा हा प्रसंग आहे.
हेन्नरचा जर्मनी ते अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा जहाजावरचा प्रवास, त्यानंतर त्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या खर्चासाठी घेतलेले कर्ज, त्यातून आलेले कर्ज-दास्य, त्या दास्याविरोधात केलेले माफक बंड आणि अखेर मुक्तिच्या आशेने ब्रिटिशविरोधी लढ्याची साथ देण्याचा निर्णय; या सार्याच टप्प्यावर या ना त्या चेहर्याचे शोषक त्याला भेटले आहेत. त्यांच्या शोषणाचे (खरे तर फारच माफक नि वरवरचे म्हणता येतील) असे अनुभव त्याने स्वत: वा परभावे घेतले आहेत. त्यातून या सार्यांबद्दल त्याच्या मनात चीड आहे. कदाचित त्यांना धडा शिकवण्याची मनीषा देखील.
या प्रसंगातून अधोरेखित होणारा मुद्दा हा की क्रांती असो वा बंड, ते ध्येयाच्या दिशेने होत असले, तरी त्याकडे होणारी वाटचाल नि त्याची परिणती नेहमी अपेक्षित असते असे नाही. नव्या व्यवस्थेमध्ये पुन्हा जुन्या व्यवस्थेचीच बीजे सुप्त रूपाने रुजत जातात; कदाचित काही कालानंतर पुन्हा फोफावतात. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की ‘जे झाले ती खरी क्रांती होती की केवळ जुन्या व्यवस्थेने वेष-बदल केला?’
आपल्यासारख्या लोकशाही राष्ट्रात निवडणुकीच्या मार्गे पुन्हा जुने संस्थानिक, गल्ली-बोळातले चार-चव्वल पत असणारे ‘राजे’ नि संस्थानिकच पुन्हा पुन्हा सत्ताधारी होतात, तेव्हा हा अनुभव आपण पुन्हा पुन्हा घेत असतो. एवढेच नव्हे तर या राजसत्तेच्या ठेकेदारांचे नि स्थानिक आर्थिक सत्ताधारी नि बाहुबलींचे जाळे तयार झाले, तर नवी व्यवस्थाही जुन्या व्यवस्थेचे कात टाकलेले रूपच होऊन राहात असते. अशा परिस्थितीत तुमच्या-आमच्या मनातील हेन्नर हतबुद्ध होऊन, ‘आपण केलेल्या संघर्षातून नक्की काय साध्य केले?’ या विचाराने हताश, कुंठित होऊन राहातो.
-oOo -
‘स्वातंत्र्य आले घरा’ या पुस्तकातील उपरिनिर्दिष्ट वेचा: उठाव
अमेझिंग अॅमेझॉन वांझ राहा रे परतुनि ये घरा... - ३ : ययाती, बुधा आणि... माणूस परतुनि ये घरा... - २ : कांदिद, कालिदास, आणि आरती देवी परतुनि ये घरा ... - १ : पेराल्टा, ऑर्फियस आणि नचिकेता ‘ग्लॅड फॉर ग्लाड?’ : ग्लाड, वीरभूषण आणि मी दोन बोक्यांनी... I. P. L. (इंडियन पोलिटिकल लीग) स्वबळ की दुर्बळ दोन हजारची नोट आणि चाकावरची अॅन्टेना आपले राष्ट्रीय खेळ
गुरुवार, २७ मार्च, २०२५
वेचताना... : उठाव
संबंधित लेखन
कादंबरी
वेचताना
स्वातंत्र्य आले घरा

स्वातंत्र्य आले घरा (उत्तरार्ध)
<< पूर्वार्ध शिलरकडे जाऊन त्यांचे काम बघत बसणे मला फार आवडे. त्यांच्या दुकानाला येणारा कातड्याचा, खळीचा वास आवडे. दुकानातले शेल्फ लाकडी साच्यां...

स्वातंत्र्य आले घरा (पूर्वार्ध)
नव्या शतकाच्या सुरुवातीला कामगार वर्गातील जागृती आम्ही पाहिली. या काळात माणूस, यंत्र आणि संपत्ती यांच्या परस्परांशी असलेल्या नात्याची जाणीव आम्हाला हो...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा